Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अखेर कळी खुलली भाग -१

Read Later
अखेर कळी खुलली भाग -१


कथेचे नाव- अखेर कळी खुलली भाग -१
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- प्रेमकथा

राघव आणि सुरेशची नुकतीच मैत्री झाली होती. ते दोघे सकाळी रोज मॉर्निंग वॉकला जात होते. जॉगिंग करताना नेहमी दोघांची भेट होत होती . जाँगिंग करून झाल्यावर ते नेहमी गप्पा मारत बसत होते. असेच एके ! दिवशी गप्पा मारता मारता राघव म्हणाला ..

"अरे माझी राखी नावाची एक मैत्रीण होती. ती खूप चांगली होती. सध्या ती मुंबईत राहते. आम्ही दोघे चांगले मित्र होतो. एका शाळेत होतो आणि आमची मैत्री खूप निखळ होती. पण जसे लग्न झाले तसे सारे काही बदलत गेले. पण अजून आम्ही मैत्री या नात्याने एकमेकांच्या संपर्कात आहोत. सुट्टीच्या दिवशी ती नेहमी मला भेटायला येते."

अशा दोघांमध्ये गप्पा चालू होत्या. नंतर अचानक राघवच्या लक्षात आले की, फार उशीर झाला आपण गप्पा मारत बसलो आहोत . राघव सुरेशला म्हणाला.

"चल सुरेश निघूया आपण. खूप वेळ झाला गप्पा काही संपत नाहीत. सध्या मी एकटाच आहे. पण तुमच्या घरी तुमची बायको ,मुलं वगैरे वाट पाहत असतील ना ?चल तर मग निघूया."

"हो रे चल तुला सुद्धा राखीला भेटायचे असेल ना?" सुरेश म्हणाला.

"अरे तसे काही नाही आहे. आज रविवार राखीच्या नवऱ्याला देखील सुट्टी असते आणि तिला तिचा नवरा खूप जीव की प्राण आहे." राघव म्हणाला .

"तिचा तिच्या नवऱ्यावर एवढा जीव आहे. तरी देखील ती तुम्हाला बरे भेटायला येते ." सुरेश म्हणाला.

"तुम्हाला काही सुद्धा कळणार नाही. सांगेन परत कधीतरी निवांत" असे म्हणून राघव तेथून निघून गेला.

सुरेश मात्र बाकावर तसाच बसून राहिला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. राखी म्हणजे आपली बायको नसेल ना?. कारण सुरेशच्या बायकोचे नाव "राखी" होते. आपली बायको असं काही करणार नाही .पण आपली बायको असेल तर मग काय ?त्याच्या मनात तो सतत विचार येऊ लागला होता. बायकोबद्दल संशय घेऊन सतत मनात विचार करत तसाच बसला. आपली बायको असं काही करेल का? अशा शंका त्याच्या मनात येत होत्या. आणि तो तसाच विचार करत होता .मग त्या दोघांचं काहीतरी चालू असेल तर काय करायचे? राखी राघववर जीवापाड प्रेम करत असेल तर? असे नको नको ते विचार त्याच्या मनात येऊ लागले.

राखी विषयी त्याच्या मनात संशय येऊ लागले. तो तसाच विचार करत बसला होता. तो अलीकडील दिवस आठवत होता. गेल्या सहा महिन्यात राखीच्या वागण्यात खूप बदल दिसत होता. असे त्याला तिच्यात वेगळेपणा जाणवू लागला होता. तो आठवत बसला होता की राखी रोज सकाळी फिरायला जात होती. सतत पार्लरला जात होती आणि कपडे देखील अगदी स्टायलिश वापरत होती. हेअर कट काय, कपडे काय , राहणीमान काय तिचे वागणे वावरणे यात पूर्णपणे बदल झाला होता. राखी दिसायला छान होती. पण आता जो तिच्यात बदल झाला होता त्यामुळे ती खूपच सुंदर दिसू लागली होती. पूर्वी घरकाम करत करत स्वतःकडे लक्ष देणे तिला जमत नव्हते. हल्ली मात्र घरातील सर्व कामे करून मुलांना व्यवस्थित आवरून शाळेला पाठवून घरातील जेवण वगैरे अगदी व्यवस्थित बनवत होती आणि अजून देखील करत होती. पण तिच्या एकंदरीत वागण्यात बोलण्यात खूपच बदल जाणवत होता.

सुरेशवर राखीचे खूप प्रेम होते त्याला जे काही हवे नको ते सर्व काही पाहत होती. तो जिथे बसेल तिथे तो जे जे मागील ते सर्व काही त्याच्या हातात नेऊन देत होती. राखीने सुरेशला कोणतीच नावे ठेवण्यासारखे किंवा कोणत्याही तक्रारीला जागा ठेवली नव्हती. तिचा स्वभाव तिचे वागणे बोलणे आणि सर्वांना समजून घेणे त्यामुळे ती कशातच कमी नव्हती. घरातील सर्व काही जबाबदारी अगदी उत्कृष्ट रीतीने पार पडत होती .पण तिच्यामध्ये अचानक हा बदल झाला तरी कशामुळे ? हे काही कळायला मात्र वाव नव्हता.

सुरेशने डायरेक्ट राखीला विचारावे, तर आपण आपल्या बायकोवर संशय घेतल्यासारखे होईल म्हणून तो मनात अनेक योजना आखत होता. मग त्याच्या मनात विचार आला की, आपण राखीचा मोबाईल चेक करून बघावा का? पण मोबाईल चेक कसा करायचा ?ते त्याचा काही केल्या धाडस होईना कारण त्यांच्या घरामध्ये एकमेकांच्या मोबाईलला कुणीही हात लावायचे नाही असे ठरले होते आणि याआधी कुणीही एकमेकांचा मोबाईल कधीही घेतला नव्हता आणि चेक देखील केले नव्हते. पण काहीतरी करून आपल्या बायकोचा मोबाईल पाहण्यासाठी सुरेशने राखीचा मोबाईल चेक करण्याचे ठरवले.

रविवारच्या दिवशी मुलांनाही सुट्टी होती म्हणून राखीने घरातील सर्व कामे आवरून उशीरा आंघोळीला गेली होती. राखी आंघोळीला गेल्याचे पाहून सुरेशने राखीचा मोबाईल चेक करण्याची संधी साधून घेतली आणि सुरेश मोबाईल चेक करू लागला. त्याच्यामध्ये राघव नावाचा एक नंबर सेव केलेला त्याने पाहिला. तो व्हाँटसप ओपन करून बघु लागला. तर त्याच्यामध्ये राखीने राघव नावाच्या मुलाशी खूप काही चॅटिंग केले होते.

सुरेशने राखीचा चॅट बॉक्स ओपन केला आणि बघतो तर काय ? राखीने राघव बरोबर आपल्या नवऱ्याचे आणि मुलांचे खूप काही कौतुक केले होते .आणि सर्वात जास्त चॅटिंगमध्ये तिने आपल्या फॅमिली बद्दलच सांगितले होते. राखीने राघवला भेटायचे ठरवले होते आणि दोघेजण एका हॉटेलमध्ये भेटायचे म्हणून ठरवले होते. दोघेजण भेटणार आहेत. हे वाचल्यानंतर सुरेशच्या मनात आणखीनच शंका निर्माण झाली होती.

तिचा चॅटिंग बॉक्स ओपन केल्यानंतर फॅमिलीचे कौतुक बघून त्याला खूप बरं वाटले होते. पण नंतर ती दोघे भेटणार म्हटल्यानंतर त्याला खूप राग येत होता आणि राखीला जाऊन जाब विचारावे किंवा आपण तिला ओरडावे असं त्याच्या मनात विचार येऊ लागला.. हा नेमका राघव कोण हे त्याला काही समजत नव्हते.

क्रमशः

©®पूजा अक्षय चौगुले
जिल्हा- कोल्हापूर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pooja

//