आम्ही जिजाऊच्या मुली भाग 2
मागील भागात आपण पाहिले की गडावर सैन्य कमी आहे त्यामुळे आपण मदत मागायची नाही. असे ठरवून तुळसा परत आली. आता पुढे काय करेल तुळसा
तुळसा आल्या आल्या म्हणाली,"आत्याबाय आव आस अंधारात बसत्यात व्हय. चला दिवा लावते आन भाकऱ्या करते."
काशी म्हणाली,"पोरी, उजेडाच भ्या वाटत बग. उजेड बगून लांडग येत्याल."
तुळसा म्हणाली,"आत्याबाय आव आपून मावळच्या लेकी असल्या लांडग्यांना घाबरायच व्हय. तिकड आऊसायबांच माह्यार संपल तरीबी त्या हुभ्या हायेत. तुमच्या माज्या आब्रूची आब राखत. मंग आपून हातपाय गाळून चालल व्हय?"
काशी म्हणाली,"पोरी,सुभेदार काय म्हणाल?"
तुळसा म्हणाली,"आत्या,माज एक काम करा. गावातल्या समद्या बायका आन जरा मोठी पोर सगळ्यांना मारुतीच्या देवळापशी बोलवा."
काशी मान हलवत बाहेर पडली. तुळसाचा चेहरा वेगळ्या निर्धाराने चमकत होता.
थोड्या वेळात सगळे जमायला लागले.
गंगी म्हणाली,"बया हित आदीच मला भ्या वाटत. तुळशीन कशाला बोलावल हाय?"
सगुणी म्हणाली,"अग बगु तरी काय म्हणायंय तिला."
तुळसा आली. तिने बोलायला सुरुवात केली,"तुमासनी ठाव हाय की सुलतानाच्या सरदारांनी हल्ला करायची तयारी केलीया. म्या तिकड शिवापूरला जाऊन आले. बायांनो राज गडावर न्हाई. आपल्यासाठी हिकड सैन्य धाडलं तर तिकड गड धोक्यात यील."
तसा म्हातारा पांडबा म्हणाला,"पोरीनो तुमी रानात जाऊन लपा. आमी जुनी खोड थांबतो हित."
यमुना म्हणाली,"व्हय आसच करू."
तसा यमुनेचा तेरा वर्षांचा पिराजी म्हणाला,"आये,किती आन कुठ पळणार? आन पळून काय करणार?"
अशी कलकल सुरू झाली. दुसरा म्हातारा म्हणाला,"पोरी,तरणी पोर राजाच्या माग लढायला गेली. गावात म्हातारी आन बाया हायेत. काय करावं?"
तेवढ्यात एक खानदानी आवाज घुमला,"मामा,म्या बोलू का?"
सगळ्यांनी वळून पाहिले तर पाटलांची सूनबाई जना होती.
जनाक्का बोलायला उभी राहिली,"तुळसाच धनी आन माज कारभारी सांगत असत्यात जिजाऊ आऊसाहेब सगळ्यांना पोरासारख जीव लावत्यात. मंग मला सांगा आता गडाला धोका हाय तर आपून पळून जायचं का?"
सगळे गप्प झालेले पाहून पांडबा म्हणाला,"पर आपून करणार तरी काय?"
तशी तुळसा बोलू लागली,"बघा रामाला सुदिक खारुताईन मदत केली नव्ह? आपल्याला गाव माहीत हाय. महाराजांनी शिकिवलेला गनिमी कावा आपून वापरायचा."
तशी मंदी म्हणाली,"म्हंजी आणि काय आसत ते?"
त्यावर जना आणि तुळसा हसून म्हणाल्या,"आव आपून रानडुक्कर घेरून मारतो तसच हाय ते."
जना पिराजीकडे पाहून म्हणाली,"काय र पोरांनो लढायच नव्हं?"
तसा पिराजी आणि सगळी पोरे म्हणाली,"व्हय आक्का,आता पळून नाय जायचं."
सगळ्या गावाने लढायचे ठरवले. इकडे गडावर आऊसाहेबांनी सदरेवर बैठक बोलावली. राजे आणि प्रमुख सरदार मोहिमेवर होते.
आऊसाहेब म्हणाल्या,"सुलतानाच्या सैनिकांची दांडगाई वाढत आहे. पोरी बाळी धोक्यात आहेत."
तेव्हा बहिर्जींचा एक हेर उभा राहिला,"आऊसाब पर तिकड कुमक धाडली तर हिकड गडावर चाल झाली मग?"
तशी जगदंबा कडाडली,"स्वराज्यात लेकीबाळींची आब्रू लाख मोलाची. दोन दिवस वाट पहा आणि मग आम्ही स्वतः येऊ समजलात."
आईसाहेब संतापाने म्हणाल्या. सदर संपली. आऊसाहेबांनी हेराला बोलावणे धाडले.
हेर हजर झाल्यावर आऊसाहेब म्हणाल्या,"जोत्याजी निवडक दहा गडी घे आणि निघ. तिथे रयतेला सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे आवश्यक आहे."
जोत्याजी म्हणाला,"जी आऊसाहेब आज रातच्याला निघतो."
आऊसाहेब म्हणाल्या,"जोत्याजी महाराज नसताना रयत निर्धास्त असायला हवी. मोहिमेवर असताना राजांना घोर नको."
जोत्याजी म्हणाला,"आऊसाब तिकड कानंदीच्या कोपऱ्यात काही गावं हायेत तिथं जास धोका हाय."
जिजाऊ मंद हसल्या,"बहिर्जींचा चेला शोभातोस खरा."
जोत्याजी म्हणाला," आऊसाब,म्या आज रातीला निगतो. उद्या सकाळच्या पारी गावात पोचतो."
इकडे जना आणि तुळसाने सगळ्या गावकऱ्यांना एकत्र केले. तुळसा म्हणाली, ईळ,कोयत, गोफणी जे आसल ते समद गोळा करा."
जना म्हणाली,"व्हय आन पिराजी गावात येणाऱ्या रस्त्याच्या कडणी जागा हेरा आन तिथं गोफण आन दगडी रचून ठीवा."
तुळसा आणि जनाने जिथून गावात गनीम शिरू शकेल अशा जागा शोधल्या. तेवढ्यात गुराखी पोरे पळत आली.
त्यातील एकजण सांगू लागला,"जनाक्का,आज रातीला गावात गनीम शिरणार हाय. आमी आईकल."
गुराखी पोरांनी आणलेली बातमी ऐकून सगळे गाव जोमाने कामाला लागले. इकडे जोत्याजी दहा कसबी गडी घेऊन निघाला.
गाव लढणार का? काय होईल पुढे. वाचा अंतिम भागात.
©® प्रशांत कुंजीर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा