आईची पाखरं ... मायलेकी मिळून आकाशाला गवसणी घालू भाग 1

मायलेकी

भाग 1

" खबरदार , माझ्या मुलीला हात जरी लावलात तर......." .. सुचित्राबाई लक्ष्मीच्या सासूचा हाथ जो लक्ष्मिवर उठत होता तो पकडत थोड्या मोठ्याने बोलल्या.  तिथे जमलेले सगळे अवाक् होत सुचीत्राबाईकडे बघत होते.
 

" हे बघा , तुम्ही आमच्या घरच्या गोष्टींमध्ये बोलू नका. आमचं काय आहे ते आम्ही बघून घेऊ. " .... अल्काबाई ( लक्ष्मीची सासू )
 

" तुम्ही घरतल्या गोष्टी घरातच ठेवल्या असत्या तर,  आम्हाला बोलायची गरज नव्हती, आणि जर कुठलीही गोष्ट जर माझ्या मुलीशी संबंधित असेल तर मला बोलावेच लागेल. " .....सुचित्राबाई

" ती माझी बायको आहे , या घरची सून आहे , आम्हाला वाटेल तसे वागू आम्ही . तुम्ही पाहुणे आहात, पाहुण्यांसारखे वागा, जेवण खावन करून आपल्या घराला जावा. आमचे जे काही आहे ते आम्ही बघून घेऊ " ....राजेश

"तिचे  नाव बदलले म्हणून माझे - तिचे , आई - मुलीचे नाते  संपत नाही  . तुमच्या घरी दिली म्हणून तुम्ही तिच्यासोबत कसेही नाही वागू शकत. तिच्यावर हाथ उगारण्याचा हक्क मी कोणाला दिलेला नाही आहे. चार चौघात तिचा अपमान मला चालणार नाही. " ...... सुचित्राबाई

" तुम्ही जास्त बोलत आहात आता. " ....राजेश

" योग्य वेळी तुम्ही बोलला असता , तर आज ही वेळ आली नसती. " .... सूचीत्राबाईंच्या आवाजात करारीपणा होता.

" काही संस्कार नाही, काही नाही,  तुमच्या मुलीला येते तरी काय ?? साधं घराला वारस नाही देऊ शकत . वांझोटी कुठली . " ....अल्काबाई

" माझ्या मुलीचे संस्कारच आहेत जे इथे मान खाली घालून  चुपचाप तुमचे बोलणे ऐकत आहे. मोठ्यांचा मान आहे म्हणून तुम्हाला पालटून उत्तर दिले नाही . आज तीन वर्षापासून निमूटपणे तुमचा छळवाद सहन करत आली आहे.  तिला पुढे शिकायचे होते, तुम्ही लग्न जमायच्या वेळी म्हणाला सुद्धा होता तिला शिकता येईल लग्नानंतर ,  पण नंतर मात्र वेगळेच झाले. तरी आम्ही काही बोललो नाही. असेल एखाद्याला नाही आवडत , दुर्लक्ष केले आम्ही. तुम्हाला, राजेशरावांना आवडत नाही म्हणून तिने स्वतःला पूर्णपणे बदलून घेतले आहे . तुमच्या मर्जीप्रमाणे ती वागत आली आहे .तरीही तुमचे समाधान होत नाही. आणि आता हे नवीन ' वांझोटी ' प्रकरण सुरू केले तुम्ही. दोन वर्षापासून केल्यात ना तिच्या सगळ्या टेस्ट??? नॉर्मल आहे ना ती ??? नाही आहे तिच्यात कुठलाच कमीपणा , कुठलाच दोष ??  आता ज्यांच्या टेस्ट तुम्ही करायला पाहिजे ते न करता तुम्ही चारचौघात तिचे दोष गौरवत आहात??  बोलता आम्हालाही येते , पण आम्हाला घराचा मानपान सांभाळता येतो. पण आज आता तुम्ही तिच्यावर हात उगरण्याचे जे धाडस केले आहे,  ते मी खपऊन घेणार नाही. बायको, सून म्हणून तिने इथे मार खात जगावे, मला मान्य नाही . मला माझी मुलगी जड झाली नाही आहे . " .....सावित्रीबाई

" हो ना , इतकेच आहे तर घेऊन जा आपली मुलगी. कामाची ना धामाची, उगाच आमच्या डोक्यावर बसली आहे ." .... अल्काबाई
 

लग्न झाल्यावर सहा महिने ठीक गेले होते. पण नंतर सासरची लोकं काही ना काही कारणानवरून तिला त्रास देत होती. कधी माहेरून पैसे मागून आन, तर कधी कामावरून,  तर कधी काही कारण नसतांना तिचा छळ करत होते. लग्न आधी आईने शिकावल्यामुळे "  घरातली गोष्ट घरातच राहायला हवी'  म्हणून तीने कधीच बाहेर कुठे होणाऱ्या छळाची वाच्यता केली नाही. असतोच नात्यांमध्ये थोडेफार कमीजास्त, होईल काही दिवसांनी ठीक, विचार करतच ती सगळं सहन करत होती. पण मागच्या एक वर्षापासून नवऱ्याचे आणि सासूबाईंचे  त्रास देणे वाढले होते. ते आता  तिला शारीरिक  त्रास सुद्धा  द्यायला लागले होते.  आज तर त्यांनी सगळ्यांदेखत  तिच्यावर हात उचलला होता. जे लक्ष्मीची  आई  सावित्रीबाईंना अजिबात आवडले नव्हते. चारचौघात तिची केलेली अहवेलाना त्यांना सहन झाली नव्हती. आणि आज पहिल्यांदा त्या त्यांच्या लेकीच्या संसारात काही बोलल्या होत्या.

सावित्रीबाईंनी एकवार सगळ्यांवर नजर फिरवली . राजेश आणि त्यांच्या आईला वाईट वागल्याचा, बोलल्याचा काहीच पछतावा दिसत नव्हता.
 

" " लक्ष्मी येते आहे माझ्यासोबत ??? " .....सावित्रीबाई

लक्ष्मी भरल्या डोळ्यांनी सगळं बघत होती. तिला तर कळतच नव्हते, तिचे काय चुकले होते ते. तिने एकदा राजेशकडे बघितले. बाकी कोणाचे काही नाही पण ज्या व्यक्तीचा हात धरून या घरात आलो होतो, त्याच्या डोळ्यात पण तिला तिच्याबद्दल काहीच भावना दिसल्या नाही. आतापर्यंतची तीन वर्ष तिच्या डोळ्यासमोरून सरसर गेली. शेवटी तिने मनाचा निर्धार केला आणि निर्णय घेतलाच.

" हो आई , मी येते आहे तुझ्यासोबत " .... लक्ष्मी

लक्ष्मीच्या त्या एका वाक्याने सगळे तिच्याकडे बघू लागले . तिच्या सासरच्या मंडळींना ती असे काही निर्णय घेईल ,कोणालाच विश्वास बसत नव्हता, कारण आतापर्यंत त्यांना लक्ष्मी कशी आहे माहिती झाली होती .  तिला कितीही वाकवले तरी ती तोंडातून ब्र काढणार नाही , त्यांना माहिती होते.

" समाजात मुलींना सासरवाचून मान नसतो मिळत. स्वतःच्या  मुलीचे आयुष्य स्वतःच्या हाताने उध्वस्त करत आहात तुम्ही. "....अल्काबाई

" माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवत आहे मी. समाजाचे काय आहे, लोकं सगळीकडून बोलतात .  आज हात उचलला तुम्ही, आम्ही सगळे असूनही, चार भिंतीच्या आड काय करताय, काय कळणार?? तुमच्यावर आता माझा विश्वास नाही.   मला माझी मुलगी प्रिय आहे .  " ...सावित्रीबाई

" लक्ष्मी जा, तुझी बॅग आणि सगळं महत्वाचे सामान घेऊन ये " ...सावित्रीबाई

लक्ष्मी आपली बॅग घेऊन आली.

" लक्ष्मी आज जर माझ्या घरातून  बाहेर गेली तर परत घरात घेणार नाही " ....लक्ष्मीला जातांना बघून राजेश बोलला.

राजेशचे शब्द ऐकून लक्ष्मीचे पाय तिथेच खिळले.

" लक्ष्मी मी बाहेर थांबते आहे ." ....सावित्रीबाई बोलून बाहेर गेटजवळ येऊन उभ्या राहिल्या.

"  माझ्या ऐवजी ' आपलं घर ' म्हणाले असता तर कदाचित थांबलेही असते. तीन वर्षात हे घर माझं नाही होऊ शकले, आता थांबून तरी काय फायदा " ... म्हणतच लक्ष्मी कोणाकडेही न बघता घराबाहेर पडली.

*****

" हा काय मूर्खपणा आहे सावित्री ? आणि हा निर्णय घ्यायचा हक्क तुला कोणी दिला ??? मी आहो अजून घरातले निर्णय घ्यायला. समजवंसुमजव करून पोरीला तिच्या घरी पाठवा, मी बोलतो राजेशरावांसोबत, घेऊन जातील ते लक्ष्मीला . " .... किशोरराव (लक्ष्मीचे वडील)

" हा मूर्खपणा नाही, योग्य काय तेच केले आहे. आज हात उगारला, उद्या जीवाने मरतील, कोणाला दोष देणार मग. ती पोरगी काहीच बोलत नाही. निपुटपणे सगळं सहन करत आहे. एका शब्दाने मला आजपर्यंत त्रास आहे म्हणून सांगितले नाही. पण मी आई आहे मला कळत होतं तिचं त्रास. पण मुलीच्या जातीला सहन करावेच लागते, होईल हळूहळू ठीक म्हणून मी शांत होते. पण आता नाही . आणि हक्काचे म्हणाल तर तिची ' आई ' या हक्काने मी निर्णय घेतला आहे तिच्या संमतीने " ...सावित्रीबाई

लक्ष्मीचे भाऊ भावजयी ललित आणि भावना ,  काय सुरू आहे ते ऐकत होते. लक्ष्मीला बॅग घेऊन आलेले बघून भावनाच्या माथ्यावर आ पडल्या होत्या.

" आयुष्यभर इथे राहणार काय?? लोकं तोंडात शेण घालतील." ..... किशोरराव

" अहो आई, बाबा बरोबर बोलत आहेत. भांडणं तर प्रत्येक घरात होतात, म्हणून काय असे घर सोडून येतात काय?? तरुण पोरगी आहे , किती लक्ष द्यावे लागेल??? नाही म्हणजे काही कमीजास्त झाले तर?? लोकांना बोलायला तेवढाच चांस ." ..... सासर्यांचे बोलणे ऐकून भावनाने आपली री ओढली.

"  ' आई '  या हक्काने म्हणे, हे घर माझं आहे, इथे मी ठरवणार, कोण राहणार कोण नाही ते . तुझी  हिंमतच कशी झाली, मला न विचारता कुठलेही निर्णय घ्यायची  "

भावजय, वडिलांचे बोलणे ऐकून लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी साचायला जगले. " सासरचे घर पण आपले नाही, आणि माहेरचे घर पण आपले नाही. " तिला कळले होते.

" हीच चूक केली मी. खरं तर मला तेव्हाच बोलायला हवे होते, जेव्हा तुम्हाला मुलगी म्हणजे ओझं समजले होता. ती अभ्यासात किती हुशार होती, तिला शिकायचे होते. पण मुलीला शिकाऊन काय फायदा, मुलीला शिकवणे म्हणजे पैसे वाया घालवणे तुम्हाला वाटत होते. कुणीतरी स्थळ सुचवले , आणि ती नको म्हणत असताना सुद्धा लहान वयातच तिचे लग्न लाऊन दिले. वाटले चला बापाच्या घरी नाही मिळाला मानपान, आनंद, नवऱ्याच्या घरी तरी मिळेल ?? पण मुळात हा विचारच चुकीचा होता. पण तेव्हा केलेली चूक आता सुधारणार आहे. आता मी माझ्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. "......सावित्रीबाई

सावित्रीबाई आज तीस वर्षांच्या संसारामध्ये पहिल्यांदा त्यांच्या नवऱ्यासोबत अश्या पद्धतीने बोलत होत्या. आणि बोलणार पण का नाही, जेव्हा तिच्या पिल्लाला कोणी टोचत त्रास देत असेल, तर प्रत्येक आई बोलणारच. ललित,  भावना, लक्ष्मी आईचे हे रूप पहिल्यांदा बघत होते.

" मला हे या घरात चालणार नाही . " .... किशोरराव

" आई , कशाला वाद घालते आहेस. बाबा बरोबर बोलत आहेस. तसेच घरात व्याप कमी आहे काय?? त्यात ही लक्ष्मी अजून. किती महागाई वाढली आहे. काहीतरी व्यावहारिक निर्णय घ्यायचे ?, असे मनात आले आणि वागले, असे होते काय?? " ....ललित

" तुम्हाला जड झाली असेल माझी मुलगी, मला नाही झाली. तुम्हाला नसेल चालत, तर मी माझी सक्षम आहे तिची काळजी घ्यायला . लक्ष्मी आपण आता इथे राहणार नाही. चल जाऊया आपल्या हक्काची जागा मिळवू " .....सावित्रीबाई , आतमध्ये गेल्या आणि आपली बॅग घेऊन बाहेर आल्या.

" खूप शहाणपण सुचत आहे, सगळं आयते मिळाले आहे  , म्हणून हा माज आहे . बाहेरचा जगात पाय ठेवाल , स्वतःची लायकी समजून येईल. आज जर बाहेर गेली तर परत या घराची पायरी चढायची नाही.  " .....किशोराराव

" मी माझी सगळी कर्तव्य पूर्ण केले आहेत. एक सून म्हणून, एक बायको म्हणून, एक आई म्हणून ....सगळे. आता  फक्त एका मुलीची आई म्हणून जगते.  काळजी नका करू तुम्ही कोणीच , तुमच्याजवळ काहीच मागायला येणार नाही. काळजी घे ललित सगळ्यांची. चल लक्ष्मी  "....म्हणत सावित्रीबाई लक्ष्मीचा हात पकडत घराचा उंबरठा ओलांडला.

*****

" आई , अग तू माझ्यासाठी का सगळ्यांसोबत वैर घेतले?? माझी मी राहिली असती ग. झालीच असती काहीतरी सोय. ".... लक्ष्मी

" नाही ग पोरी, तू माझी लेक आहेस, तुला कशी एकटी सोडणार होती. काळजी का करते, बनऊ की दोघीजणी मिळून आपलं एक छोटेसे घरटे. " ....सावित्रीबाई

" आई , घरातून तर निघालोय, पण आता जायचे कुठे??" ...लक्ष्मी

" नलू आजी ,माझी आत्या  आहे ना , तिच्याकडे जाऊ . ती एकटीच आहे बघ. लहानपणी आई गेली, तिनेच आम्हाला आईची माया लावली. मुलंबाळ कोणी नाही तिला,एकटीच राहते.   मला तिला आपल्याकडे घेऊन यायचे होते, पण तुझ्या बाबांचा स्वभाव तर तुला माहिती आहेच , आपलं कुठे चालू देतात ते. पण आता कोणाचे दडपण नाही , तिच्याकडे जाऊ, ती हो म्हणाली तर राहू तिच्याकडे, नाहीतर बघू . " ....सावित्रीबाई

दोघीही तिथेच मुंबईमध्ये एका चाळीत राहत असलेल्या सावित्रीबाईंच्या  आत्या, नलूआजी कडे आल्या.

*****

" मी एकटीच आहे इथे, मला तर गरज होतीच ग पोरी . पण तुम्ही हे अश्या घर सोडून आल्या, बर नाही वाटत आहे . असे आपला संसार सोडून येतात काय??" ...नलूआजी

" संसार तर खूप केला आत्या, आता आपल्या मानापाणासाठी जगावं वाटते . पोरीची अवस्था खूप वाईट होती ग . वेळीच लक्ष नसते घातले तर गमावून बसले असते पोरीला. आजकाल घरी यायची, शून्यात बघत बसली असायची. खाणेपिणे नाही नीट, काही नाही. आजकाल काय ते म्हणतात '  डिप्रेशन ' त्याची शिकार झाली आहे बघ. किती हुशार माझी पोर, तुला तर माहितीच आहे, कामात म्हणू नको की कलाकुसर मध्ये, अभ्यासातही किती हुशार होती . आयुष्याचं पोतेरे झाले बघ तिच्या. पण अजूनही वेळ गेली नाही . नव्याने उभी करेल मी माझ्या मुलीला.  तुला आम्ही इथे राहिलेले चालेल काय?" ....सावित्रीबाई

" हो ग बाई, जे बोलते आहे ते बरोबरच बोलते आहे. राहा तुम्ही इथेच. माझ्या म्हातारीला पण गरज होतीच ग. आता तब्बेत साथ देत नाही ग. पैसे होते तेव्हा खूप नातेवाईक येत होते बघ. आता नाहीत तर कोणी विचारपूस सुद्धा करत नाही. इथेच रहा तुम्ही, माझी पण मदत होऊ दे लक्ष्मीला. " ...नलूआजी

आता त्या तिघी एकत्र त्या चाळीच्या दोन खोल्यांमध्ये राहत होत्या.  आजूबाजूला थोडी ओळखी झाली. लक्ष्मी सुद्धा तिथे लहान मुलांमध्ये रमायला लागली होती.सावित्रीबाईंनी काही घरी स्वयंपाकाचे काम सुरू केले. तेवढाच त्यांना आधार वाटत होता. लक्ष्मीने सुद्धा आईची हिम्मत बघून नव्याने सुरुवात करायचे ठरवले होते. तिने सुद्धा सकाळी तीन चार घरचे स्वयंपाकाचे काम सुरू केले होते. संध्याकाळी मुलांची शिकवणी घेत होती. सहा महिन्यात दोघींचा चांगला जम बसला. नलुआजीची सुद्धा खूप मदत होत होती. तिघीही एकमेकींची काळजी घेत राहत होत्या. बाकी घरून तसा काही सपोर्ट नव्हताच. ललित काय तो कधीतरी फोन करायचा. लक्ष्मीच्या नवऱ्याने एकदाही फोन केला नव्हता, की साधीशी विचारपूस केली नव्हती. ललितच्या एकदा बोलण्यावरून समजले होते की, लक्ष्मी आणि लक्ष्मीची आई जर त्यांची सगळ्यांची माफी मागेल तर ते लक्ष्मीला घरात घ्यायला तयार आहेत. पण त्यासाठी लक्ष्मी आणि सावित्रीबाईंनी स्पष्ट नकार दिला होता.

राहण्या खाण्यापिण्याची तर सोय झाली होती. पण आजूबाजूची लोकं मात्र काही काही बोलून मायलेकिंचे जगणे कठीण करत होते. लक्ष्मी तर तरुण, दिसायला सुंदर, वरून नवऱ्याने सोडलेली अशीच अफवा सगळीकडे पसरली होती, त्यात बरेच वासानाधिन पुरुष ( यांना पुरुष म्हणायचे काय , हा मोठा प्रश्न ?)  तिला रस्त्याने , बाहेर नको तसे स्पर्श करत, नको तसे कॉमेंट पास करत त्रास देत होते. त्यातूनही मायलेकिंने स्वतःला खंबीर बनवत, निडरपणे त्यांचा सामना करत होत्या.

*****

क्रमशः

****

नमस्कार फ्रेंड

माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या कथा प्रेम कथा आहेत. तर आता हा नवीन प्रयत्न करते आहे. ही पण love story च आहे बरं काय, पण एका आई आणि तिच्या मुलीची. आशा करते तुम्हाला आवडेल. 

मला माहिती तुम्ही नंदिनी...श्वास माझा या कथेच्या भागांची वाट बघत आहात. ती कथा लीहेपर्यंत ही कथा वाचून , कशी आहे  नक्की सांगा . 

Thank you ????

🎭 Series Post

View all