Feb 26, 2024
नारीवादी

अकल्पिता भाग 1

Read Later
अकल्पिता भाग 1

"ताई, तुझं लग्नाचं वय उलटून चाललं आहे. आणखी किती दिवस तू आमचा संसार सांभाळत राहणार? शेवटी तुझं आयुष्य तुला मनाप्रमाणे जगता यायला हवं. खूप केलंस तू आमच्यासाठी. आता फक्त स्वतःचा विचार कर." नचिकेत अकल्पिताला म्हणाला.

"आता या वयात कोण मुलगा लग्नाला तयार होणार? या आधीच आपण ताईंसाठी स्थळं पाहायला हवी होती. आता तसा फारसा प्रतिसाद यायचा नाही मुलांकडून." रचना नचिकेतला म्हणाली.

"या वयात म्हणजे? आत्ता कुठे ताईने एकतिशी ओलांडली आहे आणि प्रतिसाद न मिळायला काय झालं? ताई दिसायला सुंदर आहे. कमावती आहे. अख्ख्या घराची जबाबदारी पेलायची ताकद आहे तिच्यात." बोलता बोलता नचिकेतच्या कपाळाला आठ्या पडल्या.
"अजूनही आपलं घर तिच सांभाळते. तुला फारसं काही पाहावं लागत नाही. छाकुलीचं सुध्दा सगळं तिच बघते. तुला स्वयंपाक-पाण्यात मदत करते. शिवाय तिचा सगळा पगार तुझ्या हातात देते आणि काय हवं गं? आणखी किती अपेक्षा ठेवायच्या तिच्याकडून?

"तसं नाही. ताई आहेत म्हणून सगळं निभावतं. नाहीतर.." रचना रडायचे नाटक करत आत निघून गेली. तसा नचिकेत बाबांच्या खोलीत आला.

नचिकेतला आपल्या बायकोची सगळी नाटकं माहिती होती. ताईने आईच्या माघारी बाबांच्या तुटपुंज्या पगारावर घर सांभाळून नोकरी पुरत शिक्षण घेतलं. नंतर स्वतः नोकरी करून घर सावरलं, चालवलं. पाठच्या बहिणीचं, भावाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली आणि प्रोत्साहन दिलं.

आरोही लग्न करून नुकतीच सासरी गेली होती आणि नचिकेतचं लग्न थोडं लवकरच झालं होतं. जेणे करून अकल्पिताचे लग्न झाल्यावर घरात बाई माणूस असावं या इराद्याने.
पण रचना आली आणि घराचा रागरंग ओळखून तिने संसाराची जबाबदारी पुन्हा एकदा अकल्पिताकडे सोपवली. त्यात गुरफटून गेलेली अकल्पिता बाहेर पडू शकली नाही.
शिवाय वयानुसार थकलेले वडील आपल्या मुलांकडे पाहून जगत होते. आता आपल्या डोळ्यासमोर अकल्पिताचे लग्न व्हावे एवढीच त्यांची इच्छा होती.

"बाबा, ताईचे नाव नोंदवून येतो आज."
नचिकेत बाबांच्या जवळ बसत म्हणाला.

"हो. माझ्या डोळ्यासमोर तिचं लग्न होऊ दे म्हणजे मी डोळे मिटायला मोकळा." बाबा क्षीण हसत म्हणाले.

"बाबा, अजून छकुलीचं लग्न पाहायचं आहे तुम्हाला. इतक्या लवकर धीर सोडून कसं चालेल?"

इतक्यात छकुली लहान मुलांच्या गोष्टीची पुस्तकं घेऊन बाबांच्या खोलीत आली. "आबा, दिवसभर नुसतं पडून कंटाळा येतो ना तुम्हाला? मग या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. आज अजिबात हलायचं नाही इथून." छाकुली जवळची खुर्ची ओढून बसली आणि तिने गोष्टी वाचायला सुरुवात केली देखील.

"नचिकेत, तू नाव नोंदवून ये." बाबा हळू आवाजात म्हणाले.

तसा नचिकेत पुन्हा बाहेर आला.
"ताई, मी जाता जाता ऑफिसला सोडतो तुला. आवर पटपट."

काही वेळात अकल्पिता आणि नचिकेत मुख्य रस्त्याला लागले.
"ताई, आधी एक छानसा फोटो काढू आणि मग विवाह संस्थेत नाव नोंदवू." नचिकेत ताईला ऐकू जावं म्हणून जोरजोराने बोलत होता.

"नचि, हे सगळं करायलाच हवं का?" अकल्पिता न राहवून म्हणाली.

"हो. मग! तुझं पुढचं सगळं आयुष्य आनंदात, सुखात जावं हीच आमची इच्छा आहे." नचिकेत आणखी बरंच काही बोलत राहिला.
_________________________

"बहिणीचा इतका पुळका आहे तर आधीच लग्न लावून द्यायचं होतं. आता लग्न होऊन ताई इथून निघून जाणार म्हणजे सगळी जबाबदारी माझ्यावर पडणार. इतके दिवस सगळं कसं नीट चाललं होतं. आता बसलेली सगळी घडी विस्कटणार.
त्यात छोट्या नणंद बाईंचे नखरे तर सांगायलाच नकोत. इथे असताना त्या कडीचे काम करत नव्हत्या. आता सासरी कशा वागतात देव जाणे. मी त्यांना फारसा भाव कधी दिला नाही आणि आई, एकतर हे घर वडिलोपार्जित असल्याने ताई आणि यांना दुखवून चालत नाही. नाहीतर हे सगळं त्या दोघींच्या घशात जायचं." रचना तणतण करत आपल्या आईशी बोलत होती. ते सगळं बाबांना ऐकायला जात होतं.

'सुनबाईंच्या आई तशा विवेकी आहेत. आपल्या लेकीच्या संसारात कधी ढवळा ढवळ करत नाहीत. पण यांच्या मनात सासरच्या माणसांविषयी अढी आहे. ती मात्र कमी व्हायला हवी.' बाबांच्या डोळ्यातून न कळत अश्रू ओघळले.
________________________

खरंतर पाठचा भाऊ आपला किती विचार करतो, या विचाराने अकल्पिता आतून सुखावली होती. तिलाही वाटायचे, आपला सुखाचा संसार असावा. मन जाणून घेणारा नवरा, आईसारखी माया देणारी सासू असावी आणि या संसारात लुडबुड करणारी फार नाहीत, निदान दोन चार चिल्ली -पिल्ली तरी असावीत. आपल्याच विचारांवर अकल्पिताला हसू आलं.
अचानक गाडी थांबली, तसे तिचे विचारही थांबले.

क्रमशः


 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//