Jan 28, 2022
विनोदी

आम्ही चहाप्रेमी

Read Later
आम्ही चहाप्रेमी
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अरबी समुद्रात एक "चहापूर" नावाचे बेट होते. तिथला चहा जगप्रसिद्ध होता. तिथे राहणाऱ्या लोकांना " चहाप्रेमी " म्हणत. चहाप्रेमी लोक अतिशय निर्व्यसनी होते. त्यांना फक्त चहाचे व्यसन सॉरी वेड होते. या चहाप्रेमी जमातीत पण पोटजमाती होत्या. जश्या कुलहड चहाप्रेमी , अमृततुल्य चहाप्रेमी , गवती चहाप्रेमी , आलेअदरक चहाप्रेमी , टपरीचा चहाप्रेमी अश्या अनेक पोटजमाती होत्या. पण सर्वांमध्ये एकोपा होता.
"चहादेव " हा सर्वांचा कुलदैवत होता. पण काळाची चक्र बदलली. चहापूरला कुणाची तरी नजर लागली. इंग्रज कॉफीचे व्यापार करण्यासाठी बेटात घुसले. त्यांना इथला चहा बघवला नाही. त्यांनी फितुरीने चहापूरचा राजा " कडक मसालेदार चहासिंग " याला बंदी बनवले. त्याच्या पूर्ण परिवाराला तुरुंगामध्ये टाकले. पूर्ण देशात आक्रोश उफाळून आला. पण कॉफीप्रेमी इंग्रजांनी लोकांवर नानाविध अत्याचार केले. चहावर बंदी आणली. जो चहा पिताना दिसे त्याला तुरुंगात डांबले जात. सर्वत्र जबरदस्तीने कॉफी पाजवली जात. चहाने त्वचा काळी पडते , आजार होतात असे अपप्रचार केले गेले. चहाची झुडुपे मुळापासून उपटून त्याजागी कॉफी लावली गेली. चहा समुद्रात फेकला गेला. जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. कोण रोखेल हा अत्याचार ? कोण करेल चहाची पुनर्स्थापना ? तेव्हा जन्म झाला एका वीरांगनेचा. जिने कॉफीप्रेमींची सत्ता मुळासकट उपटून काढली आणि चहाची पुनर्स्थापना केली. ती होती माधवी चहाप्रेमी. तिला या कामात मदत केली तिचा भाऊ पार्थ चहाप्रेमी. दोघांनी मिळून " चहा बचाव , कॉफी हटाव " संघटनेची स्थापना केली. आज त्यांची मिटिंग होती. कितीतरी तरुण तरुणी ठरलेल्या जागी रात्री पोहोचले.

" मित्रानो , आमचे शत्रुत्व कॉफीशी कदापी नाही. तर चहाला तुच्छ समजतात त्या कॉफीप्रेमीशी आहे. चहा पिणे आपला मूलभूत हक्क आहे. तो न मिळू देणे हे माणुसकीचे उल्लंघन आहे. जोपर्यंत चहाची पुनर्स्थापना होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसायचे नाही. आपली जात चहा , आपला धर्म चहा , आपला देव चहा. बोलो चहा " माधवी मॅडम म्हणाल्या.

" जिंदाबाद !" सर्वजण ओरडले.

मग काय क्रांतीचे वारे सर्वत्र वाहिले. कॉफीच्या कारखान्यावर हल्ले होऊ लागले. रेल्वे लुटल्या जाऊ लागल्या. लपूनछपून चहाचे उत्पादन सुरू झाले. लोक नुसते दूध पिऊ लागले पण कुणीच कॉफी पीत नव्हते. कॉफीच्या दुकानदारावर लोकांनी बहिष्कार टाकला. अश्या मुलांना वडील आपल्या मुली देईना. त्यामुळे कुणीच कॉफी विकायला तयार होईना. कॉफीची विक्री घटली. सरकारला संशय आला की कोणीतरी कॉफीविरुद्ध अपप्रचार करत आहे. सरकारने चौकशी सुरू केली. संघटनेचे धागेदोरे शोधले. पार्थने चहाचे राष्ट्रगीत बनवले. कॉफीप्रेमींनी ते गायला बंदी केली. दुर्दैवाने पार्थ पकडला गेला. त्याला न्यायाधीशसमोर आणले गेले.

" तुला तुझे गुन्हे कबूल आहेत ?" न्यायाधीशने विचारले.

" नाही. तुम्ही आमची चहासंस्कृती बुडवली. जर तो गुन्हा नसेल तर हा पण गुन्हा नाही. " पार्थ अभिमानाने म्हणला.

" म्हण कॉफी जिंदाबाद !" न्यायाधीश म्हणले.

" कॉफी जिंदाबाद !" पार्थ म्हणाला.

" म्हण चहा मुर्दाबाद !" न्यायाधीश म्हणले.

" ओय. चहा जिंदाबाद है. चहा जिंदाबाद था और हमेशा रहेगा. " पार्थ मोठ्याने ओरडला.

न्यायाधीश चिडला. त्याने पार्थला जबरदस्ती कॉफी पिण्याची शिक्षा सुनावली. पण जबरदस्ती करूनही पार्थ सतत उलट्या करत. त्याने कॉफीचा एकही थेंब शरीरात जाऊ दिला नाही. शेवटी कंटाळून त्याला फाशी देण्यात आली. ( असेपण त्याला प्रत्येक कथेत मरण्याची सवयच लागली होती ). पार्थ घरोघरी पोहोचला. तो सर्वांचा आदर्श ठरला. माधवीने भावाच्या मृत्यूचा सूड घेण्याची प्रतिज्ञा घेतली. पार्थचे बलिदान कुणालाच व्यर्थ जाऊ द्यायचे नव्हते. दिनांक ठरला 21 मे. त्यादिवशी कॉफीप्रेमींची सत्ता उलथवून लावायची होती. घरोघरी हत्यारे पोहोचवण्यात आली. माधवीने या उठावाचे नेतृत्व केले. त्या दिवशी मोठा उठाव झाला. कॉफीचे डब्बे समुद्रात फेकून देण्यात आले. सीसीडीच्या काचा फोडण्यात आल्या. कॉफीप्रेमी इंग्रज देश सोडून पळाले. राजपरिवार कैदेतून मुक्त झाला. नवीन संविधान लिहिले गेले. माधवी चहापुरची पहिली पंतप्रधान म्हणून निवडली गेली. सर्वानी रस्त्यावर येऊन चहा पिऊन आनंद साजरा केला. चहाचे कप असलेला झेंडा सर्वत्र फडकवण्यात आला. चहाचे राज्य आले. चहाची पुनर्स्थापना झाली. पुढे बशिचा पण शोध लागला. लोक चहा बशीत ओतून पिऊ लागले. लग्न कार्यात नवराबायको एकमेकांचा उष्टा चहा पीत. त्याने प्रेम वाढते अशी समाजमान्यता होती. चहा जगभर पोहोचला. कॉफीचे अस्तित्व संपुष्टात आले. माधवीने इतरही देशातील चहाआंदोलकाना मदत केली. शेवटी एक कप चहा पिऊन माधवीने जगाचा निरोप घेतला. या सुंदर बेटाला कुणाची तरी पुन्हा नजर लागली. माधवीच्या मृत्यूनंतर तिचा पुत्र सवाई पार्थ गादीवर आला. मेघा नावाची स्त्री अमेरिकेहून बिजनेस करण्यासाठी चहापुरमध्ये आली होती. तिने इथे कोकचा व्यवसाय सुरू केला. लोकांना हळूहळू कोक आवडू लागले. पण पार्थला हे आवडले नाही. ज्या चहासाठी आपल्या आईने आणि मामाने बलिदान दिले त्या चहाला कोक रिप्लेस करेल ही भीती त्याला सतावू लागली. त्याने मेघामॅडमच्या कोकविरुद्ध फर्मान काढले आणि कोकवर बंदी आणली. मेघा मॅडम फार चिडल्या. त्या पुन्हा अमेरिकेकडे निघाल्या. पण जाताना सवाई पार्थला शाप देऊन गेल्या.

" जा मी तुला शाप देते की तुझे हे बेट समुद्रात बुडून जाईल ! तुमचा इतिहास विस्मृतीत जाईल. "

या बद्दल समजताच पार्थने मेघामॅडमचे चरणस्पर्श केले.

" मी शाप मागे तर घेऊ शकत नाही. पण मी उपशाप देऊन त्याची वेदना कमी करू शकते. ही चहाप्रेमी जमात पुनर्जन्म घेऊन जगभर विखुरली जाईल. कॉफीने कितीही प्रचार केला तरी चहाप्रेमी चहा सोडणार नाहीत. ते चहाचा पताका फडकवत राहातील. " मेघा मॅडम म्हणल्या.

थोड्या दिवसांनी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पूर्ण बेट पाण्यात बुडाले. सोबतच तो इतिहास पण विस्मृतीत गेला. पण आजही जगभरात चहाप्रेमी आहेत. कॉफीवाले नेहमी चहाला पाण्यात बघतात पण कट्टर चहाप्रेमी कुणासमोर झुकत नाहीत. जोपर्यंत चहाप्रेमी आहेत तोपर्यंत चहाचे अस्तित्व कायम भूतलावर राहील. आजही 21 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. केवळ पानांच्या उत्पादनासाठी ज्यांची लागवड केली जाते अशा काही थोड्या वनस्पतींपैकी चहाच्या वनस्पतीला विशिष्ट स्थान आहे. भारतातील खाजगी उद्योगांत चहाच्या उद्योगाला पहिले स्थान आहे. तसेच भारतात रेल्वेच्या खालोखाल चहा उद्योगातील कामगारांची संख्या आहे. ताग उद्योगानंतर भारताला सर्वांत अधिक परदेशी चलन मिळवून देणारा हा उद्योग आहे. भारताला मिळणाऱ्या एकूण परदेशी चलनाच्या पंधरा टक्के चलन चहा उद्योगातून मिळते. चहाची वनस्पती झुडूप या प्रकारातील असून त्याच्या प्रक्रिया केलेल्या पानांपासून (अगर पानांच्या चुऱ्यापासून) उत्तेजक पेय तयार करतात. त्या पेयालाही चहा हेच नाव आहे. हे जगातील सर्वांत लोकप्रिय पेय आहे. जगातील जवळजवळ निम्मे लोक हे पेय पितात. समाजाच्या सर्व थरांतील लोकांच्या घरांत दैनंदिन आहारात आणि आदरातिथ्यात चहाला महत्त्वाचे स्थान आहे. यापुढे कधीही चहा पीत असाल तर ही कथा नक्की आठवा. बोला चहा जिंदाबाद !

नव्हे फक्त पेय चहा हे
मनातल्या भावनाच ते
गरम चहा हृदय सुखावे
मन प्रसन्न करूनच जाते

घेता सकाळी एक चहाचा घोट
ताण तणावाचा होतो कडेलोट
दुधात साखर आणि थोडी पत्ती
चालू करे बंद दिमागाची ती बत्ती

उष्टा केलेला चहा तर किती रोमँटिक
पावसातला चहा कधी न होई अँटिक
धर्मजात कोणतीही चहा सर्वा आवडे
माणसाला माणसाशी तो घट्टपणे जोडे

चहा तर आहे आमच्यासाठी अमृततुल्य
शहाणेच जाणतात त्याचे अनोखे मूल्य
मैत्री प्रेम साऱ्याच भावना त्यात एकवटे
चहा पिताच मनातली मरगळ बघा हटे

आबालवृद्ध सर्वाना वाटतो हवाहवासा
सोमरसपण लाजतो चहा आहेच असा
ऊर्जा प्रेरणा शक्ती देतो नवीन आम्हाला
रात्रीही दिवसाचा भास आणतो देहाला

कॉफीसमोर झुकणार नाही आम्ही चहाप्रेमी
अफवा कितीही उठवा चहाच उरेल या जिभी
बनू आम्ही चहा पिऊन काळे होऊ आजारीही
पण चहा सोडणार नाही याजन्मी आला देवही !

~ पार्थ ✍️

समाप्त
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

पार्थ

Student

माझ्या सर्व साहित्याचे अधिकार राखीव आहेत. कॉपी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.