Jan 19, 2022
सामाजिक

आजोळ

Read Later
आजोळ

#आजोळचे घर

माझं आजोळ कुडाळ तालुक्यात पिंगुळी इथलं. आजोळचं घर आणि तिथल्या आठवणी मनात छान चितारल्या आहेत. आईसोबत काही दिवस आम्ही आजोळच्या घरी जायचो. या घराचा पाया जरा उंच होता. पायऱ्या चढून आत प्रवेश केला की बाहेरची पडवी होती. पडवीच्या उजव्या कोपऱ्यात पाटा वरवंटा होता. आता तसा पाटा दिसतही नाही. आजी त्यावर वाटप वाटायची तेंव्हा त्या सुवासाने भुक जाग्रुत व्हायची. उकड्या तांदळाचा भात,गोडी डाळ व गारपाचे आंबे खायला मजा यायची.

पडवीच्या दोन्ही बाजूस दोन होवऱ्या होत्या. त्यात भाडेकरू रहायचे. आजी भाडेकरुंवर खूप माया करायची. एकदा त्यांच्या घरी गोंधळ होता तो बघायला आजी,मी व माझी आत्ते बहीण आवळेगावला गेलो होतो. सकाळी उठल्यावर त्यांनी आम्हाला चहा भाकरी दिली होती.

पडवीतून आत गेलं की लागते लांबलचक खोली जिला वळई म्हणतात. वळईच्या मधोमध गोल खांब होता. बाजूला उखळ होतं. त्यात पाय घालून दांडा हाताने धरुन गोल गोल राणी म्हणत गिरकी घ्यायला फार आवडायचं. वळईच्या डाव्या बाजूला साठप्याची खोली होती. त्यात गवताच्या मुडींत भात भरुन ठेवलेला असे.डाव्या बाजूस स्वैंपाकघर होतं,आडवं लांबलचक. स्वैंपाकघरात समोरच एक खिडकी होती लाकडी गजाची. खिडकीच्या एका बाजूला चूल होती. चुलीपुढे मांजरं मुरी मारुन बसलेली असायची. काही लाकडी फळ्यांवर डबे रचलेले होते व एका कोपऱ्यात आजीची भली मोठी ट्रंक होती. त्यात माऊपासून लपवून ठेवायच्या वस्तू होत्या.

आजीकडे म्हैस होती. तिचं दूध याच ट्रंकेत एका कितलीत ठेवलेले असायचे. मला आठवते, काही शेजारणी आजीकडे दहा,वीस पैशांच दूध मागायला फुलपात्र घेऊन यायच्या  

सकाळी उठलं की डोळे चोळत स्वैंपाक घरात जायचो. आम्ही उठायच्या आधी आजीने घावळे,आंबोळ्या करून लाकडी उतवावरल्या सुपात रचून ठेवलेले असायच्या.
कधी सांजेला नदीवरुन काहीजण म्हळव्याच्या गातणी आणायचे. आजी ते खरेदी करायची. रखा लावून मासे साफ करायची. या म्हळव्यांचा सार अप्रतिम लागायचा.
मी पाचवीत असताना आजोबा देवाघरी गेल्याने आजी घरी एकटीच रहायची. एका खोलीत कायम गडद अंधार असायचा. तिथे जायला मला भितीच वाटायची. मागील दारी एक खोली होती. त्यातही कधीकधी भाडोत्री असत. 

डाव्या बाजूला शेवग्याचं झाड होतं. खूप शेंगा धरायच्या. तिथेच झाडाच्या खोडाला म्हशीला बांधायचे. पाठीमागे असलेल्या गोठ्यात शेण्या,लाकडे रचून ठेवलेली असायची.

आजी गोरीपान होती. ठेंगणी होती,बारीकसी,केस कुरळे होते. पडवीत केस विंचरायला बसायची. भरपूर तेल लावून चापूनचुपून एवढ्याशा केसांचा अंबाडा बांधे. आजीच्या कनवटीला एक चंची असायची. त्यात पान,सुपारी,चुन्याची डबी ठेवलेली असायची. आजीचे दात सगळे शिल्लक पण झिजलेले व पान खाऊन खाऊन चॉकलेटीसर झाले होते. आजीचा चष्मा जाड भिंगाचा होता. नववारी लुगडं नेसायची व व्ही गळ्याचा ब्लाऊज ती घालायची.

इथे आंघोळीसाठी आत मोरी नसायची. बाहेरच्या खळ्यात उजव्या बाजूला तुळशी व्रुंदावन होतं. त्याचा पाया रुंद होता. त्यावर आम्ही पानफुलं गोळा करून भातुकली खेळायचो. कधी आजी यावर ताटात फणसपोळी,आंबापोळी वाळवत ठेवायची. आजीकडे नारळाच्या झावळ्यांनी बांधलेला बाथरूम होता.  त्यात फडतरीवर बसून आम्ही आंघोळ करायचो. खूप भारी वाटायचं त्या मोरीत आंघोळ करताना. 

अंगणात पिवळ्या कण्हेरीची फुलं पडायची. डाव्या बाजूला पांढरा देवचाफा होता. ही फुलं एकत्र करुन आम्ही त्यांचे हार करायचो. आजी एकटी असल्याने शेती खंडाला द्यायची. फणसाची झाडं चिक्कार होती. फणस मुळापासून धरायचे. आम्ही भरपूर गरे खायचो. काही व्यापारी फणस विकत घेऊन जायचे. खोडचं दिसत नव्हती. जास्वंदीची घंटाक्रुती फुलंही छान दिसायची.

आजीच्या घरापुढच्या वाटेने दोन मिनटं चालत गेल्यावर मावशीचं घर यायचं. या वाटेत लाजरी असायच्या. त्यांना बोट लावून मिटताना बघायला मजा यायची. मावशीच्या घरी पाठल्या दारी हेळूचं झाड होतं. मावशीच्या घरापाठी आबोली होती. भरपूर आबोली धरायची. हातभर लांब वळेसर व्हायचा. मावशीकडे तेंव्हा भातशेतीसोबत मिरच्या,मुळा,वांगी..करायचे. त्याला परडे म्हणायचे.

विहिर मात्र हायवेच्या पलिकडे होती. तिथून बायका डोक्यावर हंडाकळशीची दूड,कंबरेत कळशी घेऊन पाणी भरायच्या. त्यांचा बराचसा वेळ पाणी भरण्यात जायचा.

कुडाळला काका व मावशीसोबत आम्ही पिक्चर बघायला जायचो.  तिथेच शहेनशहा पाहिला होता. राऊळ बुवांच्या मठातही एकदा गेलो होतो. 

मावशीची सासू फार प्रेमळ होती. तिला आम्ही लाकडं,शेणी भरून द्यायचो. ती आम्हाला आयस्रोटवाला आला की लाल,पिवळे आयस्रोट घेऊन द्यायची. कुडाळात आजीला आओ म्हणायचे. इथल्या भाषेचा हेल रानबांबुळीच्या भाषेहून बराच वेगळा होता.

 आजीकडे   हापूस आंबे नव्हते. आंब्याची झाडं होती. हा आंबा बाहेरुन लालसर सालीचा व आतून गर्द केशरी असायचा. खूपच गोड लागायचा. जांभळंही भरपूर धरायची. मावशीकडे म्हशी खूप होत्या. रेड्याचं जोत होतं. दुधदुभतं भरपूर असायचं. इथेही आंबोळ्या,घावणे,वडे,शेवयारस,खापरोळ्या..आमची नुसती चंगळ असायची. कुडाळच्या बाजारातही कधी जायचे मावशीसोबत. मावशी तिथे बांगड्या भरायची. लिंबू सरबत प्यायचो. थोडं थोडं आठवतं. बुधवारी आजी बाजारात जायची मोठी टोपली घेऊन. 

आठवड्याला लागणारी पानसुपारी,तेल,चहापावडर,साखर,डाळी,कडधानय,भाज्या,आंबे घेऊन यायची. आमच्यासाठी कांदाभजीच्या पुड्या व बामगोळे घेऊन यायची. आत्ता पाठीमागे विहिर आहे. घरात नळ आहेत,बाथरूम आहे. आजी नाही..बरंच काही हरवलं आहे.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now