आली गवर पावणी...

श्रद्धा आणि माणुसकी जपणाऱ्या खेड्यातील एका सुंदर घराची कथा


एकोणीसशे बहात्तर दुष्काळी साल.पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील छोट्याशा गावात राहणारे रखमा आणि पांडुरंग.एकमेकांना अगदी अनुरूप जोडी.थोडीशी ठेंगळी,सावळी रखमा आणि जरा धिप्पाड पण वारकरी घराण्यातील पांडुरंग.

घरी पांडुरंग आणि त्याचे तीन भाऊ त्यांच्या बायका झालच तर पोरसोर,बैल बारदाणा आणि आठ एकर शेती.बऱ्यापैकी उत्पन्न मिळत होत.सगळे एकत्र सुखात आणि दुःखात सोबत होते.परंतु कालचक्र कसे फिरेल सांगता येत नाही.

लागोपाठ दोन वर्ष पाऊस कमी झाला होता.शेतीतून पोट भरणे मुश्किल होऊ लागले.

शेवटी पांडुरंग म्हणाला,"रखमा,हित बसून चालायचं न्हाय.तिकड पिंपरी नाहीतर पुण्यात जाऊ.चार पैक मिळालं तर लाल गहू तरी आणता येत्याल."

रखमा म्हणाली,"आव पर आस समद सोडून कस जायचं?"

पांडुरंगने संध्याकाळी सगळ्यांना एकत्र केले.चारही भाऊ,त्यांच्या बायका आणि म्हातारी आई.

पांडुरंग म्हणाला,"दुष्काळ लई बेकार हाय.हित तलावाच्या कामाव समद्याची पोट भरायची न्हाय."

दोन नंबरचा गणपत म्हणाला,"व्हय,पर मग काय करायच दादा.तू सांग?"

पांडुरंग म्हणाला,"आपल्यातल्या दोन जोड्यानी शेरात जाऊन काम करू."


आई म्हणाली,"आर पर पांडू आस गाव,जमीन जुमला सोडून जायचं व्हय?"


पांडुरंग म्हणाला,"आये,फक्त दुष्काळ हाय म्हणून.दोन जोड्या राहतील हित."


सगळ्यांच्या विचाराने पांडुरंग आणि धाकट्या भावाची जोडी पिंपरी चिंचवड भागात जाणार अस ठरलं. गरजेपुरते सामान घेऊन एका पाहुण्याच्या ओळखीने पिंपरी भागात भाड्याने खोली घेतली.पांडुरंग आणि धाकटा श्रीपती दोघे काम शोधायला बाहेर पडले.शेवटी हमलीचे काम मिळाले.


हिकडे गावाला राहिलेल्या गणपत आणि वामनचे गावकरी कान भरू लागले,"ते मस्त शेरात राजा राणी राहत्यात,तुमि हिकड दगडी वाहून आणि उन्हात काम करुन मरताय."


श्रीपती आणि वामन मात्र काही उत्तर देत नसत.


काही दिवस गेल्यावर धाकटी विमल म्हणाली,"आक्का,आस घरात बसून चालायचं न्हाय.कायतरी काम बघू दोघी."

रखमा म्हणाली,"इमले,शेतात कष्ट करायचं आन घरच्यांना जेऊ घालायचं एवढं केलं आजवर."


विमल म्हणाली,"आक्का,दिस तस आल्यात.झालं तर गावाकड पोर हायेत.तिकड पैका पाठवायला पायजे."


रखमा म्हणाली,"बर,हे दोघं आल की बोलू."


पांडुरंग आणि श्रीपती दोघांनी परवानगी दिली.पण किती शोधले तरी दोघींना काम काही मिळेना.तशात गणपती जवळ आले.पाऊस अजून पडला नव्हता.


गावाकडे दोन नंबरची सिता तिच्या नवऱ्याला म्हणाली,"आक्का आणि इमली न्हाई,गौरी गणपती आलं.कस व्हणार व?"


श्रीपती म्हणाला,"आग,दादा कायतरी करल बघ."

दुसऱ्या दिवशी कामावर वामन काम करत असताना त्याचा जोडीदार म्हणाला,"पिंपरी वरून काय खबर?का गेले तिकडचं?"


वामन गप्प झाला.संध्याकाळी जेवताना तो म्हणाला,"दादा आन श्रीपती दोघांना सणाला बोलवू.म्या जातो सांगावा घिऊन."


तशी त्याची बायको जानकी म्हणाली,"आव खुळ का काय?गेलं तीन महिन पैक पाठवत्यात.आता सण हाय.तर त्यांना अजून कोड्यात टाकता व्हय.यंदा माहेरवाशिणी गुळाचा खडा आन पाणी पिऊन खुश व्हतील बघा."


सिता लगेच म्हणाली,"व्हय,लेकी माहेरचा आब राखत्याल."


वामन म्हणाला,"ते समद खर पर आठ दिस झालं लाल गहू बी आल न्हाईत. कस व्हायच?"


इकडे विमल आणि रखमासुद्धा काळजीत पडल्या.रखमा म्हणाली,"इमले,आग कस व्हणार?आठ दिसावं गौरी गणपती आल्यात."

विमल म्हणाली,"आक्का, लेकिना दोन लुगडी आन खपला गहू एखाद कीलू एवढं जमवायला पायजे."


रखमा उदास झाली.इकडे पांडुरंग आणि श्रीपती काळजीत होतेच.दिवसभर हमाली करून हातात फार उरत नव्हते.

विमल म्हणाली,"आक्का,आज काम हुडकाय जाऊ.तेवढंच काय तरी घावल."


दोघी भाजी भाकर बांधून निघाल्या.शहरात सणाची तयारी महागाई सोसून सुरू होती.कपडे,गौरीचे मुखवटे आणि दागिने बघून विमल म्हणाली,"आक्का,गावाला किती मजा यायची."


दोघी एके ठिकाणी कारखान्याबाहेर झाडाखाली बसल्या.तेवढ्यात जेवायचा भोंगा वाजला.कामगार बाहेर येऊ लागले.

एकजण म्हणाला,"गणपा,खायचं हाल व्ह्त्यात र. नुसत भजी पाव खाऊन किती दिस काढायचं?"


त्याचा जोडीदार म्हणाला,"खरय गड्या,पर हित बायकुला आणायचं म्हंजी.रहायची सोय कुठ करायची?"



रखमा आणि विमल परत आल्या.येताना काहीतरी ठरवून आल्या.दुसऱ्या दिवशी राशन मिळालेल्या ज्वारीचे पीठ जात्यावर दळले. पिठले बनवले आणि दोघी बाहेर पडल्या. कारखान्या बाहेर एका टोपलीत दहा भाकरी आणि एका टोपात पिठले.


विमल सगळी लाज बाजूला ठेऊन आवाज देऊ लागली,"गरम गरम भाकरी आन पिठल,आज खा उद्या परत याल."


तिची हाक ऐकून कामगार तिकडे वळू लागले.त्यातला एकजण म्हणाला,"इकायला हाय का?"

विमल म्हणाली,"व्हय."


बघता बघता सगळ्या भाकरी संपल्या.दोघी घरी निघाल्या.ह्या दुष्काळात सुद्धा काळाबाजार करणारे व्यापारी होतेच.विमलने जमलेल्या पैशातून जिन्नस खरेदी केले.नेमके ते गावातील कामानिमित्त आलेल्या रामचंद्रने पाहिले.


गावाकडे सिता आणि जानकी सणाची जमेल तशी तयारी करत होत्या.रामचंद्र गावात आल्याबरोबर इकडे आला.त्याने तिखट मीठ लावून सगळे सांगितले.

जानकी म्हणाली,"भावजी आव आमचीच माणस पोटभर जेवली तर आमासणी दुःख व्हईल का?"


रामचंद्र गेला.सिता म्हणाली,"जानके,पर खरच आस असल तर?"


जानकी हसली,"आक्का आस कधीच करणार न्हाय.इस्वास ठीवा."


आता विमल आणि रखमा रोज दुपारी जाऊन भाकरी आणि पिठले विकत होत्या.इकडे श्रीपती आणि पांडुरंग रात्रीपर्यंत हमाली करत होते.सणाला गौराईसाठी लुगडे तरी घ्यावे म्हणून.


बघता बघता गावी जायचा दिवस जवळ आला.संध्याकाळी दोघे भाऊ जेवताना गप्प होते.रखमा म्हणाली,"का वो,अस गपगप?"


पांडुरंग म्हणाला,"रखमा आग गौरी येत्याल.माहेरवाशिणी उपाशी जात्याल यंदा."


विमल म्हणाली,"दादा,नगा चिंता करू व्हईल समद नीट.उद्या सांच्याला जायची तयारी करतो."


हे दोघे कामावर गेल्यावर विमलने पैसे मोजले,"आक्का,पोरांना,जाऊबाई आन दोघांना कापड आन धान्य घेतल तर पैक उरायच न्हाई काय?"


तशी रखमा उदास झाली,"आता ग इमल?"


तेवढ्यात शेजारच्या पोराबरोबर एक माणूस ह्या दोघींना शोधत आला.आपल्याकडे काय काम असेल ह्याचे?दोघी विचारात पडल्या.


तो बोलू लागला,"माझ्या कारखान्यात एक कार्यक्रम आहे.तुमची भाकरी मी खाल्ली आहे.जर तुम्ही आजचा स्वयंपाक केला तर दोघींना मिळून दोनशे रुपये देईल मी."


हे ऐकताच विमल म्हणाली,"सायेब येतो आमी."


दोघींनी दिवसभर पुरण पोळीचा स्वयंपाक पार पाडला.पैसे घेऊन दोघी आनंदाने बाहेर पडल्या.


इकडे पांडुरंग आणि श्रीपती काळजीत होते.तेवढ्यात एक माणूस तिथे आला.त्यांना म्हणाला,"दुकानाचा माल अचानक आला.रात्रीतून खाली करा.जास्त पैसे देतो."


दोघे आनंदाने कामाला.लागले.इकडे गौरीला साड्या,झालच तर दोन्ही जाऊबाईना लुगडी.अशी बरीच खरेदी करून दोघी घरी आल्या.शेजारच्या माणसाने निरोप दिला की पांडुरंग आणि श्रीपती सकाळी येतील.


विमल म्हणाली,"आक्का,पण गणपती उद्या सकाळी यील.मग कस व्हायचं?"


रखमा म्हणाली,"नग काळजी करुस."



वामन आणि गणपत वाट बघून थकले.शेवटची मुक्कामी एस टी आली.पोर नाराज होऊन घरी आली.


म्हातारी म्हणाली,"सिते,जानकी आता कस करायचं?घरात एक दाणा न्हाय."

दोघी गप्प राहिल्या.इकडे पांडुरंग आणि श्रीपती सकाळी घरी आले.येताना भरपूर धान्य आणि भावांसाठी कपडे घेऊन आले.चौघेही गावी जायला निघाले.


वामन गणपती घेऊन आला.इकडे हे चौघे एस टीने निघाले.एस टी वेगात जात असताना धडाम असा आवाज झाला.डोळ्यापुढे अंधारी आली.


गावात पोर दिवसभर वाट पहात होती.दिवस गेला.दुसरा दिवसही असाच गेला.


आता मात्र सिता म्हणाली,"आव,नक्कीच काय तरी झालं आसंल.नायतर आक्का आल्याबिगर रहायची न्हाय."


वामन म्हणाला,"आग पर जायला पैस न्हाईत जवळ.आन पायी जायचं तर दोन दिस जात्याल."


म्हातारीने हाक मारली,"सिता, जानके गौराई आणा.ती समद नीट करील बघ."



दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ह्या चौघांना दवाखान्यातून सोडले.तशी रखमा तिथल्या नर्स जवळ म्हणाली,"आमचं सामान कुठं हाय?माझा नवरा,दिर कुठ हाय?"


विमल तिच्या जवळ आली,"आक्का,समदी ठीक हायेत."


समोरून पांडूरंग आणि.श्रीपती आले.रखमा म्हणाली,"आर देवा,आज माहेरवाशिणी येत्याल,कस पोचणार व?"


चौघे बाहेर आले.तेवढ्यात एक ट्रक जाताना दिसला. श्रीपतीने हात दाखवला,"दादा कुठवर जाणार हाय?"


ट्रक ड्रायव्हर म्हणाला,"लांब तिकड मावळात जायचं हाय."


त्याने गावाचे नाव सांगताच पांडूरंग म्हणाला,"आमाला घ्या की.तिकडचं जायचं हाय."



जानकी आणि सिता मात्र उदास होत्या.त्यांची आक्का आणि विमल आली नव्हती.शिवाय आज माहेरवाशीण येणार.तिला काय नेसावयच?खाऊ काय घालायचे?नणंद पाहुणी येणार तिचा पाहुणचार?


सिता भरल्या डोळ्यांनी गौरीचे मुखवटे उभे करत होती,"लेकीनो,यंदा गॉड मानून घ्या.पाऊसपाणी पिकू द्या."


एवढे बोलून ती जा म्हणाली,"आत्याबायची दोन जुनी लुगडी काढा."

तेवढ्यात अंगणातून विमल ओरडली,"आग ये जानके माहेरवाशीण पोरींना जुन नेसवती व्हय."

रखमा आत आली,"गौराई, तूच ग माय.अशीच पाठीशी रहा.बघत काय बसली सीते,सामान सोड. सैपाक करायला घे.इमले जात काढ,पीठ दळायला घ्या."घर आनंदाने भरून गेले.चौघे भाऊ अंगणात बसले. रखमाने चहाचे आधण मांडले आणि जात्यावर विमल गाऊ लागली.

आली गवर पावणी,सईबाई काय सांगू.
करते कौतुक लेकीच, दळीते खपला गहू .
लगेच तिच्या सुरात सूर मिसळून चौघी जावा गाऊ लागल्या,
आली गवर अंगणी,भाकर तुकडा ववाळा
आल्या लेकी माहेराला, जमला समदा गोतावळा.

घर आनंदात न्हाऊन निघाले.
चौघी जावा आनंदाने गौरीच्या तयारीला लागल्या.माहेरवाशिणी आज आनंदी होत्या.त्यांनी माहेरचा आब आणि सत्व दोन्ही जपले होते.