"नेहा, बाळा अगं सारखं जीन्स -टॉप नको घालत जाऊ. हल्ली तुला ते फारसं शोभत नाही आणि बाकी कपडे म्हणजे नुसती कपाटाची भर झाले आहेत. त्याचाही वापर नको का व्हायला?" श्रुती ताई आपल्या चोवीस वर्षांच्या मुलीला म्हणाल्या.
"काय गं आई? झालं का तुझं पुन्हा सुरू? हे नको करू, ते नको करू! तू आधी साडी नेसत होतीस. आता पंजाबी ड्रेस घालतेस ना? मग? मला हेच कपडे कंफर्टेबल वाटतात." नेहा चिडून आपल्या आईला म्हणाली.
"हो, गं बाई. मी काही तुला साडी नेसायला नाही सांगत आहे. अगं मुलीसारखं वाग कधीतरी! छान नटून बघ. नव्या पद्धतीचे किती सुंदर ड्रेस असतात, ते ट्राय करून बघ. आज ना उद्या तुझे लग्न होईल. उद्या तुझ्या सासुबाई म्हटल्या 'साडीच नेस..' तर तेव्हा त्यांचं ऐकावं लागेल ना तुला?" आई.
"आई, आजकाल सासुबाईंचं कोण ऐकतं? आपण आपल्या मनाला येईल तसं वागायचं." नेहा उध्द्टपणे आईला म्हणाली आणि दार आपटून बाहेर पडली देखील.
"बघितलं का आई, तुमची नात कशी वागते, बोलते ते? पानात वाढलेल्या पालेभाज्या खाताना नखरे, कोशिंबिरी, उसळी खाताना देखील नखरे..पण सॅलड मात्र पानात हवं. पोहे आणि उपमा तर दूरचीच गोष्ट आहे.
कपड्यांच्या बाबतीतही तेच. आता स्वयंपाक यायला हवा तिला. आपणच काही खात नाही मग नवऱ्याला काय करून वाढणार पोरगी? किती समजवायचं बाई या पोरीला?" श्रुती ताई आपल्या सासुबाईंना म्हणाल्या.
"जाऊदे गं. लग्न झालं की येईल समज तिला. उद्या सासू बोलली की गप्प ऐकेल सगळं नीट. तू उगीचच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस." श्रुती ताईंच्या सासुबाई म्हणाल्या.
"लग्न झाल्यावर येईल समज. पण सासुबाई शिस्तीच्या असतील तर. नाहीतर बोलणी खावी लागतील तिला ती वेगळीच. शिवाय आमचाही उद्धार व्हायचा." हे ऐकून श्रुती ताईंच्या सासुबाई गालातल्या गालात हसू लागल्या.
"आई, अशा हसता काय? हल्ली मला टेन्शन येतं. पोरीचं हे असं वागणं पाहून." श्रुती ताई काळजीने बोलत होत्या.
"अगं, हसत नाही मी काही. पण तू जे बोलते आहेस ना, ते लग्नाचे वय झालेल्या मुलीच्या आईचे ठरलेले डायलॉग का काय म्हणतात ते..ते आहेत. म्हणून हसू आले इतकेच.
एकदा का जबाबदारी अंगावर पडली की, निभावतं आणि आजकालच्या मुली शिकतात झटपट सारे काही. नको उगा काळजी करू." श्रुती ताईंच्या सासुबाई समजावणीच्या सुरात बोलल्या.
इतक्यात श्रुती ताईंच्या बहिणीचा फोन आला. त्यांनी नेहासाठी एक उत्तम स्थळ पाहिलं होतं.
पण आता ते नेहाला सांगायचं तरी कसं? 'मला इतक्यात लग्न करायचे नाही' असे म्हंटली म्हणजे सगळचं फिस्कटलं.
तरीही ताईंनी त्या स्थळाला फोन केला. मुलाची पत्रिका, फोटो आणि माहिती मागवून घेतली. मुलगा छान होताच. शिवाय योगायोगाने नेहाची पत्रिकाही त्याच्या पत्रिकेशी जुळत होती.
श्रुती ताईंच्या सासुबाईंनाही हे स्थळ योग्य वाटले.
रात्री जेवताना श्रुती ताईंनी सर्वांच्या समोर हा विषय काढला. बाबांनाही हे स्थळ योग्य वाटलं आणि नेहाने सुद्धा चक्क होकार दिला.
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. दोनच दिवसांत एकमेकांची पसंती आली आणि नेहा आणि राजचे लग्न दणक्यात पार पडले.
नेहा सासरी आली आणि सासुबाई म्हणाल्या, "नवी नवरी आहेस तू तर चार दिवस साडीच नेस. पाहुणे मंडळी आहेत घरात, ती गेल्यानंतर मग काय आपलेच राज्य आहे."
नेहा नवी नवरी. आपल्या सासुबाईंना उलट कसे बोलणार? नेहाने नुसती मान डोलावली. साडी नेसायची सवय नव्हती, त्यामुळे नेहाला फार अवघडल्यासारखे होत होते. धड चालता येईना, की धड काम करता येईना.
हे पाहून सासुबाई म्हणाल्या, "साडी राहू दे. तू पंजाबी ड्रेस घातलास तरी चालेल."
हे ऐकून नेहाला सुटका झाल्यासारखे वाटले. पण तिला या ड्रेसची सवय होती तरी कुठे? मात्र साडी पेक्षा फार सुटसुटीत, म्हणून नेहाने हे कसेबसे चालवून घेतले.
नव्याने नऊ दिवस सरले आणि नेहाचा संसार सुरू झाला. सासुबाई म्हणाल्या, "इतके दिवस मी घरचं सारं केलं. आता तू पाहायचेस. तुझ्या मनाप्रमाणे केलेस, तरी आमची हरकत नाही. मात्र आम्ही बाहेरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळतो. अगदी नड असेल तर ठीक आहे. शिवाय तुझ्या सासऱ्यांना घरचं जेवण लागतं."
हे ऐकून नेहाला आनंद झाला खरा. पण स्वयंपाक तरी धड कुठे येत होता तिला? आता मात्र नेहाला आईची आठवण येऊ लागली. आई कानी कपाळी ओरडत होती. 'सारखे वेस्टर्न कपडे घालू नको. स्वयंपाक शिकून घे. त्याआधी पानात वाढलेल्या सगळ्या भाज्या खायला शिक. बाहेरचे खाणे कमी कर.' हे आठवून नेहाला रडू येऊ लागले. तेव्हा "आईचे ऐकायला हवे होते." असे वाटू लागले तिला.
"आता सासुबाईंना काय सांगायचे? मला येत तर काहीच नाही." नेहाला काही समजेना.
शेवटी न राहवून ती सासुबाईंकडे गेली आणि म्हणाली, "आई खरंतर मला फारसा स्वयंपाक येत नाही. कामाची सवय नाही. तुम्ही शिकवाल का सारे? मी मनापासून सारं शिकून घेईन तुमच्याकडून. कुठे चुकले तर, हवं तर कान पकडा माझा. पण रागराग तेवढा करू नका."
नेहाचे हे बोलणे ऐकून सासुबाईंना हसू आले. त्या म्हणाल्या, "अगं हे मला माहित होते आधीच. तुझ्या आईने लग्नाआधीच सारे सांगितले होते. मग म्हटलं, थोडी गंमत करावी. पण तू काळजी करू नकोस. मी शिकवेन तुला सारं.
एक मात्र लक्षात ठेव, कधीतरी आईचे ऐकावे म्हणजे नडत नाही कुठे. आता मीही तुझ्या आई सारखीच आहे. माझं ऐकशील ना? "
सासुबाईंनी आपल्याला समजून घेतले हे पाहून नेहाला खूप बरे वाटले.
"हो.आई. मी तुमचे ऐकेन आता." नेहा आपले डोळे पुसत म्हणाली. तसे सासुबाईंनी तिला प्रेमाने जवळ घेतले आणि सासू- सुनेच्या नव्या नात्याची छान सुरुवात झाली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा