Dec 01, 2021
कथामालिका

आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 2

Read Later
आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 2

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 2

यशचा रागावलेला चेहरा पाहून सर्वाना टेन्शन आले.

" पप्पा , तुम्ही जा. मी नाही येणार. दिवाळी येणारे आणि चाचूसोबत मला फटाके उडवायचे आहेत. " रौनक चिडून म्हणाला.

" यश यार , आता आलोय तर दिवाळी करूनच जाऊ ना. असे पण किती महागडे तिकिट आहेत. " मी म्हणालो.

" पार्थ , तुला पैश्याचे पडले आहे ?" यश माझ्याकडे डोळे मोठे करून बघत म्हणाला.

" अरे तस नाही पण यांचे चेहरे बघ. सर्वांचे डोळे पाणावले आहेत. त्यांच्या सुखासाठी किमान दिवाळी तरी करून जाऊ. ही आपली माणसे आहेत. हा आपला देश आहे. अस परत जाणे बरोबर नाही दिसणार. त्यांना आपल्याला भेटण्यासाठी असा बहाणा करावा लागला म्हणजे आपणच तो विश्वास निर्माण करण्यात कुठेतरी कमी पडलो. " मी म्हणालो.

" यश , चूक आमची होती पण प्लिज आता परत सोडून नको जाऊ. नाहीतर मी खरच आजारी पडेल." दादी म्हणाली.

" भैया सॉरी ना यार. प्लिज. तुला हर्ट करायचे नव्हते मला !" पुष्कर कान पकडून म्हणाला.

" यशजीजू , प्लिज थांब ना. " प्रीती पण केविलवाणा चेहरा करत म्हणाली.

यश जोरजोरात हसू लागला.

" अरे मी मजाक करतोय. पक्का मारवाडी आहे मी. इतक्या दुरून आलोय तर इथे मस्त महिनाभर राहूनच जाणार. सारे काही वसूल करणार. " यश म्हणाला.

" क्यूटी यशु !" मी नकळत आनंदाच्या भरात यशचे गाल ओढले.

आपण आता भारतात आहोत याचे मला भानच उरले नाही.

" ओह !" सर्वजण मला चिडवू लागले. मी आणि यश नवविवाहित जोडप्यासारखे लाजलो.

" दादी , तुला किंवा घरातील कुणालाही आम्हाला भेटायचे असेल ना तर असे नाटक करायची किंवा खोटे बोलण्याची काही गरज नाही. आम्ही अजून इतके मोठे नाही झालो की तुमची गोष्ट ऐकणार नाही. तुम्ही एक हाक मारा आणि आम्ही धावत येऊ. बाय द वे , पप्पा दिसत नाहीत ?" यश म्हणाला.

" तो वर आहे. झोपला आहे. " दादी म्हणाली.

" का ? दादाजीना माहिती नाही आम्ही आलोय ते ?" रौनक विचारतो.

" नाही रे. त्याची तब्येत थोडी खराब असते आजकाल. " दादी छोट्या सुरात म्हणाली.

" मी आलोय ना दादी. आता आपण सर्व मिळून धमाल करु. " रौनक म्हणाला.

" तुम्ही पटकन फ्रेश व्हा. मी जेवायला वाढते. " प्रीती म्हणाली.

मी आणि यश पप्पांच्या खोलीत गेलो. आम्ही दाराला नॉक करणार तेवढ्यात पप्पांना खोकला लागला. यशने पळत जाऊन लगेच ग्लास उचलून पप्पांना दिला.

" यश !" पप्पा म्हणाले.

त्या पित्याने ग्लास बाजूला सारून यशला मिठी मारली.

पितापुत्राची ही भेट मी दुरूनच पाहत होतो आणि माझे डोळे हे भावस्पर्शी दृश्य पाहून पाणावले होते. मी पण पुढे सरसावलो. खोकला तर केव्हाचा थांबला होता. काही व्यक्ती जीवनात खरोखर औषधासारखे काम करत असतात. दुर्दम्य आजार काहीजणांच्या फक्त एका स्पर्शाने दूर होतो.

" काय पप्पा ? तुम्ही अजिबात काळजी नाही घेत तब्येतीची. " मी तक्रार केली.

" आता तुम्ही आलात ना तर माझी तब्येत आपोआप सुधारेल !" पप्पा म्हणाले.

" सुधारायालाच हवी. रौनकसोबत फुटबॉल खेळायचे आहे तुम्हाला !" यश म्हणाला.

" अरे माझा नातू आला आणि मला कुणी सांगितले देखील नाही. कुठे आहे डुग्गू ?" पप्पा म्हणाले.

" खाली आहे. तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून वरती नाही आणले. तुम्ही आराम करा. " मी म्हणालो.

" नातवाचे कधी आजोबाला डिस्टर्ब होते का ? नातूआजोबा तर जिवलग मित्र असतात. " पप्पा म्हणले.

आम्ही कितीही प्रयत्न केला तरी पप्पा रौनकसाठी खाली आले. त्याला काघेत घेतले. आजोबानातवांनी काही क्षणातच पूर्ण हॉलिडे कसे घालवायचे याचा आराखडा तयार केला. नंतर आम्ही जेवायला बसलो. सारा स्वयंपाक प्रीतीने बनवला होता. पारंपरिक राजस्थानी स्वयंपाक पाहून यश सातव्या आसमंतात पोहोचला. गड्डे की सब्जी , बाजरा रोटी , घेवर असे बरेच काही होते. रौनकसाठी तिने चॉकलेट केक बनवला होता. आम्ही या घरच्या जेवणावर अधाश्यासारखे तुटून पडलो आणि मस्त पोटभरून जेवलो. क्षणभर मला विश्वासच बसला नाही की हा स्वयंपाक प्रीतीने बनवला आहे. म्हणजे लहानपणी प्रीती करपलेली छोटी चपाती मला आणून द्यायची आणि मी ती चवीने खायचो. तिचे कोडकौतुक करायचो. तेव्हा ती किती खुश व्हायची. आज माझी बहिण इतकी सुगरण कशी झाली याचा मला सुगावाही लागला नाही. तिने राजस्थानी संस्कृतीला स्वीकारले होते. जेवण संपल्यावर आम्ही थकलेलो असल्याने यशच्या खोलीत झोपायला गेलो. रौनक मात्र हट्ट करून पुष्कर-प्रीतीसोबत झोपायला गेला. एरवी यश पुष्करसोबत व्हिडीओ गेम्स खेळायचा पण आता हा जॉब रौनक करणार होता. यशची खोली खूप मोठी आणि प्रशस्त होती. लग्नानंतर काही काळ मी इथेच होतो. किंग साइज बेड , भिंतीवर कारचे मॉडेल लावलेले , यशच्या ट्रॉफीनी भरलेले एक अलमारी , पुस्तकांसाठी वेगळी अलमारी असे राजेशाही थाट असलेली खोली होती.

" पुष्करला ही खोली नेहमी हवी होती. पण आजही किती सांभाळून ठेवली आहे बघ. एक वस्तू इकडची तिकडे नाही होऊ दिली. " यश खोलीत येताच मला म्हणाला.

" सर्वजण खूप जीव लावतात तुझ्यावर. आणि का नाही लावणार ? माझा यशु परफेक्ट आहे. " मी त्याच्या मिठीत शिरत म्हणालो.

" ओह. " यशने खोलीचे दार लावले आणि मला अलगद उचलले.

" आमच्या या राजमहालात सरकारांचे स्वागत आहे. " यश म्हणला.

" थँक्स इकडची स्वारी. आता मला बेडवर टेकवून गिटार वाजवून दाखवा. म्हणजे आमची काने मंत्रमुग्ध होतील. " मी म्हणालो.

" जो हुकूम सरकार. " यश म्हणाला.

यशने लगेच गिटार घेतली आणि तो बेडवर बसून वाजवू लागला. मी त्याच्या खांद्यावर डोके टेकवून , नेत्रे मिटवून त्या प्रेमस्वरात मंत्रमुग्ध झालो. राधाही कृष्णाच्या बासरीत अशीच गुंग होत असावी.

" आता तू एक कविता ऐकव !" यश म्हणाला.

मी माझी लिहीलेली एक कविता यशला वाचून दाखवली.

आली आशियानात दिवाळी
प्रेमाचे दिवे प्रीतीची रांगोळी
मिटला द्वेषाचा सारा तिमिर
उगवतो नवविचारांचा मिहीर

मजबूत होई नात्यांची वीण
प्रेमसागरा होई मने विलीन
लोभस जोडीदाराची मिठी
शोधे सर्वत्र माझी ही दिठी

चमकला मानवतेचा कंदील
भूषण सदस्यांचे त्यांचे शील
मिटली मरगळ कंटाळवाणी
खुलले मुख फुलासम ताजी

आनंद वाहू लागला चहूकडे
लक्ष्मी वळली जणू घराकडे
सुखाची नवीन पहाट जाहली
आली आशियानात दिवाळी !

~ पार्थ ✍️

क्रमश..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now