आलवण

Vyatha Eka Strichi

सिंधू थकलेल्या चेहऱ्याने एका कोपऱ्यात बसली होती. तिचे यजमान नुकतेच गेल्याने तिच्या अंगावरचे सारे अलंकार उतरवले गेले. नवरा तिची सोबत कायमची सोडून गेला होता आणि तिच्या अंगावरल्या या दागिन्यांच्या रुपातल्या त्याच्या आठवणीही ओरबाडून काढल्या गेल्या. कपाळावरचे कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, पायातली जोडवी असे सौभाग्य अलंकार क्षणात उतरवले गेले. "पण यांच्या आठवणी एका क्षणात पुसल्या जातील? " सिंधूच्या मनात अनेक विचार येत होते.


क्रियाकर्म झाले आणि सारी पुरुष मंडळी घरात आली.

सारं घर दुःखात होतं. आपला कर्ता मुलगा असा अचानक गेल्याने सावित्रीबाई शून्यात नजर लावून बसल्या होत्या.
आत्याबाई, म्हणजेच सिंधूच्या सासऱ्यांच्या मोठया बहीण, सिंधूकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहत होत्या.

"दादा, या..या सिंधूमुळे तुझा मुलगा हातचा गेला. इतकी वर्षे सारं काही सुरळीत सुरू होतं. ही लग्न करून इथे आली आणि सगळे विस्कटले. हिच्या पदरात दोन लहान लेकरं! आता आपणच सांभाळायचं का या तिघांना? विचार करा, नाहीतर माहेरी पाठवून देऊ. कसे?
पण ते सारं नंतर बघू. आधी प्रथेनुसार आलवण नेसवायला हवं तिला."
आत्याबाईंचे बोलणे सिंधूच्या कानी पडत होते.

"आत्याबाई काय बोलत आहेत हे? नवरा कायमचा सोडून जाणं म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख. तिला आपल्या नवऱ्याचा विरह आयुष्यभरासाठी सहन करावा लागतो. शिवाय इतरांच्या सहानुभूतीपूर्वक, जळजळीत, विखारी नजरा सतत तिचा पाठलाग करत राहतात. अशा वेळी काय करावं तिने? त्यापेक्षा सती गेले असते तर? पण ती प्रथा कधीच बंद झाली."
नवऱ्याच्या पाठी बायकोने जगणे म्हणजे अगदीच अवघड वाटू लागले तिला. आपल्या नवऱ्याच्या आठवणीने तिच्या डोळ्यातलं पाणी ठरत नव्हतं.
पतीची शांत, सौम्य, धीरगंभीर मूर्ती सतत तिच्या डोळ्यासमोर दिसत होती.
त्यातच आत्याबाईंचे हे बोलणे तिच्या जिव्हारी लागले. उद्वेगाने ती रडू लागली.

"अगं, असे काय करतेस? होणारं आपण टाळू शकतो का? सावर स्वतःला. मुलं, बाळं आहेत घरात. त्यांच्याकडे पाहून आपल्याला सावरायला हवं." इतर स्त्रिया तिला समजावू लागल्या.

"वय ते काय म्हणावं बाईचे? जेमतेम वीस- बावीस! अशातच वैधव्य आलं. आता काय करावं बाई हिने? कायम एका कोपऱ्यात बसून राहावं लागेल." कोणीतरी म्हणाले.

सिंधूला आपल्या बालविधवा असलेल्या लहान नणंदेची आठवण झाली.

"रमा "जेमतेम बारा -तेरा वर्षांची होती. दोन वर्षांपूर्वी तिथे यजमान हे जग सोडून गेले होते. प्रथेनुसार तिसऱ्या दिवशी तिचे केलेले केशवपन.. डोके झाकण्यासाठी लाल पण विटकरी रंगाच्या आलवणाचा पदर कानामागून घेऊन तिच्या डोक्यावरून देण्यात आला होता आणि नवऱ्याच्या रक्षाविसर्जना सोबतच तिचे कापलेले केसही विसर्जित केले होते. आपल्या सोबत हे सारे काय चालले आहे? हे कळण्याचे देखील रमाचे वय नव्हते. तिने हे सारे मुकाटपणे सहन केले. तिच्या सासुबाई आणि सासरे स्वभावाने मुळातच गरीब. म्हणाले, "आमची सून ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तिचा आयुष्यभर सांभाळ करू."

----------------------------------------------

तिसरा दिवस उजाडला.
सिंधू एका कोपऱ्यात पाय मुडपून स्तब्ध बसली होती. इतक्यात न्हावी आल्याची खबर घेऊन कोणीतरी आत आलं.

"आपले लांबसडक केस असे कापून टाकायचे?" सिंधूच्या तोंडून एक अस्पष्ट हुंदका फुटला. "यांना किती आवडायचे माझे केस! आपल्या पत्नीचे असे विद्रूप रूप यांना आवडेल का? आता यास विरोध करायचा तरी कसा? इतर लोक काय म्हणतील?" सिंधूला काही कळेना.

तिने आपल्या मुलांकडे पाहिलं. तिची दोन लहान मुलं शांतपणे आजीच्या मांडीवर बसून होती. घरात काय चाललं आहे, हे कळण्याइतपत त्यांचं वय मुळीच नव्हतं.

इतक्यात कुणीतरी सिंधूला हाताला धरून उठवलं.
"सिंधू, चल आत.."
तशी निर्विकार चेहऱ्याने सिंधू उठली. मात्र क्षणात कुठलेसे बळ तिच्या चेहऱ्यावर उमटले.

"नको..नको. सासुबाई तुम्ही तरी सांगा. नाही कापायचे केस मला." सासुबाईंनी सिंधुकडे निर्विकार चेहऱ्याने पाहिले.
"मी काही करू शकते?" असे भाव होते त्यांच्या चेहऱ्यावर.

तसे सासरेबुवा, गोपाळराव पुढे आले. "ज्या प्रथा, परंपरा असतील त्या पाळायलाच हव्यात सुनबाई. त्यामागे काहीतरी हेतू असतो."
हे ऐकून सिंधू मान खाली घालून उभी राहिली.

"मामांजी, माफ करा. बाकी काहीही सांगा. मात्र हे आलवण नको आणि हे केस कापणं नाही व्हायचे आमच्याने."
सिंधू आज पहिल्यांदाच आपल्या सासरेबुवांच्या समोर धीर करून बोलत होती.

"आपल्या सासऱ्याला उलट बोलतेस? काय ही तुझी हिंमत? आणि धारिष्ट्य तरी काय म्हणावे हे? अगं, नवरा गेलाय तुझा. वेळ काळाचे काही भान राख. जे वाट्याला आलं ते भोगायलाच हवं.
ते काही नाही. तिचं काही ऐकू नका. घेऊन चला तिला आत." आत्याबाई तरातरा पुढे होत म्हणाल्या.

"नको आत्याबाई, ऐका माझे.."
सिंधू आकांत करू लागली. आई रडते हे पाहून मुलेही रडू लागली.

इतर स्त्रियांनी सिंधूला आत खोलीत नेले आणि दार लावून घेतले. आतून रडण्या-ओरडण्याचा आवाज बराच काळ येत राहिला. आतून येणारा आवाज थांबला, तशा इतका वेळ शांत बसलेल्या
सिंधूच्या सासुबाई, सावित्रीबाई भरकन् उठून आत आल्या.

"थांबा."

"वहिनी, अहो काय करताय हे?" आत्याबाई त्यांच्या मागून धावत आल्या.

"वन्स, मी म्हणते ना थांबा म्हणून. सिंधू इकडे ये." आपल्या सासुबाईंकडे पाहून सिंधूच्या डोळ्यात आशेचे भाव उमटले.
"वन्स, त्या न्हाव्याला जायला सांगा."

"वहिनी?"

"सांगा म्हणते ना.." सावित्रीबाईंचा आवाज चढला.

"वहिनी, तिसऱ्या दिवशी प्रथेनुसार तिचे केशवपन झालेच पाहिजे. विधवा स्त्री पाहणे म्हणजे अशुभ असते आणि यामागे सिंधूची सुरक्षितता आहे. तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये हा उद्देश आहेच. त्याविना उगीच का या प्रथा, परंपरा पाळाव्या लागतात? शिवाय केस वाढले म्हणजे वेणी -फणी आली. नकळत नटणे ,मुरडणेही आलेच. मग अशा विधवा स्त्रीला हे शोभते का? थोडा विचार तुम्हीही करा. "आत्याबाई नाक मुरडत मोठ्या आवाजात म्हणाल्या.

"मी म्हणते, नवरा गेला यात बाईची काय ती चूक? आधीच ती दुःखात असते. त्यात तिची अशी अवस्था करून तिला आणखीच दुःखात ढकलतो आपण. या उलट तिला समजून घेऊन तिचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करायला हवा.
मान्य आहे आम्हास, या साऱ्या प्रथा, परंपरा यांच्यामागे काही ना काही हेतू असतो.
मात्र एक "स्त्री "म्हणून तिचा मान काढून घेतल्यानंतर अशा जगण्याला अर्थ तरी काय?

तिचा नवरा, म्हणजेच माझा मुलगा इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कोणी ना कोणी लागत होता. त्याचं प्रत्येकाशी काही ना काही नातं होतं. मग या नात्याने कोणी त्याला आवडणाऱ्या गोष्टींचा त्याग करेल? सांगा कोणीतरी.."
सावित्रीबाई शांत झाल्या. पण कोणी काही बोलत नाही हे पाहून पुढे म्हणाल्या, "नाही ना सांगता येत? मग केवळ त्याच्या पत्नीनेच का त्याग करायचा?" सावित्रीबाईंनी सिंधूला जवळ घेतले.

"वहिनी, काय बोलता आहात हे? पूर्वापार चालत आलेल्या प्रथा, परंपरा यांना विरोध करणाऱ्या तुम्ही कोण?" आत्याबाई रागाने म्हणाल्या.

"वन्स, माझ्या रमेच्या बाबतीत जे झाले ते सुनबाईंच्या बाबतीत होऊ नये, इतकेच वाटते मला. काळ आहे तसाच राहत नाही हो. तो पुढे सरकत असतो. त्यानुसार काही गोष्टी बदलल्या तर आपल्याला जमवून घ्यावेच लागते." सावित्रीबाई.

"बाई गं. किती हे पुढारलेपण! वहिनी, विचार तरी काय आहे तुमचा? अशाने सिंधूचे दुसरे लग्न लावून द्यायला मागे पुढे पाहणार नाही तुम्ही!" आत्याबाई.

"वन्स, परिस्थिती जशी वागवेल, तसेच वागावे लागते आपल्याला आणि एक सांगते, सिंधू इथेच राहील, अगदी आमच्याजवळ. माहेरी धडणार नाही आम्ही तिला आणि मुलेही इथेच राहतील. इथे ती सुरक्षितच असतील."
आत्याबाईंनी गोपाळरावांकडे पाहिले. ते काहीच बोलत नाहीत हे पाहून त्या पुढे म्हणाल्या, " घरचा कारभार स्त्रिया चालवणार का आता? निर्णयही त्याच घेणार वाटतं. काय हा अगोचरपणा?"

सावित्रीबाई आपल्या पतीच्या जवळ आल्या. खाल मानेने त्यांनी सिंधूचे केशवपन न करण्यास परवानगी विचारली. गोपाळरावांचा एक हुंकार त्यांना खूप काही सांगून गेला.
सासऱ्यांची संमती आणि सावित्रीबाईंचे विचार
यामुळे सिंधूच्या आयुष्याची एक नवी सुरुवात झाली होती.
©️®️सायली

(सदर कथा काल्पनिक असून जोतिबा फुले यांनी केशवपनावर बंदी आणण्यास प्रयत्न केले. तसेच राजाराम मोहन रॉय यांनी सतीप्रथेस विरोध केला होता.)