आम्ही लग्नाळू भाग 4

राघव आणि शालू गावात पोहोचले आता पुढची मजा बघू



आम्ही लग्नाळू भाग 4

मागील भागात आपण पाहिले की राघव आणि पार्थ रात्रीच्या अंधारात शालू आणि सुमन बरोबर गावात जायला निघाले. आता हा प्रवास कसा होईल आणि पुढे काय गंमत येईल.पाहूया पुढे.


थोडा वेळ चालत पुढे गेल्यावर अचानक पार्थला ठेच लागली आणि तो ओरडला,"आई ग!"

तशी सुमन पटकन मागे आली आणि म्हणाली,"काय झाले? फार लागले का?"

असे म्हणून तिने पटकन पार्थला हाताला धरून उभे केले.

पार्थ हसला,"थँक यु. इतके काही लागले नाही."

तेवढयात शालू म्हणाली,"अय शारुक दीपिका चला आता लवकर."

राघव आणि शालू पुढे चालले होते. एवढ्यात अचानक अंधारातून एक कुत्रा सुसाट वेगाने बाहेर पडला आणि शालूने पटकन जाऊन राघवच्या दंडाला घट्ट पकडले.

कुत्रा गेला तसे खाकरत सुमन म्हणाली,"कुत्रा गेला. चला आता पुढे."

तसे शालू पटकन बाजूला झाली,"हा,ते कुत्र्याची भीती वाटती मला."

सगळे अंधारात कसेतरी गावाजवळ पोहोचले. लवणात आल्यावर रेंज आली आणि शालू आणि राघव दोघांचे फोन एकदम वाजले.

राघव म्हणाला,"मामा अरे येतो आम्ही चालत. मित्र आहे बरोबर."

शालू म्हणाली,"मावशी आपण कोणाच्या बापाला घाबरत नाय. येते म्या तवर मस्त खायला कर."


चौघेही गावात आले. थोडे चालून गेल्यावर शालू म्हणाली,"सुमे,आल बग मावशीच घर."

तसा राघव बोलला,"आयला हे तर रखमा मामीच घर आहे."


ते ऐकायला शालू थांबलीच नाही. ती सुमनचा हात धरून केव्हाच घरात शिरली.

तसा पार्थ म्हणाला,"आपल्याला कुठे जायचे बाबा?"


राघव पुढे चालू लागला. दोन आळ्या पार केल्यावर मामाचे घर आले.

चिंगिने लांबून त्याला पाहिले आणि ओरडली,"आई,राघू दादा आला बग."

तशी लगबगीने पारू भाकरतुकडा घेऊन बाहेर आली.

ती पायावर पाणी घालणार तसा राघव बोलला,"मामी,आता मी लहान आहे का?"

तेवढ्यात सर्जा बाहेर येत म्हणाला,"आर लहान न्हाईस म्हणून तर आक्कीच्या जीवाला घोर लागला नव्ह."


तेवढ्यात पारू चिडली,"आव पोर दमून आल्यात त्यांना जरा चा पाणी घिउ द्या. तुमि जावा बर तिकड धारा काडा."

सर्जा चिडला आणि निघून गेला. पार्थ तर घर पाहूनच खुश झाला होता.


मस्त सारवलेले अंगण,त्यात तुळस,कौलारू पडवी आणि नंतर बैठकीची खोली. असे घर पाहून त्याला आनंद झाला.

तेवढ्यात पारू म्हणाली,"राघव सुला आक्का लई चिडल्या हायत. तवा मामानी उद्या पावन बोलावल्यात तर फकसत पोरगी बगून घ्या."


तसा राघव चिडला,"मामी,तू म्हणाली म्हणून मी आलो. तर हे काय चाललंय?"

पार्थ मात्र गालात हसत होता. तेवढ्यात चिंगी मस्त दोन ग्लास दूध घेऊन आली.


पार्थ नाराजीने म्हणाला,"दीदी अग चहा मिळेल का?"

त्यावर कमरेवर हात ठेवून चिंगी म्हणाली,"राघू दादा यांना सांग माज नाव चिंगी हाय. आन नुसता चा पिऊन पार वाळून गेल्यात हे. तस बी आमच्या बाई सांगत्यात चा पिणे वाईट."


पार्थ हात जोडून म्हणाला,"माते, आण तो दुधाचा ग्लास इकडे."


शालू आणि सुमन घरात आल्या तर रखमा मस्त भाकरी करत होती. शालूची आई बाजूला बसली होती.


शालू चिडली,"मावशी काय हे? अग म्हत्वाची मीटिंग सोडून आले मी."

तशी शालूची आई चिडली,"रखमे अग लोकांच्या पोरींना दोन दोन पोर झाली
तरी यांच्या आपल्या मीटिंग चालू. आई बा हिकडं मेल काळजी करून."


शालू काही म्हणणार तेवढ्यात रखमा म्हणाली,"शालू,आक्का म्हणती ते बी खर हाय की. आता कवा तरी लगीन करायचं हायच ना. काकांनी एक पोरगा पायला हाय. उद्या यील."


शालू म्हणाली," भेंडी,उद्या मस्त गावात फिरणार होते मी. काय यार मावशी."


तोवर सुमन कपडे बदलून आली आणि म्हणाली,"मावशी काही मदत करू का?"


ते पाहून शालूची आई म्हणाली,"बगा आता ही पोर बी शिकलेली हाय की."

तेवढ्यात काका आले आणि विषय थांबला.


सुमन आणि शालू जेवण पाहूनच खुश झाल्या.मस्त टम्म फुगलेल्या भाकरी,भरल्या वांग्याची भाजी, शेंगदाण्याची भरपूर लसूण घालून केलेली चटणी आणि घरचे घट्ट दही.


पाहूनच सुमन म्हणाली,"मावशी,किती छान जेवण. मला तर अगदी आईची आठवण आली."


सुमन रडत असलेली पाहून रखमा म्हणाली," फोन कर की मग आईला एखादा."


सुमन म्हणाली,"हो करते. आता ती आली असेल कामावरून. खूप कष्ट करून आईने शिकवले आहे मला."


तेवढ्यात भाकर वाढत शालूची आई म्हणाली,"सुमन पोरी लगीन कधी करणार हाय. तू म्हणत आसली तर माझ्या भावाच्या पोराला इचारु का ?"

शालू चिडली,"हे बघ माते,तुझ्या भावाच्या पोराचे गुण गायला लावू नको."

तेवढ्यात सुमन म्हणाली,"उद्या कोणते पाहुणे येणार आहेत?" रखमा म्हणाली,"अग पलीकडच्या पारगावच्या पाटलाचा पोरगा हाय. सोमनाथ नाव हाय त्याच. इंजिनियर हाय आन शेरात कामाला बी हाय."

शालू गप जेवत मनात काहीतरी आखत म्हणाली,"आई,मावशी त्याच्याशी बोलल्यावर मग मी ठरवेल."


पार्थ आणि राघव दोघांना पारुने जेवायला आवाज दिला. पार्थ बोटे चाखत म्हणाला,"मामी आता मला रघ्याची तब्बेत उत्तम का ते कळलं. आई आणि मामी एवढ्या भारी खायला घालतात."

तेवढ्यात सर्जा आला,"राघू,उद्या सकाळी पावन येत्याल कुठ जाऊ नग" राघव चरफडत जेवू लागला.


कांदेपोहे रंगातील का? काय करतील आपले नायक नायिका?

वाचत रहा.
आम्ही लग्नाळू.
©® प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all