Dec 01, 2021
कथामालिका

आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 1

Read Later
आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 1

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 1

( प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तव जीवनाशी कसलाच संबंध नाही. डेन्मार्कमध्ये राहणारे यश - पार्थ हे समलैंगिक विवाहित जोडपे आणि त्यांचा दत्तक पुत्र रौनक असे सुखी त्रिकोणी कुटुंब भारतात अनेक वर्षांनी जेव्हा परततात तेव्हा काय घडते यावर ही कथा आहे. तुम्हाला आवडेल ही आशा. )

      कोपेनहेगनहून विमान दिल्लीकडे रवाना झाले होते. आमचे कुटुंब वगळता पूर्ण फ्लाईट परदेशी लोकांनी भरलेली होती. यश खिडकीतून पांढऱ्या मेघांकडे पाहत होता. त्याचा राजस राजबिंडा चेहरा उतरला होता. चिंतेच्या कृष्ण मेघांनी त्या चंद्रमुखाला झाकले होते. कारणही तसेच होते. पर्वा रात्री पुष्करचा फोन आला होता. दादीची तब्येत अतिशय बिघडली होती. आम्हाला भेटण्याची तिची शेवटची इच्छा होती. मी माझ्या आजोबाला गमावले होते पण यशला ते दुःख भेटू नये ही माझी इच्छा होती. एक लहान लेकरू आईच्या कुशीत जाण्यासाठी जसे उत्सुक असते तसे आम्हाला वाटत होते. कितीतरी वर्षे आम्ही भरतभूमीपासून लांब होतो. आमच्या परिवारापासून लांब होतो. व्हिडीओ कॉल करत होतो पण त्यात मायेच्या स्पर्शाची ऊब नव्हती. माणूस जग फिरला तरी आईच्या मांडीवर येणारी झोप त्याला कुठेच कधीच भेटत नाही. एकीकडे आम्ही भारताला उराशी कवटाळायला उत्सुक होतो तर दुसरीकडे रौनकला म्हणजेच आमच्या हृदयाच्या तुकड्याला लोक कसे सामोरे जातील याची धाकधूकही लागली होती. आधी रौनक छोटासा बाळ होता पण आता तो सहा वर्षाचा होता. त्याला बरेच काही समजत होते. डेन्मार्कमध्ये त्याला समाजाने समलैंगिक जोडप्याचा मुलगा म्हणून स्वीकारले होते पण भारत हा देश वेगळा होता. इथले लोक स्वीकारतील का ही आशंका मनात घर करून होती. रौनकला त्याच्या हक्काचे कुटुंब नातेवाईक भेटणार होते पण समाजातील काहीजणांनी त्याला हिनवले तर आम्ही रौनकच्या डोळ्यात अश्रू पाहू शकणार नव्हतो. पण सध्या फक्त यशची दादी डोळ्यासमोर होती. रौनकने भारत कधी येणार विचारून आम्हाला हैराण केले होते. त्याच्या डोळ्यात वेगळीच उत्सुकता होती. आम्ही भारताचे इतके गुणगान गातो तो देश नक्की आहे कसा याबद्दल त्याला खूप काही जाणून घ्यायचे होते.              
        
        शेवटी खिडकीखाली चमकणारे पिवळे दिवे दिसू लागले. दिलवाल्याची दिल्ली जवळ आली होती. विमान लवकरच लॅंड करणार अशी घोषणा झाली. शेवटी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरले. आम्ही आमच्या भारतात परतलो. इथली माती उचलून कपाळाला लावावे अशी इच्छा झाली. " चिठ्ठी आयी है " आणि " घर आजा परदेसी " गाणे जणू आम्ही अनुभवत होतो. माझी आणि यशची नेत्रे ओली झाली होती. रौनक मात्र खूप खुश होता. आम्ही आमच्या बॅग्स घेतल्या. एअरपोर्टवर यशचा भाऊ पुष्कर आणि माझी बहिण प्रीती हे दोघे आधीपासूनच उभे होते.

" भाई !" पुष्कर जोरात ओरडला.

       त्याचे डोळे पाणावले होते. यशने जाऊन त्याला कडकडून मिठी मारली. माझ्या मनात सहज एक कल्पना तरळून गेली की श्रीराम-भरत यांची भेट याहून फार वेगळी नव्हती. मी पण माझ्या लाडक्या बहिणीला कितीतरी वर्षांनी आलींगन दिले.

" पार्थदादा , एकदा पण आठवण नाही आली ना बहिणीची !" प्रीती रडत म्हणाली.

" ओय आताच आलेत ते. इथेच रडवशील का ?" पुष्कर म्हणाला.

" मला तर कुणी विचारत पण नाही. मी परत जातो. "  रौनक दोन्ही हात कमरेवर ठेवून गाल फुगवून बसला.

" अरे चॅम्प. आम्ही तुला ओळ्खलेच नाही. आता तू आणि चाचू खूप धमाल करू. " पुष्कर म्हणाला.

" आत्तूकडे नाही येणार का डुग्गू ?" प्रीती म्हणाली.

रौनक तिच्याकडे गेला आणि तिने त्याचे लाड केले.

" चॉकलेट केक बनवला आहे. आवडतो ना ?" प्रीती म्हणते.

" हो आत्तू. " रौनक खुश होऊन म्हणाला.

       आम्ही दिल्लीहून उदयपूरला निघालो. प्रवास लांबचा होता पण गप्पा मारत कधी संपला कळले देखील नाही. यशचा उदयपूरला मोठा संगमरवरी बंगला होता. बंगला कसला राजवाडाच होता तो आणि यश माझा राजकुमार होता. आम्ही येणार म्हणून पूर्ण घर सजले होते. दारासमोर रांगोळी , बँडबाजा , लायटनिंग , दिवे , आम्ही येताच उडालेले फटाके ! रौनक तर कारमधून उतरताच बँडबाजावर नाचायला लागला.

" दादी !" रौनक धावत दारापाशी येऊन म्हणाला. दादीने धावत जाऊन रौनकचे लाड केले आणि त्याचे चुंबन केले. यशने डोळे भरून त्याच्या घराला न्याहाळले. आपल्या आवडत्या यशबाबाला बंगल्यात काम करणाऱ्या कितीतरी लोकांचे डोळे पाणावले. सर्वांचा यशवर खूप जीव होता. धीमी पावले टाकत आम्ही घराच्या उंबरठ्यापाशी आलो. दादी हातात आरतीची थाळी घेऊन स्वागताला उभी होती. यशला समोर पाहताच तिने पदराने डोळे पुसले. यशची आणि माझी आरती केली. आम्ही दादीचे चरणस्पर्श केले. मग आरती प्रीतीला देऊन दादीने यशला मिठी मारली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

" दादी , तू तर ठीक आहेस. " यश म्हणाला.

" आम्ही नाटक करत होतो. तुम्ही यावे म्हणून. " दादी हसत म्हणाली. सोबत पुष्कर आणि प्रीतीही हसू लागले.

" तुम्हाला ही गोष्ट मजाक वाटते ? आम्ही किती स्ट्रेसमध्ये होतो. खोटे बोलण्याची पण हद्द असते. पार्थ , उद्याची तिकीट काढ. मला क्षणभरही इथे राहायचे नाही !" यश रागात म्हणाला.

क्रमश.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now