Dec 08, 2021
General

आमच्याकडे असंच असतं

Read Later
आमच्याकडे असंच असतं

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

#आमच्याकडे_असंच_असतं

नानीची तब्येत आताशी बरी नसायची. गावातल्या घरात दोघंच नवराबायको रहायचे. त्यादिवशी रात्री अचानक तिची तब्येत बिघडली. जीव घाबराघुबरा झाला. 

नानांनी रिक्षा बोलावून तिला दवाखान्यात न्हेलं. सगळ्या तपासण्या करण्यात आल्या. डॉ. पातकर म्हणाले,"नानी,एकटी रहातेस ना. जास्त विचार करतेस तू. मेंदूत सतत बडबड चालू असते तुझ्या. बाकी तुला काही आजारपण नाही. माणसांची सोबत हवीय. ती काही विकत मिळत नाही." नानांचा लेक, विश्वनाथ तितक्यातच आला होता. तो केबिनचं दार उघडून नानांच्या मागे उभा होता. विश्वनाथलाही डॉक्टर बडबडले,म्हणाले,"या दोघांना तुमच्या आधाराची,मायेची गरज आहे,नुसत्या पैशाअडक्याची नाही विश्वनाथ. बील भरुन तुझं काम पुर्ण झालं असं वाटत असेल तर तो भ्रम आहे तुझा." विश्वनाथ काहीच बोलला नाही. क्षणभर कुणीच काही बोलेना. तसं नानाच म्हणाले,"तो लाख न्हेतो म्हणेल पण ही ऐकायला पाहिजे नं." तसं नानी म्हणाल्या,"यावेळी ऐकेन मी. जाऊ आपण विश्वाकडे." 

डॉक्टरांचा निरोप घेऊन तिघं घराकडे आली. विश्वानेच चूल पेटवून डाळभाताची खिचडी केली सोबत मुरलेलं आंब्याचं लोणचं घेतलं. संध्याकाळी नानानानींना घेऊन विश्वा मुंबईला निघाला. नानी अशी फारशी रहायला कधी आलीच नव्हती विश्वाकडे. कौमुदी,नानीची सून तिला दरवर्षी बोलवायची. नानी काहीतरी निमित्त काढून गावच्या घरातच रहायची. नाना मात्र येऊनजाऊन असायचे. 

नातसून गौरी घरात वावरत होती. कौमुदी नि तिचं किचनजवळ काहीतरी खुसुखुसु चाललं होतं. मधेच दोघी हसायच्या. गौरीने नानांना गरम पाणी नेऊन दिलं,नानीला बिनदुधाचा चहा दिला. नानी मनात म्हणाली,"म्हणजे कौमुदीने सुनेला सारं शिकवलेलं दिसतय. चहाही एकदम कडक होता. नानीला जरा तरतरी आली. नानीचं बारीक लक्ष होतं. कुमुदने  गरम दूध घेतलं त्यात चमचाभर बोर्नविटा घातलं. गौरी आत पोळ्या लाटत होती. तिला खुर्चीवर बसवून बळेबळे दूध प्यायला लावलं. गौरीने ओले केस तसेच वरती बांधून ठेवले होते. कुमुदिनीने गौरीचे केस सोडवले. त्यांना पंचाने नीट पुसलं. कानाच्या मागच्या बटा घेऊन छानशी बटवेणी घालून दिली तिला. गौरीही हसतहसत थँक्यू आई म्हणाली. 

नानीला आठवलं, कुमुदिनीचे केस किती छान होते,कुरळे कुरळे पण तिने कधी तिच्या केसांतून अशी मायेची बोटं फिरवली नव्हती. कधी दारातला सोनटक्का कौतुकाने कुमुच्या केसात माळला नव्हता.  गौरी ऑफिसला जायला निघाली तसं कुमुदने तिला आवर्जून पास,पाकिट,पाकिटात पुरेसे पैसे आहेत का ते विचारलंं.

गौरी गेल्यावर तिने नानीच्या नहाण्याची व्यवस्था केली.  नानी अंघोळीआधी सर्वांगाला दूधात चण्याचं पीठ भिजवून लावायच्या ती दूधपीठाची वाटीही तिने तयार करुन दिली. आंघोळ्या झाल्यावर नानानानींना शिरापोळी   करुन दिली. दोघांनाही गोळ्या घ्यायची आठवण करुन दिली. 

संध्याकाळी मात्र सगळा स्वैंपाक गौरीच्या हातचा होता. अर्थात पुर्वतयारी कुमुदने करुन दिली. आमटीत दाण्याचं कूट होतं. सगळीजणं कौतुक करत आवडीने जेवत होती.
नानी पुन्हा भूतकाळात गेली. नानीला कुमुद गावी तिच्यासोबत असतानाची पहिली चार वर्षं आठवली. पहिल्याच दिवशी कुमुदने चहा केला तेव्हा पहिल्या घोटालाच नानी म्हणाली होती,आमच्याकडे इतका गोड चहा नाही चालत. साखर जरा कमीच टाकत जा आणि हो चहापावडरही प्रमाणात घाल हो. उगा ओतून ठेवायची नाही. कुमुदने  भातात थोडं मीठ टाकलं तर नानींनी तिला आमच्यात भातात मीठ टाकत नाहीत सांगितलं होतं. तीच तर्हा भाजीची,प्रत्येक पदार्थांची..इतकंच काय स्वैंपाकघरातल्या प्रत्येक डब्याच्या जागाही नानींच्या ठरलेल्या होत्या. इकडचा डबा तिकडे ठेवला तर नानी कुमुदला रागे भरायची. सगळं नानीच्या 'आमच्याकडे असचं चालतं' या नियमानुसार करावं लागायचं कुमुदला तरी कुमुद नानीना कधी उलटून बोलली नव्हती पण तिला नानींचं बोलणं लागायचं आणि ते कुमुदच्या डोळ्यांत दिसायचं. 

एकदा कपडे धुताना कुमुदने तिचा नवीन ब्लाऊज इतर कपड्यांसोबत भिजवला व सगळे कपडे लालेलाल झाले होते तेव्हा नानी केवढी ओरडली होती तिला..तुझ्या आईने तुला नवीन कपडा वेगळा धुवायचा,रंग जाऊ शकतो त्याचा,इतकंही शिकवलं नाही का गं असं आणि बरंच बोलली होती तेव्हा मात्र नानांनी कुसुमची बाजू घेत, "मला मात्र हा लाल सदरा आवडला बरं का सुने. नाहीतरी पांढरे सदरे घालून जीव वीटलेला अगदी," अशी मलमपट्टी केली होती. अर्थात तेव्हा आवकही कमी असल्याकारणाने कोणत्याही प्रकारे झालेलं नुकसान हे परवडणारं नव्हतं. विश्वा नंतर दुसरी बनियन घेईस्तोवर  एकच बनियन रात्री धुवून वाळवून घालून जायचा.

दुसऱ्या दिवशी नानींची नात आणि कुमुदची मुलगी,केतकी नानानानींना भेटायला आली. आल्याबरोबर तिने नानीला मिठी मारली. तिच्याही लग्नाला आता कुठे वर्ष होणार होतं. केतकी तिच्या सासूची तक्रार करत होती. सासू सारखी 'आमच्याकडे असंच चालतं' म्हणते असं सांगत होती. 

कुमुदने केतकीची समजूत घातली. सासू वयाने व मानाने मोठी आहे तेव्हा तिच्या कलाने घेत जा असं लेकीला सांगितलं तिने. नानीला मात्र अगदीच ओशाळल्यागत झालं. नानीची लेक नानीकडे आली की नानी नि लेक दोघी तिच्या सासरकडच्यांची उणीदुणी काढायच्या. कुमुद एकटीच स्वैंपाक करत बसायची. मदतीला कुणी जायचं नाही. नानी लेकीला चार समजुतीचे शब्द सांगण्यापेक्षा तिच्या सासूलाच बोल लावायच्या. इथे मात्र परिस्थिती वेगळी होती. 

कुमुद,केतकी व गौरी तिघी मिळून हसतखेळत कामं आवरत होत्या. केतकी माहेरी आली म्हणून आरामात बसली नव्हती कि कुमुद कुठेही सासूगिरी दाखवत नव्हती. गौरीचं तर कसलं ऑनलाइन काम होतं. ती रात्रभर जागी होती. कुमुदने तिला मधे कॉफी करुन दिली. सकाळीही तिला शांत झोपू दिलं. 

नानीला कळत होत्या,आकलन होत होत्या..तिने भूतकाळात केलेल्या चुका,लेकीवर केलेलं जास्तीचं प्रेम आणि सुनेवर माया करताना आखडता घेतलेला हात.

 नानीला मनात आलं,पाटीवर लिहिलेली अक्षरं जशी ओल्या फडक्याने पुसता येतात तशी ही मधली वर्ष पुसता यावीत नि पुन्हा नव्याने जगता यावीत मग नानी आमच्याकडे हा शब्द कटाक्षाने टाळणार होती,तुझ्या आईने तुला हेच शिकवलं का असं बोलून वर्मी घाव घालणार नव्हती पण ते आता शक्य नव्हतं.

 नानीने मनातला सल नानांकडे बोलून दाखवला. नाना म्हणाले,"अजून आठवडाभर तरी आहोत आपण इथं. तू कुमुदजवळ तुझं मन मोकळं कर. तुला बरं वाटेल बघ. अगं आता आपली राहिली कीतीसी वर्षं! सॉरी म्हण तिला. त्यात कमीपणा नसतोच मुळी पण मन हलकं होईल तुझं. नानी,त्यावेळच्या पद्धतींनुसार वागलीस तू . जाणूनबुजून सुनेला त्रास देणारी कजाग सासू मुळीच नव्हतीस तू. कुमुदची पोटाची शस्त्रक्रिया झाली तेव्हा स्वत:चे साठवलेले पैसे विश्वाला पाठवले होतेस ते तुझा कुमुदवर जीव आहे म्हणूनच ना." नानीने नाकावरचा चष्मा काढून ओलावलेले डोळे पुसले. दोघांनाही कल्पना नव्हती की कुमुद त्यांच्यामागे पाण्याचा तांब्या घेऊन उभी आहे. 

कुमुदने नानींना मिठीच मारली,"नानी,हे सॉरी बिरी मला म्हणायचं नै बरं का. मला तुमची शिस्तच आवडते. तुमचं हे असं मुसमुसणं नाही आवडत मला. माझी सासू कशी वाघिणीसारखी हवी मला. मग कितीही आमच्याकडे नि तुमच्याकडे केलंत तरी मला नाही फरक पडत. मनातून मला तुम्ही आपलं मानलय हे ठाऊक आहे मला. दरवर्षी मला तिखट,लोणची पाठवता. अजुनही आम्ही मुंबईला यायला निघालो की आमच्या हातावर दहीसाखर ठेवता. नाना तळमळीने, पैसे आहेत ना रे विश्वा असं विचारतात तेव्हा किती आधार वाटतो तुमचा आम्हाला. प्रमोशन झालं न् मुंबईला बदली झाली ह्यांची नाहीतर तुमचा सहवास पुरेपूर मिळाला असता आम्हाला. आता मात्र तुम्ही दोघांनी कुठे जायचं नाही, आम्हाला सोडून. या आपल्या घरात एकत्र राहू. आधारवडाची छाया हवी आम्हाला नानी." 

नानी सुनेचा शब्द न् शब्द अम्रुतासारखा प्राशन करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर न्हाऊन शेगडीजवळ गेली. अनायासे रविवार होता. सगळी घरात होती. नानीने सुनेला व नातसुनेला हातीशी घेतलं व वडेसागोतीचा बेत केला. वडे करताना कुमुदला तिच्या पद्धतीने पीठावर वडे थापू दिले व नातसुनेला तिच्या पद्धतीने वाटण काढू दिलं. 

नानांनी,विश्वाने व नातवानेही बोटांचा मोर करुन जेवण छान झाल्याची पावती दिली तेव्हा नानी म्हणाली,"छान असणारच. आम्ही मिळून केलंय आमच्या पद्धतीने." तिघी मिळून मग तोंड भरून हसल्या.

-------सौ. गीता गजानन गरुड.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now