आईच पत्र

A Small Letter From Mother To Her Teenager Son

"किती लवकर मोठी होतात ना मुलं?" ह्या एका वाक्याने जगातल्या सगळ्या आयांना आनंद आणि दुःख एकाच वेळी होत असेल, नाई का?

डॉक्टरांनी आपल्या हातात आणून दिलेलं छोटंसं बाळ वर्षभरात कधी धावायला लागतं अन मोठं होतं कळतच नाही.

बघता बघता तू १४ वर्षांचा झालास. तू आता teenager आहेस. त्या निमित्ताने तुझ्याशी थोड्या गप्पा मारायच्या होत्या.

आता कदाचित तुला त्या कळणार नाही, पण मोठा झाल्यावर मी हे का बोलतेय ते तुला कळेल.


तू तुझ आयुष्य भरभरून जगावंस अशी माझी इच्छा आहे.

कुठल्याही प्रकारे मन मारून जगू नकोस.

वेगवेगळ्या कला शिक, अभ्यास कर, फिरायला जा.

ज्या गोष्टीतून तुला आनंद मिळतोय, तुझ्या मनाला शांत वाटतंय त्या गोष्टी कधीच सोडू नकोस. 

स्वतःला खुश ठेव. सुखाची जबाबदारी दुसऱ्या माणसावर सोपवू नकोस. ते तुझ्या आतून येऊ देत.

प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची स्वतःची अशी एक unique identity घेऊन येतो. परमेश्वराच्या त्या देणगी ला जप आणि वाढवत रहा.

तुला हवं ते क्षेत्र निवड फक्त एक लक्षात ठेव की आपण आपल्या देशाचं काहीतरी देणं लागतो. तू ज्या क्षेत्रात जाशील तिकडे आपल्या देशासाठी काहीतरी तुझ्या हातून हातभार लागू देत.

स्वतः वर प्रेम कर, देवावर प्रेम कर, देशावर प्रेम कर.

प्रेम वाटत रहा.


ह्या जगात चांगल्या बरोबर वाईट लोकांची सुद्धा कमी नाही.

वयात आल्यावर अनेक प्रलोभन तुझ्या वाटेला येतील. त्याच्या वाटेला पडू नकोस. व्यसन करायचं असेल तर चांगल्या कार्याचं व्यसन कर.

चूक झालीच तरी जबाबदारी स्वीकारून सुधारायची तयारी ठेव.

चुकत नाही असा एकपण माणूस आतापर्यंत जन्माला आला नाही. त्यामुळे perfection च्या नादी लागू नकोस.

Consistency चा मागे लाग. 

होऊ देत चुका. त्या मधूनच नवे मार्ग काढत रहा.

वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगल म्हणण्याची धमक ठेव.

निडर हो, स्वच्छ मनाचा हो, पारदर्शी हो, प्रसंगी जशास तसा वाग, माफी मागण्याची आणि माफ करण्याची दोन्हीची ताकद ठेव.

भौतिक, अध्यात्मिक, शारीरिक, आर्थिक, मानसिक सगळ्या पातळ्यांवर प्रगती करत रहा. आणि अपयश आलं तरीही खचून जाऊ नकोस. पुन्हा जोमाने कामाला लाग.

आयुष्य Whole heartedly जग.

आनंद वाटत रहा.

आणि तुझी unique identity जपत रहा.


- तुझी आई