आजीची पैठणी भाग 3

आजीला सन्मानाने उभे करणाऱ्या आजच्या पिढीची गोष्ट.

आजीची पैठणी भाग 3

अनघाने आजीच्या परिस्थितीची जाणीव देवांश आणि नित्याला करून दिली. त्याबरोबर आजीचा स्वाभिमान जपायचा हेही सांगितले. आपली लाडकी आजी अशी जगतेय आणि आपल्या ते कधीच लक्षात आले नाही ह्याचे देवांश आणि नित्याला खूप वाईट वाटत होते. आता पाहूया पुढे.


"अनघा,असे काय करता येईल ज्यामुळे आजीला स्वाभिमानाने उभे करता येईल आणि आपल्याला तिचा सहवास पण लाभेल?"
नित्याने विचारले.
"कोकण आता पर्यटन हब झाले आहे. माझी एक मैत्रीण एका संस्थेद्वारे स्थानिक लोकांना मदत करते. आपण तिथून आजीकडे जायचे. करायचं सगळ आपण नाव फक्त त्यांचे."
अनघाने योजना सांगितली.
देवांशने तिला मिठी मारली.
"दाद्या लग्न झालं नाही अजून." नित्या हसत म्हणाली.

"ये पण मला काय वाटतं मामाचा सोहम आणि स्नेहा तसेच मावशीचे जय आणि विजय यानांही सांगू आपण."
देवांश सुचवत होता.
"अगदी माझ्या मनातलं बोलला." नित्याने दुजोरा दिला.
तिघेही फिरून आले. आजी डब्यात असलेले पैसे मोजून परत ठेवत होती.

"पोरं इतक्या दिवसांनी आलीत त्यांना आवडीचे खायला करून घालायला पाहिजे."
आजी स्वतः शी बोलत होती.

नित्या आणि देवांश दोघांचे डोळे पाणावले. तेवढ्यात अनघा आत आली.

"आजी,आता आम्ही पुढचे तीन दिवस राहणार आहोत. तर मी आणि नित्या बाजार करून आणतो. तुम्ही यादी द्या."
अनघा हसत बोलली.
"आगो,तुला काय समजणार कोकणी बाजार.मी आणते सगळ."आजीने टोलावले.

पण नित्या आणि अनघा दोघींनी हट्टाने आजीकडून यादी करून घेतली आणि बाहेर पडल्या.


तेवढ्यात तिला सुगंधाआजी दिसल्या.

"सुगंधा आजी! कुठे निघालात?"
अनघाने आवाज दिला.
"इकडे एका खानावळीत काम करतय म्या. पोटा पाण्यास काय तरी कराव लागतंय ना."
आजी उदास हसून निघून गेली.

इकडे पार्वती आजी अंगणात काम करत असताना तिकडे देवांश तिच्याकडे पहात होता. लहान असल्यापासून आजीला तो असेच बघत आला होता. आताही अंगण झाडत होती.

"आजी,दे इकडे झाडू. मी झाडतो अंगण." देवांश तिच्याजवळ गेला.

"नको पोरा,इतका मोठा साहेब तू. तुझी आई चिडेल." आजी झाडू मागे घेत म्हणाली.

"आजी,मी आधी तुझा नातू आहे ग! अशीच कायम सगळ्यांचा विचार करत असतेस." देवांश तिच्या जवळ गेला आणि तिचे हात धरून खाली बसवले.

"आजी,तुला नाही वाटलं कधी की छान तयार व्हावं. आराम करावा." देवांश भावुक झाला होता.


"मी पण माणूस आहे. आजोबा गेल्यावर तीन मुलांना कष्टाने वाढवले. वाटायचं माझे रजाचे गज होतील आणि माझे पांग फेडतील."
आजी त्याच्या केसात हात फिरवून सांगत होती.

"तुझ्या आईच्या लग्नाच्या वेळी विहीन बाई म्हणाल्या,"तुझ्या आईला कसली साडी घेऊया?"
मला वाटलं लेक कौतुकाने काहीतरी सांगेल. तर तिने उत्तर दिले,"आईला कशाला नवी साडी. ती साध्याच वापरते. पोरा, तेव्हापासून मी मुलांकडे काहीच मागणार नाही असे ठरवून टाकले."

आजीचे डोळे नकळत भरून आले.


"आजी,मावशी,मामा आणि आई तिघांनी तुला गृहीत धरले. तू त्यांची आई आहेस मग तूच कर्तव्य करत रहायचे. पण तू एक माणूस आहेस. तुझ्याही काही छोट्या इच्छा असतील हे मात्र विसरून गेले सोयीस्कर. पण आजी आम्ही नातवंडं मात्र ही चूक करणार नाही."

देवांश आजीला उठवत म्हणाला.

तेवढ्यात एक साधारण चोवीस वर्षांची मुलगी आत आली.

"अग बाई! कोण ग तू? कोणाला भेटायचं आहे?"
आजीने तिला विचारले.

"आजी,मी मिथिला कारखानीस. भेटायचे तुम्हालाच आहे." मिथिला शांतपणे खाली बसली.

"घे,पाणी पी. काय मदत पाहिजे तुला?" आजीने तिला विचारले.

"आजी,माझी आजी मालती कारखानीस म्हणजे पूर्वीची वसुधा कामत." मिथिला म्हणाली.

"काय? वसू! वसुची नात तू?" आजी पटकन पुढे झाली.

"हो, अनघाने तुमची माहिती सांगितली तेव्हा आजी जवळच बसलेली. गावाचे नाव ऐकून तिने फोटो पाठवायला सांगितला आणि तुमचा फोटो पाहून नाचायला लागली."

मिथिला हसत सुटली. तेवढ्यात अनघा आणि नित्या परत आल्या.
आजीला न सांगता सगळे गुपचूप करायचे होते. वसुधा आजीने मात्र मिथिलाकडे निरोप दिला.

"पोरं जे काही करत आहेत त्यांना करू दे. निदान आता तरी स्वतः चा विचार कर."
त्यामुळे मुलांनी आजीला सगळेच खरे सांगायचे ठरवले.


मिथिलाने आजीला सगळी योजना सविस्तर समजावली.

"पोरी पण पैसे कुठून आणायचे? ह्या वयात कर्ज?" आजी काळजीत पडली.

"आजी,लहानपणी आमची प्रत्येक इच्छा तू जपलीस ना! मग आता आम्ही यात पैसे गुंतवू. आमच्या आई बाबांचे नाही तर आम्ही कमावलेले."

नित्याने आजीला समजावले. आजीचे डोळे आनंदाने भरून आले.


काय असेल ही योजना? आजीच्या मुलांना त्यांची चूक कळेल?
पाहूया अंतिम भागात.
वाचत रहा.
आजीची पैठणी.
©®प्रशांत कुंजीर.


🎭 Series Post

View all