"डॉक्टर काय म्हणतात?" चारू.
"वयानुसार व्हायचेच असे. त्याला फारसा इलाज नाही." दादा म्हणाला.
चारू रात्रभर आईजवळ बसून राहिली.काही ना काही बोलत राहिली. आपले सुख तिने आईपाशी बोलून दाखवले. आपल्या संसारात मग्न राहून आईला आपण कसे काय विसरलो? याचे तिला खूप दुःख वाटत होते.
"अगं, मुलीचे कर्तव्यच आहे ते. लग्नानंतर तिने सासर सांभाळावे. माहेरी जास्त लक्ष देऊ नये." आई क्षीण आवाजात म्हणाली. "तुझा निरोप घेण्यासाठी जीव अडकला होता. पण तू भेटलीस. आता मी सुखाने..."
"आई, नको ना असे बोलू. तू..तू लवकरच बरी होशील. मी आले ना आता, सगळं काही ठीक होईल. मग आपण माझ्या सासरी जाऊ. तिथे आरामात हवे तेवढे दिवस राहा. कोणी काही म्हणणार नाही." चारू आईच्या कुशीत शिरून म्हणाली.
"बरं. तुझ्या मनासारखं होऊ दे. मग तर झालं?" आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
आणि खरोखरच दुसऱ्या दिवसापासून आईची तब्येत सुधारू लागली. एक दिवस वर्धन, मुले, सासुबाई- सासरे, वैदेही सारे जण आईच्या तब्येतीची विचारपूस करून गेले.
"आईंना बरे वाटले की आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊ. नको काळजी करू. सारं काही ठीक होईल." वर्धनच्या या शब्दांनी चारुला बळ मिळालं. तिच्या सासुबाईंनी आईची मायेने विचारपूस केली. चारूला खूप बरं वाटलं.
"वन्स, तुमचं सासर अगदी मायेचं आहे. नशिबाने अशी माणसे मिळतात." वहिनी चारुला म्हणाली.
दिवस धावत होते. अचानक आईची तब्येत बिघडली. सर्वांनी धावपळ केली, डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर आई सर्वांना सोडून निघून गेली.
दिवस कार्य झाले आणि वहिनीने चारूच्या हातात एक चिठ्ठी ठेवली. "आईंचा निरोप..किंवा पत्र म्हणा हवं तर. मात्र त्यांनी तुम्हाला त्यांच्या पश्चात द्यायला सांगितलं होतं."
त्या चिट्ठीनुसार आईने आपले सगळे दाग-दागिने आपल्या सुनेला दिले होते. कारण माहेरचा वाटा मुलीला मिळाला तर तिला माहेरी जास्त किंमत राहणार नाही, असे आईला वाटत होते.
शिवाय चारूचे सासर सधन होते. तिला कशाची कमी नव्हती.
चारूने ती चिठ्ठी वाचून आपल्या वहिनीकडे दिली."मला इथलं काही नको. केवळ माहेरी येण्याचा हक्क हवा." चारू म्हणाली.
"वन्स, हा वाटा मला मिळाला काय आणि तुम्हाला मिळाला काय..तुमचं माहेर तुमच्यासाठी कधीच परकं होणार नाही." वहिनीने शब्द दिला.
दुसऱ्या दिवशी चारू आपल्या माहेरच्या माणसांचा निरोप घेऊन बाहेर पडली. लग्नानंतर अनेक वर्षांनी गेले कित्येक दिवस ती आईच्या, आपल्या माहेरच्या माणसांच्या सहवासात इतके दिवस राहिली होती. आता आपल्या माणसांचा निरोप घेताना तिचे डोळे पाणावले. "पुन्हा या घरात येताना आई इथे नसेल. पण तिचे अस्तित्व मात्र कायम असेल."
चारू आपल्या सासरी आली. तिला पाहताच मुले तिला बिलगली.
"आजपासून मला तुझी आई समज." सासुबाईंनी तिची समजूत काढली. चारुला वाटलं, 'आईचा कायमचा निरोप घेणं सोपं नसतं. पण सासुबाईंना आई मानणं त्याहूनही अवघड असतं. पण काहीही असो शेवटी आई ती आईच असते.' आपल्याच विचारात तिने सासुबाईंना कधी मिठी मारली हे कळलंच नाही तिला!
समाप्त.
©️®️सायली जोशी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा