आज मैं ऊपर आसमान नीचे

A story about a housewife , when her day is full of her mistakes ....

आज बाप्पाचे विसर्जन करून सगळे घरी परतले. घरात एक पोकळी निर्माण झाल्याचे जाणवले.घरातील माणसानं सारखेच घरातील वातावरण सुद्धा शिथिल झाले.अनघा आणि तिच्या घरचे सगळेच गेले दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाच्या पाहुणचार करण्यात, त्याच्या भक्तीच्या ऊर्जेत न्हाऊन निघाले!

अनघाला गेल्या दहा दिवसात निवांत क्षण नव्हताच. ती आवडीने बाप्पासाठी मोदक, खीर, लाडू सगळ बनवी. सासूबाईंची मदत असे, तरी अनघाची चांगलीच गडबड असायची. घर, नवर्याचे घरूनच सुरू असलेले ऑफिस, मोठ्या लेकीची ऑनलाईन शाळा, धाकटा मुलगा नुकताच दुडूदुडू धावायला लागला होता. सासुसासरे त्यांचे पथ्यपाणी सांभाळणे, ती सगळ्यांचं नेटाने, मनापासून करत असे!

"उठा उठा, सकळिक, वाचे स्मरावा गजमुख...." अनघाच्या मोबाईल फोन वरचा गजर वाजला...बाप्पा तिचे लाडके दैवत, त्यामुळे सकाळी गजर म्हणून गोड लता बाईंचा आवाज कानावर पडणे, अन् गणरायाला स्मरून दिवसाची सुरुवात करत ती उठायची! आज जरा अंग अवघड़ले होते तिचे, पटकन हलवत नव्हते ! नाही म्हटलं तरी सणवार, पै पाहुणा म्हटलं की थोडा शिण होतोच घरच्या करत्या बाईला.

अनघाची आज तशी संथ सुरवत झाली होती. रोजच्या सारखा उत्साह आज हरपला होता.किचन मध्ये जाऊन कामाला सुरुवात केली. सासूबाईंनी तिला मस्त आल्याच्या चहा करून दिला, अन् दिवसाची सुरुवात छान झाली. एक एक जण उठून अवरू लागले. शाळा घरून, ऑफिस घरून, धाकटा मुलगा घर भर बागडत असे, त्याला सांभाळत सगळ्यांचं करण्यात अनघाची  तारेवरची कसरत सुरू असायची!

गॅसवर रवा भाजायला ठेवला, आज उपम्याचा बेत होता. तेवढ्यात सारा ने हाक दिली, "आई भूक लागली, दूध देना...."

फ्रीज मधून दूध काढून, सारा करता दूध कोमट केलं अन् तिला दिलं. पण तोवर झालं असं की गॅसवर भाजायला ठेवलेल्या रव्याला आला ना राग, त्याला सोडून गेली, अन् दुधाला घेतल म्हणून! चिडून चिडून रवा लाल, काळा झाला.... झालं कसला आलाय उपमा!

सासूबाईंनी सुचवलं, "असं कर, आता पाहण्याचा कार्यक्रम करू,पटकन होईल " ठेव तो रवा बाजूला. "हाहाहाहा...."दोघी एकसुरात हसल्या!
" हो आई चालेल"
पाहण्याचा कार्यक्रम म्हणजे चहा अन् कांदेपोहे ह्यांचा नाष्टा! झटपट आणि सगळ्यांच्या आवडीचा!

पोह्यांची तयारी केली अन् कढई गॅसवर ठेवून फोडणी करायची म्हणून अनघा, मसाल्याचा डबा काढायला गेली, तर आहे कुठे तो जागेवर??? आता सकाळच मसाल्याचा डब्बा कुठे जाणार? कमालच झाली आता....काय असं?? ती मनात पुटपुटत होती.....

"आई, तुम्ही मसाल्याचा डबा दुसरीकडे कुठे ठेवलात का? नेहेमीच्या जागेवर नाही तो?"

" गेला असेल मॉर्निंग वॉकला" बाहेरून सासरे बोलले.....

"अहो, काय मुलीची चेष्टा करता....." सासूबाई म्हणल्या

"नाष्टा येई पर्यंत चेष्टा करतो, काय झाल एवढं त्यात"  विनोदी अन् हसमुख स्वभावे सासरे नेहेमीच असे छोटे विनोद करत!

" मी नाही ग पहिला डब्बा, जागेवरच होता काल....बघ जरा नीट"

" छे....काय होतय आज!" एक गोष्ट घड होत नाही, आधी रवा करपला, आणि आता डबा हरवला....."

सगळे घरातले लागले कामाला....मसाला डब्बा शोध मोहीम! मोहितला अनघाच्या नवऱ्याला आता भूक अनावर होऊ लागली. अनघा बोलली " तू जरा ज्युस घेतोस का? फ्रीज मध्ये आहे बघ बाटली. तोवर मी पोहे करते, मिळेल डब्बा....काय असं जाऊन जाऊन कुठे जाणारे मसाल्याचा डबा!" आता डब्बा शोधून काढतेच बास...कुठे लपलाय!

मोहितने फ्रीज उघडल, ज्यूस घेण्यासाठी अन् पाहतो तर काय अहो आश्चर्य! मसाल्याचा डब्बा, शांतपणे फ्रीज मध्ये एका बाजूला बसला होता! "अनघा, हा घे तुझा मसाल्याचा डब्बा..... हळद, तिखट, जिरे, मोहरी.....ह्यांना सगळ्यांना त्या गरम मसाल्या बरोबर राहून राहून गरम होऊ लागले, गेले सगळे थंड व्हायला, फ्रीज मध्ये!" बाप बेटा सारखेच, विनोद बुद्धी रक्तातच त्यांच्या!

"अगं बाई, हा फ्रिज मध्ये कसा गेला....??"

"अनघा, अगं दूध ओट्यावर राहिलं,अन् मसाल्याचा डब्बा फ्रिज मधे गेला बघ" सासू बाइंच्या लक्षात आल, मगाशी साराला दूध दिलंस तेव्हा दूधाच भांड आत ठेवायचं, तर तू मसाल्याचा डब्बा ठेवलास....हाहाहा....अगं काय ग!"

"अय्या....काय ना असं मी गोंधळ घातला, हाहाहा..."

अखेर, पाहण्याचा कार्यक्रम उरकला,म्हणजे नाष्टा झाला,कांदेपोहे आणि आल्याचा चहा!

"आई....माझ्या कॉम्प्युटरला बघ ना...... काय झालं, अगं टीचर दिसत नाही मला" साराने आवाज दिला....ऑनलाईन शाळा, म्हणजे मुलांना टॅब. लॅपटॉप, कॉम्प्युटर सगळे गॅजेट्स हाताशी मिळाले. ह्या चिमुकलीला दुसरीचा वर्ग शिकण्यासाठी पाच तास त्या कॉम्प्युटर समोर बसावे लागे.

" काय ग, काय झालं? ओह्.... लॅपटॉप चे सॉफ्टवेअर उपडेट होतेय....तुझी शाळा सुरू आहे अन् त्यात हे मध्येच. बरं थांब मी माझ्या मोबाईल वर तुला देते ऑनलाईन क्लास तुझा चालू करून. दोन मिंट थांब"

घाई घाईत अनघा मोबाईल घेऊन आली आणि मोबाईल उनलॉक करण्यासाठी, स्क्रीन वर पॅटर्न काढू लागली..... झालं, हात थोडा ओला असल्याने, ते पॅटर्न चुकलं! बोट सरकन सरकल अन् चुकला ना पॅटर्न! मोबाईल सुद्धा अनघावर रुसला अन् लॉक होऊन बसला.....आता पुढचे काही मिनिटे जातील त्याचा राग शांत व्हायला, तोवर त्याला कोणी डीवचायचे नाही! तस स्पष्ट मेसेज दिसला ना मोबाईल स्क्रीन वार!" ट्राय आफ्टर सम टाईम"

छोटी सारा खुश, अचानक मिळालेल्या सुट्टीचे लगेच तिने स्वागत केले...धूम स्वारी खेळायला पळाली....
छोटा दीड वर्षांचा रियांशची बाहेरच्या खोलीत आजी आजोबां बरोबर खेळ मस्ती चालू होती, सारा देखील त्यांच्याशी खेळण्यात रमली.....

मुलं खेळात रमली किंवा झोपली असली, तर आईची कामे पटकन होतात., अनघाने दुपारचे जेवण बनवले आणि जेवणं वाढायची तयारी केली....
"चला, ताट घेते, वाढते जेवायला"

सगळे बसले जेवायला, अन् रियांश बाळाने आपला कार्यक्रम सुरू केला.आता त्याला दाढा येत असल्याने, जुलाबाचा त्रास होत होता! हे आईच जेवायला बसणे अन्  लहान बाळाने कार्यक्रम करून ठेवणे हे काय अजब गणित आहे कोणास ठाऊक! नेमकं कसं बर, वेळा जुळून येते ना.....! बिचारी अनघा, निवांत जेवायला बसणार....अन् उठून आधी बाळाला आवरून स्वच्छ करून आणले. सासूबाई किंवा मिहिर ही अनेकदा बाळाचं आवरून घायचे, त्यांची मदत होत असे तिला.

"चला....तास दोन तास आता किचन ला आराम" म्हणत अनघा बेडरूमकडे वळली. पिल्लू आजीच्या कुशीत झोपले होते. सारा, बहुलिशी खेळण्यात दंग होती. अनघाला थोडं वामकुक्षी घ्यावी वाटू लागले. बेड वर पडून डोळे मिटले खरे पण डोकं शांत बर बसू देईल. संध्याकाळी चहा बरोबर आज कांदा भजी करू की हीझटपट ढोकळा करावा? बरं तेवढ्यावर थांबले नाही. मग रात्री जेवायला काय करावे हा पुढचा प्रश्न डोक्यात पिंगा घालू लागला....

जरा आराम करावा तर कसलं, किचन, मेनू, खण पिणं, आलं गेलं हे सगळं बाईच्या डोक्यात घुमतच अस्त. त्या विचारांमध्ये अनघाला लागला जरा डूलका.

पाचच्या सुमारास जाग आली, चहाची तल्लभ आली. पाऊल थेट किचनकडे वळली. मस्त आलं किसून उकळत्या पाण्यात घातलं अन् दूध फ्रीज मधून काढायला फ्रीजकडे वळली .....दूध फ्रीज मध्ये नाहीच!
अरे देवा! सकाळ पासून दुधाच भांड फ्रीज बाहेर राहिलं! त्या मसाल्याच्या डब्ब्याने घातलेला गोंधळ, शिक्षा झाली दुधाला.....

घाबरत घाबरत दूध ठेवलं खरं तापवायला,पण व्हायचं तेच झालं.अनघा दुधाकडे पहात होती अन् दूध तिच्याकडे पाहून हसत होत.म्हणता म्हणता 'दूध का दूध पानी का पानी' झालं.आता अनघाच्या डोळ्यातून पाणी येणार तेवढ्यात सासरे किचन मध्ये येऊन म्हणले, "चहाला वेळ आहे का अजून?"
"बाबा, अहो....दूध फाटल!" अनघाचा पडलेला चेहेरा, तिचा हिरमुसलेला आवाज ऐकवला नाही सासर्यांना. ते लगेच तिला बरं वाटावं म्हणून म्हणाले "अरे वाह! अगं आज पनीर म्हणजे जेवायला, घरचं पनीर अन् तेही तुझ्या हातचे पनीर पराठे, वाह.. वाह....मस्त बेत होईल जेवणाचा!खूप दिवसांनी दूध फटल, बरच झालं की"

" मी आणतो दूध खाली मार्केट मध्ये जाऊन, आलोच"

अनघाला खूप अवघडल्या सारखं झालं. आज काय माझी त्रेधातिरपीट उडाली आहे! आज काय मी हा असा गोंधळ घालतीये, छे! कमाल झाली माझी! लक्षातच राहिलं नाही दूध बाहेर ओट्यावर राहिलं ते! आज सकाळपासूनच बिनसलं आहे.

दूध आणलं, चहा झाला. रात्रीच्या जेवणाला खमंग पनीर पराठे अन् पुदिना चटणी, सोबत काकडीची कोशिंबीर असा मस्त बेत झाला. सगळे जेवून खाऊन तृप्त शांत झाले! गप्पा मारत बसले तेव्हा दिवस भराचा अढावा घ्यावा तसे अनघाच्या तरंबळीचे किस्से सगळे मुखवास म्हणून चाघळू लागले.हस्ता हसता कधी अनघाच्या डोळ्यात पाणी आले तिला ही कळले नाही.....

"अनघा, खूप छान आज तू आम्हाला हसवलं, चल इसी बात पे कॉफी पिने चालते हैं" मिहिर अनघा कडे पहात म्हणाला.

"या जाऊन दोघे, फार उशीर करू नका रे...पिल्लं झोपली आहे त्यांची काळजी नका करू, आम्ही आहोत दोघे."सासूबाई म्हणाल्या!

दिवसभराचा थकवा, कंटाळा, विसरून अनघा चटकन खोलीत जाऊन मस्त तयार होऊन आली! सुंदर गुलाबी ड्रेस, हलकीशी लिपस्टिक, काजळ, छान तयार होऊन आली आणि जोडी निघाली कॉफी प्यायला.....

गाडीत बसली आणि निघाले दोघे जवळच्या कॉफी शॉपच्या दिशेने. अनघाचे सहज लक्ष तिच्या पायाकडे गेले अन् एकटीच खो खो हसत सुटली......

" अगं काय झाल? का हसतेस?" मिहीरने विचारलं

" अरे, मी घाई घाईत घरातल्या स्लीपर घालून आले आहे. चप्पल बद्दलली नाही धावपळीत निघाले.एवढ्या सुंदर ड्रेस अन् पायात घरातली स्लीपर घालून आले मी"

"हाहाहाहा.....अगं असुदे,छान दिसतेस"

" इश्य....काय हा गोंधळ" म्हणत अनघाला हसू आवरेना....

"आज मैं उपर....
आसमा नीचे....
आज मैं आगे....
जमाना हैं पीछे......"

अनघाच्या आजच्या अवस्थेला साजेस गाणं मिहिरने गाडीत लावलं अन् कॉफी पिऊन दोघे घरी परतले!

©तेजल मनिष ताम्हणे