आम्ही पुणेकर...

राज्यस्तरीय करंडक स्पर्धेदरम्यान घेतलेला अनुभव


आम्ही पुणेकर…..

राज्यस्तरीय करंडक स्पर्धा पहिला अनुभव

मैत्रीणीचा (प्रज्ञाचा), फोन आला इरा वर राज्यस्तरीय जिल्हा करंडक स्पर्धा आहे, तु भाग घे पुणे संघातून. खरतर ती ही पुण्याची पण आता सासर पुण्याच्या बाहेर असल्यानं तिला या सदरात लिहता येणार नव्हतं. मी काय सासर - माहेर दोन्ही पुण्यातच त्यामुळे पक्की पुणेकर. ( खवय्ये, चांगल्याचं कौतुक, वाईटाचा राग, स्पष्ट बोलून व्यक्त करणारी, एक ते चार वामकुक्षी घेणारे, किमान शब्दात कमाल अपमान अशी सगळी बिरुदं अभिमानाने मिरवणारी मी एक पुणेकर???)

अग, कसं शक्य आहे ते? मी तर आतापर्यंत कधीच लिहलं नाही इरावर, मला तर काहीच माहित नाही. त्यात श्रावण महिना मंगळागौर प्रॅक्टिस आणि कार्यक्रम यात मी बिझी, लिहणं होईल कि नाही काय माहीत? आणखी म्हणजे ग्रूप सोबत काम करायचे प्रत्येकाची वेगळीच तर्‍हा नाही होणार ग मला. मी माझा निर्णय तिला सांगून टाकला.

सगळं जमेल ग तुला, करशील तू खात्री आहे मला, मी लिंक पाठवते आधी जॉईन हो. ( आपल्यापेक्षा जास्त आपल्या मैत्रीणींनी आपल्याला ओळखावं यातच मैत्रीची व्याख्या पुर्ण होते, हो कि नाही?)

एकदा का स्पर्धेत उतरायचं ठरवलं कि ते अगदीतनमनाने, सर्वस्व पणाला लावून हे आत्ताच नाही हं आमचा इतिहास हेच शिकवतो आम्हाला. पाठ दाखवणं आमच्या रक्तातच नाही. मग ठरवलं रात्रीचा दिवस झाला तरी चालेल (दुपारची झोप शाबूत ठेवून ?) हर हर महादेव म्हणत पुजा सारथ्य करत असलेल्या जहाजावर स्वार झाले. त्यात आधी खिंड लढलेले कल्पना, कविता, सुप्रिया, सायली, प्रशांत सर, ॠषी सारखे निष्णात आणि अंजली, विशाखा, शिल्पा सारखे धुरंधर लेखणीची तलवार घेऊन सज्ज होते. त्यांना बघून माझा जीव भांड्यात (शाईच्या?) पडला. पुण्याला जिंकवायच्या नादात वेडात मराठे वीर दौडले सात नाही…. एकसाथ. ✌️✌️??
पहिलीच फेरी लघूकथेची मग पहिल्याच आघाडीवर मला लढायला लागलं. ती मोहीम यशस्वीपणे पार पाडत आम्ही लघुकथाकार मागे सरणार एवढ्यात स्पर्धा कवितेची दुसरी चाल आली मग पुन्हा हातातील लेखणी सरसावली आणि ती चाल ही पार पडली. आता पुढची चाल होती ती कथा मालिकांची ती लढण्याचा माझा पिंड नव्हता म्हणून मग मी बॅकफूटवर आले तसे कथामालिका लिहणारे लढवय्ये सरसावले. ती भिंत पार करेल पर्यंतच वादविवादाचे विषय आले आणि "अमृततुल्य" चहाच्या घोटा बरोबर चर्चेला रंग चढला. रूढी-परंपरांचा जाज्वल्य अभिमान असणा-या आम्ही पुणेकरांनी फॅशन सोयीसाठी आहे हे सिद्ध करण्यासाठी लेखन कौशल्याची पराकाष्ठा केली. शेवटी कसं ना आपला शब्द खरा करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आणि कोणत्या गोष्टींवर किती वाद घालायचा याचं कसब आमच्या नसानसात भिनलयं. व्हिडिओ साठी पुन्हा सर्व जण आपापले मोबाईल घेऊन सज्ज झाले, आपलं कसब पणाला लावत शेवटचं टास्क पुर्ण करत, एक मोठा निश्वास सोडत सगळेजण रिलॅक्स झाले.

स्पर्धा पार पडली, खरं सांगू का टश्शन असल्याशिवाय स्पर्धा ही स्पर्धा वाटत नाही. प्रत्येक संघ आपापल्यापरीने बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धा म्हटली कि कोणीतरी हरणार कोणीतरी जिंकणार हे अलिखित सत्य असतं ते तेवढ्याच खिलाडू वृत्तीने घ्यायचं असतं. एक मात्र खरं यातून मिळणारे अनुभव, आनंद खुप काही देऊन जातात, कायमचे स्मरणात राहतील असे.

सोप्पं नसतं ग्रुप मध्ये सर्वांना सामावून घेत एखादी स्पर्धा करणं. त्यात आम्ही पुणेकर आपापल्या मतावर ठाम असणारे, सहजासहजी बदल न स्वीकारणारे, नितीमुल्य जपणारे, कुठलाही आडपडदा न ठेवून स्पष्ट बोलणारे. बरं यातही अजून (ग्रुप मध्ये) कुणी चितळेंच्या बाकरवडी सारखे खुसखुशीत, कुणी वैशाली च्या डोश्यासारखे कुरकुरीत, कुणी सुजाता च्या मस्तानी सारखे थंडगार, कुणी बेडेकरांच्या मिसळी सारखे झणझणीत, कुणी काका हलवाई च्या मोदकासारखा गोड, तर कुणी जोशी वडेवाल्यांच्या वड्या सारखे गरमागरम, कुणी मुरलीधराच्या उसाच्यारसा इतके मधूर …… तर कुणी…. अजून ही खुप उपाधी दिल्या असत्या पण तुमच्या तोंडातील लाळ फोनवर पडते कि काय अशी शंका आली म्हणून बास करते.?????

तर अशी ही आमची पुणेरी, लई भारी टिम तुम्हाला दिसलीच असेल कथा, कविता, व्हिडिओ च्या माध्यमातून, हो ना? स्पर्धा संपली तरी मैत्रीचे ऋणानुबंध जपणारे आम्ही पुणेकर, आमच्या पुणेरी पाट्या प्रमाणे नेहमीच चर्चेत राहू.

ता.क. : स्पर्धा सगळीकडेच असते, जे विनर होतात त्यांना ट्रॉफी मिळते पण इरा च्या ट्रॉफीचं कसं झालयं माहित आहे का एखाद्या सुंदर तरुणीच्या कुणीही बघताक्षणीच प्रेमात पडावं तसं इथे लिहणारा प्रत्येक लेखक तिच्या प्रेमात पडलाय, प्रत्येकाची अभिलाषा तिला आपल्या टेबलवर विराजमान करण्याची, त्याला मी तरी अपवाद कशी असेल ना? (उगाच ताकाला येऊन भांड लपवायला मला नाही बाई जमत, म्हणून सांगून टाकलं एकदाचं! ???)

हुश्श ऽऽऽऽऽ

@शब्दनक्षत्र ?
©️®️स्वाती सासवडकर कुंभार