आजीची नथ

Aaji Ani natichi nate veglech aste. tyachich ek premal gosht

सानू चे लग्न ठरले तसे आजीने आपला जुना पितळी डबा उघडला. त्यात जुन्या वळणाचे थोडे दागिने होते. त्या दागिन्यांपैकी एक पाणीदार, टपोऱ्या मोत्यांची नथ उचलत आजीने सानू च्या हातात ठेवली. तशी आई हसून म्हणाली, सानू हे आजीकडून तुझ्या लग्नासाठी भेट आहे बरं का! तसा सानू चा चेहरा उजळला आणि ती आपल्या डोळ्यातले अश्रू लपवीत आजीच्या कुशीत शिरली.
मी आलेच हा..ट्राय करून असे म्हणत सानू पटकन उठून आपल्या खोलीत पळाली. तशी आजी आईला म्हणाली आपली सानू किती लवकर मोठी झाली ना! असं वाटतं अजूनही लहान मुलीसारखी ती माझ्याकडे गोष्टी ऐकण्यासाठी गाल फुगवून बसेल. आई ओरडली, बाबाने धपाटा दिला म्हणून रडत येईल. बिस्किटाच्या पुड्यासाठी हट्ट करेल... आणि आई पाहिजे म्हणून रडत- रडत माझ्या मांडीवर झोपून ही जाईल. तुम्ही दोघे ही नोकरी करीत होता दिवसभर.. मग काय आम्हा दोघींना काहीही करण्याची मुभा होती घरात. तो काळही आम्ही दोघींनी मस्त एन्जॉय केला. शेजारी -पाजारी, नातेवाईक सगळे म्हणायचे...सानू म्हणजे अगदी आजीचे शेपूट आहे.
मुली किती लवकर मोठ्या होतात ग!
बघ ना..अगदी उद्या-परवा सासरी जाईल आपली सानू..आजी रडू लागलेली पाहताच आई ही रडू लागली..
इतका वेळ आई आणि आजी चे हे भावनिक संभाषण ऐकणाऱ्या सानू ने येऊन दोघींनाही गच्च मिठी मारली आणि म्हणाली मी सासरी जाताना तुम्ही दोघींनी अजिबात रडायचं नाही , नाहीतर मी सासरी जाणारच नाही मुळी...

आतापर्यंत घरात नाचणारी ,बागडणारी सानू लग्न सोहोळ्यात पोक्तपणे वावरत होती. वारंवार नाकातील नथ सावरत कौतुकाने सोहळा पाहणाऱ्या आजीकडे मध्येच हसून पाहणारी सानवी आता 'सासरी' जाणार या कल्पनेने आजीचे डोळे वारंवार भरून येत होते. आजी ही आपल्या नातीकडे कौतुकाने पाहात होती. नव्या नवरीचे तेज आनंदाने निरखीत होती. नात जावयाकडे लक्ष जाताच सानूच्या बाबाच्या कानात   हळूच म्हटली.. जावईही तितकाच छान आहे हो !ते काय म्हणतात ना आजच्या काळात... 'अगदी मेड फॉर हीच अदर... 'अशी जोडी आहे दोघांची.

लाडकी लेक सासरी जाताना साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. तशी आजीही रडू लागली. आपल्या जवळचा पितळी डबा सानू च्या हाती देऊन म्हणाली.. फक्त 'नथ' नाही तर हे सारे आजपासून तुझे आहे. ' दत्तक 'नात म्हणून मी सुरुवातीस तुझा राग राग केला. तुला स्वीकारायला मन तयार होईना..पण मला आठवतंय तू जेव्हा बोलायला लागलीस ना..तेव्हा एके दिवशी तू "आजी " ऐवजी आई म्हणून हाक मारलीस मला.. अगदी निरागसपणे..तेव्हा च 'परकेपणाच्या 'साऱ्या भिंती गळून पडल्या. तुला जवळ घेऊन मी खूप रडले.. नंतर मला तुझा खूप लळा लागला. अगदी सख्ख्या नातीपेक्षाही खुप प्रेम दिलेस मला.. आणि आजी होण्याचं भाग्य ही..
जा सुखाने संसार कर.. सासरी ही सगळ्यांवर असेच भरभरून प्रेम कर.
या साऱ्या गोष्टींपासून अनभिज्ञ असणारी सानवी आजी च्या कुशीत शिरून खूप रडली.. आज आजीच्या डोळ्यातले अश्रू तिला तिने दिलेल्या टपोऱ्या नथी पेक्षाही किती तरी खरे वाटले... त्या नथीसोबतच आजीचे अश्रू ही ती आठवणीने मनात जपून ठेवणार होती अगदी आयुष्यभर.