आकाशी झेप घे

आकाशी झेप घे...

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय : आकाशी झेप घे 

                           आकाशी झेप घे 

आकाशी झेप घे, असं ऐकलं की मनात एखादं प्रेरणादायी चित्र किंवा एखादी प्रेरणादायी कथा नक्कीच येते. त्या साऱ्या गोष्टी बोलताना उत्साह अगदी ओसंडून वाहत असेल, तरी प्रत्यक्षात ती झेप घेणं इतकं सोपं आहे का? याचं उत्तर नाही कडे जास्त झुकतं. कारण पंखात बळ येणं सहज शक्य नसतंच मुळी! त्यासाठी हालचालही करावी लागते. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पंख आहेत या गोष्टीची जाणीव होणं ही आवश्यक आहे. कस्तुरी हवी म्हणताना कस्तुरीच्या शोधात इकडेतिकडे धावणाऱ्या कस्तुरी मृगासारखी अवस्था होणं काय कामाचं? म्हणून आधी स्वतःची ओळख होणं नक्कीच महत्त्वाचं आहे.

स्वतःच्या विचारांची सीमा ठरवणं आपल्याच हाती असतं. ही विचारांची चौकट मोडून 'ती' सुद्धा भरारी घेऊ शकते आणि 'तो' सुद्धा! कारण चौकटी फक्त स्त्रियांसाठीच असतात असं नाही. पुरुष सुद्धा दृश्य अदृश्य चौकटींत बांधले गेले असतातच. परिस्थितीसमोर हार मानून पळ काढणं हेच मोठं अपयश असतं. 'मला हे जमणार नाही', 'आमची परिस्थिती नाही', 'आमच्याकडे तर हे चालतच नाही', 'कोणाला नाही आवडणार', 'कोण काय म्हणेल', अशी वाक्यं मनावर जेव्हा ताबा मिळवतात तेव्हाच स्वप्न हवेत विरायला सुरुवात होते. वातावरण पाहून स्वतःच्या स्वप्नांना मुरड घालून राहणं प्रत्येकवेळी योग्य असतंच असं नाही. स्वप्नांना पंख देऊन त्या आकाशात उंच झेप घेण्याची जिद्द मनात आणली तर ते स्वप्नांचं आभाळ नक्कीच गवसेल.

-©® कामिनी खाने.