आजोळ - एक जिव्हाळ्याचे ठिकाण

आजोळ - एक जिव्हाळ्याचे ठिकाण

आजोळ.!!!! 

शब्दातचं किती भावना आहेत.

      प्रत्येकासाठी प्रत्येक नात्याची किंवा नातलगाची व्याख्या निराळी असते. 

आणि त्या असंख्य नात्यांत आजोळ नेहमीच वरचढ ठरत असते. बहुतांश लोकांच्या बाबतीत हे घडते. 

       आजोळाप्रती प्रेम , काळजी , जिव्हाळा , माया, ओढ यासारख्या कितीतरी भावना मनात दाटून येतात. 

याचं काही ठराविक "लॉजिक" वगैरे सांगता येणार नाही कोणालाही , पण हे घडण्याचा आकडा मात्र निश्चितच मोठा आहे. 

लहानपणी अजाणत्या वयापासूनच एक ओढ असते आजोळी जाण्याची. जी पुढे जाऊन देखील जपली जाते. 

गाव..!!! 

आजोळाचे गाव म्हणजे एक आठवणी देणारं रम्य ठिकाण. 

         आज या धावत्या जगात सुद्धा लोकं आपल्या माणसांसमवेत वेळ घालवण्यासाठी गावी जाणं ठरवतात. कारण कुठेतरी मनात त्याची एक वेगळीच जागा असते. 

       कोणाला आजोळाची ओढ तिथल्या रम्यतेमुळे असते तर कोणाला माणसांमुळे. प्रत्येकाची विचार करण्याची अन् व्यक्त होण्याची पद्धतच मुळात वेगळी असते. आणि मग जन्म घेतात निरनिराळे दृष्टीकोन.! 

अनुभव... !!! 

     प्रत्येकाचे अनुभव नक्कीच वेगळे असतात. त्यामुळे कोणत्यातरी ठराविक शब्दांत आजोळाला शब्दांकित करणे योग्य ठरणार नाही. 

          काहींना आजोळात केलेल्या धमाल मस्तीची आठवण होते तर काहींना आजी आजोबांच्या गप्पा गोष्टींची. 

            काहींना आजीच्या हातचे जेवण अन् खाऊ आठवतो तर काहींना आजोबांसोबतचा फेरफटका. 

       कोणी मैत्र परिवार व भावंडांसोबतच्या मैफिलीत हरवून जातं तर कोणी त्यांच्या सोबत जगलेल्या हुंदडण्यात. 

या अन् अशा अनेक अनुभवरूपी आठवणी प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असतात. पण आजोळाची ओढ मनात एक खास जागा घेऊन राहते. 

( फार नाही पण थोडे मनातील शब्द...) 

-©®कामिनी खाने