अकल्पिता भाग4

कुटुंबासाठी धडपडणाऱ्या स्त्रीची गोष्ट
अकल्पिता आपल्या नव्या संसारात खुश होती. सुखाची अपेक्षा नसावी अन् अचानक ते पदरी पडावे अन् त्यामुळे आयुष्य बदलून जावे, अशी काहीशी स्थिती होती तिची.

अकल्पिताच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले. नचिकेतच्या आग्रहावरून ती चार दिवस माहेरी राहण्यासाठी आली.
पण माहेरचे घर तिला पूर्वीसारखे वाटेना. काहीतरी कमी जाणवू लागली तिथे. लग्नानंतर बदललेली रचना वहिनी आता अंतर ठेवून वागल्यासारखी वाटत होती. नचिकेतच्या मनातही काहीतरी सलत होते. मात्र तो बोलून दाखवत नाही, हे अकल्पिताला जाणवले होते.

"नचि, मी इतकी परकी झाली का रे? की तू या घरचे प्रॉब्लेम्स माझ्याशी शेअर करू शकत नाहीस? या सहा महिन्यात असं काय बदललं? मी जरी सासरी गेले असले तरी आपलं नातं नाही ना बदललं? तुझ्या मनात काय आहे ते बोलून टाक. मन मोकळं होईल तुझं."

"ताई, बरं झालं तुम्हीच विषय काढलात. गेले दोन महिने यांच्या हाताला काही कामच नाही." रचना घाईघाईने बाहेर येत म्हणाली.

"तुझी नोकरी? काय झालं नचि? सांगशील का?" अकल्पिता चिडून म्हणाली.

"ताई, दोन महिन्यापूर्वीच माझी नोकरी गेली. थोडी रक्कम शिल्लक होती, तीही आता संपत आली आहे."

"पण अचानक अशी नोकरी जायचं कारणच काय? खरंच मी इतकी परकी झाले? तू मला हे सगळं आधी का सांगितलं नाहीस? आणि बाबा, तुम्ही मला काहीच बोलला नाहीत! निदान तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती." अकल्पिताने एक चेक लिहून नचिकेतच्या हातावर ठेवला.

"ताई, नको. आता तुझे लग्न झाले आहे. या पैशाचा अधिकार आधी तुझ्या सासरच्या माणसांचा. मला काय आज, उद्या नोकरी मिळेल. आधीच तू खूप केले आहेस आमच्यासाठी. आता हे नको..खरंच नको. उद्या लोक म्हणतील हा नचिकेत आयुष्यभर ताईच्या जीवावरच जगला."

"असं काय करतोस? आज आई असती तर तिच्याकडून तू पैसे घेतले नसतेस? हे तसंच समज हवं तर आणि लोक काहीही म्हणू देत. या लोकांनी कधी आपला विचार केला? साधी मदतही कोणी केली नाही. मग ते काय म्हणतील याचा विचार आपण का करायचा?" अकल्पिताने रचनाच्या हातात चेक ठेवला.

"ताई, यांना नोकरी मिळाली की आम्ही तुमचे सगळे पैसे परत करू." रचना म्हणाली खरी, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव काही वेगळचं सांगत होते.

"तरी मी यांना म्हणत होते, ताई आहेत मदतीला. पण हे ऐकतच नव्हते." बोलता बोलता रचनाने आपली जीभ चावली.

"अजून किती दिवस तुझे उपकार घ्यायचे? आता तुझं लग्न झालंय. तुला तुझा संसार आहे. तुझ्या मागे चार माणसं आहेत. तू त्यांचा विचार कर. आमचे आम्ही बघू."

"बाबा, उपकार कसले? तुम्ही सर्व माझीच माणसे आहात. लग्न झालं म्हणजे माहेरची नाती तुटत नाहीत. नचि, तू तुला जमेल तेव्हा पैसे दे हवे तर म्हणजे तुमच्यावर माझे उपकार राहणार नाहीत."
________________________

अकल्पिता आपल्या घरी आली. तिने सारंगला सारे काही सांगून टाकले. पण का कुणास ठाऊक आज ती पोटभर रडली.
"आजही वहिनीने तेच केलं. ही सगळी माझी लोकं मला कायम गृहीत धरत आली. आजवर सर्वांसाठी सगळं काही केलं. पण नचिकेत शिवाय माझा विचार कोणीच केला नाही. अगदी बाबांनीही! कारण माझं लग्न व्हावं ही जरी त्यांची इच्छा असली तरी त्यांनी ते मनावर कधीच घेतलं नव्हतं.

अहो, आई गेल्यानंतर त्यांनी नोकरी बदलायचा देखील विचार कधी केला नाही. आहे त्या तुटपुंज्या पगारावर त्यांनी अख्ख आयुष्य काढलं. आम्हा मुलांना काय हवं, काय नको, हे मनापासून जाणून घेण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. आईची जागा घेणं तर दूरच राहिलं, ते फक्त बाबा होण्याचे कर्तव्य करत राहिले.

सारंग, मला खूप शिकायचं होतं. चांगली नोकरी करायची होती. पण घरच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही."
आज इतक्या वर्षांचे साचलेले दुःख अकल्पिताच्या तोंडून बाहेर पडत होते.

"तू आधी शांत हो बघू. अकल्पिता, तू तुझी जबाबदारी पूर्णपणे निभावली आहेस. कायम आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिलीस. पण जेव्हा त्यांना तुझी गरज लागेल तेव्हा तू त्यांच्यासाठी नेहमी पदर खोचून उभी होतीस. जिथे कमी पडेल तिथे ती कमी पूर्णपणे भरायचा तू प्रयत्न केलास.

आता मी जे सांगेन ते ऐकशील?"
सारंग अकल्पिताकडून काय उत्तर येते याची वाट पाहत तिच्याजवळ बसून होता.

"बोला सारंग. मी ऐकेन सारं. आता हे ओझं मला सहन होत नाही. खरंतर हे ओझं नाही. ती सारी माझीच माणसे आहेत. पण मी काही बोलत नाही, याचा अर्थ माझ्या मनात विचार येत नसतील? हे कायम गृहीत धरलं जाणं हल्ली ओझं वाटायला लागलं आहे."

"तू सासरी आलीस तरी माहेरच्या जबाबदाऱ्या तुझ्या मनातून गेल्या नाहीत. इथे आपल्याला कशाचीही कमी नाही. पण तुझ्या माहेरी मात्र पहिल्यापासूनच काही ना काही कमी होती. तू ती भरून काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलास. जेव्हा जेव्हा आपल्या माणसांना तुझी गरज होती तेव्हा तू त्यांच्या पाठीशी उभी राहिलीस.
पण आता नचिकेतला स्वतःच्या जबाबदारीवर काहीतरी करून पाहू दे. रचना वहिनीला आपल्या कुटुंबासाठी धडपडू दे. परिस्थितीशी झगडू दे. बस् आलेल्या परिस्थितीचा सामना कसा करायचा हे त्यांचे त्यांना शिकू दे.
तू आता स्वतःसाठी जग. त्यांच्यापासून चार हात लांब रहा आणि काय घडतं ते बघ. नचिकेतचे सगळे पैसे संपले तर संपू देत.
शेवटी माणूस पोटापाण्यासाठी काही ना काही उद्योग करतोच. निदान तो यासाठी प्रयत्न तरी करेल. तू जर त्यांना सारखे पैसे पुरवत राहिलीस तर तुला गृहीत धरणे त्यांच्यासाठी अधिक सोपं होणार नाही का?"

अकल्पिताला सारंगच म्हणणं पटत होतं. आपल्या माणसांना आपली अनुपस्थिती देखील जाणवली पाहिजेच. त्याशिवाय आपली किंमत राहत नाही.
सारंगच्या बोलण्याने अकल्पिताला थोडा धीर आला होता. नकळत ती त्याच्या मिठीत विसावली.

क्रमशः

🎭 Series Post

View all