आंबील

आंबील

महालक्ष्मीच्या नैवेद्याच्या पानावर आंबील महत्त्वाची मानली जाते. बहुतेकांना हा पदार्थ आवडतो.चला तर मग मी आज तुम्हाला आंबील ची रेसीपी सांगते. 

साहित्य

दोन वाट्या ज्वारी, खोबराडोल, पाच, सहा मिरे, थोडी सुंठ, पाव लिटर ताक, चवीपुरते मीठ, एक, दोन हिरव्या मिरच्या.

कृती

प्रथम ज्वारी स्वच्छ धुऊन पाच ते सहा तास पाण्यात भिजू द्या. नंतर पाण्यातून काढून घेऊन एखाद्या सुती कापडावर पसरून सुकू द्या. थोडी ओलसर असतानाच ती ज्वारी मिक्सर मधून थोडी जाडसर काढून घ्या. आता हा ज्वारीचा झालेला रवा दोन तास ताकात भिजत ठेवा. खोबऱ्याचे तुकडे करून घ्या. मिरे थोडे जाडसर कुटून घ्या.  एका  गंजात अंदाजाने पाणी घेऊन ते पाणी उकळी येऊ द्या. त्यात मिऱ्याची भरड , खोबऱ्याचे व मिरचीचे तुकडे व थोडी सुंठ व किंचित मीठ घाला.नंतर त्या उकळीच्या पाण्यात  ताकात भिजवलेला ज्वारीचा रवा हळूहळू अशा तऱ्हेने वरा की गुठळ्या होणार नाहीत. मंद आचेवर ही आंबील चांगली शिजू द्या. थंड झाल्यावर गुळ, सायीचे दूध व तूप टाकून खायला घ्या. अत्यंत पौष्टिक अशी ही ज्वारीची आंबील सर्वांना निश्चितच आवडेल. रोजच्या भाजी पोळीपेक्षा थोडा बदल म्हणून ही रेसिपी अवश्य करून पहा.

मस्त खा.

स्वस्थ रहा.

सौ. रेखा देशमुख