Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

आम्ही चालवू हा पुढे वारसा!

Read Later
आम्ही चालवू हा पुढे वारसा!स्पर्धा गोष्ट छोटी डोंगराएवढी 

विषय - गुरूने दिला ज्ञानरूपी वसा

कथा शीर्षक - आम्ही चालवू हा पुढे वारसा!

लेखिका  - स्वाती  बालूरकर , सखीआज श्रेयसचा सत्कार होता.

मागच्या महिन्यात बाहेरून त्याच्या कानावर आलं होतं की या सामाजिक बांधिलकीच्या पुरस्कारासाठी त्याच्या संस्थेचा विचार केला जात आहे पण त्याचा विश्वास बसला नाही.

चार दिवसांपूर्वीच निमंत्रण आलं होतं.
मुळात हाती घेतलेलं हे कार्य इतकं वाढेल हे त्याला स्वतःला कधीच वाटलं नव्हतं.

त्याने कधीतरी बक्षिस मिळेल यासाठी हे सगळं केलंच नव्हतं .
हे जे केलं ते कुणाच्या तरी प्रेरणेने केले होतं व स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरू केलं होतं.


राज्यभरातील शैक्षणिक संस्थानातून आपलं वेगळेपण टिकवून ठेवून समाजाला भरभरून निस्वार्थपणे ज्यांनी दिलं त्यांना हा पुरस्कार मिळणार होता.

त्याची चार माणसं त्याच्यासोबत हा सोहळा पाहण्यासाठी आणण्याची परवानगी त्याला होती.

आई ,बाबा आणि दादा यांच्या  व्यतिरिक्त चौथे नाव विचार करण्याची गरजच नव्हती . ते मनात ठरलेलंच होतं.

म्हणजे वेळप्रसंगी घरात एखादं माणूस रद्द करूनही त्याने ज्योत्स्ना मॅडमला बोलवलंच असतं.


ज्योत्स्ना मॅडम त्याच्या प्रेरणास्थान असलेल्या शिक्षिका !

त्याला शाळेमध्ये आठवी ते दहावी मराठी शिकविणाऱ्या मॅडम त्याच्या सगळ्यात आवडत्या शिक्षिका होत्या.


त्यांच्या शिकविण्यात पुस्तकीपणा कमी व व्यवहारी ज्ञान जास्त असायचं.


प्रेमाने बोलणं, मुलांच्या भावनांचाही आदर करणं व सुलभपणे शिकवणं ही त्यांची कौशल्ये होती.

त्यांच्या सल्ल्याशिवाय तो काहीच करत नव्हता .

शिवाय मनातलं सगळं मॅडम कडे बोलायचं , ही सवय पण होती.

ही संस्था "अविरत " नावाने सुरू झाली होती, हळूहळू काम वाढलं व व्यापकता वाढली. . . पण हा सर्व डोलारा उभा आहे त्यामागे ज्योत्स्ना  मॅडम चे  शब्द आहेत , हेही त्याला आठवत राहतं.

त्याला आज सगळे शाळकरी दिवस आठवत होते, जणु आठवणींचा बोलपट  मेंदूत चालू झाला  होता!

श्रेयस अभ्यासात जास्त हुशार नसला तरीही , किंवा बंड असला तरीही त्याच्या चांगुलपणामुळे आणि त्यांच्या धाडसामुळे श्रेयसचं त्याच्या शाळेमध्ये चांगलं नाव होतं.

पण दुसरे शिक्षक नेहमी त्याच्या अपूर्ण अभ्यासावर रागवायचे किंवा गुण कमिो मिळाले म्हणून टोमणे मारायचे.

केवळ ज्योत्स्ना मॅडम होत्या ज्या त्याच्यातली देशभक्ती आणि त्याच्यातल्या धाडसाचं कौतुक करायच्या.

"आवश्यक अभ्यास करून तू तुझं ध्येय ठरव आणि मग नियोजन कर !"असं  त्यांनी सांगितलंच  होतं, ते अजूनही आठवतं.

आठवी ते दहावी या किशोर वयात त्याच्या मनात ज्योत्स्ना मॅडमचं स्थान अगदी एखाद्या देव्हार्‍यातल्या देवी सारखी झालं होतं.

शाळा संपली तेव्हा निरोपाला त्यांच्यासाठी तो खूप रडला होता .

बारावीनंतर त्याला सैन्यातच  जायचं होतं, धाडसाने आपल्या देशासाठी काहीतरी करायचं होतं.

सीमेवर लढायचं होतं आणि जमलं तर लढताना हौतात्म्य देखील पत्करायची तयारी होती. 


हे ध्येय बाळगून त्यांने एनडीए ची तयारी सुरू केली. पुढचे सगळं त्याने जिद्दीने पार पाडलं. बारावी झाली.

एन डी ए ची परीक्षा झाली .

काही दिवसांनी \"त्याचं सिलेक्शन झालंय व उद्या जॉइन करायचंय \" या आशयाचं पत्र आलं.

ज्या दिवशी त्याला पत्र मिळालं तो आनंदाच्या अत्युच्च शिखरावर होता.

तो पळतच ज्योत्स्ना मॅडम च्या घरी गेला होता, सायकलचं भानही नव्हतं .

ते सिलेक्शन चं पत्र पाहून , श्रेयसचं स्वप्न पूर्ण होणार हे पाहून मॅडमच्या डोळ्यात त्यावेळीचे अभिमानाचे अश्रू तो आजतागायत विसरला नाही.

पण दैवगती न्यारी असते , ती आपल्याला माहिती नसते म्हणून आपण योजना बनवतो.


दुसर्‍या दिवशीच संध्याकाळी त्याला पॅकिंग करून जायचं होतं म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळी सगळ्या मित्रांनी शुभेच्छा पार्टी ठेवली होती.

काही सामान आणण्यासाठी मित्राच्या नवीन हायफाय बाईक वर तो आणि विवेक निघाले होते.

अरूंद गल्लीतून जाताना समोरून आलेल्या वाहनाचे टायर फुटले व ड्रायवरचे संतुलन बिघडले व सरळ मित्राच्या गाडीला धडकली .

श्रेयसच्या मित्राचा तोल गेला.

मित्र आणि गाडी एकीकडं पडले आणि श्रेयस रस्त्यावरती दुसरीकडे!

त्याचवेळी दुर्दैवाने समोरून भरधाव येणार्‍या ट्रकखाली त्याचे दोन पाय आले आणि होत्याचं नव्हतं झालं.

श्रेयसचे दोन्ही पाय गेले.

दवाखान्यात ऍडमिट केलं , पण ठीक होण्याची आशा नव्हती .

त्याचं स्वप्न धुळीला मिळालं होतं, तो परावल्लंबी आयुष्य येऊन जगू शकणार नव्हता.


तो देशासाठी , समाजासाठी काहीतरी करणार होता पण आता तर काहीच करू शकणार नाही हे कळत होतं.

तो तर धड उभा पण राहू शकत नव्हता.

त्याच्या अपघाताचं कळालं , आणि घाबरून मॅडम त्याला बघायला आल्या होत्या .

पाय गेलेल्या दुखामुळे तो त्रासून गेला.

त्यांचं मन त्याला खायला लागलं आणि त्यानं ठरवलं की आता जगायचंच नाही. हे असं अपंग आयुष्य  का जगायचं ?

त्यांने सतत एकच ध्यास घेतला . मला मरायचं आहे , मला असं अपंग जगायचं नाही .

डॉक्टरांना विनंती करू लागला , काही गोळ्या द्या किंवा एखादं औषध गोळ्या मागू लागला, इंजेक्शन देण्याची रिक्वेस्ट करू लागला.

"तू तुझ्या पायाने उभा ही राहू शकत नाहीस" याचं वाईट वाटून आईने रडून रडून डोळे सुजवून घेतले होते.

तिने मॅडमना निरोप दिला.


यावेळी मॅडम भेटायला आल्या पण अशा रूपात की त्यांचे ते रूप त्याने कधीच पाहिलेलं नव्हतं.

त्या शाळेत किती उत्साही, मनमिळावू हसतमुख व प्रेरणा दैवतच होत्या.

त्या खूप रागात आल्या होत्या, नाराज आहेत हे ही कळत होतं.

"तुला मरायचंय का श्रेयस? काय ऐकतेय मी? तुझ्या नशीबात मृत्यु लिहिला असता तर तू जागेवरच गेला असतास ना. ते पाय गेलेत तुझे,  पण जीव नाही.
जर देवाने तुला वाचवलंय तर कशासाठी ? कळतंय का ?
अरे तू पंख्याला लटकूनही मरू शकत नाहीस, फासावर लटकू शकत नाहीस .
कळतंय का तुला? मरण्यासाठी स्टूलवर उभं राहावं लागतं ना, पण ते ऑप्शन ही देवाने ठेवलं नाही. उडी मारायला पण पाय लागतात." श्रेयस घाबरला .

मग मॅडम नी एक व्हीलचेअर मागवली व त्याला व्हीलचेअरमध्ये बसवून लिफ्टमधे नर्स सोबत निघाल्या. त्या ढकलत लिफ्ट ने त्याला वरती घेऊन गेल्या.

दवाखान्याच्या गच्चीवर पोहोचल्या व म्हणाल्या " मरायचंय ना मग मर, देशासाठी मरण तर तुझ्या नशीबात नव्हतंच !"

"मॅडम हेच नशिबात नाही म्हणून तर मला जीवन नकोसं झालंय !"

तुम्हालाच  माहित आहे ना मॅडम  न कळत्या वयात मला माझं ध्येय  कळालं होतं . "

"पण तुला  आता कळत नाहीय. ध्येय अजून शाबूत आहे, गेलाय तो  आत्मविश्वास !
शरीर धडधाकट आहे, पाय गेलेत न फक्त! मरू शकत नाहीस देशासाठी . . . . मान्य!  मग जग ना कुणासाठी तरी!"

"कुणा साठी? कसं जगावं ? मीच दुसर्‍या वर भार झालोय! कळत नाही मी काय करु शकतो ?"

"तू जगून काय करू शकतोस याचा विचार कर नाहीतर . . . नाहीतर माझं नाव कुठे सांगू नकोस . माझा विद्यार्थी म्हणायची. . . श्रेयस मला तुझी लाज वाटते . मरायचं तर सांग आता ढकलत ने तुझी ही व्हीलचेअर अन संपवून टाक सगळं. पण मरशील याची खात्री नाही. नियतीने वाचवलंय तुला."


आणि नर्सच्या हातात व्हीलचेअर देवून मॅडम रागाने निघून गेल्या.


आठवडाभर तो दवाखान्यात होता , त्या भेटायलाच आल्या नाहीत.

दवाखान्यातून डिस्चार्ज झाला.

श्रेयस डोक्यात सतत तेच विचार करत होता.

" देशासाठी मरणार ना तू ?  मेला नाहीस म्हणजे जग मग देशासाठी !" तेच शब्द आठवत राहिले.

जेव्हा तो दुखापतीतून थोडंसं बरं झाला , त्यानं ठरवून टाकलं .

व्हीलचेअर लाच आपले पाय बनवायचे आणि फिरायचं पण रिकामं बसायचं नाही .

त्याच्या मित्रांनी त्याची खूप साथ दिली .

सैनिक लोकांशी संपर्क करणं, युद्धात जायबंदी झालेल्यांची माहिती काढणं , वीर मरण आलेल्या लोकांची माहिती , त्यांच्या कुटुंबाची माहिती जमवणे!

तो स्वतः मित्रांसोबर जात राहिला, भेटत राहिला, त्याला देशासाठी काय करता येईल याचाच विचार व सल्ला घेत राहिला.

त्यातूनच या संस्थेने जन्म घेतला, "अविरत "जो तो चालवत होता. मॅडम च आल्या होत्या उद्घाटनाला.

युद्धात जखमी होऊन रिटायरमेंट घेतलेल्या सैनिकांना त्यांने हाताशी धरलं.


युद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या मुलांसाठी त्याने शासनाशी सहायता घेवून शाळा उघडली.

वीरपत्नी किंबा सैनिक पत्नींना शिक्षिका म्हणून नोकऱ्या दिल्या.
सैन्यात भरती होऊ इच्छित किंवा जाऊ इच्छिणार्‍या युवकांना मार्गदर्शनपर क्लासेस उघडले.


छोटसं वाटणारं हे काम पण कामाचा व्याप इतका वाढत गेला की त्याला काम करायला दिवसही कमी पडू लागला .

या संस्थेला वर्ष झालं आणि ती आकार घेऊ लागली.

वर्षपूर्तीला मॅडम ला फोन केला , अभिमानाने म्हणाल्या, " आदर्श  शिष्य आहेस तू माझा , आवडता शिष्य!"

"मॅडम जेव्हा सगळे जण रागवायचे तेव्हा तुम्ही प्रेमाने समजवायच्या , तुम्ही माझ्यासाठी आदर्श शिक्षक ठरलात . पण जेव्हा वेळ पडली त्यावेळी सगळे सहानुभूती दाखवत होते, तर तुम्ही रागात आलात. "

" श्रेयस , देवाचे आभार  मान की मला कळतं कधी रागवायचे आणि कधी प्रेमाने बोलायचं !"

"मॅडम तुम्ही त्या दिवशी मला रागावला नसतात तर कदाचित त्या निराशेच्या गर्तेतून मी बाहेर आलोच नसतो. कसा अपंग व परावलंबी जगलो असतो."

" आज या सगळ्या गोष्टीला सात वर्ष पूर्ण झाली व अविरत आठव्या वर्षात पदार्पण करताना हा पुरस्कार घोषित झालं. मला आमंत्रण दिलंस तू! आम्हा शिक्षकांसाठी त्यांचे विद्यार्थीच वारस असतात , त्यामुळे आम्ही दिलेल्या ज्ञानरूपी वसा थांबला नाही पाहिजे. तो वारसा तू झालास . तुम्हीच खरे ज्ञानाचे वारस ! एका सामान्य माणसाला त्यांची पोटची मुलं असतात पण त्या एका शिक्षिकेला तिची सर्व विद्यार्थी तिची मुलं असतात.
त्यामुळं मला खूप अभिमान आहे."

कार्यक्रमात श्रेयसच्या संस्थेला "सेवाभावी पुरस्कार" भलीमोठी रक्कम, सन्मानपत्र ,मानचिन्ह, घोषित झालं .


श्रेयस ने आईवडिलांची माफी मागून मॅडम ला मंचावर येण्याची विनंती केली.

सर्वांसमोर त्यांना नमस्कार केला आणि आपल्या भाषणात थोडक्यात आपली जीवन कहाणी सांगितली.

आणि मॅडमला उद्देशून म्हणाला," तुमचं कार्य तुम्ही केलं आता आमची वेळ आहे. " गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा" आपल्या संस्थेतून बाहेर निघणारे मुलं तो वारसा पुढे चालवतील ."

"तुझं कार्य सफल झालं!" 

ध्येयपूर्ती झाली म्हणून त्याच्या आईवडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला .

बसलेल्या प्रेक्षकांनाही \"एक गुरू एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात काय करू शकतो !\" याची जाणीव झाली .

शुभं भवतु !
समाप्त.

लेखिका- स्वाती बालूरकर , सखी
दिनांक १८. ०९ .२२

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 25 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.

//