आनंदी हे जग सारे

Be happy with small things

'' इत्तीसि हांसी ... इत्तिसि खुशी ....''

आज खूप दिवसांनी मैत्रिणींचा अड्डा जमला होता... आमच्या एका सुगरण मैत्रिणीने पाव भाजी मस्त गरमागरम, गाजर हलवा असे छान छान पदार्थ बनवले होते आणि आमचा ताव मारत मारत चर्चासत्र चालू होतं...  ' आयुष्य ' या विषयावर ...
कसं आयुष्य जगायला आवडेल आणि आपण कसे जगतोय यावर सगळ्यांची गाडी अडकली...प्रत्येकजण आपल्या सुखी जीवनाची व्याख्या रंगवत होती ...कोणाला मोठ्या गाडीतून मस्त फिरायचे होते , कोणाला रोज हॉटेल मधले पदार्थ खायचे होते तर कोणाला रोज रोज फिरायला जायचे होते...माझा फंडा अगदी साधा ...मला हवे ते हवे त्यावेळी करता यावे बास्स! म्हणजे फार काही नाही माझ्या आवडीचे पदार्थ खावे(साधा वरण भात असेल तर अगदी बहर येईल ), मस्त पुस्तक वाचावे ,हवं तेव्हा बाहेर मस्त चक्कर मारावी , वाटेल त्याला भेटून किंवा फोन करून गप्पा माराव्यात , लहान मुलांप्रमाणे बागदाव ...कधीतरी मस्त पावसात भिजावं बास्स इतकचं ...
' मी फारच अल्पसंतुष्ट आहे ' यावर सगळ्यांचं अगदी एकमत झालं . " काय ही तुझी दरिद्री लक्षणं ग , किमान मोठ्या गाडीतून फिरणं किंवा एखादा छान पदार्थ हॉटेल मध्ये जाऊन खावा हे म्हणायचं सोडून काय ते वरण भात..." 
" ह्या गोष्टींसाठी कशाला ग पाहिजे आयुष्य  वेचायला ...सध्या सुध्या गोष्टी या ...हाच का तुझा फंडा  ? "
"साधं सुध बोरिंग लाईफ ...त्यात काय ग मज्जा "
"लहान आहेस का आता , जरा मोठी हो ग ..."
आता अस्मादिक कसे गप्प बसणार ?आता तर हे गुपित उघड करावच लागेल म्हणून मी माझे फंडे पुराण उगळायला सुरुवात केली ...
" अगं सख्यानो...विचार करा आजकाल इतके प्रॉब्लेम्स वाढलेत त्यामुळे साधा वरण भात खाणं सुद्धा अवघड होत चाललंय ...जर तुम्ही जाड असाल आणि त्यात अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर कधीही आणि काहीही खाऊ शकाल का ? मस्त पुस्तक वाचत बसण्याची मनशांती ज्याला मिळते तो भाग्यवान नाही का ? आणि ती मिळवून देणारे आपल्या घरचेहि आपल्याला समजून हा आनंद मिळवून देतात हे काय कमी आहे का ? हवं तेव्हा फिरता यावं म्हणजे आपण स्वतः साठी जगणं , आपल्यात रमण ...हे ही खूप अवघड असतं ना आठवून बघा शेवटचं कधी असं भटकलात ...कोणाकडेही बिनधास्त जावं किंवा फोनवर मनसोक्त गप्पा मारण्याचा आनंद जेव्हा मिळतो तेव्हा समोरचाही आपल्या तितकाच जवळचा असतो. म्हणजे त्यालाही आपली किंमत असते ! असे लोक आपल्या आयुष्यात असणं म्हणजे पर्वणीच नाही का ...?
पावसात मस्त भिजाव असं खरंच तुम्हाला कधी वाटलं नाही का ? आणि लहान मुलांना बागेत खेळताना पाहून आपणही त्यात सामील व्हावं असं वाटल्याशिवाय राहिलाय का कोणाला ...?
तर मग आता खरं खरं सांगा असं साधं , सुंदर मनमुराद जगता येणे खरंच कोणाला नाही आवडणार ....? "
सगळ्याजणी गप्प बसून गाजराच्या हलव्याचा समाचार घेऊ लागल्या...सगळ्यांचे चेहरे थोडे विचारमग्न होते ...खरंच छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्यापेक्षा आपण उगीचच मृगजळामागे धावतोय हे बहुतेक सगळ्यांना पटलं होतं...
अचानक गडगडाट एकु आला ... पहिला पाऊस ...आम्ही सगळ्या क्षणाचाही विलंब न करता गच्चीवर पळालो आणि मस्त बरसणाऱ्या सरिंसोबत बेघुंद झालो ....
छोटया छोटया गोष्टींमधून मिळणाऱ्या आनंदाची सुरुवात तर झाली ....! 
'' इत्तीसी हसी , इत्तिसी खुशी 
इत्तासा तुकडा चांद का ...''
इतकचं पुरे असतं ना आनंद वेचायला ....!

तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या !


????स्मिता चिद्रवार( भोस्कर )