अकल्पिता भाग 2

कुटुंबासाठी धडपडणाऱ्या स्त्रीची गोष्ट

"मॅडम, हा फॉर्म घ्या." नचिकेत विवाह संस्थेतल्या मख्ख चेहऱ्याच्या एका स्त्रीला म्हणाला.

"हं..ठेवा तिथे आणि बसून घ्या." त्या स्त्रीच्या रुक्ष आवाजाला तो मगापासून सरावला होता.

"कोणाचे नाव नोंदवले?" ती स्त्री आपल्या डोळ्यावर चष्मा चढवत म्हणाली.

"म..माझे." अकल्पिता पुढे होत म्हणाली.

"तसं वय बरंच दिसतयं. पण लग्नाला इतका उशीर का?"

"ते तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही नाव नोंदवून घ्या फक्त." नचिकेतचा उरला सुरला संयम संपला होता.

"हे बघा, ही संस्था माझी आहे आणि इथे ज्या स्त्रिया काम करत आहेत त्या सगळ्या माझंच ऐकतात. त्यामुळे मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नीट द्यावी लागतील." ती स्त्री नाटकीपणाने म्हणाली.

"मॅडम, घरच्या जबाबदाऱ्या.. त्यात आई नाही. ताईनेच पुढे होऊन घर सांभाळलं. आम्हा दोन बहीण -भावंडांची लग्न केली. आता तिचं आयुष्य मार्गी लागावं इतकीच अपेक्षा आहे." नचिकेत जरा नरमाईने म्हणाला.

"हम्म. नोकरी करते ना? पगार किती आहे? तेही या फॉर्ममध्ये लिहून द्या."
हे ऐकून अकल्पिताने पुन्हा घाईघाईने फॉर्म भरून दिला.

"बाकी अपेक्षा काय?"

"ते लिहिलं आहे त्यात. पण मुलगा सुयोग्य असावा आणि घर कसं माणसांनी भरलेलं असावं. इतकंच." अकल्पिता थोडा विचार करून म्हणाली.

हे ऐकून त्या स्त्रीला बरं वाटलं. तिने आनंदाने मान डोलवत म्हणाली,
"या माफक अपेक्षा ऐकून खूप बरं वाटलं. नाहीतर आजकालच्या युगात मुलींच्या काय, काय अपेक्षा असतात देवच जाणे! ते जाऊ दे.
माझ्या सख्ख्या नणंदेचा मुलगा लग्नाचा आहे. वय परफेक्ट तुझ्या इतकेच आहे. दिसायला देखणा आहे. भरलेलं घर, गाडी, नोकरी सगळं आहे. पण लग्न जमत नाही. ते स्थळ चालेल का पाहा. हवं तर फोटो देते." त्या स्त्रीने बोलता बोलता फोटो शोधून काढला.
नचिकेतने तो फोटो आणि मुलाची माहिती स्वतः जवळ ठेऊन घेतली आणि दोघेही त्या स्त्रीचा निरोप घेऊन बाहेर पडले.

"नचि, नको ना हे सगळं. मला नाही लग्न करायचं. घरची विवाह संस्था असूनही त्या मुलाचं लग्न जमलं नाही अजून! मग तो काय माझ्यासाठी थांबला असेल का?" अकल्पिता नाराज होत म्हणाली.

"असेलही कदाचित. आपण बाबांशी बोलू मगच काय ते ठरवू." नचिकेत ऑफिसला निघून गेला आणि अकल्पिता आपल्या ऑफिसमध्ये आली. कामात तिचे लक्ष लागत नव्हते. राहून राहून त्या मुलाचा फोटो तिच्या डोळ्यासमोर येत होता. 'खरंच नचिकेत म्हणाला तसा माझ्यासाठी थांबला असेल का तो!' अकल्पिताने विचारांच्या तंद्रीत कामाला सुरुवात केली.

संध्याकाळी नचिकेत घरी यायच्या आधीच अकल्पिता घरी पोहोचली. आज कधी नव्हे ते रचनाने तिच्या हातात गरम गरम चहा दिला.

"ताई, मग नाव नोंदवले का? आणि मॅडम काय म्हणाल्या?" रचनाने उत्सुकतेने विचारले.

"हो. नचि येऊ दे. मग सविस्तर सांगेन."

अकल्पिता चहा घेऊन आपल्या खोलीत आली. ठेवणीतले दोन - चार कपडे काढून तिने छान इस्त्री करून ठेवले.
एकीकडे तिचे मन आनंदाने भरून गेले होते, तर दुसरे मन म्हणत होते, 'खरंच आता या वयात लग्न करणे योग्य आहे की नाही? शेवटी आपला आनंद महत्वाचा आहेच. उद्या वय झाल्यावर रचना वहिनी किंमत ठेवेल का माझी? मग आपल्याच घरात अडगळ होऊन राहण्यापेक्षा आपला आनंद शोधलेला केव्हाही बरा. आयुष्यभर साथ देणारा जोडीदार असेल तर कुठल्याही अडचणीतून मार्ग काढता येतो आणि एखाद्याच्या आयुष्यात हा योग उशीरा येतो! पण त्याने फारसा फरक पडत नाही.'

विचारांच्या तंद्रीत हरवलेली अकल्पिता नचिकेतच्या आवाजाने भानावर आली.
"अगं, कधीची हाक मारतो आहे मी? होतीस कुठे? बाबांना सांगून आलो सगळं. ते म्हणतात, हे स्थळ पाहायला काही हरकत नाही.

"आणि वहिनीचं काय मत आहे?" अकल्पिता रचनाकडे पाहत म्हणाली.

"मी काय बोलणार? हे आणि बाबा ठरवतील तसं." रचना आपले तोंड फिरवून आत गेली.

"तू नको लक्ष देऊ. खरंतर आपली नणंद लग्न होऊन सासरी जात आहे म्हणून तिने खुश व्हायला हवं. पण इथे सगळंच उलटं आहे." नचिकेत डोळा मारत म्हणाला. तसे बाबा मनापासून हसले.

'या विषयावर मी काय बोलणार? लग्न करू नका म्हणाले, तर कोणी माझे ऐकणार आहे का? आता बघतेच, कोण मुलगा पसंत करतो आमच्या नणंद बाईंना!' रचना स्वतःशी बोलत आवराआवर करू लागली.

क्रमशः

🎭 Series Post

View all