आलोच पाच मिनिटात

नवरा आणि त्याचे मित्र

आलोच पाच मिनिटात..



" अनय, आज संध्याकाळी बाहेर जाऊया? म्हणजे बघ हा, आधी एक छानसा पिक्चर, मग चौपाटी आणि नंतर हॉटेलमध्ये जेवण.. किती दिवस झाले आपण बाहेर गेलो नाही.." नवविवाहित सानिया नवर्‍याला विचारत होती.. अनयने थोडा गंभीर चेहरा केला..

" आज?"

"हो.."

"आज शनिवार आहे ना?"

" म्हणून तर.. रात्री यायला उशीर झाला तरी चालेल.. उद्या लवकर उठायचे टेन्शन नाही.."

" ते आहेच.. मी तुला सांगणारच होतो. माझा एक मित्र ना खूप वर्षांनी भारतात आला आहे. त्याला आपल्या लग्नात यायला जमले नव्हते. नेमकं आजच भेटायचं ठरलं होते.." ते ऐकून सानियाचा चेहरा उतरला..

" तू काळजी नको करूस.. मी जातो आणि पाच मिनिटात त्यांना सांगून लगेच येतो.."

" नक्की?"

" हो ग राणी.."

" मला ना खूप कंटाळा येतो रे एकटीला.. दिवसभर घरात मी एकटी. इथे आजूबाजूला कोणी माझ्या वयाचे पण नाही.. बोलायचे कोणाशी आणि काय हा प्रश्नच असतो बघ.."

" सांगितलं ना काळजी करू नकोस.. असा गेलो आणि असा आलोच.." असे बोलता बोलताच अनय घरातून बाहेर पडला.. परत करायचे काय? हा प्रश्न होताच.. तिने मग भरतकाम करायला घेतले.. एक तास झाला तरी अनयचा पत्ता नव्हता.. तिने त्याला पटकन फोन लावला..

" अनय, अरे लगेच घरी येणार होतास ना.. काय झाले?"

" अग निघालोच होतो.. पण यांनी नेमकी ऑर्डर देऊन ठेवली आहे जेवणाची.. पैसे देतो आणि येतो लगेच.. "

" अरे पण मी....."

" नाहीतर तू असे करतेस का? जेवून घेशील का? मी आता एवढे पैसे खर्च करतोच आहे तर थोडे खाऊनही येतो.." सानियाला बोलायची संधी न देता त्याने फोन ठेवून दिला..

बिचारी सानिया.. आज बाहेर जाता येईल म्हणून तिने सकाळी स्वयंपाक पण कमी केला होता.. आता परत एकटीसाठी काय करणार? म्हणून मग फक्त दूधपोहे खाल्ले.. तिला तिच्या घरची आठवण येत होती.. माणसांनी भरलेले घर.. ती सतत चालणारी बडबड. सकाळ संध्याकाळ चारी ठाव स्वयंपाक.. आणि इथे नवऱ्याच्या नोकरीच्या ठिकाणी एकटी पडलेली ती.. अनय आधीपासूनच इथे रहात असल्यामुळे त्याचा मित्रपरिवार जमला होता.. पण बरेचसे मित्र अविवाहित असल्यामुळे तिच्यासोबत कोणीच नव्हते.. अबोल जरी नसली तरी सोसायटीत ही सगळे वर्किंग आणि तिच्यापेक्षा वयाने मोठे असल्याने तिच्याशी मैत्री करणारे कोणीच नव्हते.. दिवसभर घरात एकटी रहात असल्यामुळे कधी एकदाचा अनय घरी येतो असे तिला झालेले असायचे.. पण अनय.. दिवसभर काम केल्यामुळे तो थकलेला असायचा.. त्यामुळे तो आल्या आल्या बोलायचे नाही.. फ्रेश होईपर्यंत त्याच्या मित्रांचे फोन यायचे. मग काय? प्रत्येक मित्र कितीतरी वर्षांनी भेटायचा.. आणि बहुतेक त्याला 365 मित्र असावेत.. त्यामुळे रोज एक नवीन मित्र असायचा.. आणि तो पहिला मित्र परत भेटेपर्यंत वर्ष झालेले असायचे.. आपले घर, आपली माणसे , आपले गाव सोडून आलेल्या सानियाला खूप अवघड जात होते तिथे एकटीने रहाणे. आणि ती ज्याच्या भरवशावर तिथे आली होती त्याला त्याची जाणीवच नव्हती. ती कधीतरी व्हायची म्हणा.. पण ते ही त्याला गरज असेल तेव्हाच.. विचारात बुडालेल्या सानियाला किती वाजले ते कळलेच नाही.. कोणाच्यातरी घरी लागलेल्या सिरीयल्सच्या आवाजाने तिची तंद्री तुटली.. तिने परत अनयला फोन केला.. पण बहुतेक त्याने फोन बंद करून ठेवला होता.. तिने वैतागून पुस्तक वाचायला घेतले पण तिचे मन लागत नव्हते.. शेवटी रात्री एकच्या सुमारास तो घरी आला.. ते ही दारू पिऊन.. त्याची अवस्था बघून तिने झोपेचे सोंग घेतले.. त्याची थोडावेळ बडबड करून झाली आणि तो झोपी गेला.. सानिया मात्र विचार करत राहिली..

" सानिया सॉरी.." दुसर्‍या दिवशी अनयने तिची माफी मागितली..

" कशासाठी?" सानिया निर्विकार होत म्हणाली.

" ते काल अग.. मी कधीचे निघत होतो पण ते मित्र सोडत नव्हते.. मग काय करणार?"

" म्हणून मोबाईल पण बंद केलास?"

" अग बॅटरी संपली होती.."

" हो का? मी सकाळी पाहिले तेव्हा फुल चार्ज होता.."

" तू कशाला माझ्या मोबाईलला हात लावायला गेलीस? मला नाही आवडत कोणी मोबाईलला हात लावलेला."

" मलाही हौस नव्हती.. पण सकाळी तुझ्या बाबांचा फोन आला होता. त्यांना तुझ्या आधारकार्डाचा फोटो हवा होता अर्जंट.. म्हणून मला तुझा मोबाईल चालू करावा लागला.." ते कारण ऐकून अनयचे तोंड पडले.. 

" ते ठिक आहे.. पण याच्यापुढे मला विचारत जा.. आज जायचे का बाहेर?"

" हो जाऊयात.. मला खरेदी करायची होती.."

" अमर बरोबर बोलला होता.." अनय पुटपुटला..

" तू काही बोललास?"

" नाही.." 

संध्याकाळी सानियाने भरपूर खरेदी केली.. थोडे कपडे, थोडे खोटे दागिने.. ते बघून अनय खवचटपणे हसला..

" काय झाले हसायला?"

" काही नाही.. अनुभवी लोक जे म्हणतात ते पटले.."

" मला हि कळू दे जरा तुला काय पटले ते.."

" तेच ग.. बायकांना फक्त कपडे, दागिने दिले कि त्या खुश.."

" अरे व्वा.. किती छान मत आहे त्यांचे.. तुझे हि तेच असेल ना?"

" हो.. आता तुझ्याकडे बघून त्यावर विश्वास ठेवावा लागेल.."

" अजून काय म्हणतात रे तुझे हे मित्र?"

" अजूनतरी जास्त काही नाही.. पण लग्नानंतरची भांडणे यावर भरपूर बौद्धिक घेतात बाबा.."

" मग ते बौद्धिक घेणारे बायकोला द्यायच्या वेळेबाबत काही बोलत नाही का?" सानियाने विचारले.. ते विचारताच अनयची बोलती बंद झाली.

"म्हणजे बघ हा.. बायको घरी एकटी नवर्‍याची वाट बघते आहे.. आणि नवरा दर एका तासाने पाच मिनिटात येतो सांगतो आणि फोन बंद करून ठेवतो.. यावर कसे वागायचे हे सांगतील का तुझे मित्र? आपण बाहेर मेजवानी झोडायची आणि बायकोने काही खाल्ले कि नाही हे हि विचारायचे नाही? हेच शिकवतात का तुझे मित्र? नवीन लग्न झालेली बायको नवीन ठिकाणी एकटी पडली असेल तिची काळजी करायची नाही.. हे शिकवतात का तुझे मित्र? आणि अजून एक शेवटचे.. तुझ्या मित्रांनी सांगितलं कि बायका खरेदीत खुश असतात. तर मी त्यातली नाही.. मी उद्यापासून जॉब शोधायला बाहेर पडणार आहे.. आणि गबाळ्या सारखे जाणे मला तरी आवडणार नाही.. म्हणून हि खरेदी.. मी एकदा कामाला जायला लागल्यावर तू पाच मिनिटात ये नाहीतर पाच तासात.. तुझे तू बघ."

सानिया चिडून तिथून निघून गेली.. अनय ठोंब्यासारखा तिथेच उभा राहिला.. कारण बायको चिडल्यावर तिची समजूत कशी काढायची हे त्याच्या मित्रांनी शिकवलं नव्हते.. 



काय आवडली का कथा? सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई