आज जेवायला काय ? एक लघुकथा

A Story Of Every Day's Menu

आज जेवायला काय???




" ईईई... पडवळाची भाजी... मी नाही खाणार..." ईशान जोरात ओरडला...

" पहिली गोष्ट पानावर बसल्यावर अन्नाला नावे ठेवायची नाहीत.. आणि दुसरी गोष्ट आरडाओरडा नाही.. " त्याची आई स्मिता त्याला ओरडली..

" हे काय? आज आमटीत ओलं खोबरं नाही.." सासूबाईंनी विचारले..

" खवलेले खोबरे संपले होते आणि जरा उशीर झाला होता म्हणून नाही टाकले.."

" सूनबाई, यासोबत थोडे पोह्याचे तळलेले पापड असते तर मजा आली असती.. " सासरेबुवा..

" आणते बाबा.. तुम्हा दोघांना काही हव आहे? " स्मिताने मुलगी ईशा आणि नवर्‍याला विचारले.. तिचा टोन ऐकून काही बोलायची त्या दोघांची हिंमतच झाली नाही.." पापडासोबत त्या सांडगी मिरच्या तळशील का?" स्मिता किचनच्या दरवाजात असताना लेकीचा आवाज आला..

तळण घेऊन स्मिता आली तरी ईशानची भुणभुण सुरूच होती.. शेवटी असह्य होऊन स्मिता बोलली.. " आपणना एक काम करू, तुम्हाला जे खायचे असेल ना त्याची यादी आदल्या दिवशी माझ्याकडे देत जा.. म्हणजे तुम्हाला हवे तसे जेवण मिळेल.. ठिक ?"

हे ऐकून मुलांचे चेहरे उजळले, पण मोठ्यांच्या चेहर्‍यावर हे काय नवीन असे भाव होते..

"चला करूया सुरुवात? ईशान तू सांग बरे उद्या तुला काय हवे? पण एक अट आहे ते सगळ्यांनी खाल्ले पाहिजे.."

" उद्या पिझ्झा नाहीतर सँडविच.."

हि नावे ऐकून आजीआजोबा घाबरले..

" पिझ्झा नको..कडक असतो.." आजोबा कवळी चाचपत म्हणाले..

" सँडविच अजिबात नाही.. मला गॅसेस होतात.." आजी..

" ईशान, अजून काही?" स्मिताने विचारले..

" आई मी सांगू?" कन्येने विचारले..

" आजपासून प्रत्येकालाच सांगायचे आहे.. बोल तू पण.."

" तुझी भजी एक नंबर असतात. मस्त भजी आणि मिसळ कर.."

" अजिबात नाही.. मला रात्री तिखट खाल्ले तर जळजळते.." मुलांचे बाबा..

" तू ना सूनबाई, वरणातली फळेच कर.. मस्त पोटभरीची पण होतील.. आणि चमचमीत पण.." आजोबा..

" आजोबा, प्लीज ना थोडे वेगळे काहीतरी हवे ना? तेच तेच काय?"

" तुम्हाला अजून ना उद्याच्या डब्याची भाजी, दुपारचा नाश्ता अशा अनेक गोष्टी ठरवायच्या आहेत.. त्यामुळे जरा घाई करा.." स्मिता..

" उद्या सकाळी तू ना छान कारले कर.. " आजी..

" शी.. कडू.. नाही बटाट्याचा पराठा.." ईशा..

" मला पनीरचा चालेल.. " मुलांचे बाबा..

"तुम्ही सगळे मिळून ठरवा.. मला लिहून द्या.. उद्या तेच होईल.. आता मी आत जाऊन किचन आवरते.."

स्मिता आतमध्ये गेल्यानंतरही कोणाचेच एकमत होईना.. शेवटी सगळ्यांनी सपशेल शरणागती पत्करली..

" हे अन्नपूर्णा देवी आम्हाला कळले कि सगळ्यांनाच आवडेल , पचेल असा मेनू ठरवणे किती कठीण असते.. त्यामुळेच उद्यापासून तु जे काही करशील ते हसतमुखाने ग्रहण करण्याचे आम्ही एकमताने ठरवले आहे.. प्रार्थना मान्य करावी.." ईशान , ईशा आणि त्यांचे बाबा नाटकीपणाने म्हणाले.. आजीआजोबा दोघेही हसत होते. ते पाहून स्मिताने पण हात वर करून म्हटले,"तथास्तू."




कथा कशी वाटली ते नक्की सांगा... आणि तुमच्या घरी काही नवीन पद्धती असतील जेवणाविषयक तर नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई