आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 7

समलैंगिक प्रेमकथा
माझ्या अश्या बोलण्याने यश दुखावला गेला. पण त्याने स्वतःला सावरले. आम्ही सर्वजण रौनककडे गेलो. तो रडत होता. आम्ही दार आपटू लागलो.

" रौनक , मी तुला चॉकलेट केक बनवून देईल. प्लिज दार उघड. " प्रीती म्हणली.

" मला एकटे सोडा प्लिज. मला कोणाशीही नाही बोलायचे. " रौनक आतून रडत म्हणाला.

" आ..माझ्या छातीत दुखत आहे. " दादी जोरात ओरडली.

नंतर दादी जमिनीवर कोसळली.

" दादी , काय झाले ?" यश ओरडला.

सर्वजण दादीभोवती जमा झाले. लगेच रौनक दार उघडून बाहेर आला.

" काय झाले दादीला ?" रौनक म्हणाला.

त्याचे पाणावलेले डोळे पाहून मला फार वाईट वाटले. पालकांसाठी त्यांच्या मुलांच्या डोळ्यातील अश्रू मोत्यासमान असतात. मुलांना रडताना पाहून पालक रडत नाहीत पण जखमा त्यांना पण होत असतात. दादीने एक डोळा उघडला.

" कस फसवलं ? विसरू नको मी तुझी परदादी आहे.  यश पण लहानपणी असच कोंडवून घ्यायचा. मी असेच करायचे. " दादी म्हणाली.

" वाह दादी. तू तर बिगबॉसमध्ये हवी होती. " प्रीती म्हणाली.

" ही चिटिंग आहे दादी !" रौनक पाय आपटत म्हणाला.

" एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. महाभारत नहीं देखी क्या ?" दादीने डायलॉग हाणला.

सर्वजण दादीकडे बघू लागले.

" यश-पार्थ तुम्ही रौनकला समजवा. " दादी तिचा चष्मा वर करत म्हणाली.

मी आणि यश लगेच रौनकला घेऊन आत गेलो.

यशने त्याला मांडीवर बसवले. " आम्ही समजवतो दादी. " असे सांगून मी खोलीचे दार लावले.

" डुग्गू. काय झाले ?" यशने विचारले.

" ते तुम्हाला छक्का म्हणून चिडवत होते. हे दहा रुपये पण दिले. छक्का म्हणजे काय असते ? आणि हे दहा रुपये का दिले ?" रौनकने रडत विचारले.

" बॅड वर्ड आहे तो. तू गुड बॉय आहेस ना मग असे वर्ड्स युज नाही करायचे. अँड हे दहा रुपये असच दिले त्यांनी दिवाळी गिफ्ट म्हणून. " यश म्हणाला.

" नाही. तुम्ही खोटे बोलताय. ते का चिडवत होते तुम्हाला ? तुम्ही तर म्हणतात इंडिया ग्रेट कंट्री आहे मग इथले लोक तुम्हाला का चिडवतात ? डेन्मार्कमध्ये तर कुणी नाही चिडवत. इंडिया बॅड कंट्री आहे ना पप्पा. म्हणून तुम्ही डेन्मार्कमध्ये शिफ्ट झाले ना ? " रौनकने विचारले.

या प्रश्नाने जणू आमचे काळीज चिरून टाकले.

" रौनक , तुझ्या क्लासरूममध्ये एक जोसेफ नावाचा मुलगा होता जो सर्वाना त्रास द्यायचा. मग जोसेफ वाईट होता म्हणून पूर्ण क्लास वाईट झाली का ? विद्युतसारखे फ्रेंड्स पण आहेत ना क्लासमध्ये. तसच इथेपण काहीजण गे लोकांना त्रास देतात पण बरेच जण चांगले पण आहेत.आपली फॅमिली बघ ना किती लाड करते तुझा. सणासुदीच्या काळात असे रडायचे नसते. दादाजी येतील तुझे मग तुला रडताना पाहून त्यांना पण रडू येईल. आता विसरून जा त्या घटनेला. " मी म्हणालो.

" रौनक , फुलांचा बुके घेशील तर सुवास येईल पण कचरापेटीतून दुर्गंधीच येईल. त्यामुळे ज्याच्याकडे जे असते तो तेच देतो. काहीजणांना फक्त इतरांना हर्ट करायला येते त्यामुळे ते तेच करतात. काहीजणांना इतरांना सुख देता येते तर ते तेच करतात. आपण आपला मूड इतरांमुळे बिघडू द्यायचा नाही. " यश म्हणाला.

" आता हस पाहू !" मी म्हणालो.

आम्ही दोघांनी गुदगुल्या करायला स्टार्ट केल्या. मग कुठे साहेब हसू लागले. त्याचे डोळे पुसून बाहेर त्याला बाहेर आणले. ललिता आणि प्रसंग समोर उभे होते.

" राजकुमारसारखा तुमचा मुलगा माझ्या गल्लीतल्या लोकांमुळे रडला. " ललिता रडत म्हणाली.

" सॉरी रौनक !" प्रसंग म्हणाला.

दोघेही यशचे आणि माझे पाय पकडायला सरसावले. पण यशने रोखले.

" अहो. तुमची काहीही चूक नाही. असे काही होईल याची आम्हाला आधीपासूनच शक्यता वाटत होती. स्वतःला कमी समजू नका प्लिज. माणूस पैशाने नाही तर मनाने श्रीमंत हवा. तुम्ही ज्या गल्लीत राहता तश्याच एका गल्लीत राहणाऱ्या कांताबेनने रौनकला दूध पाजले आहेत. त्यामुळे प्लिज पाया वगैरे पडून आम्हाला लाजवू नका. " यश म्हणाला.

रौनकही प्रसंगकडे सरसावला आणि त्याने प्रसंगच्या खांद्यावर हात ठेवला.

" सॉरी नको बोलू. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. " रौनक म्हणाला.

◆◆◆

रात्री मी गच्चीवर गेलो होतो. चंद्राकडे एकटक बघत होतो. यशच्या रुपात माझ्या पण पदरात चंद्रच पडला होता. चंद्रच होता माझा यशु. पांढराशुभ्र , सर्वाना हवाहवासा , निरागस , प्रसन्न करणारा , प्रकाश देणारा , नभाची शोभा वाढवणारा , चांदण्यांनी घेरलेला , काव्ये रचण्यासाठी प्रेरणा देणारा , काव्यांचा कथांचा विषय ठरणारा यश. आज कळतनकळत मी त्याला दुखावले होते. मी मीपणा करून आमच्या "आपले"पणावर घाव टाकला होता. मी या विचारांच्या समुद्रात खोलवर बुडालो होतो तेव्हा मागून कुणीतरी मला मिठी मारली. राजस्थान दिवसा जितके तप्त तितके रात्री थंड असते. थंडीच्या त्या रात्री मला त्या घट्ट मिठीमुळे उबदारपणा जाणवला. यशुच असावा हा निरोप मनाने बुद्धीपर्यंत पोहोचवला. यशने त्याचे गाल माझ्या गालावर टेकवले. त्याची सुंदर हनुवटीचा भार मला माझ्या खांद्यावर जाणवला. दोन्ही हात माझ्या पोटावर फिरवले. मग माझ्या कानात एक गरम फुंकर मारली.

" यश , कुणीतरी बघेल !" मी म्हणालो.

" सर्वजण झोपलेत. उद्या अभ्यंगस्नान आहे ना. चारला उठायचे आहे. पण आमच्या स्वारीचा पत्ताच नव्हता. " यश म्हणला.

" यश , तू झोपायचे ना. " मी म्हणालो.

" विसरला का लग्नानंतरच्या पहिल्या रात्री काय ठरले होते ? एकमेकांकडे चेहरे करूनच झोपायचे कितीही भांडण झाले तरीही. बोल इथं एकटा का उभा आहेस ?" यशने विचारले.

" यार मी खूप चुकीचा बोललो तुला. रौनकबाबतीत मी खूप प्रोटेकटीव्ह आहे रे. तो भाईचा मुलगा आहे. भाई माझी जान होता. " मी पाणावलेले डोळे पुसत म्हणालो.

यशने त्याचे दोन्ही हात माझ्या गालावर ठेवले आणि अंगठ्याने माझे अश्रू पुसले.

" नकटु , तू खूपच हळवा आहेस. कधी कधी तुला रौनक तुझा मुलगा कमी आणि भाईची अमानत जास्त वाटतो. तुझा जीव होता ना इशांतवर. म्हणूनच रौनकविषयी तुझ्या मनात हळवा कोपरा आहे आणि त्याच्यासाठी तू माझ्याशी पण भांडण करू शकतो. हे सर्व मला ठाऊक नाही असे का वाटते तुला ? तू हे पण समजून घे की रौनकवर माझ्याही तितकाच हक्क आहे. मी पण रौनकवर तुझ्याइतकेच प्रेम करतो. पण जीवनाच्या अनुभवातून शिकलोय. मधमाशी पोळ्यापासून दूर जाते तेव्हाच गोड मध गोळा करते. रौनकला जगाचा सामना करावा लागेल. लढावे लागेल , रडावे लागेल , उभा राहवे लागेल आणि मग हसावेही लागेल. मगच तो स्ट्रॉंग पर्सन बनेल आणि इशांतने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होईल. आपण रौनकचा आधार बनायला हवे त्याला अडवणारा पिंजरा नाही. डोक्यात घुसले का नकटु ?" यशने मला टपली मारली.

" हो. " मी हसत म्हणालो.

यशने माझ्या ओठांवर ओठ टेकवले. एक चंद्र आकाशात चांदण्यासोबत हसत होता तर दुसरा चंद्राच्या मिठीत मी विसावलो होतो.

त्या सुंदर चंद्र गारव्याच्या राती
तुझा उबदार हात माझ्या हाती
अनवाणी पायाखाली थंड माती
प्रेमाच्या दिव्याला प्रीतीची वाती

रात्रभर आपल्या चालणाऱ्या गप्पा
प्रणयाच्या पुढे जाई नात्याचा टप्पा
एकत्र मोजू नभातील सर्व चांदण्या
विरहगाठी तोडून टाकूया आतल्या

तुझ्या खांद्यावर माझे टेकले डोके
मिठीत तुझिया वाढे हृदयाचे ठोके
सागरगर्भात जसे मोतीरत्ने साचले
तसे आठवणी मी ओंजळीत भरले

सारे जीवन जगलो मोजक्या क्षणात
तू भेटला अजूनि काय हवे जीवनात
तुझ्या इंद्रमुखावर कायम हास्य रहावे
हीच इच्छा तुझ्या मांडीवर मरण यावे !

~ पार्थ ✍️

क्रमश...

🎭 Series Post

View all