आमची कॅप्टन कुल सोनल (संबध सेतू )

आमची कॅप्टन कुल सोनल (संबध सेतू )
दु:ख पांघरावे शालीसारखे
आनंदीपण मिरवावे भरजरी वस्त्रासारखे
नम्रता नि संयमाचे अलंकार असावे असोशी
तरच तन नी मन असेल सदा सुशोभित

असा काहीसा आयुष्याचा मंत्र जपणाऱ्या सोनल मॅडम बद्दल मी आज बोलणार आहे. इराच्या स्पर्धेचे दुमदुम वाजले आणि मी आधीच्या स्पर्धेसारखं यावेळीही आपलं नाव रजिस्टर केलं. संजना मॅडमनी आम्हा दहा नवोदित लोकांना एकत्र एका टीममध्ये टाकलं. ज्यातील प्राजक्ता आणि प्रिया सोडली तर कोणी ओळखीच नव्हतं.

ह्या वेळेच्या स्पर्धा एवढ्या वैविध्यपूर्ण आहेत की मी सुरवातीलाच घाबरले होते. माझा तर नकारच होता. मला नाही जमणार ..मी टाटा बाय होते. हे विचार मनात पक्के होत असताना सोनल मॅडमची कॅप्टन म्हणून निवड झाली.

मग मी त्यांना फोन लावून सरळ माझी भिती सांगितली. त्यांनी मला थांबायला सांगितलं आणि मी त्यांच्या समजवण्यावर थांबलेही. मग काय जलद कथा लेखनाला काय लिहायचं ह्यावर आमची फोनवर चर्चा होऊ लागली. मी त्यांना दोन कथाबीज दिली आणि त्यातील त्यांनी  "सवत माझी लाडकी" हा विषय निवडला.

मी कधीही कौटुंबिक लिहलं नव्हतं, पण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझी जलद कथा टॉप टेन कथांमध्ये आली. त्यांना जेवढी ओळखत गेली तेवढं जाणवलं की त्या स्वभावाला लाघवी आणि गोड आहेत. आम्ही सुरवातीला दहाजण होतो.

काही लोक प्रतिच्या स्पर्धेमुळे सगळ्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकत नव्हते, पण ह्यावरून त्यांनी कधीच चिडचिड केली नाही. जे आहात त्यांना घेऊन त्यांनी प्रत्येक फेरी पार केली. प्रत्येकाकडून गोड बोलून, प्रेशर न देता प्रत्येक फेरीसाठी भाग घ्यायला लावणं हे कॅप्टनच काम त्यांनी लीलया पार पाडलं.

असं म्हणतात स्तुती सांगावी जनात आणि निंदा करावी एकट्यात..तसंच त्यांच वागणं आहे. त्या सगळ्या ग्रुप समोर प्रत्येक राऊंडसाठी प्रत्येकाला मोटीवेट करायच्या, पण फोलोअप मात्र त्यांनी पर्सनलीच केला. ज्यामुळे त्या मेंबरला कधी डेडलाईन गाठायला उशीर झाला तरी उगाच ओशाळल्यासारखं व्हायचं नाही.

आम्ही टॉप ग्रुपमध्ये अजून तरी नाही आहोत..पण हसत खेळत, एकदाही वाद व भांडण न झालेले आणि सगळ्या फेऱ्या नेटाने पुर्ण करणारा कुल ग्रुप आहोत आणि आमची मोट बांधणारी आणि दिशा दाखवणारी कॅप्टन कुल आहे सोनल मॅडम.

त्या फक्त हया ग्रुपच्या नाही तर त्यांच्या आयुष्याच्याही कुल कॅप्टन आहेत. शिक्षणासाठी त्यांनी केलेली धडपड  खरंच प्रेरणादायी आहे. ऐन तारुण्यात पितृछत्र हरवल्यानंतरही त्या समर्थपणे उभ्या राहिल्या. ज्याच्याशी प्रेम केलं, त्या व्यक्तीच्या खऱ्या प्रेमासाठी मुंबईसारख्या अनेक संधी असणाऱ्या शहराला आणि चांगल्या नोकरीला रामराम ठोकून गावात राहायला गेल्या. तिकडेही जॉब करून आपलं स्वप्नांच घरकुल उभारलचं आणि विद्यार्जन करून आत्मनिर्भरही राहील्या. आताही त्यांना काही प्रकृतीच्या तक्रारी असतात, पण तरीही त्या प्रत्येक जबाबदारी समर्थपणे निभावतात.

मग ती लेखक म्हणून वेळेवर दर्जेदार लेखन करून वाचकांचे मनोरंजन असो, आमच्या सगळ्याबरोबर स्पर्धेचे टास्क करणं, प्रत्येकाची कथा नीट इरावर आणि फेसबुक वर आली आहे की नाही ह्यावर लक्ष ठेवणं असो.
स्पर्धांच्या अनेक फेऱ्यामध्ये त्या नेहमीच संजना मॅडम आणि आमच्यात उत्तम संबध सेतू बनल्या आहेत. त्यांनी वेळोवेळी मॅडमना सांगून आमच्या शंका दूर केल्या. नेहमीच त्या आमच्यासोबत असतात. एवढं करून
घराच्या जबाबदाऱ्या तर उत्तमपणे निभावतात ,त्याला कधीही सुट्टी नसतेच त्यांची.

ह्या सगळ्या ताणात मी तरी कधीही वैताग किंवा राग हे भाव त्यांच्या स्वरात ऐकलं नाही. त्या माझ्यासाठी कॅप्टन धोनी सारख्या कुल कॅप्टन आहेत.

आमच्या ग्रुपचे वैशिष्ट्य आहे, आम्ही लेकुरवाळ्या संसार करणाऱ्या नऊ दुर्गा (सोनल मॅडम ,प्रिया ,वैशाली मॅडम,वैशाली मंठाळकर, प्राजक्ता,स्वप्नाली,गीतांजली आश्विनी आणि मी वृषाली ) आणि आमचे गणपती  (किरण दादा). म्हणजे बघा हा!  आठ बायकांना कसं मस्त सांभाळून घेतलं असेल त्यांनी.

एक मात्र खरं की आमचा ग्रुप ही कुल आहे. प्रत्येक जण दुसऱ्याला प्रोत्साहित करत असतो. मग ती जलद कथा लेखन, इन्स्टावर कविता, स्टँड अप कॉमेडी अथवा चॅट व्हीडीओ काही म्हणा..प्रत्येकाने भाग घेणाऱ्याला प्रोत्साहन दिलचं आहे व वेळप्रसंगी मदतही केली आहे. 

अशी आहे आमची टीम आणि आमची कॅप्टन कुल सोनल.

समाप्त.