Dec 01, 2021
कथामालिका

आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 3

Read Later
आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 3

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 3

दुसऱ्या दिवशी सकाळी मला एक गोड सरप्राईज भेटले. हॉलमध्ये वृत्तपत्रे चाळत मी चहा घेत होतो. भारतीय वृत्तपत्रे आणि त्यातल्या त्या मसालेदार बातम्या ऐकून मन तृप्त झाले. हॉलमध्ये कुणीतरी प्रवेश केला.

" पार्थ !" मला माझ्या आईची हाक ऐकू आली. मी उभा राहिलो आणि आईकडे एकटक बघतच बसलो. किती दिवसांनी मी माझ्या आईला समोरासमोर पाहत होतो. एकेकाळी आईच्या बाजूलाच मला झोप यायची आणि आता सातासमुद्रापार आईविना राहत होतो. आईची ती मायाळू मूर्ती डोळ्यात साठवल्यावर मी तिला मिठी मारली. तिने मायेने माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला. दोघेही निःशब्द होतो पण जणू बरेच काही बोलून गेलो. मी हे क्षण जगत होतोच तोच मागून रौनक " आजी " अशी हाक देत धावत आला. काही क्षणातच रौनक आईच्या कमरेला बिलगला आणि मी दूर सरलो. माझ्या आणि यशच्या प्रेमात रौनक वाटेकरी बनला होता. नव्हे आता तोच त्या प्रेमाचा खरा वारस बनला होता. मागून निवेदिता दीदी , महेश जीजू आणि गोलू आले. गोलू म्हणजे माझा भाचा , लग्नात माझ्या आणि यशच्या चिठ्ठ्या पोहोचवणारा " कबूतर " आता किशोरवयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. गोलूच्या लहानपणी ज्या कोमल गालावर चुंबने घेतली होती त्या गालावर दाढी फुटू लागली होती. आमचा लाडावळेला गोलू आता "अद्वैत " बनला होता. त्याच्या चेहऱ्यावर वेगळे तेज आले होते. जीवनाच्या एका सुंदर स्थित्यंतरामध्ये तो पोहोचला होता. या वयात मनात विचारांचे आणि हृदयात भावनांचे काहूर माजते. मित्र मैत्रीण जवळचे वाटतात. चिडचिड होते. नवीन जाणिवा विकसित होतात. प्रेमाच्या कळ्या खुलू लागतात. उगाच नाही गुलझार साहेब लिहून गेलेत की " सोलह बरस की बाली उमर को सलाम " ! असो. मी गोलू सॉरी अद्वैत , महेशजीजू आणि निवेदिताला भेटलो. निवूदी अजूनही तशीच सुंदर दिसत होती. महेशजीजू फ्रेश वाटत असले तरी त्यांच्याही चेहऱ्यावर काळजीचे सूर दिसत होते.

" गोलू , खूपच मोठा झालास !" मी म्हणालो.

" हो. खूपच मोठा झालाय !" निवेदितादिदीने टोमणा मारला.

काहीतरी गडबड आहे हे मला कळून चुकले. फक्त खूप दिवसांनी भेटल्यामुळे माझ्या हळव्या मनाला हे जाणवत होते की खरेच काहीतरी बिनसले होते हा नात्याचा गोड गुंता मलाच सोडवायचा होता. किंबहुना ते माझे कर्तव्यच होते. असो. यशनेही सर्वांची भेट घेतली. आईची बॅग मी लहान मुलाप्रमाणे उत्सुकतेपोटी उघडली. मोती साबण आणि चितळेची बाकरवडी पाहून मी सातव्या आसमंतात पोहोचलो.

" नकटु , अरे काय लहान मुलांसारखे आईची बॅग उघडतोय ?" यश म्हणला.

" अरे यश , मोती साबणाशिवाय दिवाळी आणि चितळेच्या बाकरवडीशिवाय फराळ मी इमॅजीनही करू शकत नाही. कसली भारी लागते ही बाकरवडी आणि हे ढब्बू मोती साबण ! उठा उठा दिवाळी आली , मोती साबणाची वेळ झाली !" मी म्हणालो.

" बाबा , या मोती साबणात खरच मोती असतो ?" रौनकने विचारले.

" लहानपणी आईने मला तेच सांगितले आणि मी पूर्ण मोती साबण आंघोळ करून संपवले. पण काहीच नाही निघाले आत !" मी म्हणालो.

सर्वजण हसले.

" तुम्ही सर्वजण फ्रेश व्हा लवकर. नाश्ता रेडी आहे !" प्रीती म्हणाली.

" किती दिवसांनी घर गजबजले आहे. बर झालात तुम्ही आलात !" दादी माझ्या आईला म्हणाली.

" माझ्या नातवासाठी पुण्याहून उदयपूरला येऊच शकते. " आई म्हणाली.

" मामा , आता ऑनलाईन नाही तर ऑफलाईन चेस खेळू !" अद्वैत मला म्हणाला.

" दादा , तू मलाही चेस शिकवणार ना ? " रौनकने विचारले.

" हो. का नाही ? " अद्वैत रौनकच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला.

◆◆◆

संध्याकाळी सर्वजण फटाके घ्यायला गेले ? मी निवूदीसाठी कॉफी घेऊन गेलो. निवूदी खिडकीतून चंद्राकडे न्हाळत होती.

" दीदी , कॉफी ?" मी तिची तंद्री भंग करत म्हणालो.

" अरे थँक्स !" निवूदी म्हणाली.

" तू थोडी अपसेट वाटत आहेस. काय झाले ? बिजनेसचे काही टेन्शन आहे का ?" मी विचारले.

" बिजनेसचे नाही रे. अद्वैतचे टेन्शन आहे. हल्ली आधीसारखा वागत नाही. मन मोकळे करून बोलत नाही. मी एकदा त्याची बॅग चेक केली तर मला घाणेरडे स्टिकर सापडले ज्यावर मुलींच्या उघड्या नागड्या फोटो होत्या. लॅपटॉपवर आधी गेम्स खेळायचा पण आता पॉर्न बघतो. त्याची एक गर्लफ्रेंड पण आहे. त्याचे व्हाट्सअप्प पाहू देत नाही. फेसबुकइन्स्टाग्रामवर मला ब्लॉक केले. घरी रोज भांडणे होतात. आई म्हणून मला त्याच्या चॅटही वाचण्याचा हक्क नाही का रे ? नऊ महिने पोटात वाढवले आम्ही त्यांना आणि त्यांना प्रायव्हसी हवे म्हणे. बाहेर जॉब केला म्हणून आईचा जॉब करण्यात मी अपयशी ठरले असे वाटते मला. पर्वा तर शाळेतून मारामारी करून आला. आई काही बोलत नाही. महेश बाहेरगावी असतो. मी एकटी कितीदा सांभाळू ? " निवेदितादी म्हणाली. तिचे डोळे पाणावलेले होते.

" ताई , प्लिज तू रडू नको. आईही आईच असते. ती कधीच तिच्या कामात कमी पडत नसते. मी अद्वैतला समजवतो. तू काळजी नको करू. " मी म्हणालो.

◆◆◆

थोड्या वेळाने बाकीचे फटाके घेऊन घरी आले. पुष्कर माझ्यापाशी आला.

" भैया , रौनक यश अँड पार्थच्या संस्काराचा वारसा पुढे चालवतोय. आज आम्ही एका दुकानात फटाके विकत घ्यायला गेलो होतो. रौनकची नजर एका वृद्ध स्त्रीवर पडली. बिचारीकडे एकही ग्राहक येत नव्हता म्हणून आशेने येणाऱ्याजाणाऱ्याकडे बघत होती. रौनकने दुकानातून फटाके घेतलेच नाही आणि माझा हात धरून त्या म्हातारीकडून फटाके विकत घेतले. म्हणला की चाचू या मोठ्या दुकानदारकडे तर शंभर ग्राहकांची गर्दी आहे पण या बिचाऱ्या वृद्ध स्त्रीकडे एकही ग्राहक नाही. खरच भैया , तुमच्या संस्कारामुळेच इतक्या लहान वयात तो इतका संवेदनशील झाला आहे. " पुष्कर मला म्हणाला.

मला रौनकचा मनोमन अभिमान वाटला.

क्रमश..


❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now