आळशांची कहाणी

मित्रांनो सध्या श्रावण महिना सुरू आहे......
आळशांची कहाणी
--------------

मित्रहो, सध्या श्रावण महिना चालू आहे. म्हणजे कहाण्यांचा महिना. आपण मागच्या पिढीतील असाल तर नक्कीच कहाण्या ऐकल्या असतील. किंवा गंमत म्हणून तरी वाचल्या असतील. साधारणपणे चांगली कामे करणारे, सात्विक वागणारे, किंवा सात्त्विक वागण्यावर भर देणाऱ्या लोकांवर कहाण्या लिहिल्या जातात. पण आळशी माणसांवर कोणी कहाणी लिहिल्याचं दिसत नाही. कहाणी लिहिणाऱ्यांना माणसाचा हा परंपरागत गूण लक्षात आलेला दिसत नाही. ही कहाणी वाचल्यावर कदाचित आपणही नवीन कहाणी रचू शकाल. या कहाणी मुळे जर कोणाच्या भावना वगैरे दुखावल्या गेल्या तर आधीच माफी मागत आहे. कारण हल्ली कशा मुळे भावना दुखावल्या जातील , हे सांगता येत नाही.

ऐका आळशांनो तुमची कहाणी .

आटपाट नगर होतं तिथे एक राजा राज्य करीत होता . तो अत्यंत आळशी होता. तो दर दोन वर्षांनी अंघोळ करी. त्याचं असं व्हायचं की राजेसाहेबांना अंघोळीची गरज आहे , हे ठरवायला राजवैद्य येत. ते यायलाच मुळी (निरोप मिळाल्यापासून) तीन चार महिने लावीत. मग ते तपासून सांगत की राजेसाहेबांना अंघोळिची गरज आहे. मग अंगाला बेताचीच (राजेसाहेबांच्या दृष्टीने) घाण येत असल्याने ते राजवैद्यांकडे लक्ष देत नसत. अंगावरील मळाची सुयोग्य रांगोळी बैठकीभोवती किंवा दरबार असल्यास सिंहासना भोवती ते रोज काढीत. मग त्यांना मान्यता प्राप्त महा आळशी महामंत्री म्हणत, " राजेसाहेब , अशानं आपली अंघोळ आणखी दोन वर्ष लांबेल. परंतु ते आपणास नक्कीच शोभेल. कारण आपण महा आळशांचे महा महा आळशी आहात, यात शंकाच नाही. " असा ते तोंडपुजेपणा करित असत.

असो. अशा या राजेसाहेबांना शिक्षणाचं अतिशय वेड होतं. त्यासाठी त्यांनी शाळा व महाविद्यालये निर्माण केली होती. राजेसाहेबांच्या आज्ञेप्रमाणे सर्वच प्रजाजनांना सर्वच गोष्टी अवेळी करण्याची सवय होती. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये होणारा पदवी दान समारंभ काही वर्षांपूर्वीचा असूनही तो चालू तारखेला होत असे. म्हणजे बघा आपण कसं म्हणतो, "अमुक एक तारा इतकी प्रकाशवर्षे दुर आहे. म्हणजे तो तेवढे वर्षांपूर्वीची स्थिती दाखवतो, तसं. म्हणजे निसर्गात सुद्धा आळशी पणा भरलेला असून तो एक गूण आहे , दुर्गुण नाही. " असं दस्तुरखुद्द राजेसाहेबांनी एका महाविद्यालयाच्या उदघाटनाच्या भाषणात सांगितलं होतं. त्यामुळे वरील वाक्ये महाविद्यालयांमध्ये सुविचार म्हणून वापरली जात होती.

अशा ह्या राज्यात महाराजांचे सिंहासन म्हणजे त्यांचा सोन्याचा बिछानाच होता. तो दरबाराच्या दिवशी उच्च स्थानी ठेवला जायचा. बाकीचे दरबारी मानकरी पण आपापल्या इतमामानुसार लहान मोठ्या बिछान्यांवर पडून असत. दरबाराची ती वंशपरंपरानुगत पद्धतच होती तिथे. दरबारात राजेसाहेबांच्या वंशातील आलसोत्पन्न पूर्वजांची तैलचित्रे लावली होती. त्यातील पूर्वज सगळे बिछानाधीनच दाखविले होते. त्यांच्या प्रत्येकाच्या चित्राखाली पूर्वजांच्या पदव्याही लिहिल्या होत्या. त्यात राजेसाहेबांच्या निपणजांपासून चित्रे होती. त्यांचे निपणजे मात्र फक्त आळशी होते असं लिहिलं होतं . कारण त्यावेळी आळशीपणावर एवढं कसून संशोधन न झाल्याने , त्यांना आळशी ही पदवीच धारण करावी लागली. म्हणजे पाहा त्यांचा हुद्दा काय होता तर "आलसोत्पन्न राजचक्र मंडित महाराजे पहुडेश्वर महाराज"(की जय). त्यांच्या राण्यांचीही तैलचित्रे होती पण ती दरबारात लावली नव्हती. कारण स्त्रीसुलभ लज्जा त्यांनाही असल्याने व त्यांची आळशीपणाची वेगवेगळ्या अवस्थेतील चित्रे कदाचित अश्लीलता निर्माण करतील, व दरबारी लोकांच्या मनावर उशिरा का होईना पण परिणाम करतील म्हणून राजेसाहेबांनी ती अंतःपुरात लावली होती.

राजांचा दिनक्रम मोठा मजेशीर होता. सकाळी सकाळी राजभाट येऊन बिछानावजा सिंहासनावर पडलेल्या राजेसाहेबांची स्तुती करीत. त्यावेळी ते आळसाचं महत्त्व सांगणारी काव्य सुभाषितं , भजनं, वगैरे गात असत. अर्थातच एकेका ओळीनंतर ते तास भर झोपत असत. त्यामुळे राजस्तुती हा प्रकार साधारणपणे दोन तीन तासतरी चाले. दरबार रोज भरत नसे. पण दरबाराची तारीख अशा रितीने ठरवली जायची की सर्व दरबारी लोकांना आपले आळसयुक्त गूण नीटपणे सांभाळता सांभाळता दरबारात हजेरी लावता येईल. असो, राजस्तुती झाल्यावर राजेसाहेब डोळे किलकिले करून पाहात, मग त्यांना खात्री झाली की आळसाचं योग्य महत्त्व लोकांवर बिंबलं आहे की ते कुशीला वळून मोठमोठ्या जांभया देत चोपदारांच्या मुखाने दरबार सुरू झाल्याचं जाहीर करीत. नंतर रोजची खबरबात सांगणारे एक मंत्री होते , ते राजेसाहेबांना राज्यातील हालहवाल, संरक्षण व्यवस्था, परचक्राची काही भीती असल्यास , तसच शत्रूबद्दलची हेर खात्याने आणलेली जुनी माहिती (जुनी म्हणजे आळसामुळे उशीर झालेली) ते ऐकवीत. या प्रसंगी दरबारी लोकांना अजिबात मज्जाव नव्हता. गोपनीय असं काहीच नव्हतं कारण राजेसाहेब लोकहितवादी होते. प्रत्येक घडामोड प्रजाननांना (अर्थात प्रजाजन हजर असतील तर) समजलीच पाहिजे असा राजेसाहेबांचा अट्टाहासच होता मुळी. आजच्या सारखे "माहितीच्या अधिकाराचा कायदा " तेव्हा असण्याची प्रजाजनांना गरज भासत नव्हती. सगळच पारदर्शक होतं. म्हणजे राजेसाहेब पुरोगामी होते. मग राज्याचा आय व्यय पाहिला जाई. कित्येक वर्षांचा कर अजून भरला जात असे. त्यावर दंड , शिक्षा असा प्रकार नव्हता. करवसुली सारख्या अप्रिय पद्धती नव्हत्या. उलट वेळेवर कर भरणारे (म्हणजे चालू वर्षाचा कर चालू वर्षातच भरणारे) तुरुंगात पडत. असे कोणीही नव्हतेच म्हणा . एक आळस सोडला, तर लोक प्रामाणिक होते. उशिरा कर भरणं ही एक कला होती. पण कर मात्र भरावा लागतच होता. मग राजघराण्यातील जन्म मृत्यूच्या बातम्या व काही खास नावाजलेल्या आळशी प्रजाजनांच्या मृत्यूच्या बातम्या सांगितल्या जात. त्याकरता मात्र दरबारात दोन मिनिटं तरी सगळ्यांची झोप उडवली जात असे. नंतर त्यांना झोपायची मुभा होती.

मध्येच राजेसाहेब कंटाळू नयेत , म्हणून कलावंतिणींचे नग्ननृत्य दोन दोन तीन तीन तास चालू राही. त्याही आळसटपणे नृत्य करीत . म्हणजे एखादा पदन्यास वस्त्र प्रावरणं वापरून करायचा असेल तर त्या आळसा मुळे विसरत असत किंवा फार वेळ एकाच प्रतीचं नृत्य त्या करीत. म्हणजे झोपाळू दरबारी लोकांचा नृत्यातील कोणताही भाग चुकत नसे. नंतर राजेसाहेबांचा "लंच टाईम " होई. मग त्यांना बिछान्यासहित महालात नेत. तसेच सर्व दरबारी व उपस्थित प्रजाजनही आपापल्या घरी अथवा महाली जाऊन हादडून व नंतरची वामकुक्षीही करून हळूहळू यायचा प्रयत्न करीत. दरबारात उशिरा येणं ही खास पात्रता होती. जर एखादा वेळेवर दरबाराला आला तर त्याची शिक्षा ठरलेली असे. पण ती त्याला पुढच्या दरबारी होई. तसच चालू दरबारी होणाऱ्या अशा शिक्षा मागिल दरबारात घडलेल्या चुकांच्या असत. इतरही गुन्ह्यांच्या बाबतीतही हेच धोरण होते. कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही कारणास्तव घाई करायची नाही. साधारण पणे गुन्हे लवकर येण्याचे व लवकर कार्यवाही करण्याचेच असत. आळसामुळे लोकांना गुन्हे करायला जमतच नसे. त्यामुळे राज्यातील गुन्हे आपोआय काबूत राहात असत. तसच गुन्ह्यांबद्दलची शिक्षेची अंमलबजावणी लक्षात आलं तरच होत असे. जर शिक्षेची कारवाई राहिली तर कोणतेही स्पष्टिकरण , अथवा दंड , शिक्षा वगैरे होतनसे. उलट अशा अंमलबजावणी अधिकाऱ्यास बढतीसाठी पात्र ठरवण्यात येई. काहीही झालं तरी आळशीपणाला बाध येता कामा नये, असे राजेसाहेबांचं धोरण होतं.

असो, रात्रीच्या समयी, साधारणपणे राज्यातील हेवे दावे, तक्रारी वगैरे ऐकल्या जात. ऐकता ऐकता राजेसाहेबांना किंवा कोणालाही झोप लागल्यास चालत असे. कारण दावे नेहेमी उद्योगी माणसांवर चालायचे. त्याला आपण कुठून कामाला लागलो असं वाटलं पाहिजे. म्हणजे पाहा,एखादा चोर असला आणि त्याने तत्परतेने चोरी केली , की तो चोर मेलाच म्ह्णून समजा. तत्परता, हा चोरीपेक्षाही महान गुन्हा होता. क्वचित प्रसंगी अशा उद्योगी आणि तत्पर चोरालाही मृत्युदंडाची अथवा जाहीर शिरच्छेदाची शिक्षा होई. त्यामुळे चोर गयावया न करता, हसत हसत तिचा स्वीकार करी. कारण अशी शिक्षा झाली तरी ती किमान दोन तीन वर्ष तरी अमलात येणार नाही याची त्याला खात्री असे , किंवा ती विसरलीही जात असे. पण त्याची तुरुंगातून मात्र सुटका होत नसे. त्याने काय गुन्हा केला व त्याला काय शिक्षा झाली , हे विसरणं हा एक फार मोठा गूण होता. त्यामुळे कित्येक वर्षांपूर्वीच्या शिक्षा हल्ली हल्ली होत असत. (काळाच्या फरकाचा गोंधळ होत असल्यास क्षमा करा. कारण तो माझाही होतोय. कारण या राज्यात काळाला महत्त्व नाही. काळाला महत्त्व दिलं की आळशीपणा संपतो ना हो. ) असो. मग राजेसाहेब केव्हातरी उत्तररात्री(म्हणजे त्याच दिवसाच्या उत्तररात्री नाही तर, कोणत्याही दिवसाच्या उत्तररात्री) अंतःपुरात जात असत. म्हणजे त्यांना बिछान्यासहित उचलून नेत असत. यथा राजा तथा प्रजा, या नियमानुसार दरबारी सर्व उपचार नीट पाळीत असत, मात्र कालावधीचा भरवसा नसे.

राजेसाहेब अंतःपुरात गेल्यावर राणीसाहेबही अंतःपुरातील क्रीडांमध्ये मग्न असत. अर्थातच त्या जाग्या असल्यास. त्यांच्या क्रीडा आळसामुळे कमी होत असत.त्यामुळे कधी कधी राजेसाहेबांना क्रोध अनावर होई. तसेच राणीसाहेबांनाही होई. मग दोघेही मोठमोठ्या जांभया देत वाद घालीत, किंवा झोप लागल्यास झोपत. अशा कितीतरी रात्री फुकट जात. आणि संतती निर्मिती अर्थातच, कमी होई. अशा रितीने राजेसाहेब कुटुंबनियोजनाचे कार्य पवित्र कार्य वर्षानुवर्षे चालवीत आले होते. त्यामुळे औरस अनौरस संतती व त्यांतील भांडणे हा प्रकार नव्हता. एक प्रकारची नीतिमत्ता आपोआपच राखली जाई. अनौरस संततीसाठी लागणारे अनाधिकृत पुरूषही तेवढेच आळशी होते. प्रजेचंही तसच वागणं होतं. लोकसंख्या पण प्रमाणात राखली जायची. मग नैसर्गिक संपत्तीही पुरून भरपूर उरत असे.

एकदा तर गंमत झाली . आजूबाजूच्या राजांनी एकदम हल्ला केला. शत्रू दरबारात सिंहासनाजवळ आला. त्या दिवशी दरबाराचा दिवस होता. हातात तलवारी घेऊन दुसरे तीन चार राजे, महा आळशी राजांना जाग येण्याची वाट पाहत होते. एक दोन तास झाल्यावर ते कंटाळले. ते कायदा नियम पाळणारे असल्याने व या राजेसाहेबांचा तसा त्यांच्या राज्यांना काहीही त्रास नसल्याने , ते निहत्या (हा शब्द आजकाल जास्त चालतो. मूळ मराठी शब्द परिणाम करणार नाही असे वाटले. ) राजाला कसे मारणार?. एकही हत्या न करता राज्य त्यांच्या ताब्यात येणार होते. सैन्य किती वर्षांपासून झोपले होते कुणास ठाऊक ? तत्पर असलेल्या त्या राजांनी विचार केला , हा महामहा आळशी राजा जर उठला तर आपल्याला शिरच्छेदाची शिक्षा देईल व काही वर्षांनी का होईना ती शिक्षा तो अमलात आणील. जर विसरला तर आपल्याला कायमचे तुरुंगात सडावे लागेल. ( कारण बरेच कैदी असे अडकले होते. ते कंटाळून पहारेकऱ्यांना शिरच्छेदाची आठवण करून देत. पण पहारेकरी ती सारखे विसरत असत. रोजच्या कैदेपेक्षा एकदाच मेलेलं बरं. असं त्यांना वाटे. )म्हणून ते सर्व राजे आपल्या राज्यात परत गेले. जाता जाता ते म्हणाले ," हे राज्य फुकट दिले तरी नको. असली आळशी प्रजा सांभाळायची म्हणजे किती कठीण आहे. " अशा रितीने प्रचक्राचा धोका या राज्याला कधीच झाला नाही. आळसाचा केवढा हा फायदा. प्रत्येक गोष्ट अंगी बाणायला अतिरेक हा करावाच लागतो , नाही का ?

असं असतानाही राजेसाहेबांना एक दिवस दुपारची खडबडून जाग आली. ते बिछान्यावरून उठून महालाच्या सोनेरी गवाक्षातून पाहू लागले. खरं तर त्यांना जाग आली ती कुणाच्या तरी अंगाच्या वासाने. त्यांना असं दिसलं की दुपारच्या वेळी एक सुंदर ललना , शकुंतला फॅशनची वस्त्रे नेसून आपल्या शाही बागेत स्वैर संचार करीत आहे. ती नुसती संचारच करीत नव्हती तर ती वेगवेगळी गुलाबासारखी फुले तोडून त्यांचा वास घेत फिरत होती आणि चक्क अधून मधून नाचत होती. अर्थातच राजे आकृष्ट झाले. अशी सुंदर ललना कित्येक वर्षात त्यांनी पाहिली नव्हती. त्यांच्या अंगाला झिणझिण्या आल्या. त्यांची उपजत भावना जागृत झाली. आळसावर ताबा ठेवत त्यांनी रक्षकांना आणि प्रधानजीना बोलावून घेतलं. ते बिचारे जांभया देत आले. हात जोडून म्हणाले, " महाराजांना अशी अचानक आठवण कशी आली. त्यांची झोपमोड तर झाली नाही ना ? माफ करावं , \"अचानक\" हा शब्द आपल्याकडे नाही. पण न राहवून बाहेर आला. " (तत्पर, त्वरीत, ताबडतोब, अचानक , लवकर, इत्यादी सारखे कालवाचक शब्द राजेसाहेबांनी शब्दकोषातून काढून टाकले होते व वापरायला बंदी केली होती. ) राजे म्हणाले, " तुम्ही त्वरीत तिला इकडे पकडून आणा. जा लवकर. " प्रधानजी म्हणाले, " पण महाराज त्वरित, लवकर हे शब्द आमच्या अंगवळणी नाहीत. पाहतो प्रयत्न करून". ते गेले.

त्या ललनेचे शाकुंतलीय सौंदर्य आणि वेषभूषा पाहून राजांचा ताबा सुटला होता. आता ती स्त्री आणि ते एवढच त्यांना दिसत होतं. सांगितल्यापासून दोन तीन तासांनी गवाक्षापासून काही फुटांवर उभ्या असलेल्या ललनेला प्रधास्नजी आत घेऊन आले. तो पर्यंत राजे आळसावले होते. मोठमोठ्या जांभया देत ते म्हणाले, " हे सुंदरी, तू कोण आहेस ? कोणत्या राज घराण्याशी संबंधित आहेस ? आणि आमच्या शाही बागेत तु काय करीत आहेस ? " असे म्हंटल्यावर, आपल्या सुंदर डोळ्यात आसवं आणून ती म्हणाली , " महाराज मी बाजूच्याच राज्यातली राजकन्या आहे. मध्ये केवळ एक भिंत असतांनाही मला यायला दोन आठवडे लागले. मी , ही शाही बाग कितीतरी वर्षांपासून पाहात आहे. अतिशय आळशी, कामचुकार म्हणून माझ्या वडिलांनी , म्हणजे, \"उद्योगी महाराजांनी\", मला आपल्या राज्यात हाकलून दिले आहे. आपण मला आश्रय द्यावा. वडील म्हणाले, माझ्यासारखी स्त्री त्या आळशी भोंदाड्या राजाच्या राज्यात अगदी योग्य आहे. म्हणून आपल्याकडे आले आहे. " असं म्हणून दोन आठवडे चालणारी ती ललना मोठमोठ्या जांभया देऊन महाराजांच्या बाहूंमध्ये कोसळली. तिला धरून तोल गेलेले महाराज पुन्हा तिच्यासहीत बिछान्यावर आडवे झाले. नंतर लवकरच, म्हणजे दोन तीन वर्षात, राजांना पुत्रप्राप्ती झाली. जिच्याव्बद्दल राजांना आणि प्रजेलाही कळायला जवळ जवळ वर्ष लागले. पुत्र अर्थातच जांभया देत जन्माला आल्याने त्याचे नाव "आलस्यचिंतामणी "ठेवण्यात आले. जवळ जवळ पाच वर्षांनी राज्यात पुत्रप्राप्ती झाल्याबद्दल साखर व मिठाई वाटण्यात आली. वाटण्याचा आदेश अमलात यायलाच मुळी चार वर्षे पूर्ण लागली .

राजेसाहेबांना शिक्षणाचं महत्त्व फार होतं. असं वर म्हंटलच आहे. राजधानीतच एक शाळावजा महाविद्यालय नविनच उघडले होते. म्हणजे काही वर्षांपूर्वी. त्याचं उद्घाटन राजेसाहेबांच्या हस्ते होणार होतं . नियमाप्रमाणे उद्घाटनाचा कार्यक्रम ठरवून वर्ष तरी झालं होतं. आता त्याची जाहिरात दवंडी पिटवून केली जात होती. त्या विद्यालयाचे प्राचार्य होते "श्री आलस्यालंकार". इतरही प्राध्यापक उत्तम दर्जाचे होते. अतिजड पदव्या घेऊन ते अनेक विषयात पारंगत झाले होते. ते सर्व व विद्यार्थी महा आळशी या सदरात मोडत होते. अभ्यासक्रमही प्राचीन होता. म्हणजे नवीन अभ्यासक्रम प्राचीन झाल्यावर यथावकाश येणार होता. उद्घाटनाचा दिवस वर्षभरानंतरचा होता. त्याप्रमाणे इमारतीमध्ये सजावटीचं काम चालू होतं. रोज एक पताका लावली जायची किंवा रोज एकतरी सजावटीचं काम केलं जायचं. हे सर्व राजेसाहेबांच्या नकळत होत होतं. कारण सरळ आहे, असं ठरवून आणि कालबद्ध काम करणं राज्याच्या कायद्याला धरून नव्हतं. शिक्षा झाली असती. काही दिवशी तर बाजूच्या राज्यातले उद्योगी सजावटकार आणून काम केलं गेल. त्यांचा मेहनताना म्हणजे "पार्श्वभागावर लाथ " ताबडतोब त्यांच्या राज्यात परत पाठवले जात होते. त्यांनीही तक्रार न करता व पैसे न मागता काम केलं . जाताना मात्र त्यांनी येथिल प्रजेला व विद्यापिठाच्या अधिकाऱ्यांना " लागले ना शेवटी उद्योगी लोक ? " असे चिडवले. पण अधिकाऱ्यांनी ते मनावर न घेता काम पूर्ण केले. परंतु राजेसाहेबांना सदर गोष्टीची खबर कुठून लागली कुणास ठाऊक. त्यांनी ताबडतोब एक सदस्यिय चौकशी आयोग नेमला. अर्थातच , आयोगाचे सदस्य म्हणजे स्वतः राजेसाहेबच होते. अमलबजावणीला मात्र वेळेचे बंधन नव्हते

आळशांची कहाणी

उद्घाटनाच्या दिवशीचा कार्यक्रम खालील प्रमाणे होता. :-

१)दरवाजावरची फीत कापणे.
२)राजेसाहेबांचे स्वागत व सत्कार
३)राजेसाहेबांचे भाषण
४)पदवीदानसमारंभ

प्रथम मुख्य शृंगारलेल्या दरवाजाला लावलेली फीत राजेसाहेबांनी कात्रीनेकापून विद्यालयाचे उद्घाटन झाल्याचे स्वतः जाहीर केले. मग राजेसाहेबांचा थोडक्यात परिचय प्राचार्यांनी करून दिला. तेच कसे
योग्य राजे आहेत हेही विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवले. इतर विद्यार्थी व पदवीची अपेक्षा करणारे विद्यार्थी आपापल्या बिछान्यांना
व्हील चेअर सारखी चाके बसवून , ते ढकलत तिथे आलेले होते. पदवी दान समारंभ साधारणपणे दोन तीनवर्षांपूर्वी जे उत्तीर्णझाले होते त्यांचा होता. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गळ्यात पदवीचा पट्टा व डोक्यावर टोपी घातली गेली. परंतू, राजेसाहेब, प्राध्यापक
व प्राचार्य मात्र उभे राहून पदवी दांकरीत असल्यामुळे त्यांची छायाचित्रे बाजूच्या राज्यातील वर्तमान पत्रात "चुकून उद्योगात गढलेलेराजे " अशा मथळ्या खाली आले होते. या सर्व कार्यक्रमांना वेळेचे बंधन नसल्यामुळे दुसऱ्या राज्यातून चोरून आलेलयाछायाचित्रकारांची मोठीच सोय झाली होती. ते छायाचित्र काढल्यावर राज्याच्या सीमेवर जाऊन बसत. राजधानीमध्ये
कित्येक दिवसापासून रोषणाई होती. वीजही बाजूच्या राज्यातून चोरून घेतली होती.
मगराजेसाहेब भाषणास उभे राहिले. ते उभे राहताच विद्यार्थ्यांसहित सगळ्यांनीझोपेत असले तरी एकेक डोळा उघडून टाळ्यांचा कडकडाट केला व पुन्हा झोपण्यासाठी सिद्ध झाले. (म्हणजे निद्राधीन झाले. )
काही झोपणारे एवढे प्रविण होते की , त्यांचे घोरणे एका लयीत होत होतं आणि एखाद्या पार्श्वसंगितासारखा त्याचा "इफेक्ट "
(परिणाम नाही) होत होता. तो ऐकून राजेसाहेबांचा ऊर अगदी भरून आला. आळसाबद्दलची एवढी आस्था आणि त्यावर
मिळवलेलं प्राविण्य (म्हणजे कमांड , इंग्रजी अर्थ लवकर कळतो. ) पाहून त्यांना पुढिल पिढ्यांची काळजीच वाटेनाशी झाली.
राजेसाहेबांनी आपला वंश कसा शुद्ध आळशांचा आहे याचे पाल्हाळ लावले. घोरण्याच्या पार्श्वसंगिताची जोड असल्याने भाषण
फारच रंगू लागले. त्यांचे भाषण त्यांच्याच शब्दात ऐका.
"प्रजाजनहो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अजून कितीतरी पिढ्या हा आळशीपणाचा
गूण आपल्याकडे टिकेल व उत्तरोत्तर तो वृद्धिंगत होत जाईल अशी खात्री मला वाटते. आपल्या राज्यात जातियता नाही.
आपल्याकडे दोनच जाती आहेत. एक "आळशी " आणि दुसरी "उद्योगी". परंतु उद्योगी जमात पुर्णपणे कारागृहात असल्याने आपल्या शुद्ध वंशीय आळशी माणसांना घाबरण्याचे कारण नाही. या विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा
पारंपारिक धंदा विचारला जात नाही. ज्ञानमार्ग सर्वांसाठी खुला आहे. येथे राखीव जागा नाहीत. तसेच जे उद्योगी पुरुष
कारागृहात आहेत त्यांच्या बायका मुलांसाठी स्वप्रशिक्षित करणारी केंद्रे उभारली आहेत. त्यात ते स्वतः जाऊन स्वतःच
आळशीपणाची दिक्षा घेऊ शकतात. मागच्या वर्षीच्या खानेसुमारी प्रमाणे राज्यात आता कोणीही उद्योगी माणूस नाही हे मी
आज अभिमानाने सांगू शकतो. आळशी पणाच्या वाईट सवयीना इतर राज्यातील हरामखोर उद्योगी लोक नाव का ठेवतात
काही कळत नाही. चांगल्या सवयी लावून घ्यायला फार वेळ लागतो . वेळेचा अपव्यय होतो. अर्थातच वेळ ही चौथी
मितीच आपण काढून टाकलेली आहे. म्हणुनच माझ्या नजरेला काही वयस्क विद्यार्थीही (वृद्ध , नाही. त्याने वयाचा अंदाज येतो.
व गणना होते. ) दिसतायत. ज्ञानार्जनाला वयाची अट नसते असं कोणी तरी म्हंटलच आहे. असो.
येथे , भोळ्या , सरळमार्गी माणसांची मुले जितकी सहज शिकतात, तितकीच , चोर
दरोडेख्रोर स्मग्लरांचीही शिकतात. सर्वजण समान आहेत. स्त्री पुरुष हा भेदही आम्ही नष्ट केला आहे. भेद फक्त एकच आहे ,
"आळशी किंवा कमी आळशी. कृपा करून उद्योगी हा शब्द वापरू नका. सर्व प्रकारच्या धंद्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे
अर्हता प्राप्त (त्याच्या धंद्यातली) विद्यार्थ्याला परदेशी जाऊन नोकरी अथवा धंदा करण्याची गरज पडणार नाही . आपण
घेतलेल्या सर्व पदव्या नावापुढे लावता येतील. अशी कायदेशीर तरतूद आहे. सगळ्या धंद्यांमधल्या पदव्या उपलब्ध आहेत.
समजा, एखाद्या चोराच्या मुलाने , "अट्टल चोर" ही नवीन पदवी आपल्या विद्यापिठातून मिळवली तर तो मुलगा " चौर्यकर्म
प्रविण "अशी पदवी त्याच्या नावापुढे लावू शकतो. "अट एकच आहे, आळशीपणा वृद्धिंगत व्हावा. पदव्या संक्षिप्त स्वरूपात
लिहिताना काळजी घ्या. एखाद्या जुन्या जातियता वादी माणसाच्या भावना दुखावतील. अर्थातच , आम्हाला त्याची काळजी
नाही. कारण आपण आळशी आहोत. आळस ही आपली पूर्वापार जपत आणलेली संस्कृती आहे.
इतरराज्यांत मंदीच्या लाटा आल्या पण आपल्या राज्याला त्याची झळ पोचलीनाही. पोचणारही नाही. (वाक्य चांगले असल्याने टाळ्या हव्या होत्या. पण बहुतेक जण झोपल्याने त्या वाजवणार कोण ? जे
जागे होते ते आळशी होते. म्हणून प्रशासनाने टाळ्यांची ध्वनिमुद्रिका लावली ) नवीन पदवी "चौर्यकर्म प्रवीण " हिलाबाजूच्या राज्यात मागणी जास्त असल्याने व आपल्याकडे चोरी नियमित करणे हा उद्योगी पणा असल्याने शिक्षेस पात्र आहे वत्याने आळशी कायद्यांच्या तरतुदी पराभूत होतात असे दिसल्याने आपल्या राज्यातील चोरांना शेजारील राज्यात
चोरी व अन्य पूरक उद्योग (म्हणजे अलाईड उद्योग) करण्याची अट घातली आहे. त्याने आपल्या राज्याला परकीय चलन
आपोआप मिळते व त्याचा साठा वाढतो. आपल्या राज्याला आज मितीस एका पैशाचेही कर्ज नाही. मंदी तर नाहीच नाही.अशा या धंदेवाईक चोरांना पारितोषिकेही ठेवलेली आहेत. ती त्यांना घरी पोचवली जातील. त्यात काही खास शस्त्रे आहेत. तर
काही रोकड बक्षिसेही आहेत.
असो. आता शेवटी एकच सांगतो. सर्वांनी मिळून माझ्या बरोबर म्हणायच आहे .
"आळस हाच आमचा खरा मित्र आहे. आळशी संस्कृतीचा विजय असो. मला तिचा अभिमान वाटतो. " नगररक्षक काही सेकंदांसाठी आळसाने झोपलेल्यांना उठवण्याचा प्रमाद करतील, जो त्यांना क्षम्य आहे. मग वरील घोषणा झाल्यावर आळसा
वर केलेले दोन ओळींचे काव्य माझ्या सोबत म्हणतील व पुन्हा झोपतील.
"आळसदेवा,आळसदेवा टाक झाकुनी दृष्टी तुझी ही "
जागा होण्या नको तडफडू,निजुनची सगळे साध्य करी तू

नंतर समारंभ संपल्याचे घोषित झाले. भोजन व्यवस्था होती. पण सगळेच झोपेत असल्याने
त्यांची भोजनपात्रे घरपोच करण्यात आली. अर्थातच, जेव्हा जमलं तेव्हा. मग राजेसाहेब व इतर प्रजाजन व उपस्थित प्राध्यापक
विद्यार्थी आपापल्या घरी प्रस्थान करते झाले.
अशी हीआळसाचीसाठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
आभार, मित्रांनो,आभार.हीकहाणी वाचण्याची घाई करू नका.

(संपूर्ण )

अरुण गंगाधर कोर्डे
9004808486