आजारापुरती सूनबाई

सासू सुनेची कडूगोड कथा


आजारापुरती सूनबाई..


" मीरा, ए मीरा.." वृंदाताई हाक मारत होत्या.

" सुमेध, प्लीज बघ ना, आई का बोलावत आहेत ते.." मीरा कुस पालटत म्हणाली.

" मीरा, यार ती तुला बोलावते आहे.. तूच जाना.." सुमेध पांघरूण डोक्यावर ओढत म्हणाला.

" सुमेध, काल रात्री दोनपर्यंत जागून मी प्रोजेक्ट पूर्ण केले आहे. आत्ताशी सात वाजले आहेत. कधीतरी तर दया दाखव रे माझ्यावर.." मीरा वैतागली होती. हे ऐकून मात्र सुमेध उठला. बाहेर वृंदाताईंचा हाकांचा सपाटा थांबला नव्हता. डोळे चोळतच सुमेध बाहेर आला.

" काय ग आई, काय झाले?" सोफ्यावर झोपलेल्या वृंदाताईंना त्याने विचारले. "आणि इथे का झोपली आहेस? बाबा कुठे आहेत?"

" ते झोपले आहेत आत. मला काल रात्रीपासून ताप आल्यासारखे वाटत आहे. यांना बोलवायचे म्हणजे मनस्ताप. मशीन काढून झोपले आहेत. उठवायचे म्हणजे त्यांच्या पुढे पुढे नाचा. म्हणून बाहेर येऊन झोपले. आता थोडा चहा हवा होता. म्हटले मीरा देईल करून.. म्हणून तिला हाका मारल्या. तर तूच उठलास."

" अग आई, ती ना रात्री दोनपर्यंत ऑफिसचे काम करत होती. आज रविवार आहे म्हणून थोडी झोपली आहे. तुला चहाच हवा आहे ना. थांब मी करून देतो."

" नको रे नको.. तुझ्या हातचा चहा म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षाच असते.. बघते.. जरा बरे वाटले की मीच करून घेते.." वृंदाताई कण्हत म्हणाल्या. सुमेधने येताना बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवला होता. त्यामुळे मायलेकांचा सगळा संवाद झोपलेल्या मीराच्या कानावर पडला. उठवत नसताना कसेतरी उठून मीरा स्वयंपाकघरात गेली. तिला बघून वृंदाताई म्हणाल्या ," चहात ना जरा गवतीचहा टाक ग.. तोंडाला अगदीच चव नाही. थोडे आलेही कुटून टाक. उठलीच आहेस तर थोडा मऊ उपमाही करशील का?" मीराने रागाने सुमेधकडे पाहिले. पण तो हुशार त्याने आधीच मान खाली घातली होती.
वृंदाताईंना हो म्हणून मीरा तशीच स्वयंपाकघरात गेली. झोप न झाल्यामुळे तिच्या डोळ्यांची आग होत होती. एका बाजूला रवा भाजायला ठेवून तिने दुसरीकडे पाण्याचे आधण ठेवले. हवा तसा चहा उपमा करेपर्यंत तिची उरलीसुरली झोपही उडाली. आता पटापट आवरून दुपारी झोप काढूया असा विचार करून तिने मुलांना उठवले. आईचा चेहरा बघून मुलांनीही कटकट न करता सगळे आवरून घेतले.
" मला जेवण जाईल असे वाटत नाही.. माझ्यासाठी पेजच कर.." वृंदाताई म्हणाल्या.
" माझ्यासाठी नेहमीचे जेवण कर हो.. नाहीतर तुला वाटायचे मी पण आजारी आहे.." सुधाकरराव हसत म्हणाले. मीराच्या चेहरा उतरला. रात्री उशीरा काम करताना दुसर्‍या दिवशी बाहेरून जेवण मागवायचा किंवा एकच पोटभरीचे काहीतरी करायचे असा तिचा बेत होता. पण आता तिला पूर्णच स्वयंपाक करायला लागणार होता. तिला खूप जीवावर आले होते.. तशीच ती स्वयंपाकाला लागली. अंथरूणावर पडलेल्या वृंदाताईंनी तोपर्यंत आपल्याला बरे नाही ही बातमी सगळ्यांना फोन करून कळवली होती. दमलेली मीरा शेवटी दुपारी उरलेला पसारा तसाच टाकून झोपायला गेली. दोन तास झोप झाल्यावर कुठे तिला बरे वाटले. बाहेर कोणाच्यातरी बोलण्याचा आवाज आला, बघितले तर तिची नणंद, नयना आईला बघायला आली होती.
" झाली का झोप?" नयनाने विचारले.
" हो.." मीराला थोडे लाजल्यासारखे झाले. " मी चहा ठेवते." ती आत जायला वळली.

" तू बस अग. सुमेधने ठेवला आहे चहा. तू तोपर्यंत जरा ही थालीपीठे खातेस का?" नयनाने विचारले.

" बघ हो. मगाशी बोलता बोलता बोलले तोंडाला चव नाही काही तर लगेच आणली हो बनवून. " वृंदाताई लेकीचे कौतुक करत म्हणाल्या. मीराने डब्यात पाहिले. मोजून चार लहान थालीपीठे होती.


सासूबाईंच्या आजारपणात मीरा त्यांची काळजी घेईल का? पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all