आजीची पैठणी भाग 2

आजीला स्वाभिमानाने उभे करायला हवे हे अनघा तिच्या नातवंडांना समजावते.आजीची पैठणी भाग 2

मागील भागात आपण पाहिले की साधी पार्वती आजी अनघाला विसंगत वाटली. त्यावर तिला तसेच आवडते असे कारण देवांशने दिले. त्यानंतर अचानक गणपती निमित्त अनघाला आजीला भेटायची संधी मिळाली. आता पाहूया पुढे.


देवांश आणि नित्या आजीला घेऊन बाप्पा आणायला गेले. आजीने नैवेद्य तयार केला होता. जास्त काही काम नसल्याने अनघा निवांत आजीचे घर पाहू लागली. साधेसे पण स्वच्छ घर.

बैठकीच्या खोलीत असलेला आजोबा, आजी आणि मुलांचा एकत्रित फोटो. काही भांडीकुंडी आणि कोपऱ्यात असलेली एक छोटीशी ट्रंक. ते पाहून अनघा शांत झाली. आजीच्या दोन्ही मुली सुस्थितीत होत्या,मुलगा परदेशी स्थाईक आणि तरीही आजीची परिस्तिथी फार बरी दिसत नव्हती.

तेवढ्यात बाहेरून हाक आली.

"पारू खय गेलं? घरात हायस काय?"
अनघा पटकन बाहेर आली. एक ठेंगणी ,सुंदर आजी मस्त हसत उभी होती.
"मी अनघा, आजींची नातसून. या घरात."
अनघा त्यांना आत घेऊन आली.
" मुंबईची ना बाय? मग तुझ्याशी तशीच वार्ता करतंय. मी सुगंधा,ते दोन वाड्या सोडून माझ घर."
आजीने ओळख सांगितली.
"आजी,चहा ठेवते. ह्या तिघांना यायला वेळ आहे.तुम्ही पण थांबा. दर्शन घेऊन जा."
अनघा संवाद वाढवत होती.
"पारुला किती समजावल,सोडून दे. तुला चार घास कसेबसे मिळतात. त्यात आणखी वाढवते कशाला?"
आपण नको ते बोललो असे वाटून सुगंधा आजी थांबली.


"आजी,थांबलात का? उलट मलाच ते सारं जाणून घ्यायचं आहे. आजी साखरपुड्याला एका कोपऱ्यात बसून होत्या. तेव्हाच ठरवले होते."
अनघा चहाचा कप हातात देत बोलली.
"पोरी,भिडस्त असणं पारूच्या परिस्थितीला जबाबदार आहेच. पण आपली आई गरीब,अडाणी आहे. तिला तसेच आवडते असा सोयीस्कर गैरसमज तिच्या मुलांनी करून घेतला आणि मग नातवंडे आजीला तशीच पहात आली. आज सुद्धा पोळ्या लाट,मोदक बनवून दे. अशी कामे करून जगतेय ती."

सुगंधाच्या डोळ्यात नकळत पाणी आले.
"आजी,मी शब्द देते. तुमच्या मैत्रिणीचे पुढील दिवस नक्की आनंदाचे जातील. बाप्पाला साक्षी ठेवून सांगते."
अनघाच्या चेहऱ्यावर निर्धार स्पष्ट दिसत होता.


तेवढ्यात बाहेर कार थांबली. बाप्पाला घेऊन येताना आजी प्रचंड आनंदात होती. अनघाने पायावर पाणी घालून सगळ्यांना आत घेतले. बाप्पाची आरती झाली.

"अनघा,तुम्ही सगळे जेवायला बसा. मी गरम पोळ्या करून वाढते."
आजी पटकन पदर खोसत होती.

"नाही हा आजी. आज तुम्ही जेवा गरम जेवण."
अनघाने आजीला हाताला धरून थांबवले.

जेवण झाले आणि देवांश,अनघा आणि नित्या थोडे फिरायला बाहेर पडले.


हीच योग्य संधी असल्याचे पाहून अनघाने विषय काढला.

"नित्या, देवांश तुम्ही आजीकडे ह्या आधी कधी आला होता?"
अनघाने विचारलेल्या प्रश्नावर दोघेही जरा विचारात पडले.

"लहान असताना सगळी सुट्टी जायची इकडे. पण नंतर अभ्यास,करिअर ह्या सगळ्यात येणे थांबलेच."
दोघांनीही कबुली दिली.

"देवांश,आजीचे घर नीट पाहिलेस? भिंतींच्या भेगा सारवून बुजवायचा प्रयत्न अपुरा पडतोय. छत खिळखिळे झालेय. ते जाऊ देत पण आजी इथे कशी जगत असेल? तिला पैसे कुठून मिळत असतील?"

अनघा थांबली.

"अनघा,हा विचार मनात आलाच नाही ग. आजी कायम आमचे लाड पुरवत आली. आजही हापूसची किमान एक पेटी तिच्याकडून येतेच.

पण तीच आठ दहा झाडे तिच्या जगण्याचा आधार आहेत हे मनातही आल नाही."

नित्या अनघाचा हात धरून बोलत होती.

"तुला आठवते नित्या,मामाच्या सोहमची मुंज होती. आई,मावशी आणि मामी खरेदिला गेल्या. साड्या घेताना मी म्हणालो की आई आजीला पण घे एक नवीन साडी.

त्यावर मामी पटकन बोलली,"त्यांना नाही आवडत अशा साड्या. साध्या सुतीच घालतात त्या."
लहान असल्याने गप्प बसलो. "

देवांश भावुक झाला होता.

आता त्या दोघांना असे अनेक प्रसंग आठवत होते. आपल्या पालकांनी आजीला गृहीत धरल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

"अनघा,मी पैसे देतो. तू आणशील का तिला छान साडी." देवांश बोलला.

"देवांश,मी हे सहज करू शकेल. पण आजीला आता मायेने,स्वाभिमानाने उभे करायला हवे. तिचे कष्ट थांबायला हवेत आणि तिला तिची माणसेही भेटत राहायला हवी."

अनघा बोलत होती. तिच्या डोक्यात काहीतरी चालू असल्याचे स्पष्ट दिसत होते.


अनघा काय करेल? आजी अशी राहतेय याबद्दल आजी काही सांगेल का? आजीला तिची नातवंडे कसे उभे करतील?


वाचत रहा.
आजीची पैठणी.
©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all