आम्ही लग्नाळू भाग 2

चिडका राघव आता गावाला जाणार का? राघवचे लग्न होईल का?



आम्ही लग्नाळू भाग 2

मागील भागात आपण पाहिले की सुला आक्का आपल्या भावाकडे अचानक आली. सर्जाला काही कळेना की असे काय झाले असावे? त्याने बहिणीला विचारले की काय झालेय? आता पाहूया पुढे.


पारू आणि सुदामराव हसत असलेले पाहून सुला आक्का चिडली,"पारू आग हासतीस काय? हित माझ्या जिवाला घोर लागलाय नुसता."


आपले हसू कसेबसे आवरत पारू म्हणाली,"वन्स आव हासू नको तर काय करू? येवढ्या कमावत्या आणि चांगल्या पोराच्या लग्नाची कशापायी एवढी चिंता करताय."


सुला म्हणाली,"सर्जा,ते काय नाय. तू राघुला फोन करून बोलाव आन काय त्यो सोक्षमोक्ष लाव बाबा."


सर्जा म्हणाला,"पारे फोन आन. लगीच बोलवतो त्याला हिकड."

पारू म्हणाली,"आव,राघव मोठ्या कंपनीत हाय. त्याला काय सुटी बिटी नग का मिळायला."


सर्जा चिडला,"फोन आन लवकर."

सर्जाने फोन लावला. पलीकडून काहीतरी इंग्लिश भाषेत गाणे वाजू लागले आणि फोन बंद झाला. तसा सर्जाने परत फोन लावला.


इकडे राघवच्या रूमवर सगळे झोपलेले होते. वाजत असलेला फोन पाहून पार्थ ओरडला,"ये ढोल्या,उठ लवकर. किती वेळ फोन वाजतोय."


राघवने डोळे चोळत फोन घेतला. तोपर्यंत फोन कट झालेला.

तर मंडळी हा आपला हिरो राघव सुदाम पाटील. मुक्काम पोस्ट पारगाव. आय. आय. टी. इंजिनियर आणि सध्या पुण्यात भल्या मोठ्या पॅकेजची नोकरी करणारा. सालस,नाकासमोर चालणारा पोरगा. सध्याच्या भाषेत अगदी मॅरेज मटेरियल पण... आता हा पण काय याचे उत्तर फोन संपला की मिळेलच.



राघवने फोन उचलला आणि मामाचे नाव पाहून बाहेर जाऊन बोलू लागला,"हॅलो,बोल मामा. काय म्हणतोस?"


सर्जा म्हणाला,"राघू तू काय चालवलं हाय हे?"

राघव म्हणाला,"कुठे काय? मी काय केले मामा?"

सर्जा चिडला,"आर चार वरीस झालं नोकरी लागून तरी तू काय करीत न्हाय. काय भानगड नाय नव्हं?"


राघव तरीही भोळेपणाने म्हणाला,"मामा आरे नोकरी तर नीट करतोय की. पगार पण वाढलाय."


सर्जा आता सटकला आणि म्हणाला,"हे बग राघू तुझ लगीन झाल पायजे यंदा. आर नकट्या सुमीच्या पोराचबी लगीन झालं."


राघव शांतपणे म्हणाला,"मामा आरे पण कोण ही नकटी सुमी? तिच्या पोराचे झाले म्हणून मी करायचे कसेल लॉजिक हे."


सर्जा म्हणाला,"उद्या शुक्रवार आन नंतर शनवार आन रयवार तुला सुट्टी आसल ना. तू हीकड ये. मला बोलायचं हाय."


राघव म्हणाला,"मामीकडे दे फोन. तिला सांगतो मी समजावून."


तेवढ्यात मागून सुला आक्का बोलू लागली,"नग बोलू बाबा त्याला. आपलाच दाम खोटा तर काय करणार."


तशी पारू फोन घेऊन बाजूला गेली,"हिकड लई तापलं हाय वातावरण. तुमि ह्यायेळी येतो म्हणा."


हो नाही करता करता राघव मामाकडे जायला तयार झाला.


इकडे जासुस पार्थने सगळे बोलणे ऐकले होते. राघवने फोन ठेवताच पार्थ म्हणाला,"हे राघवा,ह्या कलियुगात तुझा तारणहार हा पार्थ असेल लक्षात ठेव."


राघव चिडून म्हणाला,"आता उद्या संध्याकाळी गावी जायचे आहे."


पार्थ म्हणाला,"चल की मग मस्त फिरून येऊ."


राघव चिडून म्हणाला,"फिरून काय येऊ? गाडी दुरुस्तीला दिलीय माहिती आहे ना. शिवाय हे असले मळकट जीन्स आणि शर्ट घालून गेलो तर मामा आधी उद्धार करेल माझा."


पार्थ हसून म्हणाला,"चिडक्या गोलू,चल शॉपिंग करू."


नाक मुरडत का होईना राघव कँपात आला. एका मस्त दुकानात शिरले. तिथे एक सुंदर मुलगी सेल्स काऊंटर सांभाळत होती.


पार्थला पाहून ती मुलगी छान हसून म्हणाली,"या ना सर काय दाखवू?"


पार्थ तिला म्हणाला,"माझ्यासाठी नाही. यांच्याकरिता दाखवा."


ती मुलगी थोडी थांबली आणि राघवला आपादमस्तक पहात म्हणाली,"सॉरी सर,आम्ही डबल एक्स एल साईज नाही ठेवत."


तिचे बोलणे ऐकून इतर सेल्सगर्ल्स पण हसू लागल्या. त्यावर राघव चिडून तिला म्हणाला,"डबल एक्स एल कोणाला म्हणाला तुम्ही."


असे म्हणून चिडून दुकानातून बाहेर आला. पार्थ त्याच्यामागे पळत बाहेर आला,"रघ्या थांब. आरे तिने फक्त पाहून अंदाज लावला."


त्यावर राघव म्हणाला,"म्हणून काय ती मला डबल एक्स एल म्हणणार का? आता अजिबात सेल्सगर्ल्स असलेल्या दुकानात नको जायला."


दुसऱ्या दुकानात सगळे पुरुष सेल्समन होते. राघवने छान जीन्स पसंद केली. ट्रायल रूम मधून बाहेर आला तर जीन्स काही बसेना.


त्यावर तिथला एक सेल्समन हसून म्हणाला,"साहेब लग्न मानवलेले दिसते. ढेरी चांगलीच वाढलेली दिसते."


राघवच्या कानातून गरम वाफा बाहेर पडताना पार्थला दिसू लागल्या. शेवटी एकदाची खरेदी आटोपून आणि दुसऱ्या दिवशीची तालुक्या पर्यंत जाणाऱ्या एस टी बसची चौकशी करून दोघे परत आले.



दिवसभराच्या मीटिंग आटोपून पार्थ आणि राघव संध्याकाळी एस. टी. स्टँडवर पोहोचले. ग्रामीण भागात लहानपण गेलेल्या राघवला आता एस. टी. नको वाटत होती.

दोघेही गाडीत बसले आणि एस. टी सुरू होणार तेवढ्यात,"आव मास्तर थांबा,मला यायचं हाय."


असा एक कडक आवाज आला आणि गाडी थांबली. भाषेवरून एखादी आजी किंवा मध्यमवयीन ग्रामीण बाई असेल असे राघव आणि पार्थ दोघांना वाटले.


तेवढ्यात एक सुंदर मुलगी वर चढली,लाल रंगाचा पंजाबी ड्रेस,लांबसडक केस आणि टपोरे डोळे.


तिला बघताच राघवच्या मनात व्हायोलिन वाजू लागले आणि राघव चक्क गाणे म्हणू लागला,"चांद मेरा दिल,चांदणी हो तुम!"


राघव मोठ्याने गात असताना आख्खी एस. टी.मधली माणसे शांत झाली.


काय होईल पुढे? कोण असेल ही मुलगी? प्रवासात काही घडेल का?

वाचत रहा.
आम्ही लग्नाळू .
©® प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all