अशांची कहाणी (भाग १)

मित्रहो, सध्या श्रावण महिना सुरू आहे....

मित्रहो, सध्या श्रावण महिना चालू आहे. म्हणजे कहाण्यांचा महिना. आपण मागच्या पिढीतील असाल तर नक्कीच कहाण्या ऐकल्या असतील. किंवा गंमत म्हणून तरी वाचल्या असतील. साधारणपणे चांगली कामे करणारे, सात्विक वागणारे, किंवा सात्त्विक वागण्यावर भर देणाऱ्या लोकांवर कहाण्या लिहिल्या जातात. पण आळशी माणसांवर कोणी कहाणी लिहिल्याचं दिसत नाही. कहाणी लिहिणाऱ्यांना माणसाचा हा परंपरागत गूण लक्षात आलेला दिसत नाही. ही कहाणी वाचल्यावर कदाचित आपणही नवीन कहाणी रचू शकाल. या कहाणी मुळे जर कोणाच्या भावना वगैरे दुखावल्या गेल्या तर आधीच माफी मागत आहे. कारण हल्ली कशा मुळे भावना दुखावल्या जातील , हे सांगता येत नाही.


ऐका आळशांनो तुमची कहाणी .


आटपाट नगर होतं तिथे एक राजा राज्य करीत होता . तो अत्यंत आळशी होता. तो दर दोन वर्षांनी अंघोळ करी. त्याचं असं व्हायचं की राजेसाहेबांना अंघोळीची गरज आहे , हे ठरवायला राजवैद्य येत. ते यायलाच मुळी (निरोप मिळाल्यापासून) तीन चार महिने लावीत. मग ते तपासून सांगत की राजेसाहेबांना अंघोळिची गरज आहे. मग अंगाला बेताचीच (राजेसाहेबांच्या दृष्टीने) घाण येत असल्याने ते राजवैद्यांकडे लक्ष देत नसत. अंगावरील मळाची सुयोग्य रांगोळी बैठकीभोवती किंवा दरबार असल्यास सिंहासना भोवती ते रोज काढीत. मग त्यांना मान्यता प्राप्त महा आळशी महामंत्री म्हणत, " राजेसाहेब , अशानं आपली अंघोळ आणखी दोन वर्ष लांबेल. परंतु ते आपणास नक्कीच शोभेल. कारण आपण महा आळशांचे महा महा आळशी आहात, यात शंकाच नाही. " असा ते तोंडपुजेपणा करित असत.

असो. अशा या राजेसाहेबांना शिक्षणाचं अतिशय वेड होतं. त्यासाठी त्यांनी शाळा व महाविद्यालये निर्माण केली होती. राजेसाहेबांच्या आज्ञेप्रमाणे सर्वच प्रजाजनांना सर्वच गोष्टी अवेळी करण्याची सवय होती. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये होणारा पदवी दान समारंभ काही वर्षांपूर्वीचा असूनही तो चालू तारखेला होत असे. म्हणजे बघा आपण कसं म्हणतो, "अमुक एक तारा इतकी प्रकाशवर्षे दुर आहे. म्हणजे तो तेवढे वर्षांपूर्वीची स्थिती दाखवतो, तसं. म्हणजे निसर्गात सुद्धा आळशी पणा भरलेला असून तो एक गूण आहे , दुर्गुण नाही. " असं दस्तुरखुद्द राजेसाहेबांनी एका महाविद्यालयाच्या उदघाटनाच्या भाषणात सांगितलं होतं. त्यामुळे वरील वाक्ये महाविद्यालयांमध्ये सुविचार म्हणून वापरली जात होती.

अशा ह्या राज्यात महाराजांचे सिंहासन म्हणजे त्यांचा सोन्याचा बिछानाच होता. तो दरबाराच्या दिवशी उच्च स्थानी ठेवला जायचा. बाकीचे दरबारी मानकरी पण आपापल्या इतमामानुसार लहान मोठ्या बिछान्यांवर पडून असत. दरबाराची ती वंशपरंपरानुगत पद्धतच होती तिथे. दरबारात राजेसाहेबांच्या वंशातील आलसोत्पन्न पूर्वजांची तैलचित्रे लावली होती. त्यातील पूर्वज सगळे बिछानाधीनच दाखविले होते. त्यांच्या प्रत्येकाच्या चित्राखाली पूर्वजांच्या पदव्याही लिहिल्या होत्या. त्यात राजेसाहेबांच्या निपणजांपासून चित्रे होती. त्यांचे निपणजे मात्र फक्त आळशी होते असं लिहिलं होतं . कारण त्यावेळी आळशीपणावर एवढं कसून संशोधन न झाल्याने , त्यांना आळशी ही पदवीच धारण करावी लागली. म्हणजे पाहा त्यांचा हुद्दा काय होता तर "आलसोत्पन्न राजचक्र मंडित महाराजे पहुडेश्वर महाराज"(की जय). त्यांच्या राण्यांचीही तैलचित्रे होती पण ती दरबारात लावली नव्हती. कारण स्त्रीसुलभ लज्जा त्यांनाही असल्याने व त्यांची आळशीपणाची वेगवेगळ्या अवस्थेतील चित्रे कदाचित अश्लीलता निर्माण करतील, व दरबारी लोकांच्या मनावर उशिरा का होईना पण परिणाम करतील म्हणून राजेसाहेबांनी ती अंतःपुरात लावली होती.

राजांचा दिनक्रम मोठा मजेशीर होता. सकाळी सकाळी राजभाट येऊन बिछानावजा सिंहासनावर पडलेल्या राजेसाहेबांची स्तुती करीत. त्यावेळी ते आळसाचं महत्त्व सांगणारी काव्य सुभाषितं , भजनं, वगैरे गात असत. अर्थातच एकेका ओळीनंतर ते तास भर झोपत असत. त्यामुळे राजस्तुती हा प्रकार साधारणपणे दोन तीन तासतरी चाले. दरबार रोज भरत नसे. पण दरबाराची तारीख अशा रितीने ठरवली जायची की सर्व दरबारी लोकांना आपले आळसयुक्त गूण नीटपणे सांभाळता सांभाळता दरबारात हजेरी लावता येईल. असो, राजस्तुती झाल्यावर राजेसाहेब डोळे किलकिले करून पाहात, मग त्यांना खात्री झाली की आळसाचं योग्य महत्त्व लोकांवर बिंबलं आहे की ते कुशीला वळून मोठमोठ्या जांभया देत चोपदारांच्या मुखाने दरबार सुरू झाल्याचं जाहीर करीत. नंतर रोजची खबरबात सांगणारे एक मंत्री होते , ते राजेसाहेबांना राज्यातील हालहवाल, संरक्षण व्यवस्था, परचक्राची काही भीती असल्यास , तसच शत्रूबद्दलची हेर खात्याने आणलेली जुनी माहिती (जुनी म्हणजे आळसामुळे उशीर झालेली) ते ऐकवीत. या प्रसंगी दरबारी लोकांना अजिबात मज्जाव नव्हता. गोपनीय असं काहीच नव्हतं कारण राजेसाहेब लोकहितवादी होते. प्रत्येक घडामोड प्रजाननांना (अर्थात प्रजाजन हजर असतील तर) समजलीच पाहिजे असा राजेसाहेबांचा अट्टाहासच होता मुळी. आजच्या सारखे "माहितीच्या अधिकाराचा कायदा " तेव्हा असण्याची प्रजाजनांना गरज भासत नव्हती. सगळच पारदर्शक होतं. म्हणजे राजेसाहेब पुरोगामी होते. मग राज्याचा आय व्यय पाहिला जाई. कित्येक वर्षांचा कर अजून भरला जात असे. त्यावर दंड , शिक्षा असा प्रकार नव्हता. करवसुली सारख्या अप्रिय पद्धती नव्हत्या. उलट वेळेवर कर भरणारे (म्हणजे चालू वर्षाचा कर चालू वर्षातच भरणारे) तुरुंगात पडत. असे कोणीही नव्हतेच म्हणा . एक आळस सोडला, तर लोक प्रामाणिक होते. उशिरा कर भरणं ही एक कला होती. पण कर मात्र भरावा लागतच होता. मग राजघराण्यातील जन्म मृत्यूच्या बातम्या व काही खास नावाजलेल्या आळशी प्रजाजनांच्या मृत्यूच्या बातम्या सांगितल्या जात. त्याकरता मात्र दरबारात दोन मिनिटं तरी सगळ्यांची झोप उडवली जात असे. नंतर त्यांना झोपायची मुभा होती.

मध्येच राजेसाहेब कंटाळू नयेत , म्हणून कलावंतिणींचे नग्ननृत्य दोन दोन तीन तीन तास चालू राही. त्याही आळसटपणे नृत्य करीत . म्हणजे एखादा पदन्यास वस्त्र प्रावरणं वापरून करायचा असेल तर त्या आळसा मुळे विसरत असत किंवा फार वेळ एकाच प्रतीचं नृत्य त्या करीत. म्हणजे झोपाळू दरबारी लोकांचा नृत्यातील कोणताही भाग चुकत नसे. नंतर राजेसाहेबांचा "लंच टाईम " होई. मग त्यांना बिछान्यासहित महालात नेत. तसेच सर्व दरबारी व उपस्थित प्रजाजनही आपापल्या घरी अथवा महाली जाऊन हादडून व नंतरची वामकुक्षीही करून हळूहळू यायचा प्रयत्न करीत. दरबारात उशिरा येणं ही खास पात्रता होती. जर एखादा वेळेवर दरबाराला आला तर त्याची शिक्षा ठरलेली असे. पण ती त्याला पुढच्या दरबारी होई. तसच चालू दरबारी होणाऱ्या अशा शिक्षा मागिल दरबारात घडलेल्या चुकांच्या असत. इतरही गुन्ह्यांच्या बाबतीतही हेच धोरण होते. कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही कारणास्तव घाई करायची नाही. साधारण पणे गुन्हे लवकर येण्याचे व लवकर कार्यवाही करण्याचेच असत. आळसामुळे लोकांना गुन्हे करायला जमतच नसे. त्यामुळे राज्यातील गुन्हे आपोआय काबूत राहात असत. तसच गुन्ह्यांबद्दलची शिक्षेची अंमलबजावणी लक्षात आलं तरच होत असे. जर शिक्षेची कारवाई राहिली तर कोणतेही स्पष्टिकरण , अथवा दंड , शिक्षा वगैरे होतनसे. उलट अशा अंमलबजावणी अधिकाऱ्यास बढतीसाठी पात्र ठरवण्यात येई. काहीही झालं तरी आळशीपणाला बाध येता कामा नये, असे राजेसाहेबांचं धोरण होतं.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all