आईची मायेची किमया

विज्ञान कथा
*आईची माया*

"अहो! मी काय सांगते. आत्ताच शेजारच्या मीना काकु आल्या होत्या. आपल्या गावच्या मंदिरात एक सिध्द साधु बाबा आलेत अस म्हणत होत्या. चला ना जावू त्यांच्या दर्शनाला!" पाटलीन बाई शंकर पाटलांना आग्रह करत म्हणाल्या.

"ठीक आहे! तूझा आग्रह आहे तर चल!"


शंकर पाटलांच्या लग्नाला दहा वर्ष झाली. पण अजूनही त्यांना मुलाचे सुख मिळाले नाही. पाटलीन बाईनीं अनेक उपास तापास ,नवस, साधु, भगत धुंडाळले पण काहीही उपयोग झाला नाही.

शंकर पाटीलांचा साधु- बाबा वैगरे यांवर फारसा विश्वास नव्हता. पण पत्नीच्या आग्रहा खातर ते अश्या गोष्टींना नाही म्हणत नसत. कारण पत्नीचा मुलाबाळां वरुन नाहक होणारा अपमान त्यांनी पाहीला व स्वतःही अनुभवला होता.त्यामुळे ते बाबांच्या दर्शनाला सोबत गेले.

"नमस्कार महाराज!" पाटलीन बाईनीं बाबांना नमस्कार केला.

"ये पोरी !...तुझी समस्या तूझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. पण तु अजिबात काळजी करु नकोस. तुझी ही समस्या लवकरच दूर होऊन तूझ्या मांडीवर बाळ खेळेल".साधु बाबा म्हणाले.

समस्या न सांगता बाबांनी ती ओळखली ह्याचे शंकर पाटलांना आश्चर्य वाटले. मनातल्या मनात त्यांच्याही आशा पल्लवित झाल्या.


"पोरी हा प्रसाद घे! मासिकपाळी नंतर सलग पाच रात्री झोपतानां खायचा. बघ तूझ कल्याण होईल! " बाबांनी आशिर्वाद दिला.

"बाबा आपली दक्षिणा?" शंकर पाटलांनी विचारले.

"काही नको! मला माझी दक्षिणा मिळाली." दोघांच्याही डोक्यावर हात ठेवत बाबा म्हणाले.

शंकर पाटलांनी आज पर्यंत अनेक बाबांकडे पाटलीन बाईनां नेलं पण दक्षिणा न घेणारा बाबा त्यांनी पहिल्यांदाच भेटला होता. त्यामुळे पाटीलांना काहीस आश्चर्य वाटले.

बाबांनी सांगितल्या प्रमाणे पाटलीन बाईनीं पाळी नंतर सलग पाच रात्री तो प्रसाद खाल्ला. आणि काय चमत्कार पुढच्याच महिन्यात त्यांना दिवस गेले. त्यामुळे पाटलांच्या घरात आनंदी आनंद पसरला. ज्या साधू बाबानंमुळे हा चमत्कार घडला त्यांना पाटलांनी शोधण्याचा फार प्रयत्न केला परंतु ते बाबा कुठून आले ? आणि कुठे गेले??कोणाला काहीच माहिती नव्हते.

दिवस जात राहिले. बाईनां प्रसूतीकळा यायला लागल्या. पाटलांनी सुईण वैगरे सगळी व्यवस्था केली. बाई प्रसूत झाल्या.मुलगा झाला.. बाळ बाळंतीण अगदी सुखरुप. फक्त एकच अडचण होती ती म्हणजे जन्मानंतर बाळ अजिबात रडले नाही. सुईणने ही गोष्ट पाटलांच्या कानावर टाकली. त्यामुळे पाटील चिंताग्रस्त झाले.

"बाळात काही दोष तर नाही ना?" त्यांनी विचारले. "नाही बाळ एकदम व्यवस्थित आहे!" सुईण म्हणाली.


"काय असेल ते नंतर पाहु!" पाटलांनी विचार केला.

चार दिवसांनंतर पाटलांच्या घरी बरीचशी वर्दळ होती. कारण त्यांच्या मुलाची सटी व नामकरण करायचे होते.बाळ दिसायला गोंडस होत. चांगले खेळायचे देखील.फक्त रडत नव्हते इतकंच. आता ते रडत नाही हे चांगले की वाईट हे मात्र त्या पाटील दाम्पत्याला समजत नव्हते.

बाळाच्या सटीच्या कार्यक्रमात बाळाचे नाव मानव असे ठेवले गेले.

दिवस जात राहिले मानव आता चार वर्षांचा झाला. तरी त्याला बोलता येत नव्हते, बसताही येत नव्हते.

.तो इतर मुलांपेक्षा काहीसा वेगळा होता. त्याला चार वर्षात कधी कोणता आजार झाला नाही. साधी सर्दी देखील नाही. पाटील दांपत्याला मुलाचे सुख तर मिळाले. पण मुलाला बोलत नाही,बसता येत नाही याची खंत होती.

असच एक दिवस ते साधु बाबा अचानक पाटलांच्या घरी आले. त्यांना पाहुन दोघांनाही फार- फार आनंद झाला. त्यांनी नमस्कार केला.

" तुमच्या चेहऱ्यावर जी चिंता आहे. ती मला माहिती आहे. तुम्ही अजिबात काळजी करु नका सगळ सुरळीत होईल!"

बाबां मानव जवळ गेले.त्याच्या डोक्यावर हात फिरवला व आपल्या झोळीतुन एक ताईत काढुन मानवच्या गळ्यात बांधला....व काहीसे मंत्र म्हंटले तसा मानव चक्क बसुन बोलायला लागला त्यांने पाटलीन बाईनां आई अशी हाक मारली. तो चमत्कार पाहुन दोघांनीही बाबांच्या पायांशी लोटांगण घातले.

"एक गोष्ट लक्षात असु दया हे ताईत कायम त्याच्या गळ्यात राहु दया!" बाबा आशिर्वाद देत म्हणाले.


मानव आता पाच वर्षाचा झाला. त्यामुळे पाटलांनी त्याला गावातल्या शाळेत घातले. मानव फारच आज्ञाधारक मुलगा होता. घरी आई बाबा जे सांगतील तस वागायचा. शाळेतील अभ्यास रोजच्या रोज करायचा गुरुजी सांगतील ते करायचा. शाळेत कधी दंगा मस्ती करायचा नाही.थोडक्यात काय तर मानव हा एकदम गुडबॉय होता.


आज टीव्हीवर एक बातमी आली आणि सगळीकडे हाहाःकार उडाला जो तो शाळेकडे धाव घेत होता. व आप आपल्या मुलांना शाळेतुन घरी घेऊन येत होता. शंकर पाटीलही मानवला आणायला शाळेत धावले. शाळेत पाहतात तर काय? सगळीकडे धावाधाव रडारड चालु होती. त्या धावपळीत त्यांनी कस तरी मानवला शोधले व त्याला घरी आणले.मानवला सुखरूप पाहुन पाटलीन बाईंच्या जीवात जीव आला. घरात बातम्या चालुच होत्या.पाटील टीव्ही समोर बसले.समोर ब्रेकिंग न्यूज दाखवत होते. की,

देशांतील जवळ-जवळ पंचवीस शाळेतील हजारच्या आसपास मुलांचे विचित्र रित्या अपहरण झालेआहे.या अपहरणा मागे कोण आहेत हे अजुन समजले नव्हते. त्यामुळे बातम्यातील निवेदिका पालकांना आवाहन करत होती की, त्यांनी आपल्या मुलांना लवकरात लवकर शाळेतुन घरी घेऊन येणे.

"शाळेतुन मुलं अचानक गायब होतात. या घटनेमागे कोणचा हात आहे. हे अजुन समजले नाही. तरी पालकांनी व मुलांनी काळजी घ्यावी!" अस वारंवार आवाहन करण्यात येत होते.

" आत्ताच हाती आलेल्या बातमी नुसार शाळेतील मुलांचे अपहरण हे कोणी अज्ञात शक्ती करत आहे.असं काही प्रत्ययदर्शी लोकांच म्हणण आहे!"

ही बातमी पाहून पाटील विचारत पडले. "ही अज्ञातशक्ती म्हणजे नेमके काय असेल?"

"आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. अपहरण करणारे हे परग्रहवासी आहेत अशी शंका आहे!" या बातमी सोबत एक वीडियो देखिल प्रसारित केला. त्यात स्पष्ट दिसत होते की एक तबकडी (U.F.O.) मधुन काही लोकं उतरून मुलांना घेऊन जात होते. मात्र त्या सर्वानी मास्क लावले होते त्यामुळे ते नेमके कसे दिसतात यावर चिन्ह होते.... काही वेळाने आणखी ऐका शाळेतील वीडियो प्रसारित करण्यात आला. त्यातही अश्याच प्रकारचे लोकं होती. या बातमीने साऱ्या देशात एकच खळबळ उडाली. कारण आजपर्यंत परग्रहवासी (एलीयन) फक्त चित्रपट किंव्हा कथेत पाहिले होते. आज ते प्रत्यक्ष पहायला मिळत होते. शंकर पाटलांचा तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. पण ते वीडियो पाहिल्यानंतर विश्वास ठेवणे भाग होते. काही वेळानंतर सरकारने देखिल याची पुष्टी केली.

या बातमीमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले. खास करून लहान मुलांमध्ये. सरकारने परिस्थीती सामान्य होई पर्यंत सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केली.

ज्या पालकांची मुलं पळवली होती ते आक्रोश करत होते. व आपल्या मुलांना परत आणण्यासाठी सरकारला विनंती करत होते... सरकारी यंत्रणेलाही काहीच समजत नव्हते. कारण ही नेहमीची समस्या नव्हती. तरिही सरकार कडून आवश्यक ते प्रयत्न केले जातील अस आश्वासन देण्यात येत होते. देशातील वेगवेगळ्या शाळांतून सुमारे हजारच्या वर मुलांचे अपहरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे ही सगळी मुलं पाहिली ते चवथी या वयोगटातील होती.

मानव आपल्या आईला बिलगून हया सर्व बातम्या पाहत थरथर कापत होता. आज पर्यंत त्याला इतका घाबरलेला कधिच पाहील नव्हत. त्यामुळे पाटील दाम्पत्याची काळजी आणखी वाढली...


बातम्यात परत-परत ते वीडियो आणि आपल्या मुलांचे अपहरण झालेल्या पालकांचा आक्रोश दाखवला जात होता...

तीन दिवस लोटले तरी मुलांचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आले. टीव्हीवर मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या मुलाखती यायला लागल्या. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे दावे करण्यात आले....त्या मुलांना प्रयोगासाठी नेल असेल आणि ती मुलं आता कधीही परत येणार नाही असंही काही तज्ञांचे मत होते. तर त्यांच्यावर प्रयोग करून त्यांना परत सुखरूप पाठवले जाईल असंही काही तज्ञांचे मत होते.

पाच दिवस लोटले तरी मुलांचा काही मागमूसही लागला नाही. पालकांची चिंता वाढली तशी सरकारचीही...सरकारी आकड्याप्रमाणे संपूर्ण देशात एक हजार आठ मुलांचे अपहरण करण्यात आले होते.ते देखिल एकाच वेळी....


"या,या!महाराज फार मोक्याच्या वेळी आलात!"पाटील दांपत्याने साधु बाबांना पाया पडून नमस्कार केला.

"बघा ना मानव किती घाबरलाय! आता तुम्हीच काहीतरी उपाय करा! ती घटना घडल्या पासुन त्याला धक्काच बसलाय!" पाटलीन बाई काळजीत म्हणाल्या.

"काळजी करु नको पोरी! सगळं ठीक होईल. सध्या मुलांच्या अपहरणामुळे सगळीकडे वातावरण फार गंभीर आहे.तुझी आई या नात्याने मुलाची काळजी करणे साहजिक आहे. पण लवकरच हे संकट टळेल अशी मला आशा आहे!"

बाबांनी मानवला जवळ बोलावले तसा तो थरथरत त्यांच्या जवळ गेला. बाबांनी अतिशय प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. "घाबरू नकोस बेटा! सर्व काही ठीक होईल!" म्हणत त्यांनीच बांधलेला मानवच्या गळ्यातील ताईत काढला. व आपल्या झोळीतला दुसरा ताईत त्याच्या गळ्यात बांधला. व पुन्हा त्याच्या डोक्यावर हात फिरवला. त्याच बरोबर त्याची थरथर थांबली व मानव एकदम सामान्य झाला.
हे पाहुन पाटील दाम्पत्याने लोटांगण घालुन बाबांना नमस्कार केला.


अपहरणाच्या दहाव्या दिवशी रात्रीच्या बरोबर बारा वाजता त्या मुलांना त्या अज्ञात शक्तीने म्हणजे एलीयनने आपआपल्या शाळांत सुखरूप सोडले. त्यामुळे पालकांनी एकच जल्लोष केला. आणि सरकारनेही सुटकेचा श्वास टाकला.

सकाळी पुन्हा एक बातमी आली की, अपहरण झालेल्या एक हजार आठ मुलांपैकी एक हजार सातच मुलं परत आली आहेत. त्यातली एक मुलगी अजुन परत आलेली नाही.

बातमी पाहणाऱ्या सर्वानाच आश्चर्य वाटत होते की, सगळी मुलं परत सुखरुप सोडली मग एक मुलगी कशी राहीली? पाटील दांपत्याला देखिल या गोष्टीचे वाईट वाटले. कारण एकीकडे जल्लोष करणारे पालक तर दुसरीकडे त्या मुलीचे आक्रोश करणारे पालक दाखवले जात होते.

सरकारी आदेशामुळे शाळा बंद होत्या कारण अजुनही त्या ऐका मुलीचा पत्ता लागत नव्हता.

अपहरणाच्या पंधराव्या रात्री मात्र त्या मुलीलाही परत सुखरूप पाठवण्यात आले.त्यामुळे सगळ्याना हायसे वाटले.काही दिवसानंतर देशातील वातावरण काहीसे निवळले तरिही भीती मात्र कायम होती.

अपहरण झालेल्या सर्वच मुलांची वैद्यकीय तपासणी झाली. खास करून त्या शेवटी आलेल्या मुलीची. पण त्यांच्या तपासणीत त्यांच्यावर कोणतेच प्रयोग झाले नाही अस आढळले.सगळ्यांचे रिपोर्ट अगदी नॉर्मल होते. यात अजुन एक महत्वाची बाब म्हणजे आपले अपहरण झाले होते. हे कोणत्याच मुलाला आठवत नव्हते.

परिस्थीती सामान्य झाल्याने सरकारने शाळा चालु करण्याचे आदेश दिले. त्यामुळे इतर मुलांप्रमाणे मानवही शाळेत जाऊ लागला.

या अपहरण प्रकरणाचा अभ्यास व छडा लावण्यासाठी सरकारने देशातील आघाडीच्या शास्त्रज्ञांची एक समिती नेमली.समितीचा तपास चालु होता. पण अजूनही त्यांच्या हाती काही लागले नव्हते.


दिवस जात राहिले मानव आता दहावीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाला. म्हणून पाटीलांनी त्याला राजधानीच्या शहरात कॉलेजला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन दिला.


मानवला ज्या कॉलेजमधे प्रवेश मिळाला ते देशांच्या राजधानीतील नामांकित कॉलेज होते.कॉलेजचा परिसर फार मोठा होता. त्यात बाहेरून शिकायला येणाऱ्या मुलामुलींना राहायला वसतिगृहाची सोय होती. तसेच इतर अनेक सुविधा होत्या.

आज पर्यंत मानव कधी आई वडिलांपासुन दूर राहिला नव्हता. त्यामुळे पाटील दाम्पत्याने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला. खास करून पाटलीन बाईनीं कारण त्यांनी आज पर्यंत मानवला कुठे साध पाहुणा म्हणून एकटे ठेवले नव्हते.


शाळेपासून मानवची ओळख पुस्तकी किडा अशीच होती. ती कॉलेजलाही तशीच राहीली.अती अभ्यासामुळे त्याला जाड भिंगाचा चष्मा लागला होता. त्याच्या शांत आणि अभ्यासु स्वभावामुळे त्याचे फारसे मित्र नव्हते. त्यात त्याची साधी राहणी, गळ्यात साधु-बाबांनी घातलेला ताईत, आईने काळजी म्हणून दिलेल्या गंधाचा टिळा... त्यामुळे मानवला सगळी मुलं हसत त्याची खिल्ली उडवत पण याचा त्याला कधीही राग येत नसे.

या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली. ती म्हणजे वसतिगृहात त्याला सागर नावाचा चांगला मित्र आणि रूम पाटनर मिळाला.सागर कला शाखेचा विद्यार्थी थोडा उडाणटप्पू आणि हौशी स्वभावाचा पण मनाने एकदम चांगला होता.मानवची सागरशी चांगली गट्टी जमली.

विज्ञान आणि गणित हे मानवचे आवडते विषय. मोठमोठी आकडेमोड तो तोंडी करी. मानवची मोठा शास्त्रज्ञ व्हायची इच्छा होती.

त्या कॉलेज मध्ये नेत्रा नावाची मुलगी होती. ती नवीन असुन तीला जवळ जवळ सार कॉलेज ओळखत होत. कारण ती आजपर्यंत बऱ्याच वेळा टीव्ही आणि पेपरमध्ये झळकली होती. नेत्रा तीच मुलगी होती जी काही वर्षापूर्वी झलेल्या अपहरण प्रकरणात शेवटी आलेली मुलगी. म्हणून त्या वेळेस तिला अफाट प्रसिध्दी मिळाली होती... तेंव्हा पासुन ती स्वतःला काहीतरी वेगळी समजत होती. ती देखिल मानवच्या जोडीला विज्ञान शाखेत होती.

नेत्रा दिसायला अतिशय सुंदर कॉलेजची मुलं तिला जाता येता तिला निरखून पाहत. पण ती कोणालाही भाव देत नसे. एक मात्र होते. मानवशी तीची मैत्री होती. ती मानवला कॉलेज केन्टीनमध्ये वैगरे सोबत घेऊन जात असे.त्याच्याशी ती फार प्रमाणे वागे.ते पाहुन "लंगूर के मूँह में अंगुर।" अस मुलं म्हणत. येवढी ब्युटीक्वीन या बॅटरी टाईप लल्लुच्या मागे कशी फिरते याचे इतर मुलांना आश्चर्य वाटे.


"काय मानव शेट! आज काल तुमच्या विषयी कॉलेज मध्ये फार चर्चा चालु आहे! आमच्या आर्टस वाल्यांनाही माहिती आहे की तूझ आणि नेत्राच चक्कर आहे म्हणून!" सागर चिडवत म्हणाला.

"मित्रा तस काही नाही रे! ती फक्त माझी मैत्रीण आहे. बाकी काही नाही. आणि मला मोठ शास्त्रज्ञ व्हायचे आहे. त्यामुळे मला या बाबतीत काहीच इन्टेस्ट नाही!"

"अरे! हो पण त्याची चर्चा करायला आम्हांला इन्टेस्ट आहे ना!"... सागर हसून म्हणाला.


रात्री मानवाच्या बडबडीने सागरला जाग आली. रात्रीचे सव्वा दोन वाजले होते. बेडवर झोपेत मानव बडबडत होता... सागरने गंमत म्हणून त्याची बडबड ऐकण्याचा प्रयत्न केला. तर तो काय बडबडतोय काहीच समजत नव्हते. विशेष म्हणजे ती कोणती तरी वेगळीच भाषा होती. तस या आधीही सागरने दोनचार वेळा मानवच रात्री झोपेत बडबडने ऐकलं होत. पण त्याने या गोष्टी कडे फारसे लक्ष दिले नव्हते. पुन्हा एकदा ती बडबडत त्याने लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला. मानव कोणाशी तरी स्वप्नात बोलत होता. कारण तो एखाद वाक्य बोलण्या नंतर थांबत होता.म्हणजे त्या वेळेस समोरचा बोलत असेल... पण ती भाषा कोणती होती?आणि मानव कोणाशी बोलत असेल? हे मानवच स्वप्न असेल की आणखी काही?.. मानवला भूतबाधा तर झाली नसेल? असे अनेक प्रश्न सागरच्या मनात ती बडबड ऐकून येत होते...काही वेळाने मानवची बडबड बंद झाली. या बाबतीत मानवला सकाळी विचारू असा विचार करून सागर झोपला.

सकाळी उठल्या बरोबर सागरने विचारले. "मानव रात्री स्वप्नात काय बडबडत होतास?"

"रात्री!.. स्वप्नांत मी बडबडत होतो?.. नाही मला नाही आठवत!. हा.. पण रात्री स्मशानभूमीतील भूत मला दिसली. आणि ती काहीतरी विचारत होती. मी त्यांना काहीतरी सांगत होतो. ते काय विचारत होते, मी काय उत्तर देत होतो हे मात्र आठवत नाही!"


"अरे! ते विचारत होते तु उत्तर देत होतास तर आपल्या भाषेत द्यायचे ना?.. तु तर काहीतरी वेगळीच भाषा बोलत होतास?"

"अस! ते नाही आठवत मला!"

"अरे! मानव गेल्या आठवड्यापासुन रात्री तुझी बडबड चालु आहे.सुरुवातीला मी दुर्लक्ष केले. पण रात्री तु जवळजवळ अर्धा तास बडबड करत होतास!.. तुझी तब्बेत वैगरे ठीक आहे ना? की घरी निरोप देऊ?" सागर काळजी स्वरुप म्हणाला.


"धन्यवाद मित्रा! पण माझी तब्बेत चांगली आहे. तु काळजी करु नकोस."


त्या रात्री पासुन मानवची रात्रीची बडबड थांबली पण तो जेव्हा कधी एकटा असे तेंव्हा तो कोणाशी तरी बोलतोय अस सागरला वाटे. मात्र हा आपला भास असेल म्हणून तो दुर्लक्ष करी.

"एक्सक्यूजमी!.... तु सागर ना?"... नेत्राच्या या प्रश्नाने सागर चमकला. नेत्रा सारखी सुंदर मुलगी त्याला हाक मारते त्यापेक्षा त्याला नावाने ओळखते याचे त्याला आश्चर्य वाटले.

"हो! मी सागर!"

"मानवचा रूममेट बरोबर ना?"

"हो! होस्टेल मध्ये एकच रूम मधे राहतो आम्ही!"

"सागर मला तुझ्याशी थोड बोलायच होत.आपण केन्टीनमध्ये बसु?"

"हो चालेल ना!" सागर आनंदाने म्हणाला.

"ही माझी क्लास आणि रूममेट पूर्वी!" नेत्राने सोबत असलेल्या तीची मैत्रिणीची ओळख करून दिली. तस सागरने हात मिळवून तीला हॅलो म्हंटले.

"सागर, मानवचा स्वभाव कसा आहे?" केन्टीनमध्ये कॉफीचा पहिला घोट घेत नेत्राने विचारले.

"मानवचा स्वभाव म्हणजे एक नंबर! शांत, संस्कारी, ना कोणाच्या घेण्यात ना देण्यात. फक्त त्याची एक गोष्ट जरा विचित्र वाटते. तो रात्री स्वप्नात काहीतरी बडबड करतो!"

"बडबड म्हणजे?" पूर्वीने आश्चर्याने विचारले कारण या वाक्याचे नेत्रापेक्षा पूर्वीला जास्त आश्चर्य वाटले.

"नक्की काय बडबड करतो?" पुन्हा नेत्राने विचारले

"नक्की काही सांगता येणार नाही. पण काहीतरी वेगळीच भाषा बोलतो!"

"अरे! मग तु त्याचा खास मित्र ना? मग?.. सागर हा एक आजार आहे. तु एक काम कर आता तो रात्री बडबड करेल ना! तर त्याचे तूझ्या मोबाईल रेकॉर्डींग करून ठेव आणि ते रेकॉर्डिंग मला पाठव माझ्या ओळखीच्या एक डॉक्टर आहेत.त्यांना मी देते. म्हणजे त्या आजारावर उपाय सांगतील. सागर तूझा नंबर दे!" सागर आपला नंबर देत असताना पूर्वीनेही तिच्या मोबाईल मध्ये सागरचा नंबर सेव केला.

"आणि हो हे काम सगळ गुपचुपपणे होऊ दे नाहीतर उगाचच मानवचा गैरसमज होईल!"

नेत्राला मानव विषयी असलेली काळजी पाहुन सागरला फार बरे वाटले.

"नेत्रा तु काही काळजी करु नकोस मी सगळ व्यवस्थित करतो. उद्या सकाळी तुला रेकॉर्डिंग मिळेल!"

केन्टीनबाहेर निघाल्यावर दोघींनीही सागरशी हात मिळवून निरोप घेतला. जाता-जाता पूर्वीने दिलेली स्माईल त्याचा कलेजा चिरून गेली.

आज त्याच्याशी दोन सुंदर मुली बोलल्या त्यांनी त्याला स्वतः हून कॉफी पाजली.त्यामुळे सागर फारच खुश होता.


" हॅलो सागर, मी पूर्वी बोलतेय! मला तुला आत्ताच भेटायचय तु तुमच्या होस्टेलच्या गेट बाहेर असणाऱ्या कॉफी शॉप मधे ये मी पोहचते लगेच!" अतिशय दबक्या आवाजात पूर्वी बोलत होती.

"का ग काय झाल?"काळजी स्वरुप सागरने विचारले. खरतर पूर्वीने स्वतः त्याला फोन करणे ही त्याच्या साठी फार आनंदाची गोष्ट होती. पण ज्या आवाजात पूर्वी बोलत होती. आणि ज्या पद्दतीने घाईत त्याला भेटायला बोलवले तेही एकट्याला त्यामुळे सागरला टेन्शन आले. तो तसाच घाई घाईत होस्टेलच्या गेट बाहेरच्या कॉफीशॉपला पोहचला पूर्वी त्याच्या आधिच पोहचली होती.

"काय झाल पूर्वी?आणि तु इतकी टेन्शन का आहेस?"

"सागर तु रात्री मानवची बडबड रेकॉर्डिंग करून नेत्राला पाठवलीस?"

"नाही!.. अग मी ती रेकॉर्डींग तिला पाठवणारच होतो. इतक्यात तूझा फोन आला!" त्याच वाक्य ऐकून तिने छातीवर हात ठेवून मोठा सुस्कारा सोडला.

"नशीब!"

"काय झाल पूर्वी? मला काही समजेल का?"

"सांगते, सांगते! सगळ व्यवस्थित सांगते चल आत मध्ये कॉफी घेऊ!"

"सागर मला ना काहीतरी गडबड आहे अस वाटते!"

"गडबड, कसली गडबड पूर्वी ?"

"सागर, काल तु म्हणाला होतास की, मानव रात्री बडबड करतो. तो कोणाशी तरी बोलतो. पण ती भाषा समजत नाही बरोबर?"

"हो बरोबर!"

"मग मी आता काय सांगते ते लक्षपूर्वक एक. ही नेत्रा आहे ना ती देखिल रात्री अशीच बडबड करते. मी बऱ्याच वेळा ऐकले आहे. पण ती कोणती भाषा बोलते ते समजत नाही. पुरावा म्हणून तीची रात्रीची बडबड मी रेकॉर्ड केली आहे.चांगली अर्धा किंव्हा एक तास बोलते!"

"काय? बाप रे! हे तर काहीतरी वेगळच प्रकरण दिसतेय पूर्वी ?"

"हो सागर मलाही असाच संशय आहे.!"

"पूर्वी, कदाचित मानव आणि नेत्रा रात्री एकमेकांशी तर बोलत नसतील?" सागर विचार करत म्हणाला.

"हे कस शक्य आहे आहे सागर?"

"अग पण मानव रात्री स्वप्नात किंव्हा झोपेत कोणाशी तरी बोलतो हे मात्र नक्की!"

"ठीक आहे आपण एक काम करु आपल्या कडे दोघांचेही रेकॉर्डींग आहे. ते ऐकू म्हणजे आपल्याला समजेल!" पूर्वीने उपाय सांगितला.

"वा! छान कल्पना आहे. सुरवातीला नेत्राच रेकॉर्डींग लाव!"

पुर्वीने रेकॉर्डींग चालु केले. ते सागर अतिशय लक्षपूर्वक ऐकत होता. रेकॉर्डींग संपले तेंव्हा सागर लगेचच म्हणाला.

"अरे बाप रे! ही तर आणखीन वेगळीच भाषा आहे. मानवची भाषा वेगळी आहे!"

सागरने मानवच रेकॉर्डींग चालु केले तर दोघांनाही जाणवले हया दोन्ही भाषा वेगवेगळ्या आहेत.

"पूर्वी, तु सायन्स वाली आहेस तुच सांग काय करायचे?"

"अरे! यात सायन्स आणि आर्टसचा काय सबंध?"

"नाही सायन्स वाले जास्त हुशार असतात ना म्हणून म्हंटल!" सागर तिला काहीसा चिडवत म्हणाला.

"मस्करी सोड विषय गंभीर आहे. या प्रकरणाचा काही सोक्षमोक्ष लागत नाही तो पर्यंत हे रेकॉर्डींग नेत्राला पाठवू नकोस! आणि ती विचारेल तर काहीतरी सांगुन वेळ मारुन ने!"

."जैसी आपकी मर्जी मॅडमजी!" सागर पुन्हा एकदा गंमतीत म्हणाला.

"ठीक आहे पूर्वी पण आता काय करायचे? या प्रकरणाचा छडा कसा लावायचा?" सागरच्या या प्रश्नावर दोघेही विचार करु लागले.

"सागर, नेत्रा त्या एलीयन अपहरण प्रकरणातील शेवटची येणारी मुलगी होती. त्याचा तर काही सबंध नसेल?"

"असु शकते ...पण मानव? मानवच तर अपहरणही झालेले नाही. मग?"

"काहीही असो मानव आणि नेत्रा यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे.आता एक गोष्ट लक्षात ठेव आपण भेटलो आणि या विषयी काही चर्चा केली याचा पत्ता मानव आणि नेत्राला लगता कामा नये. कारण काही गौडबंगाल असेल तर ते सावध होतील समजले?" पूर्वीने सागरला दम भरला.

"आता सायन्स वाली तीपण सुंदर मुलगी सांगत असेल तर आर्टस वाल्यांना ऐकावेच लागेल!" सागरच्या या वाक्यावर दोघंही हसली.

"तुम्ही आर्टस वाले बोलण्यात मात्र फार हुशार असता!" यावर पुन्हा एकदा दोघंही खळखळून हसली.

"ते जाऊ दे! आता काय करायचे ते सांग?" पूर्वीने विचारले.

"पूर्वी,तु एक काम कर त्या एलीयन अपहरण प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली होती.तु सर्च मार.त्यातल्या एखाद्या शास्त्रज्ञाचा नंबर वैगरे मिळतोय का?"

"वा! आर्टस वाले वा! एक्सलंट आयडिया"


पूर्वी लगेचच कामाला लागली आणि तिने त्या समितीचे प्रमुख डॉ. सी. चंद्रन यांचा नंबर मिळवला.

"पूर्वी, आता आपण जी चर्चा केली तो आपला फक्त एक अंदाज आहे. यात काही वेगळ असु शकते किंव्हा नेत्राच्या मतानुसार हा एखादा आजार देखिल असु शकतो. त्यामुळे आपण सध्या दोघांवर पाळत ठेऊ. आणि फार वाटलंच तर आपण डॉ सी. चंद्रन यांच्याशी बोलू!"... यावर दोघांनी डन म्हणून हात मिळवले.

"सागर एक सांगु.. तु उडानटप्पू वाटतोस पण चांगला आणि हुशार आहेस!"

पूर्वीच्या या वाक्यावर सागरला काय करु आणि काय नाही असे झाले.

"चल मी निघते!.. नेत्रा शोधत असेल.ओके बाय! कॉलेजला भेटु! आणि हो आजची कॉफी हुशार आर्टसवाल्यासाठी माझ्या कडून "..पूर्वी हसत म्हणाली.

आज मानव व नेत्रा फार खुश होती कारण उद्या कॉलेजची ट्रीप देशातल्या सगळ्यात मोठ्या रीसर्च सेंटर मध्ये जाणार होती. ही सहल फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी होती.

आपल्याला त्या रिसर्च सेंटर मध्ये विज्ञानातील अनेक रहस्य, नवनवीन शोध पाहायला मिळतील म्हणून मानव अतिशय आतुर झाला होता. त्या सहलीचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

" काय मानव शेट! आज फार खुशीत दिसताय?" रात्री अभ्यास करतांना सागरने विचारले.

"हो! कारण आमची अभ्यास सहल आपल्या देशातल्या सर्वात मोठ्या रिसर्च सेंटरला जाणार आहे. तिथे नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील!"


" कॉलेजची अभ्यास सहल आहे म्हणून नाहीतर तिथे सर्वसामान्य माणसाला प्रवेश नाही. तिथे अनेक गुप्त फार्मूले व देशाच्या सुरक्षेविषयी अनेक गुपिते आहेत़!"

"म्हणजे? सागरने कुतुहलाने विचारले!"

" म्हणजे तिकडे अनेक फार्मूले आहेत़. उदा: माणसाचा क्लोन कसा करायचा वैगरे!"

"माणसाचा क्लोन म्हणजे?" सागर पुन्हा कुतुहलाने

"अरे! माणसाचा क्लोन म्हणजे त्याच्या सारखाच दिसणारा वागणारा थोडक्यात त्याचेच गुणधर्म असणारा दुसरा माणूस."

"काय? मानव अस खरच शक्य आहे?"

"अरे,हे तर काहीच नाही ऐका ठीकाणापासुन लुप्त होऊन क्षणात दुसरीकडे पोहचणे ई. अनेक फार्मूल्या वर तिथे रिसर्च चालु आहे!"

"काय नेत्राबाई आज फार टेन्शन मध्ये?"

"अग, उद्या आपली सहल जाणार आहे ना रिसर्च सेंटरला म्हणून!"

"आपली नाही! तुमच्या सारख्या हुशार विद्यार्थ्यांची! वर्गातील पन्नास पैकी वीसच मुलांची निवड झाली.मला तर वगळले सहलीतुन!" पूर्वी नारजीत म्हणाली.

"नेत्रा, सहल जाणार आहे.त्यात टेन्शन येण्या सारखे काय आहे? उलट आनंद व्हायला पाहीजे!"

"तेच ग! जरा एक्साईट झाले बाकी काही नाही!"

"ओके ठीक आहे गुड नाईट!"

"चला मानवशेट तुम्ही अभ्यास करत बसा मी झोपतो.गुड नाईट!"

"ओके, माझही झाल आता मी पण झोपतो.उद्या सकाळीच जायच आहे ना. गुड नाईट!"


सागरला काहीशी जाग आली .त्याने मानवकडे पाहिले खोलीतील लाईट बंद होती मात्र खिडकीतून बाहेरचा उजेड येत होता. मानव नेहमी प्रमाणे बडबडत होता. पण आज त्याचा आवाज नेहमी पेक्षा फार कमी होता. तरी सागरने ऐकण्याचा प्रयत्न केला. बाकी त्याला काही समजले नाही. पण एक दोन वेळा त्याने रिसर्च सेंटरचे नाव घेतले...

सागरने पूर्वीला मेसज केला. म्हणून पूर्वीने देखिल कानोसा घेण्याचा प्रयत्न केला तर नेत्राही त्या रीसर्च सेंटरच नाव घेत होती.

पूर्वीने सागरला उद्या सकाळी ठरलेल्या ठिकाणी भेटण्याचा मेसज केला.


"पूर्वी काय करायचे?" सकाळी कॉफीचा घोट घेत सागरने विचारले.

"आपण ही गोष्ट डॉ. सी चंद्रन यांना सांगु मग ते ठरवतील काय करायचे ते!"

"ठीक आहे! तु फोन लाव!"

तसा पूर्वीने फोन लावला.व सागर कडे दिला.

"हॅलो डॉ. सी चंद्रन?"

"हो, बोलतोय बोला!"

"सर, मी सागर बोलतोय. मला तुम्हांला काही महत्वाचे सांगायचे आहे. माझा एक मित्र आहे. मानव. मी त्याचा रुममेट तो रात्री विचित्र बडबड करतो. भाषा समजत नाही.काहीतरी कोड मध्ये बोलतो. आणि हो एक मैत्रीण आहे. नेत्रा नावाची ती देखिल रात्री झोपेत अशीच बडबड करते. आणि ती नेत्रा म्हणजे त्या एलीयन प्रकरणात शेवटी आलेली मुलगी होय. तुम्हांला तर आठवतच असेल. ते दोघं आमच्या कॉलेज मध्ये विज्ञान शाखेत आहेत. त्यांची अभ्यास सहल आज आपल्या देशातल्या सगळ्यात मोठ्या रीसर्च सेंटर मध्ये गेली आहे. रात्री झोपेत ते दोघंही वारंवार त्या सेंटरच नाव घेत होते!"


"ठीक आहे! तु मानवचा रुममेट आहेस म्हणून तु मानवला बडबड करतांना पाहिले व ऐकले आहेस. पण नेत्राही अशीच बडबड करते हे तुला कस माहीत?"

"सर! माझी एक मैत्रीण आहे. पूर्वी नावाची ती नेत्राची रुममेट आहे. तीनच मला हे संगितले. ती सध्या माझ्या सोबतच आहे.मी तिच्याच फोनवरून बोलतोय!"

"तुम्ही या विषयी दुसऱ्या कोणाला काही सांगितलय?"

"नाही सर अजुन तरी नाही!"

"गुड! तुम्ही आता कुठे आहात? तुमचे करंट लोकेशन पाठवा. आणि तिथेच थांबा.तुमच्या जीवाला धोका आहे. मी लगेच पोलीस पाठवतो!"

"आपल्या जीवाला धोका?" हे ऐकून सागरला या प्रकरणाचे गांभीर्य समजले. सागरने पूर्वीला फोन वरचे बोलणे संगितले. तशी पूर्वी घाबरली.

तिचा हात हातात धरून सागर म्हणाला. "पूर्वी घाबरू नकोस मी आहे ना!"

इतक्यात तिथे तीन पोलिसांच्या गाड्या आल्या.

"तुमच्या पैकी सागर आणि पूर्वी कोण आहेत? "

"साहेब आम्ही!" सागरने हात वर करून संगितले.

"काळजी करु नका!आम्हांला वरुन आदेश आलेत तुम्हांला सुरक्षा देण्याचे. चला! गाडीत बसा तुम्हांला सुरक्षित ठिकाणी न्यायचे आहे!"

"तुम्ही दोघं तर साधे दिसता. तुम्हांला सुरक्षा पुरवण्यासाठी थेट गृहमंत्रालयातुन आदेश? काय केलय काय तुम्ही?" गाडीत बसल्यावर इन्स्पेक्टर साहेबांनी विचारले.

"माफ करा साहेब पण या विषयी आम्हांला कोणालाही सांगायला बंदी आहे"

"ठीक आहे!"

इतक्यात इन्स्पेक्टर साहेबांचा फोन वाजला...

"हो साहेब! ....हो साहेब!!" म्हणत त्यांनी फोन ठेवला.

"तुमचे दोघांचे फोन बंद करा आणि माझ्या कडे जमा करा. तसे वरुन आदेश आहेत!"

"हे घ्या साहेब!" पूर्वी आणि सागरने त्यांचा फोन इन्स्पेक्टर साहेबांच्या हातात दिला.

इकडे मानव आणि नेत्राची बस रिसर्च सेंटरच्या बाहेर थांबली. गेटवर सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त होता.. सगळ्या विद्यार्थ्यांना खाली उतरवून त्यांची तपासणी केली तसेच बसचीही कसून तपासणी केली.त्यानंतर सगळ्याना प्रवेश देण्यात आला.

रिसर्च सेंटरमधे प्रवेश केल्या नंतर. त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रोफेसरांनी तेथे ठेवलेल्या प्रयोगांची माहिती दिली. व विद्यार्थ्यांना समोर ठेवलेल्या माहितीच्या आधारे स्वतः निरिक्षण करण्यास संगितले.

प्रयोगशाळा मोठी होती. त्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभिनव प्रयोग ठेवण्यात आले होते. प्रत्येक प्रयोगाच्या समोर एक माहितीपुस्तिका ठेवली होती. त्यामधे त्या प्रयोगाचा फर्मुला देखिल होता.

मानव निरिक्षण करत क्लोनच्या प्रयोगा जवळ आला. त्याने बराच वेळ त्या प्रयोगाचे निरिक्षण केले व त्याचा फार्मूला समजून घेतला.

बाकी ठेवलेले अनेक प्रयोग त्याने लक्षपूर्वक पाहिले व समजुन घेतले.

नेत्रा निरीक्षण करत करत क्लोनच्या प्रयोगा जवळ आली. तिने माहिती पुस्तिका उघडली व फार्मूला समजण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र तिला तो समजला नाही... बराच वेळ झाला. ती स्वतःशीच काहीतरी बडबडत होती... तिच्या चेहऱ्यावर बरीच नाराजी दिसत होती... तीची बडबड सुरुच होती...


इतक्यात प्रयोग शाळेतील लाल लाईट लागुन जोरजोरात अलार्म वाजु लागला.थोड्याच वेळात तेथे बंदूकधारी सैनिकासह डॉ. सी. चंद्रन पोहचले. सैनिकांना आदेश दिल्या बरोबर त्यांनी मानव व नेत्राला पकडुन बेड्या ठोकल्या.हे सगळ इतक्या घाईत घडले की, काय चाललंय हे प्रोफेसर व इतर विद्यार्थ्यांना काहीच समजत नव्हते...

"सो, मानव आणि नेत्रा तुमचा खेळ संपलाय. आता खर काय ते सांगा, तुम्ही कोणत्या ग्रहावरून आला आहात? आणि येथे येण्याचा तुमचा उद्देश काय?" रिसर्च सेंटरच्या गुप्त खोलीत बंदिस्त केलेल्या दोघांनाही डॉ. सी. चंद्रन यांनी विचारले.

डॉक्टरांनी प्रश्न विचारल्या नंतर बराच वेळ शांतता पसरली...

" मी आमच्या तौम्ब्ब्बा ग्रहावरुन आलोय. मला येथे आत्ताच्या मानवी स्वभावाचा अभ्यास करण्यासाठी पाठवले आहे. आमचा ग्रह तुमच्या पृथ्वी ग्रहाला हजारो वर्षापासून ओळखतो. काही हजार वर्षापूर्वी तर पृथ्वीशी आमचा व्यापार चालत असे. तुमच्या कडे हजारो वर्षापूर्वीची जी बांधकामे झालीत त्याचे दगड व तंत्रज्ञान आमच्या ग्रहावरचे आहे. याआधी आणि आत्ताही आम्ही कधी पृथ्वीचे नुकसान केलेले नाही.आणि करणारही नाही. कारण पृथ्वीला आम्ही मित्र ग्रह मानतो!" मानवाने सगळ विस्ताराने संगितले.

"आणि ही नेत्रा तुझी साथीदार .. रात्री तुम्ही दोघं एकमेकांशी कोड मधे बोलता बरोबर?"

"नाही! ही नेत्रा माझी साथीदार नाही.ती प्लेँतूओ नावाच्या ग्रहावरची आहे. आणि याच ग्रहाने आमचे पृथ्वीशी सबंध बिघडवले तेंव्हा पासुन आमचा पृथ्वीशी व्यापार आणि सबंध तुटला. तोच आता आम्ही पूर्वपदावर आणयला आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच मी इथे आलोय!"


"ही नेत्रा त्याच प्लेँतूओ ग्रहाची आहे. ज्या ग्रहाने मला शोधण्यासाठी एक हजार आठ मुलांचे अपहरण केले होते. मी त्यांच्या हाती लागलो नाही म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी नेत्राला टार्गेट केले.खर तर नेत्रा पृथ्वीवरचीच आहे. तिच्या शरीरात जी चीप बसवली आहे. त्या द्वारे तिला कंट्रोल केले जाते. तिच्या शरीरातील ती चीप काढली तर ती नॉर्मल नेत्रा होईल!"

"प्लेँतूओ ग्रहावासीनी तिला खास क्लोनिंग फार्मूला आणण्यासाठी तयार केले आहे. नेत्रा इथे आल्यानंतर रिसर्च सेंटरच्या आत मधील सुरक्षा सिस्टिम मुळे तिचा संपर्क होत नव्हता. म्हणून ती चिडली होती. कारण तो फार्मूला समोर असुन ती प्लेँतूओ वर पाठवू शकत नव्हती. तिने माझ्याशी मैत्री करण्याच कारण म्हणजे जेणेकरून मी तिच्या कामात अडचण करु नये!"

" नेत्राला अस वाटत होत की, मला तिच्या विषयी माहिती नाही. मात्र मला तिच्या विषयी संपूर्ण माहिती होती. आमची सिस्टम तिच्यावर पुर्ण नजर ठेवून होती!"

"तुमची सिस्टिम म्हणजे? अजुन किती एलीयन आहेत तूझ्या बरोबर या पृथ्वीवर?"

"कोणी नाही! मी एकटाच आहे. गरज पडली तर आमच्या ग्रहाचे बॉस येतात!"

"मानव तु हे सगळ सांगतोस ते खर आहे?"

"हो डॉक्टर एकदम खर आहे!" अस सांगत त्याने आपला मोबाईल काढला. आणि हजारो वर्षापूर्वी त्यांच्या ग्रहाशी पृथ्वीचा कसा व्यापार चलायचा याचे वीडियो त्याने दाखवले. डॉ सी. चंद्रन स्वतः शास्त्रज्ञ असल्याने त्यांना खात्री पटली.

" मग नेत्राच काय?" डॉक्टरांनी विचारले.

"आता आपण प्रयोग शाळेतील या खोलीत आहोत ते बर आहे. कारण इथल्या सिस्टम मुळे ते तिच्याशी संपर्क करु शकत नाही. तुम्ही इथेच डॉक्टरांना बोलवा व तिच्या शरीरातील चीप काढा. तिला सिस्टम बाहेर नेणे धोक्याचे आहे. कदाचित ते नेत्राचा जीवही घेऊ शकतात!"

"मानव आता तिचा संपर्क तुटला आहे. म्हणजे ती आता नॉर्मल आहे ना?" डॉक्टरांनी विचारले.

"नाही डॉक्टर आताही ती नॉर्मल नाही. जो पर्यंत नवीन आदेश येत नाही तो पर्यंत तीची चीप जुन्या आदेशावर चालू आहे. तीची चीप काढल्या शिवाय ती नॉर्मल होणार नाही!"

"ओके! ठीक आहे. मी डॉक्टरांना ऑपरेशन साठी इथेच बोलावतो"

तत्पूर्वी त्यांनी सैनिकांना दोघांच्याही बेड्या काढण्याचे आदेश दिले.

काही वेळातच डॉक्टर त्यांच्या टिमसह पोहचले. व त्यांनी नेत्राच्या शरीरातील चीप काढली.

"मानव मला एक समजत नाही. अपहरणानंतर जेव्हा नेत्राला तपासले तेंव्हा तिच्या शरीरात चीप का सापडली नाही?."

"डॉक्टर कारण ती तेंव्हा त्यांच्या संपर्कात होती. त्यांच्या सिस्टम मुळे सापडली नाही. इथे त्यांच्याशी संपर्क तुटल्यामुळे त्यांची सिस्टम काम करत नाही. त्यामुळे आता सहज सापडली!"

"डॉक्टर! नेत्राला शुद्धीवर यायला किती वेळ लागेल? डॉ. सी चंद्रन यांनी डॉक्टरांना विचारले!"

"बस! आता येईलच ती शुद्धीवर!"

"डॉक्टर! पेशंट शुद्धीवर आला!"
नर्सने निरोप सांगितला.

"नेत्रा कस वाटतंय?" मानवने विचारले .. ती काहीच बोलली नाही.सगळ्याना अनोळखी नजरेने पाहत होती.

" नेत्रा तुला काही आठवतय?" डॉ. सी. चंद्रन यांनी विचारले.

"थोड आठवतय.... माझ नाव माझे आई वडील माझी शाळा तो माझा चवथीचा वर्ग!"


म्हणजे तिला अपहरण केल्यापासुन आज पर्यंत काहीच आठवत नव्हते. थोडक्यात एखादा कोमात गेलेला पेशंट दहा पंधरा वर्षांनी कोमा बाहेर येतो. अशी अवस्था नेत्राची होती. बाकी काहीही असो ती आता प्लेँतूओ ग्रहवासी पासुन सुरक्षित होती.

"डॉक्टर मलाही आता परत आमच्या ग्रहावर जाव लागेल. त्यामुळे माझ्या पृथ्वीवरील आई वडिलांना इथे बोलवा. कारण तुम्ही त्यांना व्यवस्थित समजाऊन सांगु शकता. माझी आई फार- फार हळवी आहे. माझ्यावर खुपच प्रेम आहे तीच.आणि हो! मीडियाला याची कानोकान खबर होता कामा नये. नाहीतर परत सगळीकडे उगाचच भीतीचे वातावरण निर्माण होईल!"

" अगदी बरोबर!"

"मानव मी तूझ्या आई वडिलांना,नेत्राच्या आई वडिलांना आणि या प्रकरणाचे हिरो त्यांनाही बोलावतो!"

"या प्रकरणाचे हिरो?" मानवने आश्चर्याने विचारले.

"अरे! सागर आणि पूर्वी हेच तर खरे हीरो आहेत! या प्रकरणाची त्यांनी मला वेळीच बातमी दिली नसती तर क्लोनचा फार्मूला त्यांच्या हाती लागला असता. आणि नेत्राचा प्राणही वाचला नसता!"

काही वेळाने नेत्राचे आई वडील, मानवचे आई वडील तसेच सागर आणि पूर्वीला लोकांच्या- मीडियाच्या नकळत गुप्तपणे तेथे आणण्यात आले.

ते सगळे आल्यावर डॉ. सी. चंद्रन यांनी सविस्तरपणे सगळ्याना आता पर्यंतचा घटनाक्रम व मानवचे वास्तव काय आहे ते संगितले. काहीही असो आमच्या पोरीचे प्राण वाचले याचे समाधान नेत्राच्या आई वडिलांना झाले.

मानवचे वास्तव ऐकून मात्र सगळ्यांच आश्चर्याचा धक्का बसला. तरी पाटील दाम्पत्याच्या पाया खालची जमीन सरकली... मानव आपला मुलगा असुन तो आपला नाही. हे ऐकून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

"मानव तु खरच माझा मुलगा नाहीस?" पाटलीन बाई त्याच्या डोक्यावर हात ठेवून रडत रडत म्हणाल्या.

"आई मी तूझ्या भावना तूझ प्रेम तुझी माया सगळ समजु शकतो. पण दुर्दैवाने मी तूझा मुलगा असुन....मी तूझा मुलगा नाही ग!"

"आई! बाबा!! तुमच्यासारखे आई-वडील मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट.तुम्ही माझ्यावर फार प्रेम करता. पण आता मला जावंच लागेल. माझा नाईलाज आहे. कारण माझ जाण येण माझ्या हातात नाही! "

"सागर मित्रा तु मला फार सहकार्य केलेस. माझा एकदम सखा मित्र तु! तुम्हांला सर्वाना सोडुन जायला मला फार वाईट वाटते पण काय करु मला जावंच लागेल!" जाड भिंगाचा चष्मा काढून डोळे पुसत मानव म्हणाला.

त्या सगळ्यांना सोडुन मानव अतिशय दुःखी मनाने जायला निघाला...

इतक्यात ते साधु बाबा आले. ज्यांच्या आशीर्वादाने मानवचा जन्म झाला होता.त्यांना पाहुन पाटील दाम्पत्याच्या जीवात जीव आला. त्यांनी साधुच्या पायांशी लोटांगण घातले.

" महाराज फार मोक्याच्या वेळी आलात! मानव आमचा मुलगा असुन तो आमचा नाही. म्हणुन तो आमच्या पासुन दूर चालला आहे. तुम्ही तर सर्व जाणता की, तुमच्याच कृपा प्रसादाने मानवचा जन्म झाला. आहे. महाराज काहीही करा आणि या समस्येवर उपाय करा!" पाटलीन बाईनीं हात जोडुन विनंती केली.

"पोरी, तुझी समस्या पुर्णपणे जाणतो. पण या वेळेस या समस्येवर माझ्याकडे काहीही उपाय नाही!"

"आई मला जाऊ दे! आज हे साधु महाराज देखिल काही करु शकणार नाही. कारण त्यांचाही नाईलाज आहे. हे मला माहिती आहे!"

"म्हणजे?" शंकर पाटलांनी मानवला विचारले.

"बाबा! कारण हे कोणी साधु महाराज नसुन माझे बॉस आहेत ते. आणि त्यांच्याच आदेशानुसार मला जाव लागणार. डॉ. सी. चंद्रन यांच्या विनंती वरुन मीच त्यांना इथे बोलवलेय!"

"ते काहीही असु दे! महाराज मी तुमच्या समोर पदर पसरते आईच्या मायेचा मान राखून तुम्ही मानवला माझ्या जवळ राहु दया!"

शेवटी आईच्या मायेला मान देत महाराजांनी एक उपाय सांगितला.

"पोरी मी मानवला ऐका अटीवर सोडू शकतो. मानव हा तुमच्या साठी मानव असला तरी आमच्या साठी तो यंत्रमानव आहे. त्याची सिस्टम मी बंद केली तर तो यंत्रमानवचा तुमचा जुना मानव होईल जसा चार वर्षा पर्यंत लहानपणी होता तसा. म्हणजे लुळा…मुका.. त्याला उठता, बोलता येणार नाही चालेल तुम्हांला?


"चालेल महाराज! मला फक्त मानवला दया!"
शेवटी आईच काळीज ते. पाटलीन बाई लगेच तयार झाल्या.


तस साधु बाबांनी मानवच्या गळ्यातील ताईत काढले. ते हातात घेऊन त्याची कळ दाबली तसे ताईत उघडले.. त्यांत एक सर्किट होते. त्यांतील काळे बटण दाबताच मानव खाली कोसळला व बेशुद्ध झाला.

"महाराज काय झाल माझ्या पोराला?"

"पोरी काळजी करु नकोस ..मी तुझी परीक्षा घेतली.त्यात आई म्हणून तु पास झालीस. हे मी ताईत त्याच्या गळ्यात बांधतो. आता तो आमचा यंत्रमानव नाही तर तूझा मानव असेल. पण....!. "

" पण काय महाराज?" पाटलीन बाईनीं फार अधीरतेने विचारले.

यावर हसुन "तथास्तु!" बोलुन महाराज लुप्त झाले.

काही वेळाने मानव शुद्धीवर आला. त्याने पाहिली आई अशी हाक मारली. मानवने आई अशी हाक मारल्यावर पाटलीन बाईनां फार आनंद झाला की, मानव बोलु शकतो.

" आई! आई!! कुठे आहेस तु? मला काहीच दिसत नाही!" मानवच्या या वाक्याने पाटलीन बाईंचा काळजाचा ठोका चुकला. महाराजांच्या पण...चा अर्थ म्हणजे आता मानव मुका नाही तर आंधळा?

"मानव मी इथेच आहे! तूझ्या जवळच आहे!"

"आई मला काहीच दिसत नाही ग!"

मानवच्या तोंडावर हात फिरवत "तु काळजी करु नको देवाच्या मनात असेल तर सगळे ठीक होईल!" आपला हुंदका आवरून ती म्हणाली. शेवटी आई ती आईच असते. लुळपांगळ असले तरी तीचे मुल तिला आवडतेच.मुलाच्या व्यंगामुळे आईची माया कधी कमी होत नाही.

मानवच्या तोंडावर हात फिरवता तिला मानवचा जाड भिंगाचा चष्मा हाताला लागला. तिने विचार केला चष्मा पुसून त्याच्या डोळ्याला लावू कदचित काही फरक पडेल निधान अंधूक तरी दिसेल. या विचाराने तिने मानवचा चष्मा काढला.

"आई! आई!! मला सर्व व्यवस्थित दिसते." मानव उठूनआनंदाने उड्या मारत म्हणाला.

त्याच्या या वाक्याने पाटलीन बाईंच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले... शेवटी आईची माया जिंकली होती. त्या मायेनेच साधु -महाराजांनी मानवला सामान्य माणसांसारखे ठेवले.

चंद्रकांत घाटाळ

(संचालक - अनुजा अवकाश निरिक्षण केंद्र कासा )

7350131480