आईपण दत्तक घेऊ

AAipan


हॅलो,करिष्मा उद्या जवळजवळ तुला मुलगी होणार आहे.. रवी

म्हणजे रे...करिष्मा

अग रजिस्टर केली नियमानुसार.... पालकत्व  सिंधू चे...रवी

कोण ती छोटी सावळी शी मुलगी जी मला आवडली होती..करिष्मा

हो तीच तीच...रवी

माझी लेक येईल आता घरी finally... ती


हो ग घर भर ती तुझ्या मागे पळत राहील आणि मी तिचे कौतूक सोहळे पाहिल ....रवी


अरे इतक्या लवकर ती आपल्याला आई बाबा म्हणून नाही स्वीकारणार, तिला वेळ लागेल आपली सवय व्हायला... करिष्मा


म्हणजे काय म्हणायचे आहे तुला..तो

तिला आपण पहिल्या भेटीत आवडलो त्यावरून तर मला वाटते की तिला कुठे तरी वाटते आपण तिला घेऊन जात आहे.. पण आपण तिचे खरे आई वडील नाही आहोत.... ती

तू सगळे छान हाताळशील तिला प्रेमाने संभाळशील यात शंकाच नाही...आणि ती ही आपलीच होऊन राहील अगदी जणू तिचेच आई बाबा असल्या सारखे...तो


तू समजून घेत नाहीस अरे, कोणी ही इतक्या पटकन कुठेच रुजत नाही...जशी ही आपली परीक्षा आहे तशी ही तिची ही परीक्षा आहे...म्हणजे बघ इतके सगळे लाड पुरवून ही तिला जोपर्यंत इथे ती उब मिळणार नाही ,आणि तिला खात्री होणार नाही की आपण तिला कोणतेच नुकसान करणार नाही ,किंवा तिच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत तिला शास्वती पटणार की आपले पालकत्व खऱ्या अर्थाने ह्या आई वडिलांनी स्वीकारले आहे...आणि मुलगी आहे म्हटल्यावर जरा वेळ घेईल च ती...मनात कुठे तरी हे ही वाटत असेल की ह्यांना मी आवडले नाही तर हे मला परत अनाथाश्रमात तर नाही ना पाठवणार... पुन्हा अनाथ होऊन जगण्यासाठी... कारण त्यांना दत्तक देतांना सांगितले जाते की आई वडिलांना त्रास होईल असे वागायचे नाही...शिस्तीत राहिले नाही तर तुम्हाला परत इथेच यावे लागेल...मग पुन्हा कोणी ही तुम्हाला दत्तक घेणार नाही...आणि आयुष्यभर इथेच रहावे लागेल... मग तुमचे शिक्षण होणार नाही... ती हळूहळू दत्तक मुल कश्या मानसिकतेत असेल...आणि तिच्या मनात काय चालू असेल... कसली भीती असेल... हे सांगत होती....

ओ म्हणजे जसे आपण आपले मन तयार केले आहे दत्तक मुलं घेण्यासाठी तसेच ,त्यांनी ही आपले कोवळे मन तयार केले असेलच दत्तक जाण्यासाठी..किती ही अवघड परीक्षा असते ग ...आपले ठीक आहे पण तिचा आणि अश्या कित्येक मुलांना विचार आला तर काळीज धस्स होते... किती बेभरोसे हे दत्तक म्हणून जाणे म्हणावे... जमले तर भविष्य नाहीतर उध्वस्त होण्यास पुन्हा तयार ...निरागस त्या जीवांना आई वडील मिळतांना ही किती कश्या कश्या गोष्टी ला सामोरे जावे लागत असेल ग...तो

ती.... हो रे, बघ ना आपण साधे मावशीच्या घरी गेलो तरी रात्रभर रडत असायचो, ओळखीची सगळी नाती असून ही अनोळखी वाटत...मग ह्यांचे काय होत असेल ना रे..


तो.... अग तू काळजीच नको करू आपण तिला अगदी फुलासारखे जपू...

ती... हो रे अगदी फुलासारखे जपू...