भारत भूमी ही संतांची भूमी आहे, महंतांची भूमी आहे. साधू, महात्मे, राजे, महाराजे, सरदार आणि सम्राटांची कर्तव्यभूमी आहे. या भूमीत अनेक राजे-राजघराणे उदयास आली आणि काळाच्या उदरात गडपही झाली. इथे अनेक युद्ध झाले, लढाया लढल्या गेल्या. हिच्यावर आक्रमणे झाली. हिचे वैभव अनेकांनी दोन्ही हातांनी लुटले, तर अनेकांनी अनेक वर्षे इथे सत्ता उपभोगली. पारतंत्र्याचा आणि गुलामीचा एक मोठा कालखंड या भारतभूमीने सोसला आहे.
आज जगात सगळीकडे अशांतता,अराजकता आहे.अनेक युद्धे विनाकारण लढली जात आहेत. मोठ्या महासत्ता छोट्या,छोट्या देशांचा घास घेवू पाहत आहेत.पण त्याच वेळी माझी ही माय भूमी आज संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देत आहे.
आज अशाच एका राजाची प्रेम कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. ज्याने एक छोट गणराज्य मिळवण्यासाठी फार मोठी लढाई लढली आणि त्या लढाईत खूप नरसंहार झाला. रक्ताचे पाट वाहिले, विधवा स्त्रिया आणि अनाथ मुलांच्या किंकाळ्या आणि हृदय द्रावक रुदनाने संपूर्ण आसमंत भरून गेला, पण त्या राजाला न त्याचे प्रेम मिळाले न ते छोटे गणराज्य आणि शेवटी उपरती होऊन, तो राजा महात्मा बुद्धांना शरण गेला आणि त्याने अहिंसेचा मार्ग अनुसरला.........
मगधच्या राजवाड्यातील गुप्तचरांच्या बैठकीत राजा अजातशत्रू अस्वस्थपणे चकरा मारत होता. अजातशत्रूला काहीही करून कसेही करून वैशाली हे गणराज्य जिंकायचे होते पण, अनेक वेळा वैशालीवर आक्रमणे करून सुद्धा अजातशत्रूला यश मिळाले नव्हते. कदाचित त्यामुळेच राजा अधिकच क्रोधाग्नि मध्ये जळत होता.
राजा -"वैशाली एवढेसे गणराज्य आणि मगध एवढे मोठे साम्राज्य तरीही प्रत्येक वेळी आम्हाला पराजयाचे तोंड पहावे लागते."
सेनापती -"महाराज आपले सैनिक लढाया करून थकले आहेत. त्यांना आरामाची,विश्रांतीची गरज आहे."
राजा -"लढाई हेच सैनिकाचे जीवन आणि युद्धभूमी हीच सैनिकांसाठी विश्रांतीची जागा. प्रत्येक सैनिकांन हृदयाच्या अखेरच्या ठोक्यापर्यंत, शरीरातील शेवटच्या श्वासापर्यंत,अन रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढले पाहिजे. तीच त्याची मुक्ती. महामंत्री युद्धाची तयारी करा, यावेळी आम्ही स्वतः युद्धाचे नेतृत्व करू आणि वैशालीला जिंकू."
राजा अजातशत्रूने चिलखत, शिरस्त्राण असा सैनिकाचा वेश धारण केला. राजमातेला भेटायला ते गेले परंतु राजमातेला सुद्धा युद्ध अजिबात आवडत नसे. तसे त्यांनी आपले पती बिंदुसार आणि आता पुत्र अजातशत्रू यांना वारंवार सांगून, विनंती करूनही त्या दोघांनी राजमातेची विनंती धुडकावली होती.
राजा -"राजमाता यावेळी आम्ही स्वतः वैशालीवर आक्रमण करणार आहोत. आम्हाला विजयाचा आशीर्वाद द्या आणि राज तिलक लावून लढाईची संमती."
राजमाता -"महाराज वैशालीच्या सैनिकांना कमी लेखू नका. ते सैनिक एखाद्या साम्राज्यासाठी किंवा राजासाठी लढत नाहीत तर स्वातंत्र्यासाठी आणि स्वतःच्या सार्वभौमत्वासाठी लढतात. तुमच्या पिताश्री महाराजांनी पण वैशालीवर चढाई केली होती पण, विजय मात्र लिचवि सेनेचा झाला."
राजा -"माते आम्हाला माहित आहे वैशाली तुमची मातृभूमी आहे म्हणून, वैशाली बद्दल तुमच्या मनात गाढ श्रद्धा आहे. पण तुम्ही आता हे कदापि विसरू नये की, तुम्ही मगधची महाराणी आणि मगधच्या जनतेची राजमाता आहात. येतो आम्ही."
अजातशत्रूने वैशालीवर आक्रमण केले. वैशालीच्या नागरिकांना दवंडी पिटून मगधच्या आक्रमणा बद्दल सांगण्यात आले. वैशालीच्या सीमेवर तुंबळ युद्धाला सुरुवात झाली. रणभरी, नगारे, दुदुंभी, तुतारी,त्याचबरोबर तलवारींचे टणत्कार, हत्तींचे चित्कार,घोड्यांच्या किंकाळ्या, सैनिकांच्या आरोळ्या, किंचाळ्यांनी आसमंत निनादू लागला. या भयानक रणसंग्रामात अनेक सैनिक धारातीर्थी पडले. काही अपंग झाले, आणि मोडक्या तुटक्या शस्त्रांचा नुसता खच पडला होता. राजा अजातशत्रू गंभीररित्या जखमी झाला होता. मगधची सेना परत एकदा परास्त झाली होती. जीव वाचवण्यासाठी अजातशत्रूने वैशालीमध्ये प्रवेश केला. तिथेच त्याची भेट आम्रपालीशी झाली.
आम्रपाली अजातशत्रूला स्वतःच्या महालात घेऊन गेली.
आम्रपाली -"सैनिक नाव काय तुझं?"
राजा -"सैनिकाला नाव नसतं, असत फक्त कर्तव्य, युद्ध किंवा मरण हेच त्याचे जीवन."
आम्रपाली -"सैनिक तू माझ्या वैशालीसाठी लढलास, माझ्या मातृभूमीसाठी तू जिवाची बाजी लावली, माझ्या मातृभूमीसाठी तू स्वतःच रक्त सांडल आहे. तू वंदनीय आहे. तू पूजनीय आहे. तू महान आहेस सैनिक.
दासी या वीर योद्ध्याची काळजी घ्या. वैद्य राजांना बोलवा. माझ्या वैशालीसाठी जिवाची बाजी लावणाऱ्या सैनिकाचा जीव वाचलाच पाहिजे."
( दासी अजात शत्रूला चिकित्सालयात वैद्य राजांकडे घेऊन गेल्या.)
आम्रपाली स्वतः जातीने अजातशत्रूची काळजी घेत होती.
आम्रपाली वैशाली गणराज्याची राजनर्तकी होती. दिसायला अतिशय देखणी, सौंदर्याची मूर्ती, नितळ गौर कांती, प्रमाणबद्ध शरीर, मृगनयनी डोळे, सुंदर धारदार नाक, विपुल काळा केश सांभार, आणि त्यासह व्यवहार कुशल,चणाक्ष, गायन, नृत्य आणि कविता करणारी आम्रपाली जणू स्वर्गलोकीची अप्सराच.
वैशालीच्या वसंतोत्सवात आधीच्या राज नर्तकीच्या नृत्यातील चूक दाखवून आम्रपाली वैशालीची राज नर्तकी झाली होती. नगर प्रमुखांनी आम्रपालीला राज नर्तकी घोषित करण्याआधी तिची ओळख विचारली, तेव्हा तिने माझे आई-वडील सर्वस्व वैशालीच आहे, आणि वैशाली मला प्राणहून प्रिय आहे असं सांगितलं. त्यावेळी नगरजनांनी टाळ्यांच्या कडकडाडात वैशालीचा आणि आम्रपालीचा जयघोष केला होता.
घायाळ अजातशत्रूची सेवा करता करता आम्रपाली त्याच्या प्रेमात घायाळ झाली होती.अजातशत्रूसारखा देखणा, राजबिंडा वीर पुरुष, देशभक्त, स्वाभिमानी आम्रपालीला आवडला नसता तरच नवल! अजातशत्रू पण आम्रपालीच्या आरसपानी सौंदर्यावर भाळला होता. परंतु अजातशत्रूंने घातपाताच्या भयान स्वतःची खरी ओळख आम्रपालीला सांगितलीच नाही. आम्रपाली सैनिकाच्या प्रेमात आकन्ठ बुडाली होती. तिला त्याच्याशिवाय काही सुचेना, तिचं जगणं, श्वास घेण, नृत्य, गायन, सर्व सर्व तिच्या प्रिय सैनिकासाठी होतं. अजातशत्रूही आम्रपालीच्या प्रेमाचा स्वीकार करत तिच्यावर जीव टाकायला लागला होता. पण म्हणतात ना फुलाचा सुगंध, नदीचा प्रवाह आणि प्रेमाची धग कितीही लपवली तरी लपत नाही.
वैशालीच्या प्रत्येक नागरिकाच्या तोंडी आम्रपाली आणि सैनिकाची प्रेम कहाणी होती. नगर प्रमुखाने आम्रपाली आणि अजातशत्रूला भेटायला बोलावलं..
नगरप्रमुख -"आम्रपाली, सैनिक मी जे ऐकलं ते खरं आहे का?"
आम्रपाली -"होय, हा आपल्या वैशालीचा वीर सैनिक आहे आणि माझं ह्याच्यावर प्रेम आहे.
नगरप्रमुख -"तुझं काय म्हणणं आहे सैनिक?"
राजा -"प्रेमाला कबुली द्यावी लागत नाही. हवा दिसत नाही परंतु ती असते. तसेच प्रेमाचे आहे."
नगरप्रमुख -"आम्रपाली तु जा मला सैनिकाशी एकट्यात बोलायचं आहे, सैनिक तुला माहिती आहे तू अगदी अजातशत्रूसारखाच दिसतोस!"
राजांन कुठलंच उत्तर दिलं नाही.
नगरप्रमुख -"मी तुला बंदी बनवून मगधला घेऊन गेलो तर?"
राजा -"निशस्त्र सैनिकावर वार करणं युद्धनीती नव्हे!"
नगरप्रमुख -"पण राजनीति तर आहे ना!"
राजा तिथून निघून मगधला परत गेला. इकडे आम्रपाली सैनिकाच्या विरहात पोळून निघाली. तिला अन्न गोड लागेना, तहान-भूक, रात्रीची झोप,दिवसाची दिनचर्या सगळं सगळं ती विसरली. प्रेमातूर आम्रपालीला केवळ आणि केवळ सैनिकाचा ध्यास लागला होता. ती विरहिणी झाडा-वेलींना, पाना-फुलाना तीच्या दासी-सख्यांना सांगत होती. वारंवार पटवून देत होती की, \"प्रेमा इतकी दुसरी कुठलीच भावना उदात्त नाही. प्रेम माणसाला दुसऱ्यासाठी जगायला शिकवत, त्याग, समर्पण, विनम्रता करूणा, दया या भावना मग आपोआपच त्या व्यक्तीच्या अंतर्मनात फुलून येतात.\"
काही दिवसांनी राजा-अजातशत्रू वैशाली नगरात आम्रपालीला भेटायला परत आला.आम्रपालीने त्याच्याकरता सुंदर नृत्य केलं. त्याच्या विरहातील तिने स्वतःची मनोवस्था त्याला निवेदन केली. पण यावेळी मात्र अजातशत्रूला आम्रपालीशी खोटे बोलवत नव्हते. तिच्या निस्सिम प्रेमाची तो प्रतारणा करतो आहे, अशी बोच त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. न राहून शेवटी अजातशत्रूंने स्वतःची खरी ओळख आम्रपालीला करून दिली.
आम्रपाली -"सैनिक तू एवढे दिवस कुठे गेला होतास? तुझ्याशिवाय एक एक क्षण युगांयुगानहून मोठा होता. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही."
राजा -"आम्रपाली मी सैनिक नाही."
आम्रपाली -"सैनिक नाही मग कोण आहेस? पुरे झाली आता गंमत. चल नौका विहारास जाऊ."
राजा -"अंबा ऐकना! मी वैशालीचा सैनिक नाही. मगधचा राजा अजातशत्रू आहे."
आम्रपाली -"तुझं आपलं काही तरीच.आता चेष्टा बंद कर आणि लवकर चल."
राजा -"अंबे अग तुझ्या गळ्याची शपथ. मी अजातशत्रू आहे. मगधचा सम्राट अजातशत्रू!"
आम्रपाली -"(रागाने) काय? म्हणजे एवढे दिवस तू माझ्याशी खोटे बोललास? माझ्या भावनांशी खेळलास? माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं? आम्रपालीने एका वैर्यावर, शत्रूवर प्रेम केलं? मला माझ्या प्रेमाची, स्वतःची घृणा वाटते. (राजाकडे बघून) निघून जा! माझ्या मनातून, आयुष्यातून, भवनातून, माझ्या वैशाली मधून निघून जा! निघून जा आणि परत कधी येऊ नकोस. आत्ताच्या आत्ता माझ्या जीवनातून चालत हो!!"
संतापाने आम्रपाली थरथरत होती. तिच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या वाक्यांनी,अजातशत्रूच्या शब्दांनी,आम्रपालीवर वज्राघात झाला होता. एकाच वेळी राग, संताप,आत्मग्लानिने आम्रपाली थरथरू लागली. संतापारितेकाने तिने अजातशत्रूला तिच्या भावनातून जाण्यास सांगितले.
ती नगर प्रमुखा कडे गेली. तिला स्वतःचा खूप राग येत होता. स्वतःविषयी तिच्या मनात घृणा उत्पन्न झाली आणि अजातशत्रू विषयी तिरस्कार.
आम्रपाली -"नगरप्रमुख मी राज नर्तकीपदाचा त्याग करते आहे."
नगरप्रमुख -"कारण तुझ अजातशत्रूवर प्रेम आहे. तुला मगधची महाराणी व्हायचं आहे."
आम्रपाली -"नाही !नाही हे साफ खोट आहे. त्याने मला दगा दिला आहे, अंधारात ठेवल आहे. माझं प्रेम फक्त माझ्या वैशालीवर आहे."
नगरप्रमुख -"आम्रपाली खोट बोलू नकोस! तुझ्या या गुन्ह्यासाठी नगरजनांनी तुला देहांत शासन करायचं ठरवलय."
आम्रपाली -"माझ्या वैशालीच भलं होणार असेल, माझ्या देहांत प्रायश्चीत्याने नगर जन सुखी होणार असतील तर, मला हे मान्य आहे."
आम्रपाली त्या वधस्तंभाकडे जायला निघाली पण, तेवढ्यात अजातशत्रूने वैशालीवर आक्रमण केलं. त्याचे सैनिक आणि अजातशत्रू तिथेच आला जिथे आम्रपाली देहांत शासन घेत होती.
राजा -"थांब अंबे! थांब. अग मी जिंकलो. मी आज वैशालीवर विजय मिळवला. आता आपल्या दोघांमध्ये कोणीही येणार नाही."
आम्रपाली -"काय माझी वैशाली हरली? माझ्या वैशालीचा पराजय झाला? नाही!"
राजा -"तू म्हणाली होतीस ना तुला आजन्म वैशालीतच राहायचे आहे. आता तू वैशालीची राज नर्तकी नसून, मगध आणि वैशालीची महाराणी आहेस."
आम्रपाली -"माझ्यासाठी तुम्ही अजून काय काय करणार? एका स्त्रीसाठी इतका नरसंहार? माझे गणराज्य पडले, लिचवी सेना हरली, अमानुष रक्तपात झाला, शेकडो सैनिक मारले गेले, त्यांच्या विधवा स्त्रिया, अनाथ मुलं आणि वीर सैनिकांच्या मातांच्या आक्रोशाने, रुदनाने माझे हृदय पिळवटून निघाले आहे. मला प्रेम नको, मला राज्य नको, मला ही वेदना असहनीय होते आहे. मला शांती हवी आहे. चिरंतन शांती!"
आम्रपाली शांतीच्या शोधात, अहिंसेच्या शोधात भगवान बुद्धांजवळ पोहोचली.भगवान बुद्ध त्यावेळी वैशालीच्या सीमेजवळील एका विहारात प्रवचन देत होते. आम्रपाली आत्मग्लानीने आणि आत्मघृणेने त्यांच्या चरणी लीन झाली आणि तिच्यापाठोपाठ अजातशत्रू सुद्धा धम्मात समाविष्ट झाला. पुढे त्यांनी अनेक वर्षे संघाची आणि धम्माची सेवा केली आणि प्रचारही केला. हिंसेवर अहिंसेने विजय मिळवला.
ऐतिहासिक विषयावर लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे चूक भूल झाल्यास क्षमस्व.
©® राखी भावसार भांडेकर.
जय हिंद.
**********************************************
सदर कथा ही संपूर्णतः काल्पनिक असून केवळ वातावरण निर्मितीसाठी ऐतिहासिक घटना आणि पात्रांचा या कथेमध्ये उपयोग करण्यात आलेला आहे. इतिहास असाच घडला असेल असा लेखिकेचा दावा नाही.
*******************************************
संदर्भ
संदर्भ
फोटो साभार गुगल.
1.एनसीईआरटी चे इतिहासाचे सहावीचे पुस्तक.
2.वैशाली की नगरवधू लेखक आचार्य चतुरसेन शास्त्री.
4.लेख टंडन दिग्दर्शित आम्रपाली सिनेमा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा