Login

आईनेही रिटायर व्हावं!

Mother should retire one day.
स्पर्धा - गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय - आई रिटायर्ड होतीय!

शीर्षक - आईनेही रिटायर व्हावं!

रिटायर या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो सेवानिवृत्त, म्हणजे माणूस जेव्हा नोकरी करतो तेव्हा एका ठराविक वयोमर्यादेनंतर त्याला सेवेतून निवृत्त केले जातं. सकारात्मक अर्थ म्हणजे आराम करा आणि वास्तविकता त्याचा नकारात्मक अर्थ असाही होतो की आता तुमची सेवा आम्हाला नको आहे.
पण हा रिटायर शब्द आईच्या बाबतीत कधीच लागू होत नाही.
आई रिटायर होते हे नाटक पाहिल्यानंतर मी खूप विचारात पडले होते खरंचच आई कधीच रिटायर होत नसते नाही का.

या संदर्भात दोन प्रसंग नमूद करावेसे वाटतात.

क्षमाच्या मुलाचं लग्न ठरलं आणि त्यातल्या काही मैत्रिणी तिला चिडवायला लागल्या "आता काय सुनबाई येणार बुवा, चला बसून खायचे दिवस आले तुझे. "

ती वरवरून जरी आनंदी झाली असली तरी कुठेही कुठेतरी मनामध्ये एक प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली होती, इतके दिवस मी सून म्हणून वागत होते आणि आता अचानक सासूच्या भूमिकेत जायचं म्हणजे काय करायचं? बसून खायचं?

"हे शक्यच नाही, मी माझ्या सासूला कधी तरी बसून खाऊ दिलंय का? नाही. लग्न झाल्यानंतर मी नोकरी करावी असा अट्टाहास सासूबाईंचाच जास्त होता. त्यामुळे घरात पडलेली कामं त्या करत राहिल्या."
क्षमांने विचार केला की मी सून म्हणून आल्यानंतर त्यांना कधीच आराम मिळाला नाही किंवा कधी आराम द्यायचं म्हटलं तरीही त्यांनी तो घेतला नाही.
शिवाय त्यांना काम करण्यापासून थांबवणं म्हणजे त्यांच्या आवडत्या कामापासून त्यांना परावृत्त करणे असं होतं.
जर मीच माझ्या सासूला बसून आरामात खाऊ घातलं नाही तर माझी सून आल्यावरती मी आराम करावा असं का वाटेल? मुळात घरातलं काम करणे हे काही सक्तीचे काम नाहीच आहे ते मी आनंदाने करते. हो कुठले बंधन नकोय असं वाटतं.
खरच कितीतरी मुलांना वाटतं की नोकरीतून आई रिटायर होऊ शकते, घरच्या कामातून नाही.
म्हणजे आईपणातून आई रिटायरमेंट होऊ शकत नाही पण मुलांच्या प्रतीचे नेहमीच कर्तव्य असतं.
नोकरीतून क्षमाने वालंटरी रिटायरमेंट घेतली आणि ठरवलं की सुने सोबत आयुष्य छान घालवायचं आणि आता सुनेला तो आनंद द्यायचा जो तिच्यासाठी नेहमी स्मरणात राहील.
आपल्या मुलाच्या आईची भूमिका आता संपेल तर आपण त्यातून सेवानिवृत्त व्हायचं. नवीन भूमिका घ्यायची सासू म्हणून आणि आवडीने वठवायची!

आता येणार्‍या सुनेशी जे बंध जुळतील त्यावर तिचं भविष्यातलं नातं देखील अवलंबून आहे.
नोकरीतून रिटायर व्हायचं आणि सासूची भूमिका वठवायची.

हा झाला सहज घडणारा एक प्रसंग!


आता दुसरा एक प्रसंग- सुविधाच्या आयुष्यातला!

सुविधा एक पन्नाशीची साधारण स्त्री!

एक दिवस तिची मुलगी रावी म्हणाली" आई, बाबा रिटायर होत आहेत, आता काय दोघेजण रिटायर आयुष्य मस्तपैकी एन्जॉय करा !"
सुविधा विचार करायला लागली की "म्हणजे नवऱ्याची रिटायरमेंट झाली की बायकोची रिटायरमेंट होते का ? तर नाही. काही बायकांना उलट त्या कामाची कटकट वाटायला लागते. हे ड्युटीला गेले तेच बरे होते किमान तितका वेळ मी माझ्या हिशोबाने माझे काम करू शकत होते पण आता त्यांना वेळ जात नाही म्हणून ते सारखे स्वयंपाक घरात येऊन लुडबुड करतात आणि त्याचा मला त्रास होतो . त्या बायकोला असं वाटलं की त्यांचं रिटायर होणं म्हणजे माझ्यासाठी डबल ड्युटी झालीय तर काय करणार! त्यांच्या आवडीचं बनवा , त्यांच्यासाठी आराम पण म्हणजे त्यांची सेवानिवृत्ती ही माझी डबल नोकरी झाली. दुपारचा आराम गेला. संध्याकाळी त्यांच्या सोबत जायचं . फिरायचं. त्यांच्यासोबत जाण्यात मला आनंदच आहे पण त्यांच्या आणि माझ्या आवडीनिवडी वेगळ्या असतील तर कसं चालणार ? माझं भजनी मंडळ किंवा दुसरा कुठला हलकेच जोपासलेला छंद . . मग तो त्यांना चालणार का?"

ती सामान्य पणे सगळ्यांचाच विचार करायला लागली.
कदाचित रावीच्या - तिच्या मुलीच्या ते लक्षात आलं आणि तिने टाईम टेबल आखून दिला. मग वडिलांना पण त्यांचं बागकाम व आईची मदत आणि आईला थोडंसं घरचं काम आणि विरंगुळा दोन्ही.

२ वर्षांत मुलीचं लग्न ठरलं त्यावेळी ती म्हणाली," आई एकदा माझं लग्न करून दिलं की मग तुझ्या मागची जिम्मेदारी कमी होईल आणि तुला रिटायर आयुष्य उपभोगता येईल."

" अग रावी आराम शरीराला पण पोटाला लागतच ना?"
"स्वयंपाकीण लावशील का ?"

" पण स्वयंपाक करणे हे काही मला एखाद्या ड्युटी सारखं वाटत नाही , ते तर मी आवडीने करतेच ."
"आवडतं ते कर पण पुन्हा असं बंधनात अडकू नको. नाही करावं वाटलं काही तर करू नकोस. नाही म्हणायला शीक."
"प्रयत्न करते." ती हसून म्हणाली होती.

रावीचे लग्न झालं , पाठवणूक झाली. पहिलं एक वर्ष तर सणावारात , दिवाळी सण , कोड कौतुकात गेलं .
दोन वर्षानंतर तिला दिवस राहीले. सुविधा हे सगळंच मनापासून एन्जॉय करत होती.
मुलीचे डोहाळे जेवण झाले . मग बाळंत पण ही खूप निगुतीने केलं. नातीला खेळवणे आणि तिचं सगळं करणे यात ती रमून गेली.
बारसं झालं व लेक परत निघाली त्यावेळी मात्र मुलगी परत निघाली तेव्हा ती म्हणाली ," आई आता तू रिटायरमेंट घे आणि आता हे म्हणू नकोस की आई कधी रिटायर होत नाही. आता मी तुला सांगते , एक आई म्हणून माझं संगोपन , शिक्षण , लग्न , मग मानपान बाळंतपण अगदी माझं एक मूल होईपर्यंत जिम्मेदारी तुझी होती. आता त्या जिम्मेदारी तून तू स्वतःला बाहेर काढ."

" अगं पण ?"

" आता तू रिटायर होऊ शकतेस. अग तू पत्नी म्हणून काम करशील, आजी म्हणून नातीत रमशील पण आई म्हणून तू माझी काळजी करणं आता सोडून दे . चांगलं शिकवलंस, मोठं केलस, संस्कार दिलेत, चांगलं स्थळ पाहून लग्न करून दिलंस. आता तू आजीच्या भूमिकेत शीर.
आणि माझ्या आईला रिटायर कर!"

"पण ते कसं ?"
"प्रथम तर तू माझी काळजी करणे सोड . आजी बनून नाती सोबतचा आनंद कसा उपभोगू शकतेस ते पहा, . . . आईला सेवानिवृत्त कर!"

" हो आवडेल की रावी अशी रिटायरमेंट घ्यायला. तू समर्थ आहेस स्वतःची काळजी घ्यायला किंवा निर्णय घ्यायला. हो मी कधी तुझ्याकडे येऊन राहील तर कधी तू माझ्याकडे येत जा. सुट्ट्यांमध्ये नातीला पाठवत जा. पटलं गं तुझं!"


म्हणजे केवळ स्वयंपाक करणे ,घर सांभाळणं संस्कार देणं किंवा मुलांची काळजी करणे हे जर "आई पण" असेल तर त्या आईपणातून कधीतरी प्रत्येक स्त्रीने मुक्त होऊन स्वतःसाठी जगायला शिकायलाच हवं. स्त्री नोकरीपेशातली असो की गृहिणी असो पण तिनेही एका वयानंतर संसारातून विरक्त होवून अगदी स्थितप्रज्ञ होवून एक व्यक्ति म्हणून जगायला हवं नाही का?

( तुम्हाला काय वाटतं? नक्की प्रतिक्रिया द्या!)

©®स्वाती बालूरकर, सखी
दिनांक - २५.१२ .२०२२