आल्या पावली परत गेला!

Aalya pavli parat gela!

#आल्या_पावली_परत_गेला!

माणिकने बारावीची परीक्षा दिली. ती सुट्टीत मामाकडे गेली होती. तिथे मामीच्या भावासोबत त्याचा मित्र जगन आला होता. जगन बीए होता. त्याला माणिक पसंत पडली.

 जगनने मामीजवळ माणिकचा विषय काढला. म्हणाला,कोल्हापूरला आमचं घर आहे. चादरींच दुकान आहे. आईवडील थोरला भाऊ नि दोन बहिणी आहेत. मामाने माणिकच्या आईवडिलांना बोलावून घेतलं. जगनचे आईवडील आले. ठराव झाला नि ग्रीष्मात माणिक नि जगनचं लग्न झालं.

 जगनने माणिकला पुढे शिकू देईन असं आश्वासन दिलेलं खरं पण घरात दहा कामं रांगेत तिची वाट बघत असायची. नणंदा कॉलेजला जायच्या. सकाळी उठल्यापासनं अंगण झाडणं,नाश्ता करणं,भांडी घासणं अशी कामाची लाइन लागलेली असायची त्यात थोरला दिर व त्याची बायको नोकरीला जायची. तिच्या लहान मुलीला सासूबाई संभाळत. दुपारी मात्र ती छोटी माणिकच्याचसोबत खेळत असे.

माणिकला घरी एवढ्या रामरगाड्याची सवय नसल्याने ती फार थकून जाई. एकदा जगन फारच चिंतेत होता. माणिकने कारण विचारलं तर म्हणे,काय करु,धंदा चालेनासा झालाय. जागामालकाने गाळा खाली करायला सांगितलय."

 माणिक म्हणाली,"तुम्ही घरात आईवडिलांशी बोला. ते नक्कीच काहीतरी मदत करतील." जगन म्हणाला,"त्यांच्याकडे कुठून आले पैसे नि असले तरी द्यायचे नाहीत ते. माझ्यावर विश्वास नाही त्यांचा. तुझाही नाही ना!"

"असं कुठं म्हंटलं मी?"माणिक भांबावत म्हणाली.

"मग झालं तर हे आपलं बोलणं आपल्यातच राहुदे. कोणाला काही सांगू नकोस. तुझ्या माहेरीही नको जाऊस काही दिवस. मला गरज आहे इथे तुझी. तुझे दागिने दे मला मंगळसुत्र राहुदे तुझ्याकडे नाहीतर उगा संशय यायचा घरातल्यांना."

माणिकने पेटीतला दागिन्यांचा बटवा काढला. त्यातल्या चार सोन्याच्या बांगड्या,कैरीहार,सासेबाईने दिलेला हार हे सगळं धन जगनच्या सुपुर्द केलं. जगन खूष झाला म्हणाला,"बायको असावी तर अशी." त्याने माणिकला मिठीत घेतलं. दिवसभर कितीही काम केली तरी रात्री जगनच्या स्पर्शाने तिची सगळी मरगळ,थकवा दूर व्हायचा. 

जगन तिला खूप सारी स्वप्नं दाखवायचा. चारेक महिन्यात दागिने सोडवून आणू,इथे काम जास्त पडतं म्हणून दोन नोकर दिमतीला ठेवू,चारचाकी गाडी घेऊ,थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाऊ..एक ना दोन..त्या स्वप्नांच्या दुनियेत माणिक हरवून जायची. त्यातच नणंदेचं कॉलेजमधे अफेअर चालू होतं,त्याची कुणकुण घरात लागली. माणिकची सासू नि नणंदेत जाम भांडणं,हमरीतुमरी होऊ लागली. माणिकचे सासरेही आजारी पडले. 

एके दिवशी जगन जो निघून गेला तो परत घरी आलाच नाही. बिचारी माणिक इवल्याशा तोंडाने आड्याकडे बघत रहायची. तिला तो येत असल्याचा भास व्हायचा. थोरल्या दिराने ओळखीच्यांत शोधले पण कुठेच त्याचा ठावठिकाणा लागेना. यातच माणिकला दिवस गेले. आता या दोन जीवांचं पोट कोण भरणार म्हणून थोरली वहिनी माणिकला पाण्यात बघू लागली. सासुबाईने माणिककडे तिने दिलेला हार मागितला. 

माणिकला कळेना आता काय सांगावे. शेवटी तिने भीत भीत जगन सगळं स्त्रीधन घेऊन गेला असं सांगितलं. सासूबाई तिच्यावर जाम भडकली. तूच माझ्या मुलाला बिघडवलस म्हणाली नि माहेरी जा नि तुझ्या वडिलांकडून तसाच हार बनवून घेऊन ये म्हणू लागली.

 माणिक नेसत्या वस्त्रानिशी त्या घरातून बाहेर पडली. संध्याकाळी दिवेलावणीच्या वेळी माणिकला तशा अवतारात आलेलं पाहून तिच्या आईचं काळीज धडधडलं. माणिक आईच्या गळ्यात पडून खूप रडली. माणिकचे आईवडील चिंताग्रस्त झाले. पोटुशी लेक दारात आली तीही अशा दीन अवस्थेत. माणिकचे वडील विचार करु लागले,"छे,चुकलंच. जरा जास्त चौकशी करायला हवी होती नवऱ्यामुलाची."

माणिकचे वडील तिला म्हणाले,"बाळ तू गर्भपात करुन घे नाहीतर पुढचा काळ अत्यंत कठीण जाईल तुला." माणिकने ठाम नकार दिला.  तिने गर्भारपण स्वीकारलं. तीचं मन म्हणत होतं,या सगळ्यात माझ्या बाळाची काय चूक? त्याचं या दुनियेत येणं मी का नाकारु? 

नवव्या महिन्यात माणिकने मुलाला जन्म दिला. आजुबाजूच्यांची कुजबूज सुरु असायची पण या तिघांनीही जणू कानात बोळे घालून ठेवले होते. घरच्या घरी बारसं करुन मुलाचं नाव सौमित्र ठेवलं. आता हाच माणिकच्या जीवनाचा सोबती होणार होता. 

सौमित्रला कळू लागलं तसं सौमित्र आईला त्याच्या वडिलांविषयी विचारायचा. माणिक त्याला ते फार लांब गेले आहेत असं सांगायची. आईवडिलांवर खर्चासाठी अवलंबून रहाणं तिला पटत नव्हतं कारण त्यांचीही परिस्थिती यथातथाच होती.

माणिकने उदरनिर्वाहासाठी पोळीभाजी केंद्र सुरु केलं. भाजीपोळी,आमटीभाताचे डबे बाजुला असलेल्या सरकारी कार्यालयात जाऊ लागले. माणिक  व तिची आई दोघी मिळून स्वैंपाक बनवायच्या. सौमित्रचे आजोबा त्यांना गिर्हाइकं आणून द्यायचे. पैशाची देवाणघेवाण करायचे. 

सौमित्रही मन लावून अभ्यास करायचा. आईचे कष्ट पाहून फार कमी वेळात त्याला शहाणपण आलं होतं. बारावीत तो जिल्ह्यात दुसरा आला तेंव्हा त्याने त्याच्या यशाचं श्रेय हे त्याच्या आईला व आज्जीआजोबांना दिलं. आजोबांनी तर गावभर पेढे वाटले. पुढे त्याने अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. प्रथमच आईला सोडून वसतिगृहात रहायला जाताना त्याला भरुन आलं होतं तरी पण माणिक खंबीर राहिली. तिने डोळ्यातून ठिपूससुद्धा  काढला नाही. 

सौमित्र गेला त्यानंतर काही दिवसातच दाढी वाढलेला,गबाळ्या अवस्थेतला जगन एका दुपारी त्यांच्या पायरीजवळ आला. माणिकने प्रथम त्याच्या अवतारावरून त्याला ओळखलच नाही. केस वाढले ले,मळके कपडे,हातापायांच्या काड्या.

 जगननेच ओळख सांगितली तसे झोपाळ्यावर बसलेले माणिकचे वडील पुढे आले,"माझ्या लेकीचं आयुष्य धुळीला मिळवलंस नि आत्ता परत तिच्या जीवनात विष कालवायला आला आहेस!",ते मुठी आवळत म्हणाले.

 सुमनने मात्र जगनला मागीलदारी न्हेलं. त्याला अंघोळीला पाणी दिलं. त्याचे केस वगैरे न्हाव्याला बोलवून कापून घेतले. जगन अक्षरश: माणिकच्या पाया पडला म्हणाला,"अगं माझ्या आईने मला घरात नाही घेतलं पण मी तुझे दागिने न्हेले,तुला वाऱ्यावर टाकली तरी तू मला घरात घेतलस. मी तुझे दागिने माडीवर जाऊन उधळले,मज्जा केली. ती चटच लागत गेली,मग चोऱ्यामाऱ्याही करु लागलो. जेल झाली. तुझी खूप आठवण यायची. माणिक,माफ करशील मला?" 

माणिक म्हणाली,"तुम्ही माझा विश्वासघात केलात तेंव्हाच तुम्ही पती म्हणून माझ्या मनातून उतरलात. मी एक दीन माणूस म्हणून तुमच्याकडे पाहिलं,तुम्हाला खाऊपिऊ घातलं. तुम्ही सोडून गेलात तेंव्हा तुमच्या प्रेमाची निशाणी होती माझ्या उदरात. मला मुलगा झाला. सध्या होस्टेलला रहातो तो. सौमित्र नाव त्याचं. हा बघा फोटो. सौमित्रचे वडील बनण्याचा प्रयत्न मात्र करु नका. त्याच्या आयुष्यात अजून वादळ आणू नका. तुम्हाला काही पैसे देते. तुम्ही लांब कुठेतरी निघून जा. नोकरी करुन पोट भरा. 

सौमित्रचं नाव मात्र सौमित्र माणिक शिरसाठच राहिल. तुमच्या आईने मी पोटुशी असताना मला घराबाहेर काढलं म्हणून मी तुमचं आडनावही सौमित्रच्या नावाला जोडलं नाही तर ज्या माझ्या आईवडिलांनी आम्हा मायलेकरांना आधार दिला,माया दिली त्यांचं आडनाव शिरसाठ लावलं." माणिकने एक नोटांच पुडकं जगनच्या हातात आणून दिलं. त्याला नमस्कार केला नि माजघराचं दार लावून घेतलं. 

ओशाळलेला जगन आल्या पावली परत गेला.

-----सौ.गीता गजानन गरुड.