आईचे हळदीकुंकू

How Family Help Mother To Celebrate Her Haldikunku
आईचे हळदीकुंकू 



" आई वरच्या मजल्यावरच्या काकूंचा फोन आला होता,तुला हळदीकुंकवाला बोलावले आहे त्यांनी." समीरा घरी येताच वीरने तिला निरोप दिला..
" हो का, मग आताच जाऊन येते.परत परत कपडे बदलायला नको." म्हणून समीरा हातपाय धुवून , पर्स ठेवून हळदीकुंकवाला गेली..
" समीरा आली होती का रे, तिचा आवाज ऐकल्यासारखे वाटले," आजोबा त्यांच्या खोलीतून बाहेर आले.
" हो, आली, पण लगेच हळदीकुंकवाला गेली." वीरने सांगितले.
" काय रे यावेळेस आपल्याकडे हळदीकुंकवाची काही तयारी दिसत नाही.. ना वाण आणण्याची गडबड, ना लाडवांची. असे चुकल्या चुकल्या सारखे वाटते नाही का.."
" बहुतेक ना आईचा कामाचा ताण वाढला आहे.."
" कोणाचा ताण वाढला आहे?" सुदीपने आत येत विचारले..
" बाबा, आलात तुम्ही? आधी हातपाय धुवून या, मी चहा देतो.."
" काही नाही रे, मी आणि वीर विचार करत होतो यावर्षी समीरा हळदीकुंकू करायच्या गडबडीत दिसत नाही याचा.."
" हो मला पण तिचा मूड ऑफ वाटला.. पण काही अंदाज नाही त्याचा."
" बाबा मी काय म्हणतो, आपण आईला सरप्राईज दिले तर ?"
"कसले सरप्राईज?"
" हळदीकुंकवाचे.. आपण सगळी तयारी करू. तुम्ही एक काम करा उद्या दांडी मारा. माझे लेक्चर्स मी करीन मॅनेज आणि रविवारी बोलावू सगळ्यांना."
"आणि मी?"
" आजोबा, कम ऑन तुम्ही तर मेन मेंबर आमच्या टीमचे.."


सॉरी सॉरी, पात्रांची ओळख करुन द्यायची राहिली.. हे आपले आधीचेच कुटुंब आहे.. सुदीप, समीरा दोघेही बँकेत, वीर त्यांचा मुलगा कॉलेज मध्ये जाणारा आणि निवृत्त आजोबा.. असे चौघांचे सुखी मध्यमवर्गीय कुटुंब... आता पाहूया समीरा हळदीकुंकवासाठी उत्साही का नाही ते..

हळदीकुंकवाला गेल्यावर समीराला जाणवले कि सोसायटीमधील सगळ्यांनाच आमंत्रण होते फक्त तिच्या शेजारच्या काकूंना सोडून.. शेजारचे काका नुकतेच वारले होते. हाच विचार समीराला खुपत होता.. तिच्या सासूबाई नसल्यामुळे गेली अनेक वर्षे काकू तिला सगळ्याच गोष्टींमध्ये मदत करायच्या. हळदीकुंकवाची तयारी करू लागायच्या. पण आता तर त्या फार दुःखी होत्या. त्यांना त्या परिस्थितीत बोलावणे आणि न बोलावणे दोन्ही समीरासाठी अवघड होते. म्हणूनच ती यावर्षी हळदीकुंकवासाठी तेवढी उत्सुक नव्हती..
       
    " समीरा , आज मी बँकेत जाणार नाहीये.."
   " का रे? बरा तर आहेस.."
" हो मी बरा आहे..बाबांची काही कामे आहेत. म्हणून सुट्टी घेतली आहे."
" अच्छा , मला सांगितले असतेस तर मी हि घरी राहिले असते."
" मला तरी काय माहित होते.." सुदीप मनातल्या मनात पुटपुटला.
" काही म्हणालास का?"
" नाही, तुला सोडू का? असा विचार करत होतो."
" नको मी जाईन एकटी. तू ज्या कामासाठी सुट्टी घेतली आहेस ते काम कर.."
" ओके मॅडम."
   समीरा बँकेत गेल्याबरोबर लगेच तिघांची सभा भरली..
" सुरूवात लाडवांपासून करू..मला जमतात मस्त, तुम्ही फक्त सामान आणून द्या मला."आजोबा..
" आजोबा, प्लीज नको ना..मागच्या वर्षी आईला मदत करायला गेलात आणि भाजलेल्या हाताला मला मलम लावायला सांगितलेत. वर हे कर ते कर. आणि तो जो पसारा होईल किचनमध्ये त्याचे काय?" वीरला विचार करूनच धडकी भरली..
" आपण ना लाडू, नाश्ता सगळे बाहेरूनच मागवू. त्याचे टेन्शन नका घेऊ.. मेनू ठरवा." सुदीप.
 महाचर्चेनंतर ढोकळा,समोसा आणि जिलेबी आणि मसाला दूध असा मेनू ठरला..
" बाबा त्या गिफ्टचे काय?"
" गिफ्ट कसले?"
" ते नाही का, बायका एकमेकांना देतात.."
"वाण म्हणतात रे त्याला.."
"तेच ते,भावना समजून घ्या.."
" वीर , तू आणि मी पटकन बाजारात जाऊ , तिथे लाडू, हलवा, आणि वाण आणू आणि बाबांच्या खोलीत लपवून ठेवू."
" हे बरे आहे, नाश्ता , लाडू बाहेरून आणणार, खरेदीला तुम्हीच जाणार आणि मी काय करायचे?" आजोबा चिडले होते.
" बाबा , तुम्ही ना सगळ्यात महत्वाचे काम करा. तुम्ही सोसायटीत सगळ्यांशी छान बोलता, आमंत्रणाचे काम तुम्ही करा. फक्त समीराला काही सांगायचे नाही एवढे आवर्जून सांगा." सुदीपने विनवले..
" ठिक आहे.".. आता तुम्ही एवढे सांगताय तर नक्कीच करीन.." आजोबा आढेवेढे घेत म्हणाले..


        असे करता करता समीराला कळू न देता आजोबा, सुदीप आणि वीर यांनी समारंभाची व्यवस्थित तयारी केली, समीराच्या मैत्रिणींना ,आजोबांच्या नानानानी पार्कातल्या मैत्रिणींना सगळ्यांनाच आमंत्रण होते. समारंभाच्या दिवशी समीरा झोपली असताना, तिघांनी मिळून घर आवरले..स्वतःचे आवरले, फुले, अत्तरदाणी, हलवा, लाडू व्यवस्थित मांडून ठेवले.. चार वाजता वीर समीराची काळी साडी घेऊन तिला उठवायला गेला," आई, जरा तयार हो ना. आपण जरा बाहेर जाऊ या.."
" असा अचानक कसे ठरवले?"
" नको ना विचारूस..."
" ओके, चल आधी चहा ठेवू दे.."
" मी करतो.. तू आवरून फक्त बाहेर ये."
        समीरा छान आवरून बाहेर आली तर बाहेरचे दृश्य पाहून थक्क झाली.." हे काय आहे?"
" सरप्राईज.... आज आहे आपल्याकडे हळदीकुंकू... तिळगूळ घ्या गोड गोड बोला..."
" प्लीज, आता रडून अजिबात मेकअप खराब करू नकोस.." सुदीप प्रेमाने म्हणाला..
" कोणाकोणाला बोलावले आहे?"
" बघ तर जरा.."
 एवढ्यात बाजूंच्या काकूंची नात त्यांना घेऊन आली.. वीरने तिच्याशी बोलून सगळे गुपचूप ठरवले होते..
त्यांना बघून समीरा खुश झाली.. 'आता आले हं' असे म्हणत ती आधी देवाजवळ वाण ठेवून आली.. तोपर्यंत बाकीच्या बायकाही आल्या होत्या. सगळ्यांनाच हे सरप्राईज माहित असल्यामुळे त्यांच्या मनात या तीन पुरूषांबद्दल कौतुक होते, आणि कुठेतरी समीराचा हेवाही वाटत होता..सगळ्याजणी येताच सुदीपने समीराच्या हातात एक पिशवी दिली आणि कानात पुटपुटला, ते ऐकून समीराला आधी आश्चर्य वाटले पण हसत हसत ती हो म्हणाली...
तिने हळदीकुंकवाचे तबक घेतले आणि सगळ्यात आधी ती काकूंकडे गेली त्यांना हळदीकुंकू लावून त्यांच्या हाती ती पिशवी देऊन म्हणाली," हे तुमचे खास वाण आमच्याकडून"
काकू फक्त नाही नाही अशी मान हलवत होत्या.. पण बाकीच्यांना त्या पिशवीत काय आहे याची उत्सुकता होती.. काकूंच्या नातीने ,नीराने ती पिशवी उघडली तर फिकट हिरव्या रंगाची छानशी साडी होती.. ते पाहून काकूंनी रडायला सुरुवात केली.. आजोबा पुढे येऊन म्हणाले, " रडायची काही गरज नाही हा काकू.. खरेतर मीच सुदीपला हि साडी आणायला सांगितली. अहो इतके वर्ष पाहतो आहे तुम्हाला हिरव्या रंगाशिवाय दुसरा रंग नसायचा तुमच्या अंगावर.. अगदी क्वचित घातला तर दुसरा रंग.. गेले काही दिवस त्या पांढर्‍या साड्यांमध्ये पाहून डोळ्यांना आणि त्याहून जास्त मनाला त्रास व्हायचा.. जाणारा माणूस जातो म्हणून राहिलेल्यांनी किती शोक करायचा. बघा पटले तर.. भावाच्या नात्याने सांगतो.."
    हे ऐकून सगळेच शांत झाले होते.. तेवढ्यात वीरने आणि नीराने सगळ्यांना लाडू, हलवा, फुले द्यायला सुरुवात केली. समीराने वाण दिले, सुदीपने सगळ्यांना डिश भरून दिल्या.. ज्यांच्याकडे हळदीकुंकू झाले होते त्यांना काकूंना बोलवायचे आपल्याला का नाही सुचले म्हणून पश्चाताप झाला ,तर ज्यांचे व्हायचे होते त्यांनी काकूंना आधी बोलवायचे असे मनाशी ठरवून ठेवले..उरलेला समारंभ छान झाला.. काकूंच्या डोळ्यात कौतुक दाटून आले होते...
   सगळे गेल्यावर समीरा म्हणाली, "Thank you so much....तुम्हा तिघांनाही, याच्या आधी एवढा छान समारंभ कधीच झाला नव्हता माझा.."
 त्यावर नेहमीप्रमाणे आजोबा म्हणाले," हे बघ, थँक यू वगैरे म्हणायची गरज नाही.. मी पहिल्यापासूनच असाच कल्पक आहे, सुदीप जरी माझाच मुलगा असला तरी माझ्याएवढ्या कल्पकतेने तो कोणताही समारंभ अरेंज करू शकत नाही आणि वीर तर नाहीच नाही.."
हे ऐकून वीर आणि सुदीप हसायला लागले पण समीराच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू होते...



कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
 दादर मुंबई