आईचा निरोप भाग 3

Katha Sykhachya Ani Dukhachya Kashnanchi

हॉटेलमध्ये मनसोक्त जेवण पार पडले आणि सगळे आपापल्या घरी परतले.दिवसभर दमून गेल्याने मुले लवकर झोपली. पण चारुला काही केल्या झोप लागेना. 

तिला राहून राहून आजचा दिवस आठवत होता. 'कधीतरी असा ब्रेक मिळायला हवा. मन एकदम ताजेतवाने होऊन जाते. हा उत्साह अनेक दिवस कामी येतो. 

हळूहळू जसे व्याप वाढले, तसा वेळ मिळेनासा झाला. पण आता मुले मोठी होत आहेत. त्यांना स्वतःची कामे जमतात. आपल्या मागे फारसा हट्ट करत नाहीत ती. शिवाय आई आहेतच मदतीला. खरं तर त्या आहेत म्हणून मी आहे. त्यांचा पाठिंबा नसता तर इतकी धावपळ जमलीच नसती मला.' विचारांच्या तंद्रीत चारूला झोप लागली.


तिला सकाळी जाग आली ती सासुबाईंच्या हाकेने. "आजही उठायला उशीर नको म्हणून हाक मारली. मुलांची शाळा आहे, डब्बा आहे. तुझा नवरा उठला की नाही अजून?" सासुबाई देवासमोर बसत म्हणाल्या.


"नाही. पण उठवते त्यांना." चारूने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं. मुले आवरून शाळेला गेली. पण वर्धन उठायचे नाव घेईना.


"अहो, आज जायचं नाही का कामाला?" चारू वर्धनला गदागदा हलवत म्हणाली.


"आज मूड नाही जायचा." वर्धनने चारुचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढले.


"अहो, काय हा बालिशपणा? अजून आई -बाबांचा नाष्टा व्हायचा आहे. त्यांना वेळेत लागतं सगळं. उठा पट्कन." 


"हम्म.. कालचे तुझे हट्ट बालिश नव्हते? पण मी काही बोललो का? नाही ना?"


तशी चारू लाजली. तिला असं लाजताना पाहून वर्धन आणखी तिच्या जवळ आला. "माझा हा बालिशपणा पेंडिंग राहिला आता." तिच्या डोळ्यात पाहून तो म्हणाला आणि आवरायला पळाला.


चारू खूप खुश होती. सासुबाई तिचा आनंद टिपून घेत होत्या. दुपारी जेवणं झाल्यावर दोघी हॉलमध्ये आडव्या पडल्या.

"तुला सांगते चारू, आमचे हे स्वभावाने पडले घुमे. अगदी जवळून ओळख झाल्याशिवाय अजिबात बोलायचे नाहीत कुणाशी. त्यात आमचे नवीन लग्न झालेलं. नवरा - बायकोचं नातं कसं असावं यासाठी माझ्या मनात अनेक कल्पना होत्या. पण ह्यांनी त्या साऱ्या कल्पना मोडीत काढल्या. लग्नानंतर कित्येक वर्षे ते माझ्याशी जास्त बोलत नव्हते. बोललेच तर तेवढ्याच तेवढं बोलायचे. नंतर वर्षभरात वैदेहीचा जन्म झाला. पण वर्धनच्या जन्मासाठी आम्हाला अनेक वर्षे वाट पाहावी लागली. त्याआधी सासुबाई मला खूप बोलल्या म्हणून यांनी कधी नव्हे ते माझी बाजू घेतली आणि तेव्हापासून ते माझ्याशी व्यवस्थित बोलायला लागले." 


"पण आता वाटत नाही. बाबा बोलायचे नाहीत कोणाशी!" चारू.


"हो. वयानुसार मोठेपण येतं, समज येते. ते मुला -नातवंडात रमले. आता त्यांना कळलं की बोलल्याविना पर्याय राहतच नाही कुठे." सासुबाई जुन्या आठवणींत रमल्या. बोलता बोलता दोघींना झोप लागली. 


चारच्या सुमारास अचानक फोन वाजू लागला. चारुची झोपमोड झाली. तिच्या बाबांचा फोन होता. 'आईची तब्येत बरी नाही. तू ताबडतोब निघून ये.' सासुबाईंनी तिला निरोप दिला.


चारुला काही सुचेना. 'अचानक आईला काय झाले? तिची तब्येत नेहमी उत्तम असायची. कधी डोकेदुखी नाही की कधी पोटदुखी. साधी गोळीही कधी घेतली नाही तिने! मला बोलावलं याचा अर्थ काहीतरी सिरियस असावं..' सासुबाईंनी तिला धीर देत नलूला फोन केला. नलू धावतच घरी आली. चारुला बॅग भरायला मदत करून तिने आपली गाडी काढली. सासुबाईंनी चारुला पाच- सहा पोळ्या आणि भाजी बांधून दिली. "वेळ पडल्यावर खा. नाहीतर रात्रीच्या जेवणाला होईलच. मुलांकडे मी बघते. तू जाऊन ये. इथली काळजी करू नकोस आणि आईला जप." सासुबाई डोळ्याला पदर लावत म्हणाल्या.


नलूने चारुला एस.टीमध्ये बसवून दिले.

बऱ्याच वेळाने गाडी गावात पोहोचली. चारूचा भाऊ तिला स्टँडवर न्यायला आला होता. 

"आई कशी आहे?" दादाला पाहताच चारु म्हणाली.

"तशी बरी आहे. पण तुझ्या आठवणीत रडते आहे नुसती म्हणून तुला फोन केला." 


आईला पाहताच चारू तिच्या गळ्यात पडली. "आई, किती खराब झाली तब्येत? मला कोणी काहीच कसं कळवलं नाही? मी आपल्याच नादात, संसारात मग्न होते. मला तुझी आठवण कशी राहिली नाही! आणि तू अशी झोपून? सतत तू कामात व्यस्त राहायचीस..आम्ही कायम तुला तसेच पाहिले आहे आणि आता अचानक काय झाले?" 


"अगं, शरीर आहे ते. केव्हातरी थकायचेच. आत्ताच आलीस ना? जा, हात -पाय धुवून घे. देवाच्या पाया पड." 

चारू आत गेली. पण देवापुढे हात जोडताना तिचा बांध फुटला. वहिनीच्या गळ्यात पडून ती खूप रडली. 

"वन्स, आम्ही काही कमी केलं नाही आईंना. पण शरीराने आणि मनाने खचून गेल्या आहेत त्या. म्हणतात आता निरोप घ्यायची वेळ आली."


क्रमशः

आई बरी होईल? की आणखी काही? पुढचा भाग नक्की वाचा.

🎭 Series Post

View all