आज मी आहे पण उद्या.....

आज मी आहे म्हणून करतोय, समजा उद्या नसलो तर त्यांच्या अज्ञानाचा फायदा कोणी घ्यायला नको.

तो, घरातली जी बाहेरची काम असतात, त्या प्रत्येक कामाला तो नाही म्हणायचा.

बँकेतील असो वा, लाईट बील, किंवा इतर सरकारी काम. याच गोष्टी वरून तो घरात ओरडा पण खायचा.

“आई हे बघा न, मला जायला सांगत आहेत, त्या ऑफीसला मी कशी जाउ, त्यांच काम आहे न हे” त्याची बायको.

“त्याने कुठल काम करावे, पाहील तेव्हा मोबाईल घेउन बसलेला असतो” त्याची आई चिडून बोलली. “आम्हाला जमत नाही म्हणून सांगतोय तुला”

“मग शिकुन घ्या न” तो ही चिडून बोलला.

“मी नाही जाणार, तिथे काय करायच माहीत नाही” त्याची बायको पण चिडली.

“काय करायच म्हणजे, हा जो अर्ज लिहीला आहे, तो द्यायचा हाताने, आणि त्याच्या झेरॉक्स कॉपी वर त्यांचा शिक्का आणायचा, मला काम आहे, मला नाही जमणार जायला” तो निघुन गेला.

तहसीलच्या ऑफीसला जाउन त्याच्या बायकोच नाव चढविण्यासाठी चा अर्ज होता, त्याने तो भरून दिला होता, पण द्यायला जायला त्याच्या बायकोला सांगत होता.
बाहेरची काम तो जास्तीत जास्त त्या दोघींकडेच तो सोपवत होता. तो अस का वागतो तेच कळत नव्हत कोणाला.

एकदा तर त्याच्या बायकोने त्याला असही म्हटल की, “तुम्ही घाबरतात बाहेर बोलायला म्हणून आम्हाला बोलायला सांगता. बाबा असते न तर तुमच्यावर नसती अवलंबुन राहीली”

तरी तो काही न म्हणता बाहेर पडला. त्याच्या मित्राने ऐकल ते सर्व आणि त्याला विचारले, 

"काय प्रकार आहे हा, त्यांना तुझंयाशवाय कोण आहे?” त्यावर तो बोलला.

“बाबा जेव्हा गेले न, तेव्हा तर सगळ मी करतच होतो, पण बाबांनी आईला कधीच बाहेरची काम सांगीतली नव्हती. त्यामुळे तिला येत नव्हती. ति पुर्ण बाबांवर अवलंबून होती. आणि आता बाबा नाहीयेत तर हतबल झाली. आपल आयुष्य किती असेल माहीत नाही, आज मी आहे म्हणून करतोय, उद्या मला काही झाले तर तेव्हा कोण करेल, उद्या त्यांच्या अज्ञानाचा फायदा कोणी घेउन नये म्हणून मी जबरदस्तीने त्यांच्यावर सोपवतो. त्यांना माहीत नसत पण मी त्यांच्या मागेच उभा असतो” त्याने मित्राला डोळा मारला आणि दोघ त्यांच्या ऑफीसला निघुन गेले.