आमच्या मधला तो

नवरा बायकोचा तो नवऱ्याचा लाडका आहे .कोण आहे तो वाचण्यासाठी कथा पुर्ण वाचा


काल ऑफिसमधुन यायला बराच उशीर झाला .नेहाने जमदग्नी आवतार धारण केलेला होता ,कारण काय तर एक अक्षम्य गुन्हाच घडला माझ्या हातून; मी चक्क लग्नाचा दहावा वाढदिवस विसरलो पुर्ण महीना माझ्या कानाशी भुणभुण चालु  होती आजच्या दिवसासाठी. स्विगी वरून हे ऑर्डर करूया .मिंत्रा वरून हा ड्रेस मागवला आहे.तनिश्कच्या आंगठ्या मागविल्या आहेत दोघांसाठी .असं करून दोन दिवसात तिने माझ्या  महिन्याभराची क्रेडीट कार्डची लिमिट चक्क दोन दिवसातच संपवली होती.
मीही चक्क विसरलो कारण मित्रांबरोबर नवीन वर्षाचे स्वागत करण्यात गुंग होतो , नेहाने तरी फोन करून किमान आठवण करावी मी लगेच निघालो असतो ,पण नाही बारा नंतर घरी आल्यावर सरळ मला लाटण्याचा प्रसादच दिला.

आताही टेंगुळ दुखतय आई ग !दु:खद घटना विसरायची असते म्हणतात पण आपण माणसे ह्या दुखद घटनेची आठवण मात्र उत्साहाने काढतो व तो दिवस साजराही करतोच.

खरतर दिवस सूर्योदयाने चालु होतो त्यानुसार लग्नाचा वाढदिवस नवीन वर्षी एक तारखेला आहे,पण रात्री बारा वाजता मी  तिच्याबरोबर नव्हतो म्हणूनच हा प्रसाद मिळाला.

आज सकाळी मैत्रिणीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना  नेहा माझीच मजा सांगत होती मैत्रिणीला .
आता माझी फजिती सांगण्याची गोष्ट आहे का ,पण नाही बायकांना सगळ अगदी सगळ शेअर करायचे असते .नेहाही अगदी हसत हसत मैत्रिणीला मला अजुन कापायचा प्लॅन करत होती.

नेहा आधी माझ्यावर चिडली होती पण आता तिने मुद्दाम ताणुन धारयच ठरवल होतं .विसरभोळा आहे ना मी ...मग नेहाने त्याच गोष्टीचा फायदा घ्यायच ठरवलयं 

माझ्याकडुन हिऱ्याचे मंगळसुत्र वसुल केल्याशिवाय नो माफी बिझनेस ...हे ऐकुन मी उडालोच.मीही चोरून ऐकत होतो ते माझ्या फायद्याच झालं .
हम्म !असा प्रकार आहे तर बच्चमजी .मी उगाच स्वतःला बोल लावत होतो .

मला लग्नापुर्वीची निरागस नेहा आठवली.चवळीच्या शेंगे सारखा बांधा होता तिचा, गुलाबी ओठ, हसरे मोत्यासारखे दात,तिचे टपोरे काजळवाले डोळे, तिचा मधुर आवाज आणि त्यावर कडी म्हणजे तिचे गोबरे गाल .त्या गालांवरतीच जीव होता माझा, पण लग्नासाठी कस विचारावं तिला हे सुचत नसायच ,त्यात तिची ऑफिसमध्ये फॅन फोलोइंग जास्तच होती तसेच ती एच.आर.डिपार्टमेंटची,मी अकाउंटिंग डिपार्टमेंटचा असल्यामुळे मला मग ओळख वाढवण्याचा चान्सच मिळत नव्हता.

मग एके दिवशी तो योग आलाच,आम्हाला जुन्या एका एमप्लॉइच्या फायनल सेटलमेंट साठी फाइल हवी होती त्यासाठी ती स्टोअर रूममध्ये जाणार होती.मीही विचार केला ;मला मग तेवढाच नेहाचा सहवास मिळेल म्हणुनच मीही तिच्या बरोबर स्टोअर रूम मध्ये गेलो होतो.

आता मला  एकांतात नेहाला प्रपोज करायचे होते मग ती नाही बोलली तर किमान ऑफिसात इज्जतचा भाजीपाला नाही होणार हे साध गणित होत त्यामागे पण जीभच रेटत नव्हती .
अचानक तो नेहाच्या समोर आला.तिने त्याला पाहीले आणि अचानक माझ्या मिठीतच आली. मला तर स्वर्ग दोन बोटच उरला होता.

नेहा म्हणाली "अनय त्याला घालवानां,मला ना त्याची फार भीती वाटते.
त्याच्या लांब मिश्या,ते काळे काळे  रूप . बघुनच कसतरी होत हो ....

"अहो मला कुणाची इतकी भिती नाही वाटत पण त्याची मात्र भिती वाटतेच वाटते हो आणि त्यालाही ते माहीत आहे म्हणून त्याला मी दिसली की तो माझ्या अंगावर येतो."  हे बोलण सरू असताना देखिल नेहाने काही माझी मिठी सोडली नाही,एवढी दशहत होती तिच्या मनात .

मग मी त्याला हकलवलं नी ती माझ्या ह्याच शौर्य गुणामुळेच माझ्या प्रेमातच पडली. आम्ही मग रोज ऑफिस सुटल्यावर  गिरगाव चौपाटीला फिरायला लागलो.सेट्रंल प्लाझाला शो बघायला लागलो .शनिवार रविवारी होणारा शॉपिंगचा हा खर्च आता  माझ्या पगारपेक्षाही मोठा होऊ लागला होता .

मग मित्रच बोलला "अनय अरे लग्न कर म्हणजे खर्च अटोक्यात येतील". मग मी त्याचा सल्ला शिरसावंद्य मान्य करत लगेच  विवाह बंधनात अडकलो.

तेव्हाची गोड लाडुली नेहा, आता कशी बदललीस.
मला पहिल्यांदाच भेटलेली तेव्हा तर हरिणीसारखी थरथरलेली होतीस आणि आता लग्नानंतर महादुर्गेच्या अवतारात कशी बदललीस ते कळलेच नाही मला.

त्याच ताणात मी ऑफिसात गेलो, त्यात पुन्हा जुन्या फाइली स्कॅन करण्याचा कंटाळवाणा टास्क होताच म्हणुन पुन्हा स्टोअर रूम मध्ये गेलो ,तेव्हा तो परत दिसला.
त्याला पाहुन मला एक कल्पना डोक्यात आली.

मी भरभर ऑफिसचे काम संपवल तसं एक जानेवारीला कुणाचाही मुड नसतोच म्हणुन लवकर घरी आलो .लॅचचा दरवाजा मीच उघडला.त्याला घरी आणणलेलं मला नेहाला कळु द्यायच नव्हतचं
मी हळुच त्याला किचनमध्ये बसवुन आलो  आणि नेहाला हाक मारली" अग ! नेहा जरा चहा देना ग. "

नेहा पण फणकाऱ्यात बेडरूममधुन बाहेर आली .मीही जरा जास्तच आर्जव केली आणि म्हणालो,

"अग! नवीन वर्षाची संध्याकाळची सुरवात तुझ्या हातच्या गोड चहाने कर .मग आपण  डायमंड सेट पाहायला जावु .चल लवकर अटप. "

मुळ उद्देश्य हाच कि नेहाने त्याला बघावं .तिही उत्साहाने चहा करायला किचनमघ्ये वळली आणि तिला तो दिसला .
त्याला बघितल्यावर ती उलट्या पावली माझ्याकडे वळली आणि म्हणाली"शुश .....अहो तो आला आहे तिकडे ..काहीतरी करा"

मी अजाणतेपणाचा आव आणत तिला म्हणलो.,"कोण आहे ग .. तोच हो .तुम्हाला माहीत आहे ना तो, आताही मिश्या ताणुन माझ्याकडे बघतोय हो..".नेहा घाबरतच बोलली.

मी ही कठोरतेचा आव आणत बोललो.
"मी का बघु त्याला ? तुच बघ गं. आता तु तर शुर झाली आहे .मलाही मारतेच ना मग तो काय चिज आहे!"

" अनय सॉरी ना ! प्लीज  तुम्हाला माहीत आहेना मला इतकी भीती वाटते की मी त्याचे नावही घेत नाही .नाव घेतले की कल्पनेनेच तो  माझ्या डोळ्यासमोर येतो. त्याला घालवाना..."नेहा रडवेली होत म्हणाली .

पुढे तिच्या टपोऱ्या डोळ्यातुन तिने अश्रु बाण काढले नी माझ्या ह्द्यावर चालवले..अगदी आम्ही पहिल्यांदा भेटलेलो तेव्हाही तिने हेच केल होतं.

मी हसत म्हटलं "काढतो पण माझ्यावर ह्यापुढे चिडायचं नाही ,मी कधी वाढदिवस विसरलो तरी रागवायचं नाही.माझी फजिती मैत्रिणींना सांगायची नाही. कबुल ! नाहीतर त्याला राहुदे इकडे..तसही घर मोठ आहे .आपल्याला काही त्रास नाही त्याचा."

नेहाच्या मनात नसतानाही नेहाने सगळ्या अटी मान्य केल्या आणि मग मी विजयवीरासारखा त्याला हकलवायला किचनमध्ये गेलो.

तो बिचारा केव्हाच तिकडुन पळाला होता पण हे नेहाला कुठे माहीत होतं... तस तर झुरळ वाइटचं आहे पण आमच भांडण मिटविण्यासाठी  अस मोठ उडणार झुरळ घरात हवचं ...धन्यवाद मिस्टर झुरळ.

वाचकांनी कृपया समिक्षेत  झुरळ शब्द वापरून संस्पेन्स उघड  करू नये ही नम्र  विनंती .