"या..आम्ही तुमचीच वाट पाहत होतो." सारंगच्या आई, कुंदा ताई नचिकेतला म्हणाल्या. त्याच्या पाठोपाठ अकल्पिता, रचना आणि बाबा आत आले. मुलगा पाहण्याची पहिलीच वेळ! त्यामुळे अकल्पिता थोडी अवघडली होती. बावरल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होती. तिची मनस्थिती ओळखून कुंदा ताईंनी चहापाणी झाल्यानंतर सारंग आणि अकल्पिताला बोलण्यासाठी बाहेर पाठवले.
"खरं सांगू का, तुमची अकल्पिता मला पहिल्याच भेटीत आवडली होती म्हणून मी सारंगला तिचे स्थळ सुचवले. योगायोगाने पत्रिकाही जमली. आता फक्त एकमेकांची पसंती बाकी आहे." त्या विवाह संस्थेतल्या बाई आज हसतमुख चेहऱ्याने सर्वांशी बोलत होत्या.
_____________________
"एक विचारू?" काहीतरी बोलायचे म्हणून सारंग अकल्पिताला म्हणाला.
"हम्म."
"अगदी खरं सांगायचं. तुमच्या लग्नाला इतका उशीर का?" सारंग कडून अकल्पिताला हा प्रश्न अपेक्षित नव्हता.
"आई लवकर गेली. नंतर आरोही आणि नचिकेतचे शिक्षण पूर्ण व्हायचे होते. जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि लग्नाचे राहूनच गेले. वाटलं होतं वहिनी आल्यावर माझी थोडी तरी सुटका होईल पण त्यानंतरही जबाबदाऱ्या वाढत राहिल्या आणि मी त्या सांभाळून घ्याव्यात हे जणू समीकरणच बनले.
असो, तुम्हीही इतकी वर्षे बिन लग्नाचे राहिलात? कोणीही मुलगी सहज मिळाली असती तुम्हाला."
"तशा बऱ्याच मुली पाहिल्या. पण मनाजोगी कोणी भेटलीच नाही. पण तुमचा फोटो पाहिला आणि.. मला तुम्ही मनापासून आवडलात. स्त्री कर्तबगार असली की तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास काही वेगळाच असतो. मात्र याचा गर्व तुमच्या चेहऱ्यावर कुठेही दिसत नाही. तोच मला जास्त आवडला."
सारंगचे हे उत्तर अकल्पिताच्या मनाला खूपच भावले. सारंगला अकल्पिता पसंत होती. इकडे नचिकेत बाबा आणि रचना यांनाही सारंग आवडला होता.
"मी आजवर कुणाजवळ मन मोकळे केले नाही. तुम्ही जवळचे वाटता म्हणून सहज बोलून गेले. पण हे तुम्ही कोणाला बोलू नका." अकल्पिता सारंगला म्हणाली.
"जवळचा म्हणजे? कसा वाटतो मी तुम्हाला?" सारंगची मिष्कील नजर अकल्पिताच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती.
त्या नजरेने अकल्पिताने आपली नजर फिरवली.
दोघेही आत आले. अकल्पिताच्या नजरेत पसंती होती. सर्वांसमक्ष एकमेकांची पसंती विचारात घेऊन बसल्या बैठकीत लग्न ठरले.
"रचना, आता तुमची जबाबदारी वाढली. मुलीच्या आईच्या जागी तुम्ही आहात. आईच्या मायेने तुमच्या मुलीचा हात माझ्या मुलाच्या हातात द्या. बस् इतकेच मागणे आहे आमचे. बाकी आम्हाला काही नको." कुंदा ताईंचे बोलणे ऐकून कधी नव्हे ते रचनाच्या डोळ्यात पाणी आले.
"बाबा, लग्न अगदी साध्या पद्धतीने व्हावे अशी आमची इच्छा आहे. आता लवकरात लवकर मुहूर्त पाहून लग्न करून घेऊ. एकदा का मुले संसारात रमली की आपण निश्चिंत झालो!" सारंगचे वडील, अनिलराव अकल्पिताच्या बाबांना म्हणाले.
_______________________
ताईच्या लग्नाची बातमी ऐकून आरोही धावत- पळत माहेरी आली. "माझ्या माघारी लग्न कसे काय जमवले?" म्हणून रुसून बसली.
"आता रुसायला वेळ नाही अरु, भरपूर कामं आहेत." बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.
तेही खरंच होतं. आरोहीने ताईच्या लग्नाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. "वहिनी, तू नुसते देखरेख कर. बाकी कामाचे आम्ही सगळे पाहून घेऊ."
हे ऐकून रचनाला खूपच आश्चर्य वाटले. लग्नाआधी साध्या कामालाही हात न लावणारी आरोही आता खूपच जबाबदारीने वागत होती.
या लग्नासाठी रचनाच्या आई, भारतीताई आपल्या कुटुंबासह हजर झाल्या. चार मोलाचे सल्ले देत त्यांनी सर्वांकडून लग्नाची तयारी अगदी चोखपणे करून घेतली.
बघता बघता लग्नाचा मुहूर्त ठरला आणि अकल्पिता -सारंगचे लग्न पार पडले. आपला कडवटपणा विसरून रचनाही या सोहळ्यात मनापासून अगदी आनंदाने सहभागी झाली.
"ताई, इथली काळजी आता करायची नाही. आम्ही आहोत. तुम्ही तुमचा संसार मन लावून करा." रचनाने अकल्पिताला मिठीत घेतले. "मागच्या साऱ्या कटू आठवणी विसरून जा आणि नव्या आयुष्याची सुरुवात करा."
रचनाचे हे बदललेले रूप सर्वांनाच खूप आवडले.
______________________
नव्या संसाराची नवीन स्वप्न, आकांक्षा, इच्छा मनात ठेवून अकल्पिताने सारंगची पत्नी म्हणून घरात पाऊल टाकले आणि लवकरच ती आपल्या संसारात रुळली.
कुंदा ताई, सारंग आणि अनिलरावांच्या सहवासात अकल्पिता आपले जुने दिवस विसरू पाहत होती. जीव लावणारे सासू -सासरे, जीवापाड प्रेम करणारा नवरा अकल्पिताच्या आयुष्यात नवे रंग भरू पाहत होते.
मात्र आयुष्यात पुढे येणारे नवे वळण तिची वाट पाहत होते. त्या वळणावर काय विसावले होते हे केवळ नियतीलाच ठाऊक होते.
क्रमशः