आमच्या कडे कि नै(खिचडी पुराण)

आमची नीतातर बाजरीची खिचडी करते अशी मस्तलागते ना त्यावर भरपूर मस्त तुपाची धार. अग बाई पण भाऊजींना पचते का? कोणीतरी खवटपणे विचारले.-----------------------------------------
*आमच्या कडे कि नै*. (खिचडी पुराण)

प्रभाकर शिंत्रे, आणि बायकोच नांव शोभना त्या काळातल्या सिनेमाचा प्रभाव , हीरो च नांव प्रभाकर तर हिरोईन शोभना. जोडी हिट.आणी पिक्चर ही.
आपली ही जोडी हिट नसली तरी फिट आणि हौशी.

तर-- ह्यां जोडी चापन्नासाव्या लग्नाचा वाढदिवस.
घर पाहुण्यांनी गजबजलेले होते. शिंत्रे यांचेदोनधाकटेभाऊ,त्यांच्याबायका,एकबहीण,तिचे मिस्टर, शिंत्रे चा मुलगा मनोज त्याची बायको म्हणजेच सून मधुरा नातवंड, भावाची मुलगीअसा मोठ्ठा गोतावळा जमला होता.
सौ शिंत्रे चे माहेर इथेच त्यामुळे ते सर्व परस्पर हाटेलात येणार होते .

कार्यक्रम दुपारीच होता .
मेन कोर्स बरोबर पावभाजी, छोलेभटूरे ,पाणीपुरी ,गुलाबजाम ,गाजर, हलवा अशा पदार्थांची रेलचेल शेवटी आईस्क्रीम. सिरीयल मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडी जोडीने नाच हीझाला. घास भरवून झाले, हार घालून लाजत उखाणे घेतले . सर्वांनी जेवणावर येथेच्छ ताव मारला.कार्यक्रम अगदी मनासारखा म्हणजे-- मराठी मालिकांमध्ये दाखवतात तस्सा झाला.

तीन साडेतीन पर्यंत हॉटेलमधून सर्व परतले ,थोड्यावेळ वामकुक्षी झाली.
पाच साडेपाचला चहा झाला.
पुरुष मंडळी टीव्ही लावून वेगवेगळ्या चॅनलचे न्यूज ऐकत बसले होते.

आतल्या खोलीत बायका साड्या, दागिने करत करत मराठी मालिकेतल्या कथांवर पोहोचल्या, त्यातली सासू किती द्वाड असते आणि सुना किती गरीब? तsर कधी सुना कटकारस्थान करणार्या,आपण नाही बाई असं वागत वगैरे वगैरे चर्चा करत वेळ घालवत होत्या.

सात वाजायला आले. घरच्या सुने ला मधुरा ला आदर्श सुनेचा रोल आठवला. आपण आपल्या घरी आहोत ही जाणीव झाली नी आठवले स्वैपाकिणबाईंनी संध्याकाळी सुट्टी घेतली होती.
आता रात्रीच्या जेवणा चा प्रश्न डोकं खाऊ लागला .
" बाहेर पुरुष मंडळींना रात्री भूक कशी आहे ते विचारा होss जरा म्हणत मधुरा ने नवरा, मनोज ला पिटाळले, आणि खिचडी चालेल न हेच्च विचारा हे ही सांगितले.

बाहेर पुरुष मंडळीं दोन गुटांमध्ये, ,जोड तोड की सरकार याने खिचडी सरकार हे यार, कंकर भी होंगे अशी गरमागरम चर्चा करत बसले होते.

चाले--ल असा निरोप बाहेरून आला तेव्हा सुनबाईंनं बायकी गुटात खिचडी करायची कां?? असे जोरात विचारले. म्हणजे कोणी उठून करते का हे तिला पाहायचे होते.

"खिचडी?? साबुदाणा खिचडी पाच वर्षांच्या पार्थ ने आनंदाने उडी मारली".
"अत्ता नाही हं,, अत्ता डाळ, तांदूळ वाली.
अरे छान लागते काकू म्हणाल्या".

" आमच्याकडे की नै-- मुगाची, सालवाल्या डाळीची खिचडी खूप आवडते ,त्याबरोबर कोशिंबीर, पापड सर्व लागतं बाई."काकू कौतुकाने म्हणाल्या.
\" सालीच्या डाळी ची? नाही बाई आमच्या माहेरी त--र आईकडे मस्त तूरडाळ ची कोरडीच त्यावर लसणीची मस्त फोडणी, मिरचीचा खर्डा ,आणि सांडगे अस्स लागायचं. दुसर्या काकूंनी नाक मुरडल.
"आई --आजी कडची खिचडी मला बिलकुल नाही आवडत उग्र लागते त्यापेक्षा आपल्याकडचीच छान. छोटी पुतणी बोलली.

\" आमच्या हेतल च्या हातची कढी खिचडी खाऊनच पह एकदा, एकदम सरस लागते. नवीन गुजराती सुनेच्या कौतुकाचा मिळालेला चान्स का सोडावा असा विचार करून नणंद बाई म्हणाल्या" . पण हेतल तिचं सगळे लक्ष फोनमध्ये, तिने ऐकून न ऐकल्यासारखं केल .

यांना की नै-- माझ्या हातचीच खिचडी खूप आवडते, कधी भाज्या घालून करते, ,म्हणजे मिक्स व्हेज खिचडी, कधी पालक खिचडी, छान आलं लसूण घालून त्याबरोबर मंचाउ सूप.
नवीन लग्न झालेली काकूंची मुलगी लाजून म्हणाली.

"आमची नीता तर बाजरीची खिचडी करते अशी मस्तलागते ना त्यावर भरपूर मस्त तुपाची धार."
" अग बाई-- पण भाऊजींना पचते कां? कोणीतरी खवटपणे विचारले.
.
इतक्या खिचडी च्यारेसिपी तर युट्युब वर ही वाचायला मिळतील कां? असा संशय मधुरा ला आला.
इतक्या सुगरणी असूनहीएक ही जण उठून करायला तयार नाही ती आपल्यालाच करायची आहे हे लक्षात येऊन मधुरा स्वयंपाक घरात आली.
अत्ता पर्यंत दोन-तीन वाट्यांची खिचडी करायची सवय आणि आता दहा-बारा वाट्यांची खिचडी सर्वांना आवडेल अशी अश्या खिचडी चे शिवधनुष्य पेलायचे?? काय बरे करावे मधुरा ने विचार केला प्रत्येकाच्या आवडीची म्हणजे तुरीची करावी की मुगाची? काकूंना सालीच्या डाळी ची आवड तर--. तेवढ्यात मनोज स्वयंपाक घरात आला . "अग प्रत्येकाच्या आवडीचा विचार करू नकोस."
मधुराने प्रत्येक डाळ अर्धी अर्धी वाटी घेत भाज्या घालून आलं लसूण वाटून लावून खिचडी केली. सोबत कांदा टोमॅटोची कोशिंबीर पापड लोणचे
थोड्यावेळाने कूकर च्या शिट्टी चा आवाज झाला, मनोज ने बाहेर येता येता बाल्कनीत पाहिले ,
बाल्कनी मध्ये नवीन लग्न ठरलेली काकूंची मुलगी सीमा लाजत मुरडत मोबाईलवर होणाऱ्या नवऱ्याची बोलताना दिसली. बापरे इधर तोअलग ही खिचडी पक रही है असे त्याच्या मनात आले.

थोड्यावेळाने--जेवणाच्या टेबलावर-
सर्व जेष्ठ मंडळी. "मधुरा वा--काय
छान केली ग खिचडी कोणत्या डाळीची?
मधुराने मनोज कडे डोळे मिचकावत पाहत म्हटले "आमच्या यांना की नै---मिक्स डाळीची अशीच आवडते.

वा वा काय मस्त झाली हो म्हणत सर्वांनी खिचडीवर आडवा हात मारला..
-----------------------------------------लेखन प्रतिभा परांजपे