Mar 01, 2024
वैचारिक

अखेर

Read Later
अखेर

तो येणार म्हणून आज तिने सगळं घर सजवलं होतं. अनेक महिन्यांपासून असलेला दोघांतला अबोला त्याच्या येण्याने संपणार होता म्हणून ती खूप खुश होती.

सासरच्या घरातून जेव्हा ती बाहेर पडली तेव्हा तो आपल्याला थांबवेल म्हणून ती डोळ्यात प्राण आणून वाट पाहत काहीवेळ बाहेरच्या पोर्चमध्ये थांबली होती.

पण अचानक आतून दार बंद झाल्याचा आवाज झाला आणि तिची सारी आशा संपली. ती पुढे जाईल तसे आतले आवाज अस्पष्ट होत गेले, तरीही ते बराच वेळ तिच्या कानात घुमत राहिले.
'काय बोलत असावेत घरचे?' हा विचार करत ती आपल्या माहेरी आली.

तिला अशी अचानक आलेली पाहून आई भांबावून गेली.
"काय झालं? अशी सगळं सोडून, निघून का आलीस?"
यावर तिच्याकडे सांगण्यासारखं काही नव्हतं. पण ती का माहेरी आली? हे तिच्या मनाला पक्कं ठाऊक होतं.

दोनाचे चार दिवस झाले, महिन्याचे चार महिने..पण तो आला नाही की त्याचा साधा फोनही आला नाही. अखेर वाट पाहून तिने त्याला शंभर फोन केले असतील. पण रिप्लाय द्यायला त्याला बहुतेक वेळ मिळाला नसावा! अशी तिने आपल्या मनाची समजूत घातली.

आता वेळ जावा म्हणून तिने एक छानशी नोकरी धरली. निदान हे कळल्यानंतर तो येईल असे म्हणून तिने नवीन ऑफिसचे, कलिगसोबत काढलेले फोटो पाठवले, मेसेज केले. पण त्याचा काहीच रिप्लाय आला नाही.

"अगं, झालंय तरी काय? लग्नाला वर्ष होत नाही तोवर मुलगी सासर सोडून येते! मग आम्ही काय समजायचे?" आई डोक्याला हात लावून बसली.

बाबांनी मात्र डोक्यावर मायेने हात ठेवला. त्यांना ठाऊक होतं, हिच्याकडे आपल्याला सांगण्यासारखं काही नाही. मात्र सांगता येत नाही असं खूप काही आहे.

न राहवून तिने सासुबाईंना फोन लावला.
"अगं, त्याच्या मनात नाही तर, मी तरी काय करणार? मी तुम्हा दोघांमध्ये पडणार नाही बाई. तुमचे तुम्हाला काय करायचे ते करा." असे म्हणून त्यांनी हात वर केले.


'घरची सून म्हणून मी कुठे कमी पडले? आईची शिकवण होती, सासरी अदबीने वागायचं. तिच शिकवण पाळली मी. आणखी काय करायला हवं होतं? पण सासुबाईंना यातलं काहीच पसंत नव्हतं..काहीच.' तिला आपलं कुठे चुकलं हेच समजत नव्हतं.

'..आणि असा का वागतो हा? त्याची नेहमीची सवय आहे, आधी त्रास द्यायचा. मग माफी मागायची. आज ना उद्या नक्की परत येईल तो. मला खात्री आहे.' तिने पुन्हा स्वतःची समजूत काढली.

एक दिवस अचानक त्याचा मेसेज आला.
"मी उद्या येतोय."
हे वाचून तिचा आनंद गगनात मावेना.

तिने अख्खं घर सजवून काढलं. बेडशीट, पदडे, कुशन कव्हर सारं काही बदलून टाकलं. अगदी समोरच्या फ्लॉवर पॉटमधील कालची फुलंही तिला सुकल्यासारखी वाटू लागली म्हणून तिने बिल्डिंगच्या खाली असणाऱ्या फुलवाल्याकडून ताजी फुलं मागवली.
आपल्या कपाटातून चार नवीन ड्रेस काढले. "आई, ड्रेस घालू की साडी नेसू?" सारं कपाट ती न्याहाळत म्हणाली.

"साडीच नेसते. मला साडीत पाहून त्याला खूप छान वाटेल!"

आईला कळून चुकलं, आपले जावई यायचे आहेत म्हणून स्वारी इतकी खुश आहे तर! आईने तिची दृष्ट काढली. "अशीच खुश राहा. एका आईला आपल्या लेकराकडून आणि काय हवं?"

दिवस तिने कसाबसा ढकलला. रात्री तिचा डोळ्याला डोळा लागला नाही.
'उद्या येऊ दे त्याला. इतक्या महिन्याची कसर भरून काढल्याविना सोडणार नाही मी त्याला. त्याच्याशी मनसोक्त भांडून, माफी मागायला लावणार. हे मात्र पक्कं.'

सकाळी तो येणार म्हणून ऑफिसला सुट्टी घेऊन
ती छान तयार होऊन बसली. बरोबर नऊ वाजता येणारा तो, अकरा वाजले तरी आला नव्हता. हिची धाकधूक वाढली होती. अनेकदा फोन करूनही तो उत्तर देत नव्हता.
'त्याने आपली फिरकी घेतली की काय?' तिला रडू आलं.

इतक्यात बेल वाजली. तिने पटकन पुढे होत दार उघडलं.
"किती वाट पाहायची? वाट पाहणाऱ्या माणसाची काही किंमत आहे की नाही?" ती लटक्या रागाने म्हणाली.

तसा तो निर्विकार चेहऱ्याने आत आला.

"दमला असशील. थांब पाणी आणते." तिने आत येऊन डोळे पुसले आणि थंड पाणी घेऊन पुन्हा बाहेर आली.

बराच वेळ कोणी काही बोलेना. हे पाहून आई आत निघून गेली.
"तुम्ही बाहेर जाऊ नका. कदाचित दोघांना आपल्या समोर बोलायला अवघड वाटत असावं." आई म्हणाली. तरीही बाबा डोकावून कानोसा घ्यायचा प्रयत्न करत होते.

"काही बोलणार आहेस की नुसताच बसून राहणार आहेस?" तिने शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.

तिच्या या प्रश्नावर उत्तर म्हणून त्याने चेहऱ्यावरचा घाम पुसत आपल्या हातातली फाईल पुढे केली.

"हे काय? नवीन घर वगैरे घेतलंस की काय?" ती उत्साहाने म्हणाली.

पण फाईल उघडताच तिला जबरदस्त धक्का बसला.

"हे..घटस्फोटाचे पेपर्स? अचानक असा निर्णय का? माझं काय चुकलं? ते तरी कळू दे मला." डोळ्यातलं पाणी अडवत ती म्हणाली.

"नाही. चूक माझी झाली. तुझ्याशी लग्न करून. खरंतर मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं." तो तिची नजर चोरत म्हणाला.

हे ऐकून आई -बाबा बाहेर आले.
"लग्न म्हणजे खेळ वाटतो की काय तुम्हाला? बोहल्यावर उभं राहण्याआधी का विचार केला नाही? माझ्या पोरीची चूक मला कळायला हवी. काय इतकी मोठी चूक केली तिने?" बाबा कडाडले. तशी त्याने मान खाली घातली.

"ते.. माझं मत..तसं नाही." तो कसाबसा म्हणाला.

"बोला, पुढे बोला..आईचा आवाज ऐकून त्याला वर पाहण्याचे धाडस होईना. तो तसाच बसून राहिला.

"मी निघतो.." तो अचानक उठून उभा राहिला.

"जावईबापू, माझ्या परवानगीविना पुढे पाऊल टाकलं तर याद राखा. हे सगळं काय चाललं आहे ते सांगा आधी मला." बाबा चिडून म्हणाले.

तो काहीच बोलत नाही हे पाहून ती म्हणाली, "माझी चूक इतकीच झाली की, मी याच्यावर मनापासून प्रेम केलं आणि विश्वास ठेवला. 
बाबा, जाऊ दे त्याला. हे त्याचं मत नाही आणि ज्यांचं मत आहे त्यांचं तो नाव घेणारही नाही." तिने काळजावर दगड ठेऊन त्या कागदांवर सही केली आणि फाईल त्याच्या हातात दिली. आता सगळं संपलं होतं.

पुढे आई -बाबा त्याला खूप काही बोलत होते अन् तो खाली मान घालून मुकाट्याने ऐकत राहिला. तिच्या धूसर डोळ्यांना दिसणाऱ्या या चित्राची जाणीव हळूहळू अस्पष्ट होत गेली आणि त्याची धूसर दिसणारी आकृती जाणिवेच्या पलीकडे गेली..कायमची!

समाप्त.

©️®️सायली जोशी.
 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//