आजोबा आणि आय पी एल

आजोबा मॅच बघायला जातात
आजोबा आणि आय पी एल..


"आजोबा.. प्लीज अजून दोन मिनिटे तिथेच उभे रहा.." वीर आणि त्याचे मित्र जोरात ओरडले..
" यस.. सिक्सर..."
" मला पण बघू दे जरा.. " असे म्हणत आजोबा आत आले..
" ओह्ह शीट.. विकेट गेली.. आजोबा म्हणून तुम्हाला सांगत होतो आत येऊ नका.. तुम्ही आत आलात कि विकेट जाते.." सगळी मुले वैतागली होती..
" बरं बाबा जातो मी बाहेर.." आजोबा तोंड पाडून म्हणाले..
" आजोबा वाईट नका वाटून घेऊ.. एकतर आधीच मुंबई इंडियन्स हरते आहे.. आपल्या टीमसाठी एवढेच करा ना.." वीर आजोबांची समजूत काढत होता.. बिचारे आजोबा परत दरवाजात जाऊन उभे राहिले.. आणि मुलांच्या आवाजावरून आत काय चालले आहे याचा अंदाज लावू लागले. समीरा बँकेतून आली.. आजोबांना दरवाजात उभे राहिलेल्या आजोबांना बघून तिला काही कळलेच नाही..
" बाबा, तुम्ही असे दरवाजात का उभे आहात? आत चला ना.."
" अग ती मॅच.. " आजोबांनी बोलायचा प्रयत्न केला..
" तेच म्हणते आहे.. आत आरामात बसून बघायचे कि असे उभ्याने?" समीरा आजोबांना आत घेऊन गेली..
" आई, आजोबा.... बघ.. गेली विकेट?" वीर वैतागला होता..
" काय बडबडतो आहेस?" समीराला काही समजत नव्हते..
" अग, आजोबांना कधीचे तेच सांगतो आहे, ते आत आले कि आपली विकेट जाते आहे.. आणि दरवाजात उभे राहिले कि सिक्स आणि फोर.."
" काहिही असते तुझे वीर.. असे कसे होईल?"
" बघायचे आहे तुला? आजोबा प्लीज एकदा माझ्यासाठी? हि शेवटची ओव्हर आहे.."
नातवाच्या इच्छेचा मान राखून आजोबा परत बाहेर गेले..
" और ये लगा सिक्सर..."
" अरे काय चालू आहे? बाबांना बाहेर का उभे केले आहे?" सुदीपने विचारले.
" सुदीप थांब.. शेवटचा बॉल राहिला आहे.. बाबांना बाहेरच उभे राहू दे." समीरा जोरात ओरडली.. सगळे एकदा तिच्याकडे एकदा टि.व्ही. कडे पाहू लागले.. 
" जितने के लिए चाहिए अब बस दो रन। देखते है अब क्या कमाल होगा? क्या मुंबई इंडियन्स यह मॅच जीत पाएगी? और ये बल्ला उठाया , घुमाया और यह लगा चौंका।"
" ए... मॅच जिंकलो.." मुलांनी नाचायला सुरुवात केली..
" आता तरी येऊ का मी आत?" आजोबांनी विचारले..
" हो आजोबा.." वीरने पटकन आत जाऊन तेल आणले आणि आजोबांचे पाय दाबून देऊ लागला..
" वीर हा काय मूर्खपणा होता?" सुदीपने कडक आवाजात विचारले. 
" काही नाही बाबा. अहो आज घरी सगळे मॅच बघायला आले होते.. आजोबा आत आले कि विकेट पडत होती.. दरवाजात उभे राहिले कि सिक्स, फोर जात होते म्हणून.."
" म्हणून तू त्यांना असे उभे केलेस? शोभते का तुला?"
"अरे सुदीप.. मला पण मजा येत होती रे.. तेवढाच आनंद.." आजोबांनी मध्ये बोलायचा प्रयत्न केला..
" तुम्ही ना लाडावून ठेवले आहे बाबा त्याला.. पण नाही त्याला शिक्षा तर होणारच.." सुदीप चिडला होता.. वीर मान खाली घालून उभा होता..
" तुम्ही द्याल ती शिक्षा मला मंजूर आहे.." वीर म्हणाला..
" हि घे मॅचची तिकिटे. तुझ्या आणि तुझ्या मित्रांसाठी आणली होती.. पण आता त्यातले एक आजोबांसाठी राखीव.."
हे ऐकताच सगळ्या मुलांनी परत कल्ला करायला सुरुवात केली..

अरे.. पण कथेच्या ओघात हे सगळे कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? तर हे आहे आपले जुनेच कुटुंब.. आज खूप दिवसांनी भेटायला आले आहेत.. समीरा आणि सुदीप बँकेत काम करणारे दांपत्य.. त्यांचा कॉलेजला जाणारा मुलगा वीर आणि घरातले मुख्य आजोबा.. जे सध्या निवृत्त झाले आहेत.. पण त्यांच्या बाकीच्या गोष्टी सुरूच असतात.. तर आता बघूया स्टेडियमवर काय होते..

" वीर , मी काय म्हणतो, हा गॉगल जुना वाटतो का रे?"
" आजोबा नवीन तर आहे.. तुम्हाला कशाला हवा नवीन गॉगल?" 
"मग काय? आपण एवढे स्टेडियमवर जाणार मॅच बघायला, गॉगल नको? मी तर तुमच्यासारखे नवीन कपडे पण घेणार आहे.."
" आजोबा आपण मॅच बघायला जातोय, लग्नाला नाही.." वीरने आजोबांना सांगायचा प्रयत्न केला..
" असू दे रे.. माझ्या लहानपणापासून मला एकदातरी स्टेडियममध्ये बसून मॅच बघायची होती.. पण काही ना काही कारणाने ते राहूनच गेले.. आता संधी मिळते आहे तर मी मला हवे तसे वागणार.. नवीन कपडे, गॉगल आणि तो झेंडा.." आजोबांची इच्छा ऐकून वीरच्या पोटात गोळा आला.. बाबांनी हि खरेच शिक्षा नाही ना दिली आपल्याला तो विचार करायला लागला..
मॅचचा दिवस उगवला.. आजोबा सकाळी सकाळी स्पोर्ट्स शूज, कपडे घालून तयार होते..
" अरे सुदीप, वीर, समीरा उठा आता.. कितीवेळ झोपणार आहात.. "
" बाबा काय ओ.. आत्ताशी सकाळचे सहा वाजले आहेत.. अजून एका तासाने उठलो तरी चालणार आहे कि." सुदीप डोळे चोळत बोलला..
" हो का? मला आठ वाजले असे वाटले.. झोप मग जाऊन थोडा वेळ."
" बाबा पण तुम्ही कुठे चाललात असे तयार होऊन?"
" अरे मॅच बघायला जायचे ना, म्हणून."
" पण तुम्हाला तर दुपारी जायचे आहे. मग आतापासूनच तयारी.."
" एक्साईटमेंट रे.." आजोबा दात सॉरी कवळी काढत म्हणाले..
" आज काय वीरचे खरे नाही.." सुदीप हसत आत गेला..

" वीर, आजोबांना मित्रांसाठी एकटे सोडू नकोस हं.."
" बाबा, तुम्हीसुद्धा मोबाईल सतत बरोबर ठेवा.. आमचे ऑफिसचे नंबर लक्षात आहेत ना? काही लागले तर फोन करा.."
" आणि सुका खाऊ, पाण्याच्या बाटल्या न्यायला विसरू नका.."
" वीर आजोबांचा हात आत जाताना आणि बाहेर येताना सोडू नकोस रे.." सुदीप आणि समिराच्या सूचना संपतच नव्हत्या..
" आम्ही काय लहान आहोत का? कळते तेवढे आम्हाला.." वीर आणि आजोबा दोघे एकत्र म्हणाले..
" बरं जातो आम्ही.. पण तिथे पोचल्यावर फोन करायला विसरू नका.. आम्ही बघतो तुम्हाला.. टि.व्ही वर.." सुदीप हसत म्हणाला..
आजोबा, वीर आणि त्याची मित्रमंडळी निघाली टॅक्सीत बसून स्टेडियमच्या दिशेने.. तिथे सगळे उत्साहाचे वातावरण होते.. वातावरणात जोश भरला होता.. आजोबांनाही त्या उत्साहाची लागण झाली होती.. सगळेजण आपापल्या जागेवर जाऊन बसले.. टॉस झाला.. मॅच सुरू झाली.. खरेतर आजोबांना एवढ्या लांबचे काहीच दिसत नव्हते. मग त्यांनी वीरला विचारायला सुरुवात केली.. "काय रे आता का ओरडले?"
" आजोबा तो बॉलिंग करतो आहे म्हणून.."
" तो कोण?"
" बुमरा.."
" आता का रडले?"
" धोनीने सिक्सर मारला.."
" अरे पण तो तर भारताचाच आहे ना?"
" आजोबा पण तो आता चेन्नईकडून खेळतो आहे. आणि आपण मुंबईचे फॅन आहोत.. आजोबा प्लीज तुम्ही त्या स्क्रीनवर मॅच बघाना.. ओह्ह तुमच्याशी बोलताना ती विकेट गेलेली बघता आली नाही.." वीर खट्टू होत बोलला..
आजोबांनीही मग आवरते घेतले.. ते तो झेंडा हातात घेऊन फिरवायला लागले.. ते बघून अशा गोष्टी कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी उत्साही लोकांनी त्यांचे वय आणि उत्साह पाहून त्यांचे शूटिंग करायला सुरुवात केली.. हळूहळू चॅनेलवाल्यांचे पण त्यांच्याकडे लक्ष गेले.. ते ही अधूनमधून आजोबांवर कॅमेरा मारू लागले.. 
" मी जरा आलो रे जाऊन.." आजोबा वीरला करंगळी दाखवत म्हणाले..
" हो.. पण इथेच या.." मॅचमध्ये दंगलेल्या वीरने सांगितले.. एखाद्या गदेसारखा तो झेंडा मिरवत आजोबा चालले होते.. आता तर प्रत्येकजण त्यांचे फोटो काढायला उत्सुक होते.. आजोबा मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ होते. आपला विधी आटोपून आजोबा स्टेडियमवर परत जायला निघाले.. पण त्यांना रस्ताच आठवेना.. ते चुकून खेळाडूंच्या रूमच्या दिशेने जाऊ लागले..
" ओ आजोबा.. इथे काय करताय?" एकाने विचारले..
" अरे मला स्टेडियमवर जायचे आहे.. रस्ता चुकलो आहे.."

आजोबांना वीर भेटेल का? या गर्दीत आजोबा सुखरूप घरी जातील का? पाहू पुढील भागात..
सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई