Dec 01, 2021
कथामालिका

आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 4

Read Later
आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 4

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 4


दुसऱ्या दिवशी वसुबारस होता. आईच्या नेतृत्वाखाली घरात फराळाची तयारी सुरू झाली होती. घरात सर्वत्र फराळीचा घमघमाट असा वास सुटला. चिवडा , चकली , करंज्या , बालूशाही , बेसनचे लाडू , नुक्तीचे लाडू सारेकाही बनले. माझ्या पोटात तर कावळे ओरडू लागले. काय खावे आणि काय नको असे झाले. गरम गरम फराळ खूपच चविष्ट तसेच कुरकुरीत लागतो आणि मनाला पोटाला प्रसन्न करून जातो. मी माझी फराळाने भरलेली गच्च ताटली घेऊन पेटपूजा करायला बसलो.

" नकटु , आता जेवढे खायचे ते खा. पण डेन्मार्कला गेल्यावर स्ट्रिकट डाएट बर का !" यशू माझ्या जवळ येऊन हळूच कानात पुटपुटला.

" मी म्हणलच इकडच्या स्वारीने मला अजून टोमणा कसा नाही मारला ?" मी यशच्या पायावर लाथ मारत म्हणालो.

यशने सर्वांच्या नजरा चुकवून माझ्या गालावर किस केले.

" यशू , बेडरूममध्ये चल ना !" मी हळू आवाजात म्हणालो.

" अरे नकटु , रात्रीपर्यंत वाट बघ ना. अस सर्वांसमोर जाणे योग्य नाही वाटणार. " यश म्हणाला.

मी परत त्याच्या पायाला लाथ मारली.

" अहो इकडची स्वारी मला काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे. चला चूप चाप !" मी म्हणालो.

आम्ही दोघेही बेडरूममध्ये गेलो आणि यशने दार लावले. मी अर्धी बालूशाही , अर्धा बेसनचा लाडू आणि चिवडा तोंडात टाकला. नंतर बोलायला लागलो पण यशला काहीच समजेना.

" अरे नकटु मागच्या जन्मात काही बकासुर होतास ? एक एक करून ठुस ना तोंडात. बिचाऱ्या फराळला वाटत असेल कोणाच्या तोंडात गेलोय आम्ही. थोडी तर दया कर त्यांच्यावर. गुदमरत असेल त्यांचा जीव. " यश म्हणाला.

मी हळूहळू सर्व खाल्ले आणि मग यशला कालची सर्व हकीकत सांगितली.

" ओह. मला पण वाटत होते की निवूदी आणि गोलूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. बट फिकीर नॉट. आठवते का दिल्लीत असताना मी पप्पूला कसे समजवले होते. तसच यावेळीही समजवतो. " यश म्हणाला.

" अरे हो पण ह्यावेळी नात्याचा गुंता आहे. मी निवूदीला ओळखतो. ती खूप शिस्तप्रिय आहे. गोलूला तर मी समजवेल पण मला वाटते की ताईला पण कुणीतरी समजवावे. दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले तर मध्यस्थी करण्याची गरज पडू नये. मी समजवले असते दिदीला पण माझी हिंमत होत नाही. " मी म्हणालो.

" बर तू टेन्शन नको घेऊ. निवूदीशी मी बोलतो आणि तू अद्वैतला समजव. " यश म्हणाला.

" ओके डन !" मी यशच्या गालावर किस करत म्हणालो.

◆◆◆

" आज वसूबारस आहे. " माझी आई दादीला म्हणाली.

" हो. तुम्ही जे सांगितले ते लक्षात आहे माझ्या. आम्ही दरवर्षी गोशाळेला दान करतो. अश्याच एका गोशाळेत गोमातेची पूजा करु शकतो. " दादी तिचा चष्मा वर करत म्हणाली.

" आजी आणि दादी , हे वसूबारस काय असते ?" रौनकने विचारले.

" बाळा , आज पासुन दिवाळी सुरू होते. आज वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. 
तर आजच्या दिवशी गाईची पुजा करतात. कारण हिंदू परंपरेनुसार या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची प्रथा आहे. " पुणेरी असल्यामुळे आईने अगदी डिटेलमध्ये संदर्भासहित स्पष्टीकरण दिले. गायीची पूजा होते इतके सोडले तर बाकीचे सर्व काही रौनकच्या डोक्यावरून गेले. तरीही त्याने नंदीबैलाप्रमाणे मान हलवली.

◆◆◆

आईच्या इच्छेप्रमाणे यश आणि मी गोशाळेत पूजा करायला गेलो. उदयपूरची सर्वात मोठी गोशाळा होती. बरेच जैन आणि मारवाडी व्यापारी त्या गोशाळेला दान करत. तिथे भरपूर गायी असल्या तरी त्याची उत्तम निगा राखली जात होती. पांढऱ्या शुभ्र गायी पाहताना मन प्रसन्न होत होते. त्या गायींच्या डोळ्यात निरागसता झळकत होती. देवत्व जाणवत होते. कर्जबाजारी झालेल्या काही शेतकऱ्यांना त्यांचे प्राणाहून प्रिय पशु जसे बैल , म्हैस , गाय खाटकाकडे विकायचे नसतात. अश्यावेळी ते शेतकरी गोशाळेला पशु विकतात आणि गोशाळा पण योग्य मानधन देते. कधी कधी अपघातात गायींना कायमचे अपंगत्व येते तेव्हा अश्या गायींनाही इथे आश्रय दिला जात होता. असो. वसूबारसची पूजा निर्विघ्नपणे पार पडली. दीदीला जवळ असलेले एक लोकेशन इव्हेंटसाठी बघायचे होते म्हणून यश आणि निवूदी तिथेच थांबले. आम्ही घरी आलो. घरी येऊन मी अद्वैतसोबत चेस खेळायला बसलो.

" गोलू , बुद्धिबळ आणि आयुष्य बऱ्यापैकी सारखे आहे. " मी म्हणालो.

" कसे मामा ?" अद्वैतने विचारले.

" कळेलच. खेळता खेळता सांगेल तुला !" मी म्हणालो.

खेळ सुरू झाला. सवयीप्रमाणे मी माझा घोडा त्याच्या मुलखात घुसवला. त्यानेही आक्रमक पावले उचलली. उजव्या साईडचे उंट , घोडे बाहेर काढले. मी अद्वैतच्या घोड्याला घेरले. खूपवेळ विचार करून अद्वैतने एक तोडगा काढला आणि घोडा सुखरूपपणे बाहेर काढला. मी माझ्या राणीने त्याच्या उंटाला उडवले.

" ओह शीट !" अद्वैत ओरडला.

" तुझी ऊर्जा आणि बुद्धी घोड्याला वाचवण्यात खर्ची पाडली. परिणामी उंटाकडे तुझे लक्षच गेले नाही. त्यामुळे आयुष्यात नेहमी लक्षात ठेव की काही क्षणिक सुखांपायी तू अमूल्य गोष्टी गमावता कामा नये. " मी म्हणालो.

मग अद्वैतने त्याची राणी बाहेर काढली. माझ्या राजाच्या मागे लागला. माझी राणी त्याच्या मुलखात हाहाकार माजवत होती. पण अद्वैतने त्याच्या राणीने माझ्या राजावर चेक बसवला. राजाला वाचवणे गरजेचे असल्याने मला माझ्या राणीची हालचाल करता येईना. माझ्या राजाच्या आसपासचे बरेच सैनिक पुढे गेले होते त्यामुळे राजाला कसलेच सरंक्षण नव्हते. आता मला माझा राजा हलवणे क्रमप्राप्त होते. मी राजा एक पाऊल तिरका फिरवला. आता तीन सैनिकांनी त्याला घेरले असल्याने तो तूर्तास तरी सुरक्षित होता. अद्वैतने अपेक्षेप्रमाणे माझ्या हत्तीला मारले आणि तो माझ्या उंटावर नजर धरून होता. माझे लक्ष अचानक माझ्या घोड्यावर गेले. मी घोडा अचानक फिरवून अडीच पावले पुढे करून अद्वैतच्या राजाला चेकमेट केले. अद्वैतच्या राजाला आडव्या दिशेने हालचाल करता येईना कारण तिथे त्याने पुढे गेलेला उंट परत आणून ठेवला होता. जर हत्ती ठेवला असता तर त्याने सरळ जाऊन घोड्याला मारले असते. पण दुर्दैवाने तिथे उंट होता.

" हे बघ अद्वैत , कधी कधी आपलेच प्यादे , आपलेच मित्र आपल्याला दगा देतात. म्हणून गैरसंगतीत पडू नये. आपल्या जीवनात येणाऱ्या बऱ्याच लोकांपैकी काहीजणांची चाल तिरकी असते. ते स्वार्थी असतात आणि त्यांची मैत्री बऱ्याचदा संकटात आणू शकते. म्हणूनच अश्या लोकांची मैत्री करावी जे आपल्या जीवनाच्या लक्ष्यपर्यंत पोहोचायला मदत करतील. " मी म्हणालो.

बुद्धिबळाचा डाव रंगत आला. अद्वैतची राणी पडली. म्हणून माझी राणी बेभान होऊन कत्तल करत सुटली. खरतर डाव लगेच संपला असता पण मला अद्वैतचे सर्व सैनिक मारून , उरलेले उंट हत्ती वगैरे मारून रण साफ करून राजाला मारायचे होते. अद्वैत हरला.

" अद्वैत , आयुष्यात प्रायोरीटी द्यायला शिक. कधी कोणत्या प्याद्याला प्रायोरिटी द्यायची , कोणाला वाचवायचे आणि कोणाला जाऊ द्यायचे हे ठरवता आले तर बुद्धिबळ जिंकता येते. बुद्धिबळात सर्वच प्यादे वाचावू शकत नाही आपण , तसच आयुष्यात येणाऱ्या सर्वच व्यक्ती महत्वाच्या नसतात. एक पालकच असतात जे जीवनात कायम सोबत असतात. " मी म्हणालो.

" मामा , तुला मम्मी काही म्हणली का ?" अद्वैत म्हणाला.

" हो. तू मारामारी करून आलास ते नाही पटलं मला. तू गुंडा नाहीस. वर पुणेरी आहेस म्हणून शब्दांचे बाण तर मारायला यायलाच हवे. मारमारी आपल्या सारख्या सुसंस्कृत घरच्या लोकांना शोभत नाही. " मी म्हणालो.

" मामा , माझ्या गर्लफ्रेंडला कुणी छेडले तर मारामारी नाही करणार का मी ? मला कमजोर समजतील ना ?" अद्वैत म्हणाला.

निवूदी जे म्हणत होती ते खरे होते. याची गर्लफ्रेंड होती. मी जेव्हा दहावीत होतो तेव्हा पुर्ण दिवस संस्कृतचे शब्द पाठ करण्यात जायचा आणि आजची पिढी ! असो. हा धक्का पचवून मी पुढे बोलायला लागलो.

" ज्या लोकांनी तुझ्या गर्लफ्रेंडला छेडले त्यांनी चूक केली पण तुझ्या गर्लफ्रेंडने टीचरला का नाही सांगितले ? टीचरकडे का नाही तक्रार केली ? बर मारामारी करताना चुकून मेंदूला वगैरे इजा झाली असती किंवा तुला कसलेतरी अपंगत्व आले असते तर आयुष्यभर बेडवर पडावे लागले असते. तुझी गर्लफ्रेंड राहिली असती का सोबत आयुष्यभर ? मी म्हणत नाही की गर्लफ्रेंड बनवणे चुकीचे आहे. पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती ते प्रेम डीझर्व्ह करते का हे पण बघायला हवे ना. रिलेशनशिपमुळे जर करियरवर परिणाम होत असेल तर नक्कीच काहीतरी चुकतंय. अश्या व्यक्तीवर प्रेम कर जे तुला मोटिव्हेट करतील. तू कधी विचार केलाय की तुझ्या आईवडीलांना कसे वाटत असेल तू घरी जखमी होऊन आल्यावर ? तुझे आईवडील किती कष्ट करून महागड्या शाळेत टाकतात कारण तू चांगले शिकावे , कुणीतरी बनावे. तू अस मारामारी करणार , गर्लफ्रेंड बनवणार , दिवसभर पॉर्न बघत बसणार , घाणेरडे स्टिकर गोळा करत बसणार मग त्यांना कसे वाटत असेल ? दिदीला वाटत आहे की तिने जॉब केला म्हणून तू बिघडला. तू सांग आई म्हणून ती कमी पडली का ?" मी म्हणालो.

अद्वैतचा चेहरा पडला होता. डोळ्यातून अश्रू गळत होते. तरीही तो म्हणाला ,

" मामा , मी ब्रेकअप करू का ?"

" नाही. पण आयुष्यात प्रायोरीटी द्यायला शिक. सध्या तुझी प्रायोरिटी तुझे शिक्षण , करियर हे हवे. माणसांना पारखायला शिक. अस नको व्हायला की लोक तुझा वापर करताय आणि तू टिशू पेपर बनतोय. एकदा स्वतःच विचार कर की ती व्यक्ती प्रेमाच्या लायकीची आहे की ती फक्त तुझा युज करत आहे. पॉर्न सर्वच बघतात पण अतिरेक नको. मम्मी पप्पाशी नीट बोलत जा. मर्द फक्त मारामारी करून बनत नसतात तर समजूतदारपणा दाखवूनही बनतात. अभ्यासाकडे लक्ष दे. मला पुढच्या दिवाळीला तुझी काहीच तक्रार नको. मला माहिती आहे जो मला समलैंगिक म्हणून लहानपणीच स्वीकारू शकतो तो गोलू त्याच्या आईला तर नक्कीच समजून घेईल. थोडा जनरेशन गॅप आहे भाई . दोन पावले तू पुढे हो , दीदी दोन पावले पुढे येईल !" मी म्हणालो.

" मामा , सॉरी माझे चुकलेच. पण आय प्रॉमिस आता फक्त स्टडीवर फोकस करणार आणि मम्मीला माझ्यावर प्राउड फिल होईल अस वागणार !" गोलूने मला मिठी मारली.

संध्याकाळ होत असल्याने सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. जाता जाता केशरी सोनेरी किरण्यांचे दान नभात सर्वत्र विखुरत होता. उदयपूरमध्ये फतेह सागर लेक खूप सुंदर प्रेक्षणीय स्थळ होते. तिथून सनसेटचा व्यु खूप मनमोहक सुंदर दिसायचा. निवूदीला यश बळजबरीनेच बोटिंग करायला घेऊन गेला. तिथेच त्याने अद्वैतचा विषय छेडला.

" निवूदी , मला अजिबात नाही आवडले तू अद्वैतची बॅग न विचारता चेक करून जासुसी केलीस. तू काय एनसीबी आहेस का धाड टाकायला ? आता तो आईवाला इमोशनल कार्ड नको खेळू. अद्वैत मोठा झालाय आणि त्याला त्याची स्पेस हवी. तू अस जासुसी करणार , बॅगमध्ये काही सापडल्यावर त्याला रागावणार असे केल्यामुळे त्याच्या मनात तुझा धाक बसेल आणि विश्वास कमी होईल. त्याला मारून रागावून तो ऐकणार नाही. टिन एजमध्ये आहे तो. या वयात मित्र जवळचे वाटतात. तू अस वागली तर तू दुरावेल. थोडं त्याची फ्रेंड बन आणि त्याला समजून घे. " यश म्हणाला.

निवूदीला यशचे म्हणणे पटले. दोघे घरी आले. आमचे घर दिवे , आकाशकंदील आणि लायटनिंगमुळे गजबजले होते. निवूदी आणि अद्वैतच्या नात्यातही नवा दिवा पेटला होता.

क्रमश..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now